वर्दीतल्या माणसांच्या नोंदी

सदानंद दाते

समकालीन प्रकाशन

/media/वर्दीतल्या माणसांच्या नोंदी_v1.jpg

पाने : ☀ 144 मुल्य (₹): 250.0

प्रस्तावना - जे. एफ. रिबेरो (माजी पोलिस आधिकारी)

सदानंद दाते म्हणजे पोलिस अधिकाऱ्यांच्या नभांगणातला तारा आहे. आजवर अनेक सक्षम अधिकारी न्यायाची आणि सत्याची कास धरण्यात, कायद्याची यथायोग्य अंमलबजावणी करण्यात, कायद्यासमोर सर्वांना समान लेखण्यात कमी पडले आहेत, हे खेदाने कबूल करायला हवं. पण सुदैवाने आपल्याकडे असेही काही अधिकारी आहेत, ज्यांनी घटनेचा मान राखण्याची आपली शपथ तंतोतंत पाळलेली आहे. सदानंद दाते अशा पोलिस अधिकाऱ्यांपैकी एक आहेत.

पोलिस खात्याच्या व्यवस्थापकीय पदांवर अधिकाऱ्यांची थेट भरती करण्याची पद्धत ब्रिटिशांनी सुरू केली; कारण आपल्या देशात भ्रष्टाचार रुजलेला असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक न्यायापासून वंचित राहत असल्याचं त्यांचं मत होतं. त्यावर उपाय म्हणून त्यांनी थेट विद्यापीठांमधून सहायक पोलिस अधीक्षक पदावरच्या नेमणुका करण्याचं आणि त्यांना इतर अधिकाऱ्यांहून चांगले पगार देण्याचं ठरवलं. आय.पी. (इंपीरियल पोलिस)मध्ये भरती झालेल्या अशा अधिकाऱ्यांचं प्रमुख काम होतं, ते म्हणजे स्टेशन हाऊस ऑफिसर्स आणि इतर कनिष्ठांच्या तपासकामांवर बारकाईने लक्ष ठेवून अपराधी पकडले जातील हे पाहणं आणि एकाही निरपराध्याला हकनाक शिक्षा होणार नाही याची खातरजमा करणं. स्वातंत्र्यानंतरही सहायक पोलिस अधीक्षक पदावरच्या अशा थेट नेमणुका सुरू राहिल्या. सुरुवातीच्या अशा अधिकाऱ्यांनी आपल्या पूर्वसुरींची परंपरा पुढे चालवली. त्याच वेळी, अशा अधिकाऱ्यांनी सत्याची कास सोडू नये आणि कायद्याने मिळालेल्या अमाप सत्तेचा गैरवापर करू नये याकडे राजकारणी जातीने लक्ष ठेवून होते.

आता इतक्या वर्षांनी परिस्थिती खूपच पालटली आहे. भारतातल्या राजकारणाने वेगळं वळण घेतलं आहे. पोलिसांनी कायद्याला बगल देऊन सत्यापेक्षा राजकारण्यांच्या इच्छांनुसार चालावं यासाठी सत्तेचा वारंवार वापर करून पोलिसांना आमिषं दाखवली जातात. यामुळे गुन्हेपीडितांवर अपार अन्याय होतो. त्याच वेळी गुन्हेगारांनाही बळ मिळतं. पोलिस अधिकाऱ्यांच्या नेमणुका आणि बदल्या करणाऱ्या राजकारण्यांचा वरदहस्त असेल तर आपल्याला कुणी हात लावू शकत नाही असं त्यांना वाटू लागतं.

सदानंद दाते यांनी राजकीय दबावाच्या अशा अनेक अंधाऱ्या गल्ल्या पार केल्या आहेत. त्यामुळेच त्यांना जनतेचं प्रेम मिळालं. हे पुस्तक वाचून तुमच्या लक्षात येईल, की त्यांनी सत्याची आणि न्यायाची कास अजिबात न सोडल्यामुळेच त्यांना हे शक्‍य झालं. आपल्या कामाचा गौरव व्हावा अशी त्यांनी कधीच अपेक्षा ठेवली नाही, आणि तेच त्यांच्या यशाचं गमक आहे.

पुस्तकात त्यांनी आपल्या पोलिस ट्रेनिंग अकॅडमीमधल्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल लिहिलं आहे. तिथे त्यांना डी.आय.जी. रामकृष्णन यांच्याकडून खूप शिकायला मिळालं. त्यानंतरची प्रत्येक जबाबदारी पार पाडताना त्यांनी हाताखालच्या लोकांकडूनही शिकत राहणं कधीही सोडलं नाही. त्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी रत्नागिरीला पाठवण्यात आलं. तत्कालीन अधीक्षकांनी त्यांना आपल्या कार्यालयाबाहेर दोन तास ताटकळायला लावून मगच त्यांची भेट घेतली. एका तरुण सहायक अधीक्षकाला प्रशिक्षणासाठी खातेनिहाय बढती मिळालेल्या अधिकाऱ्याकडे पाठवण्यात आल्याचं मला आश्चर्यच वाटलं होतं. आमच्या वेळेला तरुण अधिकाऱ्यांची पहिली नेमणूक सर्वोत्तम अधिकाऱ्यांच्या हाताखाली होत असे. त्यामुळे करियरच्या सुरुवातीलाच त्यांच्या जडणघडणीला योग्य ती दिशा मिळत असे.

