द डिफरन्स एंजिन

लेखक : विल्यम गिब्सन आणि ब्रूस स्टर्लिग

/media/timb.jpg

अव-काळाचे आर्त : आता कृपया नको, विभाजन! - नंदा खरे

स्थळकाळ : ब्रिटन १८५५. पण हे ना आपल्या ओळखीचे ब्रिटन, ना आपल्या ओळखीचे १८५५ साल!

समजा असे झाले..

चार्लस बॅबेजने १८२४ साली त्याचे ‘डिफरन्स एंजिन’ रचले. तो संगणकांचा पूर्वज पूर्णपणे यांत्रिक आणि वाफेच्या एंजिनावर चालणारा होता. पेट्रोल-डिझेल एंजिने, वीज, यांचे शोधच लागले नव्हते! पण या ‘विचारी’ यंत्राच्या आधाराने ‘औद्योगिक मूलतत्त्व पक्ष’, (इंडस्ट्रियल रॅडिकल पार्टी) उभी झाली. घराणेशाहीतून येणारी लॉर्डशिप निवडणूक हरली. सामंती व्यवस्था संपली आणि वैज्ञानिक रॅड्सह्ण सत्तेत आले. काही बंडखोरी झाली. काही काळ यंत्रविरोधी ‘लडाईट’ ( Steampunk) चळवळीने दंगेधोपे केले. मग मात्र ‘द्रष्टय़ा’ (सॅव्हन्ट ) वैज्ञानिक लोकांना लॉर्डस करून शुद्ध ‘गुणाधिष्ठित’ (मेरिटोक्रॅटिक) राज्य घडले. १८३७ साली बॅबेजचे ‘अ‍ॅनालिटिकल एंजिन’ घडले. हा खराखुरा तर्कशास्त्र वापरणारा संगणक प्रचंड कार्डे वापरायचा. ते संगणक तंत्रज्ञान ब्रिटनला प्रचंड शक्तिमान बनवून गेले. जगाचा नकाशा बदलला. चिनी, रशियन आणि ब्राझिली साम्राज्ये आपापल्या कानाकोपऱ्यांत उभी, तर इतरत्र ब्रिटिश साम्राज्यावर कधीच काही मावळत नसे! उत्तर अमेरिका खंडात ब्रिटिश (कॅनडा) भाग, आणि त्या खाली कॅलिफोर्निया आणि टेक्सासची गणराज्ये, उरलेले छोटेसेच ‘युनायटेड स्टेटस ऑफ अमेरिका’ हे गुलामगिरीच्या मुद्दय़ाने उत्तर-दक्षिण विभागलेले होते. आणि हो! कार्ल मार्क्‍सच्या विचारांनी प्रेरित मॅनहॅटन हे साम्यवादी द्वीप-राष्ट्र!

सगळय़ा संगणकी-औद्योगिक व्यवहारामागे ऊर्जा मात्र कोळसा जाळणाऱ्या वाफेच्या एंजिनांचीच. त्यामुळे धूळ, धूर, विषारी वायू, राख असे भरपूर प्रदूषण असे. आणि राजधानी लंडन तर प्रदूषणाने पार झाकोळलेली होती, जिथे जगणेच अस होते. थेम्स नदी तर केवळ विषारी गटार उरली.

यांतच एक गूढ बाब अवतरली. दुधाळ पांढऱ्या कचकडय़ाचा पोस्टकार्डाएवढय़ा आकाराच्या पंचकार्डाचा एक संच असल्याची वार्ता पसरली. ही कार्डे ब्रिटिश संगणकांत चालत नसत, पण फ्रेंच ‘नेपोलियन’ यंत्रांमध्ये चालत असत. असे सांगितले जाई की बॅबेजची सहकारिणी लेडी अ‍ॅडा लव्हलेस हिने आपला जुगाराचा षौक पूर्ण करायला ही मोडस

(Modus) नावाची नियमावली घडवली होती. आता जर हा कार्डसंच जुगारात भरपूर कमावून देण्याची शक्यता होती, तर त्यामागे लागलेले भलेबुरे लोकही भरपूर होते. एक होती सिबिलह्ण ही एका माजी लडाईट यंत्र-द्वेष्टय़ाची मुलगी, आता पेशेवरह्ण चोरटे-धंदेवाली झालेली. एक होता मॅलरी हा ब्राँटोसॉरस या महाकाय डायनोसॉरसचे जीवाश्म शोधलेला पुराजीवशास्त्री, ज्याने कार्डसंच ब्राँटोच्या कवटीत लपवला! तिसरा होता ऑलिफॅन्ट हा वार्ताहर-हेर, थेट साम्राज्याच्या सेवेतले एक नररत्न.

