बॅड ब्लड: सिक्रेटस अ‍ॅण्ड लाईज इन अ सिलिकॉन व्हॅली स्टार्टअप

जॉन कॅरीरू

/media/BB8HXL6MdL.jpg

पैसा, प्रसिद्धी… फसवणूक, कैद! - मिलिंद कोकजे

एलिझाबेथ ही स्टॅनफोर्ड विद्यापीठातील विद्यार्थिनी. तिने शिक्षण अर्धवट सोडून एका महत्त्वाच्या कल्पनेवर काम करायला सुरूवात केली. अतिमहत्त्वाकांक्षेपाटी सगळ्या समाजालाच वेठीला धरणाऱ्या एका उद्योजकाभोवती असलेले वलय भेदून तिचे खरे ‘मूल्यांकन’ करणाऱ्या पुलित्झरविजेत्या पत्रकाराची ही ‘स्टोरी’ केवळ धाडसीच नाही, तर विलक्षणही आहे.

हे वर्ष सुरू होत असताना म्हणजे ३ जानेवारी २०२२ रोजी अमेरिकेत एलिझाबेथ होम्स हिच्यावर फसवणुकीचा आरोप सिद्ध झाला. ही एलिझाबेथ कोण असा प्रश्न अनेकांना पडेल. आरोग्य क्षेत्रातील एक अफलातून कल्पना डोक्यात आलेली ती एक महत्त्वाकांक्षी उद्योजक होती. तिच्या डोक्यातली कल्पना तिला प्रत्यक्षात कधीच आणता आली नाही. परंतु अतिमहत्त्वाकांक्षेमुळे आपले अपयश मान्य न करता ती, तिचे भागीदार, संचालक आणि गुंतवणूकदार यांना आपल्या यशाबाबत सतत फसवत राहिली. एलिझाबेथने उभे केलेले सर्व अडथळे पार करून आणि कायदेशीर कारवाईचा धोका पत्करून तिने केलेल्या फसवणुकीची केलेली पोलखोल म्हणजे जॉन कॅरीरू या वॉल स्ट्रीट जर्नल या वर्तमानपत्रात काम करणाऱ्या फ्रेंच अमेरिकन पत्रकाराचे ‘बॅड ब्लड: सिक्रेटस अ‍ॅण्ड लाईज इन अ सिलिकॉन व्हॅली स्टार्टअप’ हे पुस्तक.

एलिझाबेथ ही स्टॅनफोर्ड विद्यापीठातील विद्यार्थिनी. तिने शिक्षण अर्धवट सोडून एका महत्त्वाच्या कल्पनेवर काम करायला सुरूवात केली. एखाद्या रुग्णाचा आजार, त्या आजाराचे तपशील समजून घेण्यासाठी रक्ततपासणी करणे हा आता अनेकांच्या आयुष्याचा एक नियमित भाग झालेला असला तरी अनेकांना तपासणीसाठी रक्त देताना भीती वाटते. वेगवेगळ्या चाचण्यांसाठी कधी कधी पुन्हा पुन्हा रुग्णाचे रक्त घ्यावे लागते. एलिझाबेथलाही या पद्धतीने बऱ्यापैकी प्रमाणात रक्त काढून घेण्याच्या कल्पनेची लहानपणापासून भीती वाटत असे. त्यामुळे हा सगळा त्रास कमी कसा होऊ शकेल याचा विचार ती करत असे. यातून तिच्या डोक्यात अशी कल्पना आली की रुग्णाच्या बोटाच्या टोकावर सुई टोचून केवळ एक थेंब रक्त काढून घेतले आणि तो थेंब एका यंत्रात टाकून रक्ताच्या सर्व चाचण्या आणि त्याही खूप अंतरावरून करता आल्या तर…

