खादीशी जुळले नाते - रघुनाथ कुलकर्णी

समकालीन प्रकाशन

पाने : ☀ 111 मुल्य (₹): 150.0

/media/खादीशी जुळले नाते_khadi.jpg

आयुष्याचे 'धागे' उलगडताना... - महाराष्ट्र टाईम्स


खादी हा थेट महात्मा गांधींशी जोडला गेलेला शब्द. देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचं एक प्रतीक. स्वातंत्र्यानंतरही खादी आणि ग्रामोद्योगाद्वारे ग्रामीण भारताच्या विकासाचं स्वप्न पाहिलं गेलं.

हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी स्वातंत्र्यानंतर महत्प्रयास केले गेले. गांधी विचारांनी भारलेल्यांनी त्यासाठी कष्ट उपसले. खादीचं उत्पादन वाढावं यासाठी प्रयत्न केले. कताई-विणाई-रंगाई अशा सर्वच क्षेत्रांत पायाभूत काम केलं. रोजगार निर्मिती आणि रोजगारवृद्धीसाठी प्रयत्न केले. खादीच्या शुद्धतेसाठी आग्रह धरला.

या सर्व कामात संशोधनापासून राष्ट्रीय पातळीवरच्या व्यवस्थापनापर्यंत रघुनाथ कुलकर्णी कार्यरत होते. थोडीथोडकी नव्हे, तब्बल ६0 वर्ष. खादीक्षेत्रातील वाटचालीचं प्रतिबिंब स्वतःच्या जीवनप्रवासातून सांगणारं महत्त्वाचं आत्मकथन.

'खादीशी जुळले नाते' ही कथा दोन पातळ्यांवर चालते. एक कथा रघुनाथ कुलकर्णी या गांधी-विनोबांच्या आश्रमीय वातावरणात वाढलेल्या जन्मजात खादीधारी अशा ध्येयवादी माणसाची आहे. दुसरीकडे पार्थ्वभूमीला स्वातंत्र्योत्तर काळातील खादी विश्वाची कथा आहे. खादीच्या ढासळत्या बुरुजांची कथा आहे. 'राईज अन्ड फॉल ऑफ गांधीज खादी' असंही शीर्षक हिला देता येईल. -डॉ अभय बंग

गांधीजींच्या विचारांचा अभ्यास करताना, त्यांच्या विचारांचा सारांश म्हणून डोळ्यांसमोर उभे राहते ते प्रतीक म्हणजे चरखा. चरख्यावर सूत कातणाऱ्या गांधीजींना पाहून खादीचा आणि पर्यायाने स्वदेशीचा, स्वावलंबनाचा विचार असंख्य भारतीयांचा मनात रुजला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही गांधीविचारांचे, खादीचे महत्त्व जनमानसात टिकून राहण्याच्या प्रयत्नांना ज्यांचा ज्यांचा हातभार लागला, त्यापैकी एक रघुनाथ कुलकर्णी. त्यांच्या आयुष्याचा प्रवास खादीसोबतच कसा झाला, हे उलगडणारे आत्मकथन म्हणजे 'खादीशी जुळले नाते'. गांधीविचारांमधून साकारलेल्या वर्ध्याच्या महिलाश्रमात संगीत शिक्षक म्हणून काम करणाऱ्या शामराव उर्फ अण्णा कुलकर्णी यांचे रघुनाथ कुलकर्णी हे पुत्र. लहानपणापासून त्यांचा गांधीविचारांशी जवळून परिचय झाला. आजूबाजूची ज्येष्ठ मंडळी या विचारांच्या प्रसारासाठी काम करताना पहिल्याने, गांधीविचार आपोआप रुजत गेले. पदवी मिळवल्यानंतर काही काळ शिक्षक म्हणून काम केल्यावर, जेव्हा अशाच एका ज्येष्ठ गांधीवादी व्यक्तीने, भाऊ लेले यांनी आग्रह केल्यामुळे, वर्ध्याची शिक्षकाची नोकरी सोडून मुंबईच्या खादी कमिशनमध्ये ते रुजू झाले.

