द मिनिस्ट्री फॉर द फ्यूचर

किम स्टॅन्ले रॉबिन्सन

/media/MMHXL98MdL.jpg

अव-काळाचे आर्त : आश्वासक/ अनिर्णित उसंत - किरण लिमये

अव-काळाचे आर्त : आश्वासक/ अनिर्णित उसंत
खलव्यक्तींच्या गटात एक आहे ती मेरी मर्फी. मेरी मर्फी ‘मिनिस्ट्री फॉर द फ्यूचर’चे नेतृत्व करत आहे.
Written by लोकसत्ता टीम
December 11, 2021 12:02:03 am
|| किरण लिमये

पर्यावरणीय बदलांना रोखू पाहणाऱ्या जगाचे प्रयत्न या कादंबरीमध्ये एका सुखान्त टप्प्यावर येतात, हे कदाचित पटणार नाही; पण तरीही ती निव्वळ ‘सुपरहिरो’च्या कल्पितकथांसारखी कथा न ठरता, गांभीर्य पोहोचवते…

किम स्टॅनले रॉबिन्सन हे नाव विज्ञानकथावाचकांच्या ओळखीचे आहे. ‘मिनिस्ट्री फॉर द फ्यूचर’ ही त्याची ऑक्टोबर २०२० मध्ये प्रकाशित झालेली कादंबरी. काय आहे ही ‘मिनिस्ट्री फॉर द फ्यूचर’? भविष्यातील मानवी पिढ्या, प्राणी, आणि अन्य सजीव यांच्या हितासंदर्भात आज अस्तित्वात असलेली माणसे ºहस्वदृष्टीने वागत असल्यामुळे मानवी अस्तित्वाला हानीकारक असलेल्या पर्यावरणीय बदलांना परतीचा मार्ग उरलेला नाही. भविष्यातली अस्तित्वाच्या हितासाठी संयुक्त राष्ट्रांनी (यूएन) ‘मिनिस्ट्री फॉर द फ्यूचर’ जन्माला घातल्याची कल्पना, या पुस्तकाने पुढे नेली आहे. या मिनिस्ट्रीच्या नेतृत्वाखाली माणसे अपरिहार्य होऊ लागलेल्या हवामानबदलांना आश्वासक वळण देतात. त्याची गोष्ट म्हणजे ही कादंबरी.

आपल्या अगदी नजीक येऊन ठेपलेल्या पर्यावरणीय अवकाळाकडे डाव्या बाजूकडून पाहण्याचा प्रयत्न ही कादंबरी करते. लेखकाच्या शब्दांत सांगायचे तर कादंबरीतील वैचारिक मांडणी ‘जैव-माक्र्सवादा’च्या अंगाने जाते. मानवाशिवाय अन्य प्रजातींच्या (ज्यांत नामशेष होण्याच्या वाटेवर असलेले प्राणी-पक्षी, सूक्ष्म जीव, वनस्पती आहेत) बाजूने केलेली ही मांडणी आहे. त्यांच्यावर हे संकट मुळात आले कशाने? तर काही मूठभरांच्या अनिर्बंध लालसेने. एकूण लोकसंख्येला भौतिक समृद्धी मिळवून द्यायची असेल तर ही अनिर्बंध लालसा अपरिहार्य आहे, असे आपल्याला भांडवलशाहीच्या तत्त्वज्ञानाने पटवून दिले आहे. निव्वळ आपल्या सगळ्यांच्या विश्वासाच्या पायावर उभी असलेली आधुनिक चलनप्रणाली भांडवलशाहीने उभी केली आहे. तिला कोणतेही भौतिक आणि नैतिक अधिष्ठान नाही. त्यामुळे जगातल्या काही ताकदवान देशांचे मुख्य बँकर्स हे या चलनाच्या मूल्याचे ठेकेदार बनलेले आहेत. ज्या भांडवलशाही तत्त्वज्ञानावर त्यांचा पिंड पोसला आहे ते भांडवलशाही तत्त्वज्ञान आणि आपापल्या देशाचे हितसंबंध हेच या ठेकेदारांना चलनव्यवस्थेच्या मूल्यनिर्धारणाचे निकष वाटतात.

