THE CONJURORS TRICK AN INTERPRETIVE HISTORY OF PAPER MONEY IN INDIA - बाझिल शेख

मार्ग पब्लिकेशन्स

पाने : ☀ 248 मुल्य (₹): 1800.0

/media/THE CONJURORS TRICK AN INTERPRETIVE HISTORY OF PAPER MONEY IN INDIA_pmindia.jpg

कागदी चलनाचा वेध - म. टा. प्रतिनिधी

फ्रान्सिस बेकन यांनी म्हटल्याप्रमाणे, "काही पुस्तके ही केवळ आस्वाद घेण्यासाठी असतात. काही सखोल अभ्यासासाठी, तर काही त्यातील विचारांचे मंथन करून आत्मसात करण्यासाठी असतात." बाझिल शेख यांचे "दि कन्जुरर्स ट्रीक अॅन इंटरप्रिटिव्ह हिस्टरी ऑफ पेपर मनी इन इंडिया" हे पुस्तक तिसऱ्या प्रकारात बसते.

रिझर्व्ह बँकेची माहिती असलेल्यांना बाझिल शेख यांचा वेगळा परिचय करून देण्याची गरज नाही. ते "आरबीआय मॉनेटरी म्युझियम" (मौद्रिक संग्रहालय) या कल्पनेला मूर्त स्वरूप देणारे, अर्थात त्याचे शिल्पकार होते. त्यानंतर त्यांनी "मिंट रोड माइलस्टोन्स : आरबीआय ७५" हा अमूल्य ग्रंथ बँकेच्या अमृत महोत्सवी ‌वर्षात काढला होता.

"कागदी चलन" सर्व थरांत, वय किंवा लिंग भेदभाव न करता लोकांना आकर्षित करत आले आहे. हे पुस्तक या कागदी चलनाच्या आजवरच्या वाटचालीचा वेध घेते. चलनावरील ऐतिहासिक चिन्हे, संकेत, त्याचप्रमाणे त्या प्रचारात आणण्याची तत्त्वप्रणाली याविषयीच्या चर्चेचा ऊहापोह करते. प्रथमच, व्यापक असा बँकिग प्रणालीचा दस्तावेज या पुस्तकरूपाने वाचकाला उपलब्ध झाला आहे. त्यामुळे खासगी बँकांनी चलनात आणलेला पैसा, सुरुवातीला सरकारने व त्यानंतर मध्यवर्ती बँकेने एकाधिकारशाही पद्धतीने प्रतीकात्मक व नंतर काल्पनिक करून आपल्या कक्षेत कसा आणला, यावर हे पुस्तक प्रकाश टाकते.

हे पुस्तक नऊ भागांत आहे. भारतीय कागदी चलन : त्याचे विश्लेषण, मुक्त बँकिंगचा पहिला टप्पा : १७७०-१८०६; मुक्त बँकिंगचा दुसरा टप्पा : १८०६-१८६१; भारतासाठी सरकारी कागदी चलन; लवचिक चलनाच्या शोध, युद्ध, फाळणी, व्यापार आणि तीर्थयात्रा, स्वातंत्र्य आणि पश्चात; संस्थानांचे आणि दुसऱ्या अनुशासित प्रदेशांचे कागदी चलन, निकड/आग्रह आदींविषयीचे विवेचन आले आहे.

पुस्तकात सर्व प्रकारच्या, काळातल्या आणि अतिशय दुर्मीळ अशा नोटांची माहिती छायाचित्रांसह दिली आाहे. काही प्रसंग चित्तवेधक आहेत. पाचवे जॉर्ज यांचे थोरले चिरंजीव आठवे एडवर्ड गादीवर आल्यानंतर ३२६ दिवसांतच एका सामान्य मुलीच्या प्रेमात पडल्यामुळे पायउतार झाले. त्यामुळे त्यांच्यासाठी डिझाइन केलेल्या नोटा रद्द कराव्या लागल्या. पुढे जानेवारी १९३८मध्ये सहाव्या जॉर्ज यांची प्रतिमा साकारून रिझर्व्ह बँकेच्या पहिल्यावहिल्या नोटा वितरीत करण्यात आल्या. "सत्यमेव जयते" या बोधवाक्याचा नोटेवर कसा समावेश झाला, त्यामागील पार्श्वभूमी व रिझर्व्ह बँकेची भूमिकाही या पुस्तकात स्पष्ट होते. दोन हजार रुपयांच्या नोटेत "चिप" बसवल्याची अफवा समाज माध्यमांवर चर्चेत होती. त्याचा उल्लेख रंजकतेने केला आहे. भविष्यात केंद्रीय बँका आणि सरकारे यांना जी आव्हाने पेलावी लागणार आहेत, त्यांचा ऊहापोह एका प्रकरणात केला आहे.

प्रस्तावना रिझर्व्ह बँकेचे भूतपूर्व गव्हर्नर डॉ. वाय. व्ही. रेड्डी यांची आहे. "पैशाइतकी क्वचितच दुसरी कुठली गोष्ट माणसाच्या मनाला किंवा हृदयाला इतकी मोहिनी किंवा भुरळ घालत असेल. माणसाला सगळ्यात जास्त चक्रावून टाकतो तो पैसाच!" तर पुस्तकाविषयी ते म्हणतात, "संशोधनावर आधारित ज्या गोष्टींचा, विनोदांचा, प्रतिमांचा ज्याप्रकारे वापर केला गेला आहे, तो दोनशेहून अधिक वर्षांचा इतिहास व नोटा चलनात आणण्याच्या प्रक्रियेला मूर्त स्वरूप कसे दिले, हे समजून घेता येते. नोटा चलनात आणण्याचे धोरण आखणाऱ्यांसाठी तसेच बँकर्स, वकिल, इतिहासकार, विद्यार्थी, सांकृतिक आणि पारंपरिक ठसा जतन करणाऱ्यांसाठी हा दस्तावेज फार महत्त्वाचा आहे." रिझर्व्ह बँकेचे आणखी एक विख्यात गव्हर्नर डॉ. सी. रंगराजन म्हणतात, "बाझिल शेख यांनी भारतात उगम पावलेल्या आणि विकसित झालेल्या कागदी चलनाविषयी अगदी मनोवेधक आणि अचंबित करणारी अशी माहिती दिली आहे. वाचकाला ते सामाजिक आणि आर्थिक माध्यमाच्या दृष्टिकोनातून भारतीय चलनावर, त्यात होत गेलेल्या बदलांचा तसेच त्यानिमित्ताने दिले गेलेल्या निरनिरा‌ळ्या संदेशांचा शोध घेऊन ती माहिती वाचकाला देतात. पुस्तक शैक्षणिक तसेच मनोरंजकही आहे. ते इतिहासाचे एक पर्व आहे." अशा प्रकारे उल्लेख केलेल्या या पुस्तकाच्या निमित्ताने नोटांच्या इतिहासाचा वेध घेण्यात आला आहे.
..........................
दि कन्जुरर्स ट्रीक अॅन इन्टरप्रिटिव्ह हिस्टरी ऑफ पेपर मनी इन इंडिया
लेखक : बाझिल शेख
प्रकाशक : मार्ग पब्लिकेशन्स
पाने :२४७, किंमत : १,८०० रुपये

द्वारा : महाराष्ट्र टाइम्
  Never miss a story from us, get weekly updates in your inbox.