The Diary Of A Young Girl-(द डायरी ऑफ अ यंग गर्ल)

अ‍ॅन फ्रँक Dr Angha Keskar

/media/q4fC5AU4ZahI.jpg

एका डायरीची ७५ वर्षं! - विबुधप्रिया दास

‘पर्सनल इज पोलिटिकल’ म्हणतात, ते या डायरीबद्दल शब्दश: खरं. अ‍ॅन फ्रँक ही तेरा वर्षांची पोर… अशा वयात स्वत:ची ओळख होत असते मुलींना.

सोबतचा पुतळा नीट पाहा आणि त्याहीपेक्षा त्यासोबत एक पुस्तक आहे त्यावरलं नाव नीट वाचा. ‘हेट आख्टेर हुइस’ असं काहीतरी अक्षर लागतंय ना? ते आहे ‘डायरी ऑफ अ यंग गर्ल’ या पुस्तकाचं मूळ नाव , मराठीत ‘जोड-घर’. लेखिका अ‍ॅन फ्रँक! जास्त जगली नाही ती, पण १९४२ ते १९४४ या काळात तिनं रोजनिशी लिहिली. एका गुप्त घरात आम्ही कसे राहातोय, कसं राहावं लागतंय, याची ही कथा प्रचंड गाजली, याचं कारण अर्थातच, हिटलरी नाझी सैन्याच्या भीतीनं लपावं लागलेल्या कित्येक ज्यू कुटुंबांची कहाणी या डायरीतून उलगडत होती.

‘पर्सनल इज पोलिटिकल’ म्हणतात, ते या डायरीबद्दल शब्दश: खरं. अ‍ॅन फ्रँक ही तेरा वर्षांची पोर… अशा वयात स्वत:ची ओळख होत असते मुलींना. त्यात अ‍ॅनला एक मित्रही मिळाला होता! साहजिकच, डायरीतलं लिखाण खूप वैयक्ति स्वरूपाचं आहे, पण तेच दाहक आहे… साध्यासाध्या इच्छाही माराव्या लागत होत्या. छळछावणीत जाणं टळलं होतं, इतकंच. पण उगवलेला दिवस आपण जिवंतपणी ढळलेला पाहिला, हेच भरपूर होतं. मिएप नावाची एक स्त्री दोन कुटुंबांना मदत करायची. तिनंच स्वत:च्या घरातल्या गुप्त जागेत या कुटुंबांना राहायला जागा दिली होती. एका भिंतीत एक कपाट. ते एका बाजूनं ढकलायचं, की मग ते आरपार उघडून आतल्या गुप्त खोलीत जाता यायचं. हे घर आजही अ‍ॅमस्टरडॅम शहरात आहे, ते आता संग्रहालय झालं असल्यामुळे कित्येक भारतीयांनीही त्याला भेट दिली आहे. सोबच जे पुतळ्याचं छायाचित्र आहे, तो पुतळा याच घराच्या आवारातला. या घरातून फिरताना आजही, अ‍ॅन फ्रँकच्या कुटुंबाला कसं भेदरलेल्या स्थितीत राहावं लागायचं याची जाणीव होते. दिवसातून एकदाच तिला गच्चीत जायला मिळायचं. तेवढाच सूर्यप्रकाश. नंतर तोही बंद झाला. इतकं असूनसुद्धा अ‍ॅन फ्रँकच्या डायरीत कुठेच दु:खाचा सूर नाही. कदाचित, आपण जे भोगतोय त्याला दु:ख म्हणतात हे तिला माहीतच नव्हतं त्या वयात! निरागसपणानंच ही सारी वर्णनं ती करते. डायरीलाच मैत्रीण मानते, तिला ‘किटी’ असं नावही ठेवते आणि दररोज लिखाणाची सुरुवात ‘डिअर किटी’ अशी करते! हिटलरच्या सैन्याबद्दल कुठेही तळतळाटसुद्धा नाही या डायरीच्या पानांवर. पण नवल मात्र वाटतंय या लेकीला, एवढे कशाला माग काढतायत ते आमचा? काय मिळणार आहे त्यांना, आमचा छळ करून? असे प्रश्न तिला पडत असतील, पण त्या प्रश्नांचाही बाऊ या पुस्तकात नाही. मी जगतेय कशी, माझे कुटुंबीय, आप्तेष्ट, काय करताना दिसताहेत मला, एवढीच ही वर्णनं. त्यामुळे तर हे पुस्तक आणखीच परिणाम करतं. अ‍ॅन फ्रँकनं विचार करण्याची जबाबदारी वाचकावर अगदी विश्वासानं टाकलेली असते आणि वाचकही ती निभावतो!