असे यंत्र तयार करण्याच्या कल्पनेने झपाटलेल्या एलिझाबेथने वयाच्या केवळ १९ व्या वर्षी म्हणजे २००३ साली थेरानोस (थेरपी आणि डायग्नोसिस या दोन शब्दांपासून तयार केलेला शब्द) ही रक्ततपासणी तंत्रज्ञान कंपनी काढली आणि असे यंत्र विकसित करायला सुरुवात केली. ‘बॅड ब्लड: सिक्रेटस अ‍ॅण्ड लाईज इन अ सिलिकॉन व्हॅली स्टार्टअप’ या पुस्तकाची सुरुवात होते (खरे तर प्रस्तावना) ती १७ नोव्हेंबर २००६ ला ‘थेरानोस’चा बायोइन्फरमॅटिक्स विभागाचा प्रमुख टीम केम्प याने एलिझाबेथच्या वतीने कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या एका ई-मेलने. स्वित्झर्लंडमधील नोवार्टीस या बलाढ्य औषध कंपनीसमोर आपण विकसित केलेल्या नव्या रक्तचाचणी तंत्रज्ञानाचे यशस्वी प्रात्यक्षिक एलिझाबेथने दिले असून त्यामुळे प्रभावित झालेल्या नोवार्टीसच्या अधिकाऱ्यांनी आपल्या कंपनीबरोबर आर्थिक सहकार्य करण्याकरता प्रस्ताव देण्यास सांगितले असल्याचे कर्मचाऱ्यांना ई-मेलने कळवले जाते.

या सुमारास कंपनीचा अध्यक्ष होता डोनाल्ड लुकास. या लुकासनेच लॅरी एलिसन या ८० च्या दशकातील तरुण उद्योजकाला मार्गदर्शन करून त्याची ‘ओरॅकल’ ही कंपनी मोठी केली होती. कंपनीचा एक संचालक होता ‘स्टॅनफोर्ड स्कूल ऑफ इंजिनीर्यंरग’चा अधिष्ठाता र्चँनग रॉबर्टसन. संचालकांच्या या मांदियाळीत नंतर माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज शुल्ट्झ आणि माजी परराष्ट्र सचिव हेन्री र्किंसजरसारखी महत्त्वाची माणसेही सामील झाली आणि त्यामुळे कंपनीला आणखीच वजन प्राप्त झाले. या नावांमुळे लोकांचा ‘थेरानोस’वरचा विश्वास अधिकच वाढला.

अनेक चांगल्या चांगल्या मोठ्या कंपन्यांमधील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनाही एलिझाबेथने आपल्या कल्पनेने आकर्षित करून घेतले. त्यांना आपल्या कंपनीत अधिकारपदाच्या जागा दिल्या. तिच्या कर्तृत्वाचा आणि यशाचा आलेख इतका सतत उंचावत होता की ‘ओरॅकल’चा एलिसन आणि रूपर्ट मरडॉकसारख्या माध्यम सम्राटानेही तिच्या कंपनीत सात कोटी डॉलर्स गुंतवले होते. त्यांनी तिच्या कंपनीचे मूल्यांकन ९०० कोटी डॉलर्स इतके केले हाते. त्यांना तिच्या या कंपनीविषयी खूपच आशा असल्याने त्यांनी कंपनीचे इतके प्रचंड मूल्यांकन केले असले तरी कंपनीने वेगवेगळ्या औषध कंपन्यांशी केलेल्या करारानुसार तिचे मूल्यांकन १.६५ कोटी डॉलर्स इतके होते.

एलिझाबेथने विकसित केलेले तंत्रज्ञान अगदी सोपे होते. बारीक सुई बोटाच्या टोकावर टोचल्यानंतर बाहेर आलेले एक दोन थेंब रक्त एखाद्या क्रेडिट कार्डाच्या आकाराएवढ्या पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिक कुपीवर घ्यायचे आणि ती कुपी रीडर नावाच्या एका छोट्या पेटीच्या आकाराच्या यंत्रात सारायची. ते यंत्र वायरलेस यंत्रणेच्या माध्यमातून रक्तातील घटकांची माहिती मुख्य सर्व्हरला पाठवेल आणि तेथे त्याचे विश्लेषण होऊन चाचणीचा निकाल वायरलेस यंत्रणेने परत पाठवला जाईल.

औषध कंपन्यांना यात रस निर्माण झाला तो त्यांच्या नव्या औषधांच्या चाचण्या करण्याची प्रक्रिया सोपी व कमी खर्चात होत असल्याने. या कंपन्या ज्या रुग्णांवर चाचण्या करणार होत्या, त्यांच्या घरात हे रीडर्स बसवणार होत्या. ज्यायोगे त्या दिवसभरात अनेक वेळा रुग्णांच्या रक्तातील घटकांची माहिती वायरलेसने यंत्रणेने मिळवून त्याचे विश्लेषण करू शकत होत्या. त्यासाठी रुग्णांना कुठेही बाहेर जाण्याची गरज नव्हती. ते कंपन्यांना घरबसल्या वायरलेसवरून माहिती पाठवू शकत होते. अनेक वेळा रक्त काढण्यातही अडचण नव्हती, कारण बोटाला टोचून फक्त एकदोन थेंब रक्त मिळवणे पुरेसे होते.