ही चलनव्यवस्था कार्बनघटीच्या भौतिक आणि नैतिक निकषावर घासून पाहिली तर? थोडक्यात, कोणतीही कृती कार्बनउत्सर्जन घटण्याच्या कामी जितकी उपयोगी, तितकी ती अधिक मूल्यवान. खनिज तेल जमिनीत ठेवणे हे ती काढून वापरण्यापेक्षा अधिक मूल्यवान. जसा डॉलर आजच्या जगात किमतीचा मापदंड आहे, तसे ‘कार्बनघटचलन’ नव्या जगातील किमतीचा मापदंड असणार. असे झाले, तर हवामानबदलाचे परिणाम थांबवण्याला आपण सुरुवात करू शकू. पण हा नवा मापदंड आणायचा कसा? कोणी? तर मानवाच्या अभिजात बुद्धिमत्तेने आणि विवेकाने. अशी बुद्धिमान आणि विवेकी माणसे, त्यांचे कामाने भरलेले, थकलेले दिवस, त्यांचे इतर माणसांशी संबंध, त्यांचे हरण्याचे-जिंकण्याचे-तरल आनंदाचे क्षण यांची गोळाबेरीज ‘मिनिस्ट्री फॉर द फ्यूचर’मध्ये आहे.

२०२५ साली उत्तर प्रदेशात (हो, हो… तो आपलाच उत्तर प्रदेश!) आलेल्या एका भयावह नैसर्गिक आपत्तीने, उष्म्याच्या संहारक लाटेने, कादंबरीची सुरुवात होते. वातावरणातील तापमान आणि दमटपणा यांचे प्रमाण हळूहळू जीवघेण्या पातळीकडे जाते आणि या लाटेत हजारो माणसे दगावतात. जसजसा दिवस चढत जातो तसतशी गळत जाणाऱ्या सुकल्या पानांप्रमाणे लोक मरतात. अमेरिकी सामाजिक संस्थेचा कार्यकर्ता या नात्याने, तेव्हा उत्तर प्रदेशात राहून या आपत्तीचा जवळून अनुभव घेतलेला, त्या मरणांच्या दर्शनाने अंतर्बाह्य बदलून गेलेला फ्रँक हे कादंबरीच्या सुरुवातीला येणारे प्रमुख पात्र. हवामानबदल हा आता त्याच्यासाठी केवळ बौद्धिक कसरतीचा विषय नाही. या बदलाचा तीव्र वैयक्तिक तडाखा त्याला बसलेला आहे. त्याच्या हानीचा सूड त्याला घ्यायचा आहे. त्याच्या मते हवामानबदल थांबवण्याची जबाबदारी असलेल्या व्यक्ती या दु:खाला जबाबदार आहेत. अशा व्यक्तींना धडा शिकवायचा असे तो ठरवतो.

या खलव्यक्तींच्या गटात एक आहे ती मेरी मर्फी. मेरी मर्फी ‘मिनिस्ट्री फॉर द फ्यूचर’चे नेतृत्व करत आहे. तिच्या दिमतीला पर्यावरणबदलाच्या प्रश्नाशी बांधिलकी असलेले अनेकविध विषयातले तज्ज्ञ आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या पॅरिस करारान्वये हे मंत्रालय अस्तित्वात आले आहे आणि आल्प्सच्या कुशीतील झ्युरिक शहरात हे मंत्रालय आहे. मेरीला धडा शिकवायला फ्रँक झ्युरिकमध्ये येतो.

सुरुवातीला फ्रँक आणि मेरीच्या एकमेकांत गुंतलेल्या गोष्टी आणि त्यानंतर अनेकानेक सामाजिक-राजकीय-आर्थिक पदर असलेला ओघवता रिपोर्ताज असे कादंबरीचे स्वरूप आहे. ओऱ्हान पामुकच्या ‘माय नेम इज रेड’मध्ये जसे काही संकल्पनांना चित्तवेधकपणे बोलते केलेले आहे, त्याच तंत्राचा सढळ वापर ‘मिनिस्ट्री…’मध्येही आहे. कादंबरी म्हणून ‘मिनिस्ट्री…’ खिळवून ठेवणारी आहे. पण आपल्या लक्षात राहतात ते कादंबरीतील निसर्गाचे, निसर्गामुळे माणसांत उमटणाऱ्या संवेदनांचे, चकित करणाऱ्या तांत्रिक बाबींचे तपशील. तपशिलांची घनता लेखकाच्या कल्पनेला विश्वासार्ह करते.

