छत्रपती शिवाजीमहाराज स्मृतिग्रंथ - संपादक - डॉ. जयसिगराव पवार

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ

पाने : ☀ 140 मुल्य (₹): 250.0

/media/छत्रपती शिवाजीमहाराज स्मृतिग्रंथ_smrutigranth.jpg

छत्रपती शिवाजी महाराज स्मृतिग्रंथ - परिचय - श्रीकांत उमरीकर

महाराष्ट्र राजय पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ म्हणजेच बोली भाषेत सर्वच ज्याला बालभारती म्हणून ओळखतात त्या संस्थेने शालेय पाठ्यपुस्तकांसोबतच इतरही काही महत्त्वाची पुस्तके प्रकाशीत केली आहेत. त्यातीलच एक आहे "छत्रपती शिवाजीमहाराज स्मृतिग्रंथ". डॉ. जयसिगराव पवार यांच्या संपादनाखाली हा ग्रंथ बालभारतीने 2011 मध्ये प्रकाशीत केला.

शालेय पातळीवर मुलांना उपयुक्त व्हावा असा हा ग्रंथ. खरं तर याची रचना केवळ विद्यार्थी नव्हे तर सामन्य वाचक, शिक्षक आणि या विषयांत अभ्यास करू पाहणार्‍या सर्वांना मार्गदर्शक ठरेल अशी आहे.

या पुस्तकांत एकूण 16 लेख आहेत. ही यादी जरी आपण बघितली तरी या स्मृतीग्रंथाचा आवाका लक्षात येईल.

1. शिवराय: संस्कार आणि शिक्षण - डॉ.आ.ह.साळुंखे, 2. शिवाजीचा राज्यकारभार - न्या. महादेव गोविंद रानडे 3. शककर्ता शिवाजी -गो.स.सरदेसाई. 4. छत्रपती शिवाजीमहाराजांचे गुणसंकीर्तन - कृष्णराव अर्जुन केळूसकर, 5. शिवाजी-एक महान नेता- सर जदूनाथ सरकार 6. शिवाजीरामांचे व्यक्तिमत्व- डॉ. बाळकृष्ण 7. श्रीशिवछत्रपतींची कामगिरी-त्र्यंबक शंकर शेजवलकर 8. शिवाजीमहाराजांची हिंदवी स्वराज्याची राज्यबंधारणा- वा.सी. बेंद्रे 9. शिवरायासी आठवावे- सेतु माधवराव पगडी 10. दिल्ली जिंकण्याची शिवाजीराजांची प्रतिज्ञा- डॉ.आप्पासाहेब पवार 11. शिवाजीमहाराजांच्या मर्‍हाष्ट राज्याची अर्थनीती 12. धर्मनिरपेक्षता आणि शिवाजी- नरहर कुरूंदकर 13. शिवाजीमहाराजांची संरक्षण संघटना- ले.कर्नल म.ग. अभ्यंकर 14. शिवाजीमहाराजांचे आरमार-डॉ.भा.कृ. आपटे 15. दुर्गपुत्र शिवाजी- गो.नी.दांडेकर 16. शिवाजीमहाराजांची चित्रे- ग.ह.खरे

या सर्व महान अभ्यासकांनी विचारवंतांनी शिवाजी महाराजांवर जे प्रचंड आणि मोलाचे लिखाण केले आहे त्यातील मोजका भाग निवडून या स्मृतीग्रंथात समाविष्ट केला आहे.

स्मृतीग्रंथाला जयसिंगराव पवारांची विस्तृत अशी प्रस्तावना आहे. या स्मृतीग्रंथाचे महत्त्व तर त्यांनी अधोरेखीत केले आहेच पण यात शिवाजी महाराजांच्या राज्याचा नकाशा प्रथमच एकत्रित स्वरूपात दिलेला आहे. पाठ्यपुस्तक मंडळाच्या चौथीच्या पुस्तकांत हा नकाशा होता. तोच आता या स्मृतीग्रंथातही घेण्यात आला आहे.

