शहाणीव देणारी पुस्तकं

डॉ. वैभव ढमाळ

/media/शहाणीव देणारी पुस्तकं_sp.jpg

वेचण्याचा आनंद देणारी पुस्तके - तृप्ती कुलकर्णी

वेचण्याचा आनंद देणारी पुस्तके

वाचन हा एक आत्मशोधाचा मार्ग आहे; त्यामुळे वाचनाची गोडी लावणे किंवा भेट देणे यासाठीचे सर्वोत्तम पुस्तक सुचवणे अवघडच; कारण प्रत्येकाचा आत्मशोधाचा मार्ग निराळा. कुठल्या वाटेवर तुम्हाला हवे ते गवसेल, हे सांगणे त्रयस्थाला कोडेच; त्यामुळे कुणाच्याही सल्ल्यावर, अनुभवांवर न विसंबता स्वत: पुस्तके निवडावीत, वाचावीत आणि आपणच मार्ग ठरवावा. त्यातला कंटाळा, वाचनात पडणारा खंड, पश्चाताप, तर कधी अनेपक्षित आनंद, भारावलेपण, हे जे काही असेल ते स्वतःच अनुभवावे. या योग्य-अयोग्यातून वाचकाच्या घडण्यात, जाणिवेत-नेणीवेत भर पडूनच शहाणीव निर्माण होते. निवडक वाचून परीक्षार्थी होण्यापेक्षा विद्यार्थी होणे, हे लिहित्या वाचकाला उपयुक्त ठरते. विचारांशी होणारे भागाकार, गुणाकार स्वतःच्या जगण्याशी पडताळणे, उपयोगी-निरुपयोगी वाचनापेक्षा योग्य-अयोग्य याचे निकष परिस्थतीनुरूप समजून घेऊन अर्थपूर्ण, समृद्ध जगणे घडते.

याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. वैभव ढमाळ यांचे सोळा पुस्तकांचा परिचय सांगणारे 'शहाणीव देणारी पुस्तकं' हे गोल्डन पेज पब्लिकेशनचे पुस्तक. डॉ. ढमाळांनी वाचक म्हणून घडताना हे सगळे अनुभव घेतले आहेत, अशी या लेखनावरून खात्री पटते. वाचन हाच त्यांचा आत्मशोधाचा मार्ग आहे, हे या लेखन वाचनातून प्रकर्षाने जाणवते.

पुस्तकाचे वैशिष्ट्य 'लिहित्या वाचकाचे मनोगत'मधून लेखकाने प्रांजळपणे नमूद केले आहे. डॉ. ढमाळ म्हणतात, 'हे लेखकाचं मनोगत समजू नये. हे लिहित्या वाचकाचं मनोगत आहे, असं समजून वाचावं.' 'माझं पुस्तक हे माझ्या वाचनाचं देणं आहे.' वाचकाला प्रेरणादायक अशा मनोगतामुळे त्याची आत्मीयता वाढते. लेखकाचे लहानपणीच्या वाचनआवडीचे, मोठेपणी ध्यासात होणारे रूपांतर, हे नवोदित वाचकांसाठी मार्गदर्शक ठरणारे आहे.

सोळा पुस्तकांच्या या चोखंदळ निवडीत पुस्तक परिचय एवढाच मर्यादित दृष्टिकोन नसून, 'त्या त्या व्यक्तींच्या जीवनजाणिवांचा शोध' आणि 'लेखन प्रेरणेचा मागोवा' हा महत्त्वपूर्ण विचार आहे; त्यामुळे वाचकाला पुस्तके नव्याने उलगडतात. पुनर्वाचनाची ओढही लावतात. सगळेच परिचय उत्तम; पण मला भावलेले, उल्लेखनीय वाटले ते 'चिखल, घाम आणि अश्रू' हे बेअर ग्रील्सचे आत्मचरित्र, वॉल्टर आयझॅकसन लिखित स्टीव्ह जॉब्जचे चरित्र, 'इट्स नॉट अबाउट द बाइक - माय जर्नी बॅक टू लाइफ' हे लान्स आर्मस्ट्राँगचे आत्मकथन, उमा कुलकर्णींचे 'संवादू अनुवादू', आनंद यादवांच्या आत्मचरित्रात्मक कादंबऱ्या, 'माय अॅनिमल लाइफ' हे प्रा. मॅगींचे आत्मकथन.

डॉ. ढमाळांनी ग्रील्सच्या पुस्तकाबाबत, 'अनेक पुस्तकांच्या नशिबी दुसऱ्यांचे जीवन आमुलाग्रपणे बदलवण्याचे भाग्य असते, अशा पुस्तकांपैकी हे एक आहे,' असे म्हणले आहे. ते योग्य वाटते; कारण यातले 'आयुष्यात एक गोष्ट सर्वांत महत्त्वाची असते, ती म्हणजे स्वप्नांचा पाठलाग करणं. असा पाठलाग करताना मित्रांची आणि कुटुंबाची काळजी घेणं.' 'जेव्हा सभोवतालची परिस्थिती अंध:कारमय असते, तीच तेजानं चमकण्याची संधी असते.' असे काही विचार मलाही भावले.

प्रा. मॅगींच्या आत्मकथनातली लेखनप्रेरणा... आणि स्वतःला प्राणी समजून विश्वाशी समरस होण्याची कल्पना मला भावली. लान्स आर्मस्ट्राँगच्या कथनात प्रचंड यशानंतरही व्यसनाधीनतेमुळे अंती येणारी विफलता विचारप्रवृत्त ठरते.

लेखांची योजनाबद्ध मांडणी, सोळा पुस्तकांचा चेहरा दर्शविणारे पुस्तकाचे मुखपृष्ठ, सुयोग्य लेखनक्रम याने वाचनीयता, रंजकता वाढली आहे. एखाद्या चित्रपटाचा ट्रेलरच पाहतो आहोत, असे वाटते. काय वाचावे, यापेक्षा 'कसे वाचावे' यावर भर देणारे हे पुस्तक वाचतानाच वेचण्याचा आनंद देणारे आहे.
मुखपृष्ठ : प्रदीप खेतमर

द्वारा : महाराष्ट्र टाइम्स वृत्तसेवा