ही तीन प्रमुख पात्रे, तो सुरुवातीच्या ‘कचकडय़ाचा’, प्लास्टिकचा कार्डसंच आणि पाश्र्वभूमीला लंडनचा झालेला गॅस-चेंबर, यांच्याभोवती रचलेली विज्ञान कादंबरी म्हणजे ‘द डिफरन्स एंजिन’ (१९९० व नंतर अनेक आवृत्या, एक व्हिडीओ गेम, वगैरे!). लेखक दोन, विल्यम गिब्सन आणि ब्रूस स्टर्लिग, दोघेही ख्यातनाम विज्ञानकथालेखक. अनेक मजेदार राजकीय आणि वैज्ञानिक-औद्योगिक संदर्भानी श्रीमंत केलेली ही साहित्यकृती आहे. उदाहरणार्थ, वीज नाही म्हणजे सिनेमे नाहीत. पण पिक्सेल ( pixel) ही चित्रांचे तुकडे पडायची पद्धत त्याआधी सापडली. त्यामुळे रंगीत ठोकळे हलवून सुस्त का होईना, चलचित्रे दाखवता येतात!

शोध काय क्रमाने लागतात? वाफेचे एंजिन – विजेची मोटर -पेट्रोल-डिझेल एंजिने, या क्रमाने शोध लागणे, हा निसर्ग-नियम नाही. गिब्सन-स्टर्लिग यांच्या कादंबरीनंतर वाफेच्या एंजिनावरच थांबलेल्या ‘जगांबाबत’ची विज्ञानकथांची एक शाखाच घडली आहे; स्टीमपंक ( Steampunk) नावाची.

मॅलरी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला हृदयक्रिया बंद पडून मरतो. तात्कालिक कारण असे : ५५ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर प्राण्यांचे प्रकार आणि संख्या एकाएकी वाढू लागल्या. या प्रकाराला पुराजीवशास्त्रात ‘कँब्रियन स्फोट’ म्हणतात. याचे स्पष्टीकरण सुचले कॅनडातील काही जीवाश्मांमुळे. तर या जीवाश्मांचे नमुने मॅलरीपुढे येतात.. आणि आता आपल्या शास्त्राचा आमूलाग्र नवा विचार करावा लागणार, याने मॅलरी हादरतो आणि मरतो!

‘सिबिल’ या नावाची कादंबरी बेंजमिन डिझराएली याने १८४५ साली लिहिली. तिच्या मागची प्रेरणा होती ‘चार्टिस्ट’ चळवळ. ही चळवळ सर्व प्रौढ पुरुषांना गुप्त मतदानाचा हक्क हवा, निवडणुकीत उभे राहायला लागू असलेली मालमत्तेची अट रद्द व्हावी, वगैरे आज सोप्या वाटणाऱ्या सुधारणांसाठी होती. पण सुरुवातीला ती दडपलीच गेली, आणि तीही कठोरपणे गोळीबार वगैरे करून. डिझराएली वगैरेंनी पुढे त्या सुधारणा करवून घेतल्या, त्याही बहुमताने. डिझराएली तर ब्रिटनचा पंतप्रधानही झाला.

कादंबरीत १८५५ मध्ये प्रदूषणाने उडवलेला हाहाकार प्रत्यक्षात १९५४ साली लंडनने भोगला. सुमारे चार हजार माणसे एका रात्रीत मेली! नंतर मात्र लंडन शहराने कठोर उपाय योजून गावाचे वातावरण आणि नदी स्वच्छ केले आहेत.

अरे हो! तो कार्डाचा संच जुगाराबद्दल नसतोच. तो असतो तर्कशास्त्रातल्या काही विचित्र वाटणाऱ्या प्रमेयांबद्दल. ही प्रमेये ‘ग्यडेलची अपूर्णतेची प्रमेये’ म्हणून ओळखली जातात. त्यांचा मला समजलेला अर्थ असा : एखादी तर्कशास्त्रीय पद्धत एकाच वेळी संपूर्ण आणि सुसंगत (कम्प्लीट अ‍ॅण्ड कन्सिस्टन्ट) असू शकत नाही! काही सत्ये तर्काच्या पलीकडेच राहतात. तर लेडी अ‍ॅडा लव्हलेस फ्रान्समध्ये एका भाषणातून कार्डसंच वापरून ही प्रमेये लोकांना समजावून देते. त्यांचा पैसे-जुगाराशी संबंधच नसतो!