परंतु या सर्व प्रक्रियेत असलेली एक अडचण कंपनीतील काही निवडक लोकांनाच माहीत होती. ती म्हणजे ही सर्व प्रक्रिया नेहमीच पूर्ण व्यवस्थित चालत असे, असे नाही. अनेक वेळा चाचण्यांचा निकाल येतच नसे. त्यामुळे औषध कंपन्या किंवा गुंतवणूकदार यांच्यापुढे प्रात्यक्षिक देताना जुन्या चाचण्यांचे निकाल आत्ताच आलेले निकाल म्हणून दाखवत त्यांची फसवणूक केली जात असे. नोवार्टीसबरोबरच्या बैठकीनंतर परत आलेली एलिझाबेथ जेवढी उत्साहात होती तेवढे तिच्याबरोबर त्या बैठकीला उपस्थित असलेले तिचे सहकारी उत्साहात वा आनंदात नव्हते. त्याचे कारणही कदाचित हेच होते.

औषध कंपन्याबरोबर केलेल्या करारांमुळे (खरे तर असे करार झाले असल्याचे एलिझाबेथने जाहीर केल्याने) कंपनीचे मूल्यांकन वाढत होते, गुंतवणूकदार पुढे येत होते. कोणत्याच नवउद्योगाचे तीन वर्षे एवढ्या कमी काळात एवढे जास्त मूल्यांकन झालेले नव्हते, ना त्यांच्यात इतकी मोठी गुंतवणूक झाली होती. त्या दृष्टीने पाहता एलिझाबेथने मोठेच यश मिळवले होते. परंतु कंपनीचा वित्त अधिकारी मोस्ले याला मात्र ते करार कधीच बघायला मिळाले नाहीत. काही ना काही कारण काढून एलिझाबेथ ते करार दाखवणे टाळत राहिली. तिच्या या वागण्याची शंका येऊन मोस्लेने यंत्रणा नीट चालत नसल्याची माहिती आपल्याला मिळाली असल्याचे तिला सांगितले तेव्हा तिने त्याला काढून टाकले.

ही सुरुवात होती. आपले अपयश झाकत राहण्यासाठी एलिझाबेथ आणि कंपनीचा सीईओ, भागीदार आणि नंतर तिचा नवरा झालेला रमेश बलवानी यांनी एकच सपाटा लावला, शंका घेणाऱ्या प्रत्येकाला काढून टाकण्याचा. अपयश उघडे पडण्याची भीती निर्माण झाल्यामुळे मग सोडून जाणाऱ्या लोकांकडून कोणताही कागद वा मेल बाहेर जाऊ नये म्हणून प्रचंड सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्यात आली. ही सुरक्षा व्यवस्था शारीरिक पातळीवर होती आणि संगणकाच्या पातळीवरही होती. कर्मचाऱ्यांचे मेल तपासायला सुरुवात झाली. बाहेर पडल्यावर माहिती उघड करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर गुप्ततेचा भंग केल्याबद्दल कायद्याचा बडगा उगारण्यात आला. काही लोकांना तर धमक्याही देण्यात आल्या.

याचवेळी एलिझाबेथने म़ॉल्समध्ये किंवा इतरत्र आपली यंत्रे ठेवून तेथे आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने लोकांच्या रक्तचाचण्या करून देत असल्याचे नाटक करायला सुरुवात केली. प्रत्यक्षात जुन्या पद्धतीनेच रक्त तपासून लोकांची फसवणूक करत होती. येथून हळूहळू एलिझाबेथच्या प्रगतीला खीळ बसायला सुरुवात झाली. पण ती इतकी धूर्त होती की संचालक मंडळात तिचेच बहुमत राहावे म्हणून तिने २०१३ साली तिच्याकडे असलेल्या प्रत्येक समभागाला १० मते असल्याचा ठराव मंजूर करून घेतला. परिणामी तिला ९९.७ टक्के इतका मताधिकार मिळाला. ‘‘संचालक मंडळ कोणते निर्णय घेतच नव्हते. एलिझाबेथच सर्व काही ठरवायची आणि त्याप्रमाणे तीच सर्व निर्णय घ्यायची,’’ असे शुल्ट्झ यांनी नंतर एका मुलाखतीत सांगितले. या शुल्ट्झ यांचा नातू तिच्या कंपनात काम करत होता. कंपनीत काही गोष्टी नीट चाललेल्या नाहीत याचा अंदाज आल्यावर त्याने आपल्या आजोबांना सावध करण्याचा प्रयत्न केला. पण त्याला उडवून लावून शुल्ट्झ यांनी एलिझाबेथवर अधिक विश्वास ठेवला.