स्वतः खादी कमिशनमध्ये मोठ्या पदावर असणाऱ्या भाऊ लेलेंचे सहायक म्हणून काम करताना कुलकर्णी यांना खादीच्या व्यावहारिक बाजू कळल्या. कापसापासून ते खादीविक्रीपर्यंतच्या साखळीचे बारकावे लक्षात समजले, जे त्यांना कालांतराने खूप उपयोगी पडले. सेवाग्राम येथे खादीविषयक संशोधनात कुलकर्णी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पुढे त्यांनी खादी कमिशनमध्ये महत्त्वाची पदे भूषवलीच; परंतु नोकरीच्या काळात आणि निवृत्तीनंतरही विविध संस्थांमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही पार पाडल्या. विविध खादीसंस्था, ग्रामसेवा मंडळ, विनोबांचे आचार्यकुल अशा ठिकाणच्या जबाबदाऱ्यांचे तपशील वाचताना खादी, ग्रामविकसन क्षेत्रातल्या त्यांच्या सखोल ज्ञानाची आणि अष्टपैलुत्वाची जाणीव होते. वर्ध्याच्या खादी रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये अधीक्षक म्हणून कुलकर्णी यांनी केलेले काम आणि त्यांच्या चमूचे कल्पक संशोधन, हा या आत्मकथनातला लक्षवेधी भाग आहे. 'सेवाग्राम लूम' हा नवीन माग विकसित केल्यामुळे कापडाचे दैनंदिन उत्पादन आधीच्या दीडपट झाले. तंत्रज्ञान बदलले; पण माणसावर विपरीत परिणाम झाला नाही. यंत्राला विरोध नाही; पण मानवाला पर्याय म्हणून यंत्र असू नये, हा गांधीविचार प्रत्यक्षात आणला गेल्याचे कुलकर्णी आवर्जून नोंदवतात. खादीनिर्मितीमध्ये मुरलेल्या मंडळींच्या अनुभवाला कुलकर्णी यांनी तंत्रप्रशिक्षण आणि वाचनातून मिळवलेल्या ज्ञानाची जोड मिळाल्याने, खादी उत्पादनाची भरभराट व्हायला मदत झाली. अर्थात, सर्वच प्रवास सोपा, आल्हाददायक नव्हता. नियमांशी आणि मूल्यांशी प्रतारणा न करण्याच्या स्वभावामुळे, इतरांकडून होणारी अडवणूक आणि कटू अनुभवही कुलकर्णी यांनी नोंदवले आहेत. खादी हे फक्त उत्पादन नसून, ती एक मूल्यव्यवस्था आहे, हा विचार लोप पावून बाजारीकरण झाल्याबद्दल ते विषाद व्यक्त करतात.

अभय बंग यांची विचारप्रवर्तक प्रस्तावना, हे पुस्तकाचे बलस्थान म्हणायला हवे. चरखा, सूतकताई, खादी यांमागे गांधीजींची विचारप्रक्रिया काय होती, आजही खादी कालसुसंगत कशी आहे, याची मुद्देसूद मांडणी बंग यांनी केलेली आहे. सूतकताईकडे गांधीजीनी स्वयंशिस्त, स्वावलंबनापासून ते रोजगार निर्मितीचे साधन इतक्या व्यापक दृष्टीने पाहिले, हे प्रस्तावनेतून लक्षात येते. खादीच का, या अनुषंगाने कुलकर्णी यांच्या आत्मकथनात न आलेले मुद्दे प्रस्तावनेत चर्चिले गेल्याने, ती पुस्तकाला पूरक ठरली आहे. पुस्तकातली एक गोष्ट मात्र खटकते, ती म्हणजे म्हणजे यातला इंग्रजी शब्दांचा अतिरिक्त वापर. ज्या संज्ञा, संकल्पनांसाठी मराठीत आधीपासून रुळलेले शब्द आहेत, त्यांसाठीही पुस्तकात इंग्रजी शब्दच योजलेले आहेत. याशिवाय पुस्तकात कथनाच्या ओघात आलेल्या काही संकल्पना (ताणा, वया, गुणक, अक्षांतर इ.) पुरेशा स्पष्ट होत नाहीत. हे खादीच्या अभ्यासक्रमातले क्रमिक पुस्तक नसून आत्मकथन आहे हे खरे असले, तरी लेखकाचा या क्षेत्रातला दांडगा अनुभव पाहता, पुस्तकाला संदर्भमूल्यही आहे. पुस्तकाच्या शेवटी अशा तांत्रिक बाबी, संकल्पनांची सूची, रेखाचित्रे अथवा छायाचित्रे असती, तर त्याच्या मूल्यात भरच पडली असती.

वैचारिक बांधिलकी पक्की असली, की त्या दिशेने आपोआप मार्ग दिसत जातो, याची प्रचिती देणारे हे आत्मकथन आहे. ते जसे लेखकाचा जीवनप्रवास रेखाटते; तसेच एका विचारसरणीचा व्यावहारिक जगातला प्रवासही सांगते. विचारांना दिशा देणे आणि विचार प्रत्यक्षात उतरवणे, या दोन्ही दृष्टींनी ते उपयुक्त ठरेल.

द्वारा : महाराष्ट्र टाईम्स
  Never miss a story from us, get weekly updates in your inbox.