जोहड - सुरेखा शाह

मेहता पब्लिशिंग हाऊस

पाने : ☀ 218 मुल्य (₹): 350.0

/media/जोहड_johad.jpeg

'जोहड' आणि राजेंद्रसिंह - प्रसाद फाटक

काही पुस्तकं आपल्याला खळखळून हसवतात, काही विचार करायला प्रवृत्त करतात... 'जोहड' आपल्याला नतमस्तक करतं. एक माणूस भवतालच्या प्रदेशाचं भविष्य आमूलाग्र बदलून दाखवतो आणि आपल्या समाजबांधवांच्या जगण्याला अर्थ मिळवून देतो हे वाचून अक्षरशः थक्क व्हायला होतं.

राजेंद्रसिंह हे शिक्षणाने BAMS अर्थात आयुर्वेदिक डॉक्टर. परंतु समाजऋणातून मुक्त व्हावे भावनेने भारलेल्या आपल्या साथीदारांसह ते राजस्थानातल्या दुष्काळग्रस्त गावात आले. त्यांचा हेतू शिक्षणप्रसार व त्या माध्यमातून प्रबोधन असा होता. परंतु परिस्थितीचा अभ्यास केल्यावर त्यांच्या लक्षात आलं की इथल्या बहुतांश समस्यांचे मूळ इथला पाण्याचा अभाव हे होतं. सर्वत्र असलेल्या शुष्कतेमुळे इथली पिकं खुरटी होती, त्यांपासून येणारं उत्पन्न अतिशय तुटपुंजं. अन्न -पाण्याची गरज पूर्ण व्हायचीच नाही. खरं म्हणजे राजस्थानात पावसाचे पाणी साठवणारे छोटे तळे ('जोहड') बांधणीचे तंत्र जुनेच असूनही त्याचा प्रभावी वापर केला जात नव्हता हे आश्चर्याचे आणि खेदाचेही होते. राजेंद्रसिंहांनी सरळ कुदळ-फावडे हातात घेतले - 'जोहड' बांधण्यासाठी ... परंतु हे असं मातीत हात घालणं म्हणजे आपले सगळे ज्ञान वाया घालवणे असे वाटल्याने त्यांच्या मित्रांनी हळूहळू तिथून काढता घेतला. राजेंद्रसिंह एकटेच उरले. यापुढे त्यांना एकट्यालाच गोवर्धन तोलायचा होता. पण ते डगमगले नाहीत. लोकांकडून हेटाळले गेले पण ते तोंडाने बोलण्यापेक्षा कुदळीने बोलू लागले. एकट्याचे कष्ट पाहून हळूहळू गावकऱ्यांनाही त्यांच्यावर विश्वास बसू लागला आणि तेही राजेंद्रसिंहांच्या मदतीला येऊ लागले. बघता बघता 'जोहड' पूर्ण होत गेले.. .

पाणी साठू लागलं, मुरू लागलं .... विहिरींना उदंड पाणी येऊ लागलं, पिकं डोलू लागली, हाती पैसे खेळू लागले... कष्टातही लोक आनंदी दिसू लागले.. जोहड बांधण्याचे एक मॉडेलच तयार झाले. अन्य गावातली मंडळीदेखील आपल्या गावी 'जोहड' बांधण्याची इच्छा दर्शवू लागली. राजेंद्रसिंह यांनी गावोगाव 'जोहड' बांधण्यासाठी आपल्या 'तरुण भारत संघा'तर्फे मदत देऊ केली. त्यांच्या अटी तीन १) एक तृतीयांश खर्च गावकरी स्वतः करणार २) गावातल्या प्रत्येकाचा सहभाग आवश्यक ३) गावात पूर्णपणे नशाबंदी झाली तरच गावात जोहड बांधणार. या अटींसाठी त्यांना खरोखरच दाद द्यायला हवी, कारण यामुळे घातक गोष्टींना पायबंद आणि हितकारक गोष्टींसाठी एकोपा असा दुहेरी फायदा साधला गेला. खरा द्रष्टा माणूस कधीच कुठल्याही समस्येचा एकाच अंगाने विचार करून थांबत नाही. राजेंद्रसिंह यांनीही आपले कार्य फक्त पाणीप्रश्नापुरतेच सीमित ठेवले नाही. त्यांनी ग्रामविकासनाचे अनेक आयाम हाताळायला सुरुवात केली. गावामध्ये डेअरी, बचत पतपेढ्या, रजई विणकाम इ. उपक्रम त्यांच्या पुढाकाराने सुरू झाले.