अशी म्हटले तर ऐतिहासिक, म्हटले तर काल्पनिक अशी ही कादंबरी आहे. वाचकाने साहित्याकडे केवळ बुद्धिहीन करमणुकीसाठी येऊ नये; हे ठामपणे मांडणारी ही कलाकृती अनेक पुरस्कार वगैरे मिळवून गेली. डॉ. जयंत नारळीकरांनी पानिपतच्या युद्धात विश्वासरावांना मारणारी गोळी वीतभर डावी-उजवीकडून गेली असती, तर आज पुण्याहून मुंबईला जाताना व्हिसा लागायची शक्यता होती, अशी एक मजेदार कथा लिहिली होती. नारळीकरांचे नाव ऐकून बहुतेकांनी तिला विज्ञानकथांमध्ये मोजले. प्रत्यक्षात ती ‘पर्यायी इतिहासा’ची, ‘अल्टर्नेट हिस्ट्री’ची गोष्ट होती. त्याच प्रकारातली ‘द डिफरन्स एंजिन’ ही कादंबरी आहे. पण! राजकारणात तथाकथित द्रष्टेपणा, गुणवत्ता वगैरेंना किती वजन द्यावे? गुणवत्तेपलीकडे माणुसकी नसते का? प्रदूषणाकडे सहजगत्या का दुर्लक्ष होते? वगैरे अनेक प्रश्न कादंबरी हलक्या हाताने उभे करते. या बाबतीत तीनस्थानी साहित्याच्या जवळ जाते.. पण जवळच जाते. शेजारी उभी ठाकते. जागा ‘घेत’ नाही!

या सदराचे काम अर्धेच..

गेले वर्षभर, २०२१ सालाच्या सुरुवातीपासून आम्ही काही मित्र-मैत्रिणी ‘अव-काळाचे आर्त’ हे सादर चालवतो आहोत. इंग्रजी यूटोपियन – डिस्टोपियन कलाकृतींची परीक्षणे, हे या सदराला धरून ठेवणारे सूत्र आहे. आमच्या दृष्टीने हे काम फार तर अर्धे झाले आहे. खुद्द ‘यूटोपिया’ हे सर थॉमस मोअरचे पुस्तक, ‘एरेव्हॉन’(उलटे ल्ल६ँी१ी !) हे सॅम्युएल बटलरचे पुस्तक, ‘फॅरनहाईट ४५१’ हे ब्रॅडबरीचे पुस्तक, अशी अनेक ‘दिग्गज’ पुस्तके परीक्षणांमधून तरी मराठीत यायला हवीत. उल्लेखलेल्या सर्व ‘मानवी’ कलाकृती आहेत, काही मोठाले अंश सार्वकालिक आणि जगभर लागू पडतीलसे आहेत. सध्याच्या अति-खंडित, अति-विभाजित जगात माणुसकीचा उद्घोष करणारे आहेत. मानवाचे निसर्गातील, विश्वातील स्थान नव्याने तपासायला लावणाऱ्या या साहित्यकृती आहेत. प्रत्येक पुस्तक विचार करायला लावणारे आहे.

प्रतिसाद

आपण ‘विचार करणे’ हा छंद म्हणून जोपासू शकतो का? हरकत काय? प्रत्येक लेखानंतर आम्ही ‘निर्मनुष्य माळरानावर बोंबलत नाही आहोत’ हे जाणवून देणारे प्रतिसाद येत. आम्ही सारे स्वत:साठी, इतरांसाठी खूश होत असू. सुरुवातीच्या ठरवलेल्या नावांमध्ये काही जण जोडले गेले. इतर एक दोन ‘मी येऊ?’ विचारत दारात उभे आहेत.

पुस्तकेच का? सध्या इतर माध्यमांतही खूप काही घडते आहे, ना? यासारख्या प्रश्नांना आज आमच्याकडे उत्तरे नाहीत. पण गेली दीडदोन वर्षे माणसापासून माणूस तुटलेले पाहिल्यावर ‘आता कृपया नको, विभाजन!’ असेही म्हणायचा मोह होतो. भौतिक मर्यादा आहेतच. असणारच.

द्वारा : लोकसत्ता वृत्तसेवा