वर्धा जिल्ह्याशी महात्मा गांधींचं नाव अगदी जवळून जोडलं गेलेलं असल्याने जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी घोषित झालेली होती. असं असूनही तिथे दारूची सर्रास विक्री चालायची हे दातेंनी पाहिलं. तसंच त्यांच्याकडे येणाऱ्या सर्वाधिक तक्रारी अवैध दारूविक्री करणाऱ्यांच्या विरोधातल्याच असायच्या. त्यांनी अवैध दारूच्या विरोधात मोहीम उघडली आणि अवैध दारूव्यवसायाशी लागेबांधे असणाऱ्या राजकारण्यांची आणि पोलिस अधिकाऱ्यांची नाराजी ओढवून घेतली. परिणामी, त्यांची लोकप्रियता घटली. मात्र, त्यामुळे ते नाउमेद झाले नाहीत.

भंडाऱ्यात त्यांना एका मंत्रिमहोदयांनी आपल्या मर्जीतल्या उमेदवारांची भरती करण्यास सांगितलं. त्याला त्यांनी नकार दिल्यावर मंत्र्यांनी त्यांना योग्य वाटेल ते करण्याची मुभा देण्याइतपत सौजन्य तर दाखवलं; मात्र, त्या उमेदवारांसमोर आपली शिफारसपत्रं टरकावू नयेत अशी विनंतीही केली! पोलिसभरती म्हणजे भ्रष्टाचाराचं एक मोठं कुरण बनलेलं आहे, आणि ही बाब चीड आणणारी आहे. प्रामाणिकपणे केली जाणारी भरती संबंधित भरती अधिकाऱ्याच्या लौकिकात तर भर घालतेच, शिवाय त्यामुळे पोलिस दलाचं सामर्थ्यही वाढीस लागतं. चांगल्या अधिकाऱ्यांकडून धडे घेण्यास दाते नेहमीच तयार असत. सूर्यकांत जोग आणि संजीव दयाल यांचा ते उल्लेख करतात. पोलिस स्टेशनची परिणामकारक पाहणी कशी करावी, तसंच कठीण परिस्थितीतही शांत कसं राहावं हे त्यांच्याकडून शिकल्याचं त्यांनी लिहिलं आहे.

२00५ साली सदानंद दाते फुलब्राइट शिष्यवृत्तीवर एक वर्षासाठी अमेरिकेला गेले. तिथल्या सर्वसामान्य माणसांचे त्यांनी लिहिलेले अनुभव वाचण्यासारखे आहेत. एका विनातिकीट प्रवाशाला तिकीट तपासनीसाने पकडलं. त्या प्रवाशाचं ओळखपत्र जप्त केलं गेलं. तिकिटाची आणि दंडाची रक्कम भरून कार्यालयातून ओळखपत्र घेऊन जाता येईल असं त्याला सांगण्यात आलं. आपल्याकडे जसं चित्र दिसलं असतं त्याच्या बरोबर उलट तिथे त्या गोष्टीचा जराही कांगावा केला गेला नाही.

सदानंद दाते यांनी आपल्याला मिळालेली कोणतीही नेमणूक स्वीकारण्यास कधीही का-कू केली नाही. तीच त्यांची ताकद आहे. आपलं सामान बांधून ते सदैव तयार असतात. राजकारण्यांद्वारे सरळमार्गी अधिकाऱ्यांच्या डोक्यावर सतत बदलीची टांगती तलवार ठेवली जाते; पण दातेंना त्याचं कधीही भय वाटलं नाही. त्यामुळेच ते चुकीच्या गोष्टींना नकार देऊ शकले आणि निर्भीडपणे, स्वतंत्र बाण्याने काम करू शकले. संपूर्ण चमूला पुढे घेऊन जाणारं उत्तम नेतृत्व, चांगल्या कामाचं श्रेय कनिष्ठांनाही देण्याची वृत्ती, आदींबद्दलची त्यांची मतं आवर्जून वाचण्याजोगी आहेत.

पोलिस खात्यातले तरुण उमेदवार तसेच त्यांचे वरिष्ठ या सर्वांनीच हे पुस्तक वाचायला हवं. या पुस्तकाचे इंग्रजीत आणि इतर प्रादेशिक भाषांमध्ये अनुवाद व्हायला हवेत. देशभरातल्या सर्व पोलिस दलांपर्यंत हे पुस्तक पोहोचायला हवं. तरुण पोलिस अधिकाऱ्यांनी हे लक्षात घ्यायला हवं, की जनतेचं लक्ष वेधून घेण्यासाठी कोणतीही हीरोगिरी करण्याची ना आवश्यकता असते, ना तसं करणं श्रेयस्कर ठरतं. उलट, नैतिकता, सचोटी बाळगणं, न्याय्य आणि योग्य कृती करणं हेच महत्त्वाचं ठरतं. असं केल्याने जनता त्यांना कायम आपलं मानून लक्षात ठेवेल आणि त्यांना कामातून पुरेपूर समाधान मिळेल; अगदी सदानंद दाते यांच्याप्रमाणेच!

द्वारा : पुस्तकातुन साभार