जंगलातील दिवस

व्यंकटेश माडगूळकर

/media/जंगलातील दिवस_jangal.jpg

मनोगत :जंगलात शिरण्यापूर्वी... - व्यंकटेश माडगूळकर

आपल्या जीवनाला फुरसदीचा एक लांबलचक, भरजरी पदर असावा, असं मनापासून वाटत असलं, तरी चरितार्थ चालविण्यासाठी कामधंदा करण्यातच आपण फार खर्ची पडतो. आपलं सगळं जीवन एका विलक्षण यांत्रिक गतीनं झपाटून टाकलं आहे. कधी अंगावर चांदणं पडत नाही, कधी झाडाच्या पानांची सळसळ ऐकू येत नाही, कधी ओढ्यात अंघोळ होत नाही, कधी उताणं झोपून चांदण्यांनी गच्च भरलेलं आभाळ पाहता येत नाही. मी कुणी मृग-पक्षी-शास्त्रवेत्ता नव्हे किंवा वनशास्त्राचा अभ्यासकही नव्हे. परंतु तरीही रानावनांतील अदभूत जगाविषयी माझ्या छंदिष्ट मनात जे अनिवार आणि न संपणारं कुतूहल आहे, त्याचा हा वृतान्त आहे.

मी माणदेशातल्या लहानशा खेड्यात जन्मलो आणि तिथेच वाढलो. पावसाने भिजलेली काळी शेते, ओढ्या- ओघळींचे थंडगार हिरवे काठ, विस्तृत माळराने आणि काटवने, टेकड्या, खडी आणि ताली यातून हिंडता-फिरता मी कळता झालो. रामोशी, फासेपारधी, धनगर, वैदू अशा रानोमाळ हिंडणार्‍या जातिजमातींची पोरे हे माझे खेळगडी होते. शेवाळाखाली दडलेले मासे हातांच्या पंज्यांखाली मी धरले, होल्याची पोरे घरी आणून ठेवली, काटवनातले पांढरे रानउंदीर पकडले आणि मुरमुटीच्या खोडावरचे सोनकिडे पाळले.

सरूड, फरूड, घोरपडी, सापसुरळीसारखे सरपटणारे प्राणी; चितूर, भुरगुंज्या, भोरड्या, पकुर्ड्या, कांड्याकरकोचा, धनचिडी, पोरेचाळवणी यांसारखी पाखरे; झिंगे, डोकरा, मरळ, वांबसारखे मासे आणि खेकडा, विरोळा, पाननिवळी यांसारखे जलचर; माळठिसकी, लांडगा, खोकड, मुंगूस, खारी यांसारखे प्राणी ही मंडळी मला किती लहान वयात भेटली! त्यांच्या मागे आणि पुढे धावता-पळता माझ्या पायात बळ आले. पोटऱ्या भरल्या आणि मांडीचे पट फिरले.

पोरवयातले माझे खाणे आठवले, तर अजून चळकन तोंडाला पाणी सुटते! माणदेशातल्या रानातला सगळा मेवा, रानातल्या पाखरा-प्राण्या-कीटकांसाठी जसा होता, तसा माझ्यासाठीही होता. निवडुंगाच्या हिरव्यागार फणीला आलेली तांबडीभडक बोंडे कुसळे झाडून मी खाल्ली. गोंदणीची उंच झाडे वेंधून माणकासारखी लालचुटूक, मधाळ गोंदणे खाऊन तोंड चिकट करून घेतले. रानबोरे, लेंडी जांभळे, उंबरे, टेंबरे, कवठे, बेलफळे ही फळे एकीकडे पाखरे, माकडे, खारी खात असत आणि दुसरीकडे मी खात असे. हे खाणे राहू द्या, पण चिंचेचा मोहर, जोंधळ्याच्या ताटावर पडलेली साखर, बाभळीचा डिक, पिकलेल्या निंबोळ्या, कांगुण्या, शेंदण्या, निळुंब्या, अळुंब्या, नेपतीची फळे हेही माझ्या नजरेतून सुटत नसे. आता रानातल्या पाखरांचा, जनावरांचा, कीटकांचा हा मेवा माणसाचे पोर खात राहिले, तर त्याचा निसर्गाशी जिव्हाळ्याचा संबंध का नाही राहणार ?

माझ्या या भ्रमंतीत नाना पाखरे, प्राणी मला आपसूक भेटले. जेवणाच्या पंक्तीत नव्या ओळखी होतात, तशा त्यांच्याशी झाल्या. कोणी न सांगता-सवरता, कोणी न 'शिकवता-पढवता मला बरेच कळू लागले. निसर्गाच्या या विशाल ग्रंथातली चार अक्षरे मला ओळखता येऊ लागली.

मी कळता झालो आणि माझ्या गावातून उडालो. 'पोटापाण्यासाठी करकोचेही सकाळी उडून दूर जातात, पण संध्याकाळी आपल्या ठरावीक झाडावर छावणीसाठी पुन्हा परत येतात. मला ते जमले नाही. मी शहरात आलो आणि तिथेच राहिलो.

माझ्या मुलांचा विचार मनात आला की, मला फार खिन्न वाटते. ती धावपळीत वाढताहेत. शांत, उल्हसित, निरागस निसर्गापासून ती कितीतरी दूर आहेत. त्यांना काही माहीत नाही. ही मुले मोठी झाली, म्हणजे त्यांचा फुरसतीचा वेळ कसा आनंदात घालवतील? मला लहानपणी जी निसर्गाची मांडी जोजवत होती, ती यांना नाहीच मिळाली. ही मुले हॉस्पिटलमध्ये जन्मली, डब्यातले दूध पिऊन वाढली, सिमेंट- लोखंडाच्या खोल्यांत लहानाची मोठी झाली, बसमधून हिंडली, पाखरांऐवजी 'विविधभारती'ची गाणी त्यांनी ऐकली. वन्य प्राणी पाहिले, ते सर्कशीतल्या पिंजऱ्यात किंवा टीव्ही सेटवर. त्यांना काहीच मिळाले नाही. मिळणारही नाही.

मी शहरी वातावरणात राहू लागलो, त्याला आता चाळीस वर्षे होत आली, तरीही माझे मन रानावनांतच रमते. मी तसा छांदिष्टच माणूस आहे. जनलोकांतून थोडे बाजूला असावे, काही नाद लावून घ्यावा आणि त्याचा पाठपुरावा करीत राहावे, यात मला विशेष आनंद वाटतो. रानावनांतील......

द्वारा : पुस्तकातुन साभार