महाराजांची ऐतिहासिक अशी सात चित्रे या पुस्तकांत समाविष्ट आहेत. व्हॅलेंटिन या डच चित्रकाराने काढलेले महाराजांचे चित्र, ऑर्मच्या "फ्रॅगमेंटस" यातील 1782 चे चित्र, 1685 मधील महाराजांचे दखनी शैलीतील चित्र, इ.स. 1700 मध्ये मीर मुहम्मद याने काढलेले चित्र, 17 व्या शतकाच्या उत्तरार्धात काढलेले आणि आता लंडन येथील ब्रिटिश संग्रहालयात असलेले अशी महाराजांची 7 चित्रे या पुस्तकांत आहेत. शिवाय वर उल्लेखिलेला स्वराज्याचा नकाशाही दाखविण्यात आला आहे.

नरहर कुरूंदकरांच्या लेखात शिवाजी महाराजांबाबत एक अतिशय मोलाचे असे वाक्य आलेले आहे, ".. शिवाजी हे एक जनतेच्या नेत्याचे चित्र आहे. या चित्राचा आकार मध्ययुगाप्रमाणे राजेशाहीचा आहे, त्याचा आशय आपल्या काळाच्या कक्षा छेदून बाहेर पडणारा, लोकशाहीचा, धर्मनिरपेक्षतेचा व लोककल्याणाचा आहे. शिवाजीने वैदिकमंत्राने राज्याभिषेक करून घेतला एवढेच आपण पाहतो. देवळे बांधणे, दानधर्म करणे, यज्ञ करणे, स्मृतींचा कायदा लागू करणे या असल्या परंपरावादात त्याने कधीही रस घेतला नाही हे आपण विसरून जातो."

शेजवलकरांनी शिवाजी महाराजांच्या दक्षिणेतील चढाईला स्वराज्य विस्ताराला मोठे महत्त्व दिले. महाराष्ट्रापेक्षाही स्वराज्याचा विस्तार कर्नाटक, तामिळनाडूपर्यंत जास्त झाला हे विसरले जाते. शेजवलकरांच्या लेखातील एक वाक्य फार महत्त्वाचे आहे, .. पण अनेक शतके ज्या समाजाचे वर्तन कासवाप्रमाणे आपले हातपाय व डोके कवचाखाली लपवून सरासरी जिवंत राहणाराचे झाले होते, त्याला शिवाजीने मान ताठ करून व हातपाय हालवून निर्भयतेने बदललेली परिस्थिती लक्षात घेण्यास उद्युक्त केले. स्वसंरक्षणाचा खात्रीचा मार्ग शत्रूवर चढाई करण्यातच असतो, हे राजनैतिक व लष्करी तत्त्व अमलात आणून शिवाजीने सर्व हिंदू लोकांसमोर ठेवले.

कर्नल अभ्यंकरांचा लेख अतिशय वेगळा असा आहे. शिवाजी महाराजांच्या लढायांचे लष्करी अंगाने त्यांनी विश्लेषण केले आहे. 1645 ते 1660 या पहिल्या पंधरा वर्षांतील मोहिमांचे वर्णन -बचावात्मक मोहिमा असे केले आहे. तर 1661 ते 1672 या काळातील मोहिमांचे वर्णन बचावात्मक पण आक्रमक मोहिमा असे केले आहे. तर शेवटच्या काळातील म्हणजेच 1672 ते 1680 या काळातील मोहिमा आक्रमक मोहिमा होत्या असे प्रतिपादले आहे.

मोठ्या आकारांतील 140 पानांच्या पुठ्ठा बायडिंगच्या या पुस्तकांची किंमत बालभारतीने केवळ रू. 247 इतकी ठेवली आहे. महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने हा स्मृतिग्रंथ तयार करण्यात आला होता. आपण इतका शिवाजी महाराजांबद्दलचा अभिमान सांगतो, त्याचे प्रदर्शन प्रसंगी मोठ्या भडकपणे करतो. शिवाजी महाराजांचे पुतळे गावोगावी तर सोडाच पण गल्लोगल्ली उभारल्या गेले आहेत.

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद

द्वारा : https://shriumrikar.blogspot.com
  Never miss a story from us, get weekly updates in your inbox.