१९४७ साली डच भाषेत आलेल्या या पुस्तकाची पहिली इंग्रजी आवृत्ती प्रकाशित होण्यासाठी १९५५ साल उजाडलं. तोवर अनेक जर्मनांनीही डच भाषेत ती वाचली असेल… पण दुसऱ्या महायुद्धाच्या जखमा तोवर कदाचित भरू लागलेल्या असतील.

आज या डायरीला ७५ वर्षं झाली तरीही ती ताजीच वाटते. कारण घरातल्या ज्या रोजच्या क्रिया असतात, त्या कुठे अशा लगेच बदलतात? खाणं, जेवणाची वाट पाहाणं, झोपणं, आवडत्या व्यक्तीची वाट पाहाणं, तिला/त्याला भेटणं आणि मग भेटीत काय झालं हे आठवत राहाणं… साधंच की सगळं. ते कसं बदलेल?

पण अ‍ॅन फ्रँक, तिचे वडील ओट्टो फ्रँक व त्यांच्या कुटुंबानं जे हाल झेलले ते आज कुणाला भोगावे लागत नाहीत. लागूही नयेत. महायुद्ध वाईटच, पण त्याहीपेक्षा त्याआधीचा तिरस्काराचा ज्वर आणखी वाईट. अशा तिरस्कारातून एका जमातीचा वंशविच्छेद करण्याची किंवा त्यातल्या सशक्त तरुणांना फक्त राबवून घेण्याची स्वप्नं पाहिली गेली. त्या राजकारणाला तेव्हा लोकांचा पाठिंबाही होता. हे सारं का टाळायचं, हे अ‍ॅन फ्रँक हळूच तुम्हाला सांगते, आजही!

दुसऱ्या महायुद्धाच्या मंथनातून निष्पन्न झालेले हे वैयक्तिक अनुभवांचे हॄदयद्रावक लेखन अव्दितीय आहे.
१९४२ च्या जुलै महिन्यात तेरा वर्षांची अॅन फ्रँक आणि तिचे कुटुंबीय नाझींच्या ज्यूंवरील भयावह अत्याचारांमुळे अॅमस्टरडॅम येथे एका गोदामात लपून बसले.ज्या पोटमाळ्यावर अॅन फ्रँकने आयुष्याची शेवटची वर्षं काढली,तिथेच तिने लिहिलेली विलक्षण दैनंदिनी सापडली.त्यात ती ह्या भयानक काळातील तिच्या अनुभवांचे,तिच्या मनावर उमटलेले खोल बटबटीत ठसे रंगवते.त्यांतून ती मानवी धैर्य,कमकुवतपणा यासंबंधी लक्षवेधी मर्मदृष्टी देऊ करते.त्याचबरोबर एका संवेदनशील जोशपूर्ण तरुणीचे मनाला भावणारे स्वचित्रणही रेखाटते.दुर्दैवाने ही आशा अवेळीच मावळते.या कुटुंबाची फसवणूक होऊन त्यांची छळछावणीत रवानगी झाल्यावर ह्या रोजनिशी लेखनाचा अकस्मात शेवट होतो.

द्वारा : लोकसत्ता वृत्तसेवा