द मॅन हू लव्हड बुक्स टू मच - अॅलिसन हूवर बार्टलेट

पेंग्विन रँडम हाऊस

पाने : ☀ 300 मुल्य (₹): 496.0

/media/द मॅन हू लव्हड बुक्स टू मच_theman.jpg

पुस्तकवेड्यांची कहाणी - निळू दामले

पुस्तकवेड्यांची कहाणी
निळू दामले
महाराष्ट्र टाइम्स - 26 Sep 2020

हिचकॉकची एक फिल्म होती, "द मॅन हू न्यू टू मच". त्या शीर्षकाची आठवण करून देणारं "दी मॅन हू लव्ड बुक्स टू मच" हे पुस्तक म्हणजे तीन पुस्तकवेड्या अमेरिकनांची गोष्ट आहे.

ऐकावं ते नवलच! ... ना षटकार ना नो बॉल, तरीही एका चेंडूवर निघाल्या सात धावा; व्हिडिओ झाला व्हायरल
हिचकॉकची एक फिल्म होती, "द मॅन हू न्यू टू मच". त्या शीर्षकाची आठवण करून देणारं "दी मॅन हू लव्ड बुक्स टू मच" हे पुस्तक म्हणजे तीन पुस्तकवेड्या अमेरिकनांची गोष्ट आहे. लेखिका अॅलिसन बार्टलेट यांच्याकडं वनौषधी या विषयावरचं १६३० साली प्रसिद्ध झालेलं जर्मन पुस्तक होतं. पुस्तक दुर्मिळ आणि किमती होतं. ते चोरलेलं आहे, अशी शंका येऊन लेखिकेनं त्या पुस्तकाबद्दलची माहिती शोधायला सुरुवात केली. जुनी पुस्तकं विकणाऱ्या दुकानदारांना लेखिकेनं गाठलं. लेखिका केन सँडर्स या दुकानदाराकडं आणि जॉन गिल्की या ग्रंथचोराकडं पोहोचली. लेखिका जॉन गिल्कीला तुरुंगात भेटली. लेखिकेनं नंतर जुन्या पुस्तकांची दुकानं, ग्रंथालयं धुंडाळली, मुलाखती घेतल्या. त्यातून हे पुस्तक तयार झालं.

पुस्तकाच्या केंद्रस्थानी आहे जॉन गिल्की. हा तत्त्वज्ञान आणि साहित्याचा अभ्यासक. तो ग्रंथालयात बसून पुस्तकं वाचत असे. दुर्मिळ आणि अतिविशेष पुस्तकं कुठली असतात, याचा अंदाज त्याला येत असे. लेखकानं सही केलेली पुस्तकं, पहिल्या आवृत्तीतली पुस्तकं, सातआठशे वर्षांच्या काळात उरलेल्या पुस्तकाच्या चार-दोन प्रती, नामांकित लेखकांची उमेदवारीच्या काळातली शिल्लक नसलेली पुस्तकं, हस्तलिखितं, अमेरिकेच्या अध्यक्षांच्या संग्रहातली पुस्तकं इत्यादींची माहिती त्याला असे. उत्तम पुस्तकं हे वैभव असतं, असा त्याचा विश्वास होता आणि ते वैभव आपल्याजवळ असावं, असं त्याला वाटे. पण ते वैभव मिळवण्यासाठी आवश्यक श्रीमंती त्याच्याजवळ नव्हती, तो अगदी साधासा गरीब माणूस होता. ती पुस्तकं मिळवण्यासाठी त्यानं लोकांचे क्रेडिट कार्ड नंबर चोरले. ते नंबर मिळावेत यासाठी त्यानं एका दुकानात नोकरी केली आणि तिथं येणाऱ्या श्रीमंतांचे क्रेडिट कार्ड नंबर नोंदवून घेतले. क्रेडिट कार्डाचे मालक श्रीमंत असत, त्यांच्यासाठी पाच-सहा हजार डॉलरची खरेदी म्हणजे अगदीच किरकोळ असे. त्या रकमांकडे ते दुर्लक्ष करत. जेव्हा चोरी कळे तोपर्यंत पुस्तक गिल्कीकडं पोहोचलेलं असे.

गिल्की युरोपातल्या कुठल्याही देशातून पुस्तक खरेदी करे. एखाद्या हॉटेलचा पत्ता देई. पुस्तक त्या हॉटेलवर पोहोचे. ते घेऊन गिल्की पसार होई. नंतर पोलिस कार्डधारक आणि हॉटेलचा पत्ता शोधत फिरत. गिल्की मात्र गायब झालेला असे. पैसे कार्डधारकाचे, पुस्तकं गिल्कीच्या संग्रहात. कार्डचे नंबर वापरून त्यानं हॉटेलांची बिलं भरली, बसची तिकीटं काढली आणि त्याच कार्डावर दुकानातून पुस्तकं चोरली. हे उद्योग करताना तो फोनवर आपले आवाज बदलत असे. आपल्या वतीनं दुकानादाराकडून पुस्तक घेण्यासाठी आपल्या पित्याला किंवा टॅक्सीड्रायव्हरला पाठवे. त्यामुळं पुस्तक चोरणारा खरा माणूस कोण आहे, त्याचा पत्ता लागत नसे.

अशा तऱ्हेनं गिल्कीनं उत्तम पुस्तक संग्राहक अशी कीर्ती मिळवली, लक्षावधी डॉलरच्या पुस्तकांचा संग्रह केला. त्यानं गोळा केलेली पुस्तकं विकली नाहीत. ती विकली असती तर त्याला काही कोटी डॉलर मिळाले असते. त्याला पैशांत रस नव्हता, पुस्तकांत रस होता. कोटी कोटी डॉलरची पुस्तकीय संपत्ती जवळ बाळगणारा हा माणूस फाटका होता. त्याची चोरी उघड झाल्यावर त्यानं कधी चार महिने, कधी सहा महिने असा तुरुंगवास सात-आठ वेळा आनंदानं भोगला. सरतेशेवटी पोलिसांनी त्याचा पुस्तकांचा गुप्त खजिना शोधून काढला. जी पुस्तकं चोरल्याचे हे सिद्ध झालं ती पोलिसांनी जप्त केली. पण अशी काही हजार पुस्तकं निघाली की ज्यांची चोरी पोलिसांना सिद्ध करता आली नाही. ती हजारो पुस्तकं गिल्कीकडंच उरली. त्यामुळं गिल्की संग्राहक ठरला. गिल्कीला आपण चोरी केली असं वाटत नाही. ग्रंथसंग्रह करण्याची थोरवी त्यानं मिळवली, पैसे कोणाचे हा प्रश्न दुय्यम. या पुस्तकात दुर्मिळ पुस्तकांबद्दल, पुस्तक प्रदर्शनांबद्दल, दुकानांबद्दल, संग्राहकांबद्दल विपुल माहिती आहे.

द मॅन हू लव्हड बुक्स टू मच

लेखिका - अॅलिसन हूवर बार्टलेट

प्रकाशक - पेंग्विन रँडम हाऊस

पाने - ३००. किंमत - ४९६ रुपये (किंडल आवृत्ती)

द्वारा : महाराष्ट्र टाइम्स
  Never miss a story from us, get weekly updates in your inbox.