नागझिरा - जंगलातील दिवस

व्यंकटेश माडगूळकर

/media/नागझिरा - जंगलातील दिवस_nagzira.jpg

मनोगत - व्यंकटेश माडगूळकर


महाराष्ट्रातील एखाद्या आडबाजूच्या जंगलात जाऊन महिना दोन-महिने राहावे; प्राणिजीवन, पक्षिजीवन, झाडेझुडे पाहात मनमुराद भटकावे आणि ह्या अनुभवाला शब्दरूप द्यावे, हा विचार गेली काही वर्षे माझ्या मनात घोळत होता.

काही परदेशी प्राणिशास्त्रज्ञांनी असा उद्योग करून लिहिलेली उत्तम पुस्तके माझ्या वाचनात आल्यापासून ही इच्छा फारच बळावली. जॉन शेल्लरने आफ्रिकेच्या जंगलात गोरिलाच्या कळपा बरोबर हिंडून लिहिलेले विलक्षण वाचनीय असे पुस्तक "The year of the Gorilla" किंवा भारतातील कान्हा-किसलीच्या जंगलात चौदा महिने राहून लिहिलेले, " The Deer And The Tiger" जेन गुडालने सेरेनगटी ह्या आफ्रिकेतील जंगलात राहून लिहिलेले " Innocent Killers" हे जंगली कुत्री, कोल्हे आणि तरसे ह्या प्राण्याबद्दल अद्‌भुत माहिती देणारे पुस्तक किंवा तिचेच चिपांझीच्या कळपात राहून लिहिलेले "In The Shadow of Man" डगल हॅमिल्टनचे "Among The Elephants" हे जंगली हत्तींच्या कळपाबरोबर राहून लिहिलेले पुस्तक किंवा गाव्हिन मॅकसवेलचे १२1४०0८ टा एग्वांश' हे पाणकुत्र्यावरचे पुस्तक... किती म्हणून नावे सांगावीत? मला ही सर्वच पुस्तके अत्यंत प्रभावी वाटली आणि मराठीत असे काही का नसावे, अशी खंतही वाटली.

परदेशात ह्या विषयासंबंधी आस्था आहे, अभ्यासक आहेत. अभ्यासकांना मदत करणारी विद्यापीठे आणि संस्था आहेत. आपल्याकडे तसे कुठे आहे?

मी इथे-तिथे प्रयत्न करून पाहिले आणि निराश झालो. हे काम आपल्या आवाक्यातले नाही, असे वाटले.

मग शेल्लरने कुठे तरी लिहिल्याचे वाचले की, भारतातील लोक प्राणिजीवनाच्या अभ्यासात उदासीन आहेत, आफ्रिकेच्याही फार मागे आहेत. त्यांना वाटते, अशा संशोधनासाठी प्रचंड खर्च करावा लागतो, पाण्यासारखा पैसा लागतो. पण तसे नाही. गळ्यात दुर्बीण, मनात अमाप उत्साह आणि आस्था असली की अभ्यास होतो.

मी शक्‍य तेव्हा एकट्यानेच उठून थोडेफार काम करत राहायचे ठरवले. कधी काझिरंगा, मानस ह्या अभयारण्यावर, कधी नवेगाव-बांधावर तर कधी कोरेगावच्या मोरावर लिहीत राहिलो.

एकदा कशा तरी निमित्ताने, राज्याचे त्या वेळचे मुख्यमंत्री वसंतरवदादा पाटील यांच्याशी पत्रव्यवहार झाला. माझ्या उत्तरत मी सहज जंगलात राहून प्राणिजीवनावर मराठीत पुस्तक लिहिण्याची माझी इच्छा त्यांना कळवली आणि ह्या कामी वन खात्याने मला साह्य केले तर फार बरे होईल, असे म्हटले. मुख्यमंत्र्यांकडून तत्काळ उत्तर आले आणि अतिशय तत्परतेने माझी नागझिराला राहण्याची व्यवस्था झाली.

एकोणीसशे अट्ट्याहत्तर साली मे महिन्यात मी नागझिराला गेलो, राहिलो. त्या मुक्कामात मी जे पाहिले, जे रेखाटले; ते हे पुस्तक.

मला चांगली जाणीव आहे की, हा प्रयत्न नवशिक्याचा आहे. तो अपुरा आहे, भरघोस नाही. त्यात बर्‍याच त्रुटी आहेत. पण, नव्या रानात शिरण्यासाठी पहिल्यांदा कुणी तरी वाट पाडावी लागते. पुढे त्या वाटेने जा-ये सुरू होते. मी लहानशी वाट पाडली आहे, एवढेच.

महाराष्ट्राच्या वन खात्याने नागझिरा हे एक उत्तम ठिकाण राखले आणि वाढवले आहे. अभ्यासकांसाठी ही उत्तम शाळा आहे. शिकार-चोरांचा उपद्रव जगातल्या सगळ्या अभयारण्यांना होतो, तो इथे अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे पुष्कळच कमी आहे. आजूबाजूचे लोकही दक्ष राहिले आणि आपल्या भागाचे एक भूषण म्हणून त्यांनी हे जंगल सांभाळले; तर आणखी अनेक वर्षे ते आहे तसे राहील, वाढेल. मला साह्य केल्याबद्दल श्री. वसंतरावदादा पाटील यांचा मी अत्यंत क्र्णी आहे. महाराष्ट्र राज्याचे निसर्गसंरक्षण संचालक श्री. आनंदराव मून, भंडारा वन विभागाचे विभागीय वनाधिकारी श्री. आर. एस. गंडले, नवेगाव-बांध येथील उपविभागीय वनाधिकारी श्री. मारुतराव चितमपल्ली ह्या सर्वांनी मला साह्य तर केलेच, पण दुर्मीळ असा स्नेहही दिला. त्या सर्वांचा मी फार फार आभारी आहे.

व्यंकटेश माडगूळकर
१ ऑक्टोबर, १९७९

द्वारा : पुस्तकातुन साभार