अर्थात इथे लिहिलंय तेवढा हा प्रवास सोपा नव्हता. झाड फळांनी लगडलेले असेल तर लोक त्यावर दगड मारल्याशिवाय राहत नाहीत. राजेंद्रसिंह यांचे कार्य ज्यांच्या ज्यांच्या हितसंबंधांआड येत होते त्यांनी राजेंद्रसिहांना अनेक खोट्यानाट्या आरोपात गोवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर थोडेथोडके नाही तर तब्बल पावणे चारशे खटले दाखल झाले. पण त्यातला एकही न्यायालयात टिकू शकला नाही. सगळे मार्ग संपल्यावर शेवटी त्यांच्या चारित्र्यावर चिखलफेक करण्याचे षडयंत्र देखील रचण्यात आले. परंतु ज्या स्त्रीचा वापर करून हा प्रकार केला जाणार होता तिनेच ऐनवेळी हिसका दाखवल्यामुळे तो बेतही फसला ! हा झाला बाहेरून होणार विरोध. उच्चशिक्षित असूनही दगडामातीत हात घालून कामं करणाऱ्या चक्रम माणसासोबत संसार करणे जड जायला लागल्याने खुद्द धर्मपत्नी देखील राजेंद्रसिंह यांना सोडून गेली. परंतु जसाजसा काळ पुढे सरकला तसेतसे त्यांच्या कार्याला यश येत असलेले पाहून पत्नीलाही त्यांच्या 'वेडेपणा'चे महत्व कळू लागले आणि ती पुन्हा त्यांच्याकडे परतली. या मधल्या कालखंडात दोन पातळ्यांवर एकट्याने लढणाऱ्या राजेंद्रसिंह यांना मनाच्या कुठल्या कुठल्या अवस्थांमधून जावे लागले असेल याचा विचारही करवत नाही. यातूनही कामात खंड न पडू देणाऱ्या त्यांच्या कणखर मनाला खरंच मानलं पाहिजे.

ग्रामविकासाच्या कार्यासोबतच राजेंद्रसिंह यांनी हात घातला तो ‘पर्यावरण संवर्धन’ या विषयात. सारिस्का जंगल वाचवण्यासाठीचे अभियान, अरवरी नदी वाचवण्यासाठीचा संघर्ष यातून त्यांच्याविषयीचा लोकांना वाटणारा विश्वास दुणावतच गेला. त्यांना हजारो हातांनी मदत देऊ केली. परदेशातून मदत मिळू लागली. राजेंद्रसिंह यांनी अर्धशतकाहून अधिक काळ सुकून गेलेल्या तब्बल पाच नद्या पुनरुज्जीवित केल्या ! राजेंद्रसिंह म्हणजे राजस्थानचे दैवत बनले. त्यांच्या या अथक कार्यामुळे ‘राजेंद्रसिंह आणि जोहड’ किंवा ‘राजेंद्रसिंह आणि पाणी’ हे शब्द समानार्थीच होऊन गेले आहेत.जोधपूरच्या महाराजांच्या मानपत्रापासून ते मॅगसेसे पुरस्कारापर्यंत अनेक प्रतिष्ठेचे सन्मान त्यांना मिळाले. या सर्व गोष्टींनंतरही विश्रांतीच्या भावनेतून त्यांचे कार्य मंदावलेले नाही, उलट त्यांना अधिक जोमाने काम करण्याचे बळ मिळाले आहे.

लेखिका सुरेखा शहा यांनीच म्हटल्याप्रमाणे हे पुस्तक चरित-कादंबरी प्रकारचे आहे. भाषा प्रवाही आहे. काहीशी अलंकारिक असूनही ती कृत्रिम वाटत नाही. एका प्रकरणात एक घटना अशी पुस्तकाची मांडणी आहे. सर्वच घटना चित्तवेधक आहेत पण त्यातही 'जिस देश में गंगा बहती है’ या चित्रपटात शोभावा असा दरोडेखोराच्या हृदयपरिवर्तनाचा प्रसंग सगळ्यात अचंबित करणारा आहे. चुकीच्या मार्गावर जाणारी पावले आपल्या आश्वासक वाणीने राजेंद्रसिंह यांनी प्रकाशवाटेकडे वळवली. हा प्रसंग मुळातूनच वाचावा असा आहे. पुस्तक संपताना येणारे प्रकट चिंतन आणि शेवटचे टिपण यांमुळे पुस्तकाचे मूल्य अधिकच वाढते. पुस्तकाची अर्पणपत्रिका राजेंद्रसिंह यांच्यासोबतच तितकेच तोलामोलाचे कार्य करणाऱ्या बंधू-भगिनींना उद्देशून लिहून त्यांच्याही लेखिकेने कार्याला वंदन केल्याचे इथे आवर्जून नोंदवायला हवे. मुखपृष्ठावरची राजेंद्रसिंह यांची प्रसन्न मुद्रा आणि पुस्तकाच्या प्रारंभी येणारे अप्रतिम जलसूक्त या गोष्टी पुस्तक वाचून संपल्यावरही लक्षात राहतात. या पुस्तकाला आत्तापर्यंत १० पुरस्कार मिळाले असून कन्नड, गुजराती आदी भाषांमध्ये त्याचा अनुवादही झाला आहे

द्वारा : prasadgates.blogspot.com
  Never miss a story from us, get weekly updates in your inbox.