माणसातील सुष्ट वृत्ती आणि तिला दिलेली मानवी बुद्धिमत्तेची जोड यातूनच आपण पर्यावरणीय बदलांच्या प्रश्नाला आपण तोंड देऊ शकू, असा खासा अमेरिकी आशावाद रॉबिन्सन मांडतो. जगावर आलेल्या संकटातून आपल्या शौर्याच्या आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर जगाला तारणारे नायक (हिरोज) किंवा प्रसंगी सुपरहिरोज असा हा हॉलीवूडपटांचाच साचा. पण रॉबिन्सनचे सुपरहिरोज वैज्ञानिक आणि राजकारणी आहेत. आपल्या संशोधनविषयात गर्क असलेले, अभिनव संकल्पना मांडणारे वैज्ञानिक आणि आपल्यावरची सद्य:कालीन व भविष्यातील जगाची जबाबदारी, आपल्यासमोरचे पर्याय, आणि या पर्यायांचे जगासह स्वत:वर होणारे परिणाम यांबद्दल संवेदनशील असलेले नेतृत्व.

पण रंजक आणि तरीही गंभीर अशा अवकाळाची गोष्ट सांगणे एवढेच ‘मिनिस्ट्री ऑफ द फ्यूचर’ करत नाही. या कादंबरीतला अवकाळ हा अचानक अवतरणारा नाही. उष्णतेच्या अतिसंहारक लाटेसाठी आवश्यक असलेली हवामानस्थिती आजही जगात काही ठिकाणी नोंदली जात आहे. आजच्या वास्तवापासून हाकेच्या अंतरावर असलेला अवकाळ लेखक या कादंबरीतून उभा करतो.

जिथे हवामानबदलाचे संहारक परिणाम वास्तवाचा एक भागच बनलेले आहेत, अशा या अवकाळात मानवजात गोंधळलेली आहे. हवामानबदलाचे परिणाम सोसणाऱ्यांचा क्रोध त्यांना दहशतवादाकडे घेऊन आला आहे. पण जागतिकीकरणाच्या शीर्षस्थानी असलेल्या, आधुनिक चलनव्यवस्थेच्या ताबेदारांसाठी मात्र कार्बनउत्सर्जन कमी करणे हा कळीचा मुद्दा नाही. हवामानबदल थांबवण्याची जबाबदारी असलेल्या ‘मिनिस्ट्री फॉर द फ्यूचर’पाशी या ताबेदारांना हुकूम देण्याची ताकद नाही. ती ज्यांच्याकडे आहे असे राष्ट्रप्रमुख लोकमताचे मिंधे आहेत. आणि लोकमताचे काय? त्याला वाचवायचे आहे का पर्यावरण? असेलही कदाचित; पण त्यांच्यातले बहुतेक जण तर अस्तित्वाच्या धडपडीतच गुंतले आहेत. कारण नवे जग आजच्याहून अधिक विषम आहे.

मग ‘मिनिस्ट्री फॉर द फ्यूचर’ काय करेल? जागतिक वित्तव्यवस्थेच्या मक्तेदारांना कार्बनघट हे मूल्य स्वीकारायला लावण्यासाठी तंत्रज्ञान आणि मुत्सद्देगिरी पुरेशी ठरेल? निष्फळ साम मार्ग सोडून दाम-दंड-भेद अवलंबण्याचे आणि तरीही परत साम मार्गावर येण्याची क्षमता मिनिस्ट्रीत असेल? या प्रश्नांदरम्यान मेरी मर्फीने केलेला संघर्ष, तिच्यात झालेले बदल आणि एका टप्प्यावरची निवृत्ती असेही कादंबरीचे वर्णन करता येईल.