एलिझाबेथने केलेल्या या फसवणुकीची, तिच्या उदयाची आणि अस्ताची कहाणी कॅरीरू याने आपल्या पुस्तकात मांडली आहे. ‘अ पर्पजफुल लाईफ’ या पहिल्या प्रकरणात अगदी नवव्या दहाव्या वर्षापासूनच कोट्यधीश होण्याचे तिचे कसे स्वप्न होते, तिचे पणजोबा सिनसिनाटी जनरल हॉस्पिटल आणि सिनसिनाटी विद्यापीठाचे संस्थापक कसे होते आणि आपल्या कामाच्या संदर्भात ती त्यांचा कसा अभिमानाने उल्लेख करीत असे येथपासून सुरू होणारी तिची ही सत्यकथा तिच्या विरुद्ध तपास यंत्रणांनी सुरू केलेल्या चौकशा आणि तपासाशी येऊन थांबते. या चौकशा आणि तपासाचीच परिणती म्हणजे ३ जानेवारीला एलिझाबेथवरील आरोप सिद्ध होणे. तिला आता सात महिन्यांच्या कैदेची शिक्षा होऊ शकते, परंतु ही शिक्षा अद्याप जाहीर झालेली नाही. होणाऱ्या शिक्षेचे सर्व श्रेय कॅरीरूलाच द्यायला हवे. अनेक माध्यमे तिच्या मुलाखती दाखवून, प्रसिद्ध करून तिची आरती ओवाळत असताना त्याने सर्वांच्या विरुद्ध जाऊन प्रश्न विचारण्याचे धैर्य दाखवले.

पुस्तकाच्या शेवटी कॅरीरूने अगदी प्रत्येक ई-मेलचा संदर्भ दिला आहे. आपले आरोप सिद्ध करण्यासाठी त्याने जवळजवळ १५० जणांच्या मुलाखती घेतल्या आहेत. एलिझाबेथने मात्र त्याला मुलाखत द्यायला नकार दिला होता. त्याचे ‘वॉल स्ट्रीट जर्नल’मधील एलिझाबेथवरील लेख आणि हे पुस्तक म्हणजे शोध पत्रकारितेचा एक उत्कृष्ट नमुना आहे.

या पुस्तकातील वृत्तान्तांसाठी कॅरीरू याला पुलित्झर पुरस्कार मिळाला आहे. त्याशिवाय जॉर्ज पोल्क अवार्ड फॉर फायनान्शिअल रीपोर्टिंग, जेराल्ड लोब अवार्ड फॉर र्डिंस्टग्विश बिझनेस अ‍ॅण्ड फायनान्शिअल जर्नालिझम आणि बार्लेट अ‍ॅण्ड स्टेला सिल्व्हर अवार्ड फॉर इन्व्हेस्टिगेटिव्ह फायनान्शिअल जर्नालिझम हे पुरस्कार त्याला मिळाले आहेत. या प्रकरणातील एक गमतीचा भाग म्हणजे, ‘थेरानोस’च्याही आधी एलिझाबेथने एक कंपनी स्थापन केली होती. तिचे नाव होते ‘रिअल टाईम क्यूअर्स’. त्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या पगाराच्या चेकवर कंपनीचे नाव चुकून ‘रिअल टाईम कर्सेस’ असे छापून आले होते. एलिझाबेथने नंतर ‘थेरानोस’मध्ये जे काही केले त्याचीच चुणूक या नावाच्या चुकीतून प्रतीत झाली नाही ना असा प्रश्न कोणालाही पडावा.
- milindkokje@gmail.com

द्वारा : लोकसत्ता वृत्तसेवा