पर्यावरणस्नेही तंत्रज्ञान आणि कार्बनचलन हे दोन मार्ग सोडले तर ‘मिनिस्ट्री फॉर द फ्यूचर’ काही रस्त्यांच्या केवळ खुणा दर्शवते. हवामानबदलाचे दुष्परिणाम नको असतील तर मुळात ज्या उपभोगवादी जीवनपद्धतीतून हा हवामानबदल घडला आहे त्या जीवनपद्धतीतच बदल व्हायला हवा, हा एक रस्ता. स्थानिक, मर्यादित परिघाचे जीवन जगणे त्याकरिता सर्वमान्य व्हायला हवे. हे लोकांनी स्वीकारून हवे असेल, तर अशा विचाराच्या लोकांचे उदाहरण लोकांसमोर यायला हवे. दुसरा रस्ता लोकांचे विचार बदलण्यापेक्षा लोकांची श्रद्धा बदलण्याचा – पर्यावरणपूरक जगणे हेच ‘धर्म’ म्हणून पुढे आणण्याचा. कादंबरी या दोन्ही शक्यता ओझरत्या चाचपून पाहते. झ्युरिक शहराच्या वर्णनात पर्यावरणपूरक पद्धतीने जगू पाहणाऱ्या समूहांचा उल्लेख अनेकदा येतो. मिनिस्ट्री-प्रमुख असलेली मेरी तिच्या निवृत्तीनंतर अशा एक समूहाचा भाग बनते. मेरीच्या निवृत्तीनंतर मिनिस्ट्रीची सूत्रे हातात घेणारा बादिम हा श्रद्धाबदलाच्या मार्गाचे सूतोवाच अनेकदा करतो. पण हे चुटपुटते उल्लेख, संहारक देवतेच्या नावाचा एक उग्रवादी गट आणि कादंबरीच्या शेवटाला असलेला एक तुकडा या बाबी सोडल्यास या शक्यता फारशा विकसित होत नाहीत. कादंबरीतला अयाचित युटोपिया अवतरतो तो शेवटी लोकशाही आणि बाजाराधारित व्यक्तिवादी चौकटीमध्येच.

कादंबरी जरी कुनस्थानी (डिस्टोपियन) असली तरी ती सुखान्त आहे. पण हा ‘अँड दे लिव्हड हॅपिली एव्हरआफ्टर’ असा प्रकार नाही. माणसाच्या अस्तित्वाची इमारत उखडू पाहणाऱ्या शक्यतेपासून आश्वासक पण अनिर्णित उसंत असा हा वास्तववादी सुखान्त आहे. काही मूठभर धनाढ्य सोडले तर बाकी सारे जसे आधी होते तसेच आहेत, कदाचित वेगळ्या ठिकाणी आहेत, पण त्यांना अजूनही ग्राहक आणि उपभोक्ते म्हणून जगता येणार आहेच, फक्त ‘काळ्या’ ऊर्जेच्या आधारे नव्हे, तर ‘हरित’ ऊर्जेच्या आणि हरित चलनाच्या आधारे! आणि जोवर तेही हरित मूल्ये सांभाळत राहतील, तोवर अपरिवर्तनीय पर्यावरणबदलाच्या कडेलोटापासून ते मागे-मागे येत राहणार आहेत.

कोविडची न सरणारी काळछाया, पर्यावरणबदलासाठी कोणत्याही ठाम कृतीबाबत एकमतावर न येऊ शकलेले जागतिक नेतृत्व (सीओपी परिषदा आठवून पाहा!), आणि अवकाळी पावसाचे वाढत जाणारे दिवस अशा पार्श्वभूमीवर सुखान्ताची स्वप्ने अवास्तव वाटू शकतात. पण एके काळी पर्यावरणबदलाचा अवकाळही असाच अवास्तव वाटत होता. आज तो उंबरठ्याबाहेर उभा आहे. ते जेव्हा आपल्या घरात शिरेल, तेव्हा हा सुखान्ताचा झरोकाच आपल्या कामी येईल का?

kiranlimaye11@gmail.com

द्वारा : लोकसत्ता वृत्तसेवा