वालॉंग - एका युद्धकैद्याची बखर

श्याम चव्हाण

राजहंस प्रकाशन

/media/walong.jpg

पाने : ☀ 126 मुल्य (₹): 160.0

सैनिकी जीवनातले वास्तव सांगणारे ‘वालॉन्ग – एका युद्धकैद्याची बखर’ - पंकज कोटलवार

दोन दिवसांपुर्वी एक पुस्तक वाचले, वालॉन्ग – एका युद्धकैद्याची बखर, अजुनही मी स्वतःला त्या पुस्तकाच्या हॅन्गओव्हरमधुन बाहेर काढु शकत नाहीये.
इतका ह्या पुस्तकाने मनाचा ताबा घेतला आहे.

लेफ्टनंट कर्नल श्यामकांत चव्हाण हे एकोणीसशे बासष्टमध्ये झालेल्या चीनविरुद्धच्या युद्धात तेव्हाच्या नेफा म्हणजे आताच्या अरुणाचल प्रदेशात भारतमातेची लाज राखण्यासाठी, आणि हिमालयाच्या शिखरांचं संरक्षण करण्यासाठी लढायला गेले होते.

१९६२ चं भारत चीन युद्ध हे अतिशय विषम अशा दोन शक्तींमध्ये लढलं गेलं होतं, ज्याची भारताला प्रचंड किंमत चुकवावी लागली.

युद्धाच्या आधी हिंदी-चीनी भाई भाई अशा घोषणा देत पुर्णपणे गाफील राहीलेला भारत…

युद्धाची मानसिक तयारी नसलेलं, भारताचं कमजोर राजकीय नेतृत्व, भारताकडे असलेली दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी वापरली गेलेली कालबाह्य तरीही अगदी अपुरी शस्त्रं…

आपलं मोजकं, आणि प्रचंड दमलेलं सैन्यबळ… त्याविरुद्ध आक्रमक आणि युद्धखोर चीनी लोक…. त्यांचं अत्याधुनिक शस्त्रांस्त्रांनी सज्ज असलेलं सैन्य….

त्यांना दक्षिण कोरीयामध्ये असलेला अमेरीकेविरुद्धच्या युद्धाचा अनुभव…. चीनने सीमाभागावर कित्येक वर्षांपासुन तयारी करुन बांधलेले बंकर्स, रस्ते आणि सुविधा.

ह्या पार्श्वभुमीवर हे युद्ध झालं.

वालॉन्ग - एका युद्धकैद्याची बखर
पुस्तकाची सुरुवात होते १२ नोव्हेंबर १९६२ ह्या दिवशी.

कर्नल श्याम चव्हाण हे नुकतेच डेहराडुनच्या मिलीटरी एकॅडमीमधुन बाहेर पडुन भारतीय सैन्याच्या कुमाऊं डिव्हीजनमध्ये भरती झालेले आहेत.

युद्धखोर चीनने अनेक ठिकाणी मॅकमोहन रेषा ओलांडली, आणि चकमकींना सुरुवात झाली. युद्धाला तोंड फुटले.

कर्नल श्याम आणि त्यांच्या सहकाऱ्यांना वरिष्ठांचा आदेश येतो की अरूणाचल प्रदेशात हिमालयाच्या शिखरांवर, चीनने घुसखोरी करुन भारतीय चौक्या नष्ट केल्या आहेत.

आता त्यांचा बचाव करण्याची, चीन्यांना तिथेच थोपण्याची जबाबदारी श्याम यांच्या कुमांऊ डिव्हीजनवर सोपवण्यात आली आहे.

किबिथु हे शहर मॅकमोहन रेषेच्या अगदी जवळ आहे, त्यापुढे भारत चीन सीमेला चिटकुन जे गाव आहे त्याचं नाव वालॉन्ग!

भारत चीन सीमेवर एक नदी वाहतेय, आपण तिला ब्रम्हपुत्रा म्हणतो, तिबेटी-चीनी लोक तिला लोहीत नदी म्हणतात.

तर भारत सरकारने ज्या शिखरांपासुन चीनी सैन्याला हुसकुन लावायची जबाबदारी कुमाऊं डिव्हीजनवर सोपवली आहे, ते ठिकाण आहे, वालॉन्ग ह्या गावापासुन तब्बल चौदा हजार फुट उंचीवर.

चीन्याकंडे आहेत, तसली हेलीकॉप्टर्स आपल्याकडे नाहीत, असलीच तर ती फारच तुरळक आहेत.

म्हणुन आपल्या सैन्याला ती जीवघेणी, धोकादायक वाट फक्त दोन दिवसांत चालत चालत पार करा असे आदेश दिले गेले आहेत.

पाठीवर मोठा पॅक, पाण्याची बाटली व इतर सामान, गळ्यात मशीनगनचा अडीचशे गोळ्यांचा बेल्ट, हातात सहा ‘टु इंच मॉर्टर’ बॉम्बचा कॅरीअर आणि कमरेला सहा हॅंडग्रेनेडस्….

फक्त एवढं सामान घेऊन, हिमालयाच्या जीवघेण्या कड्याकपारी, चिंचोळ्या वाटा, पायात गुडघ्याएवढा बर्फ अशा बिकट परिस्थितीत कर्नल श्याम आणि त्यांचे सहकारी हे अंतर कुठेही न थांबता पार करतात.

जस्ट डु ऑर डाय, नॉट टु क्वेश्चन व्हाय? ह्या कठोर सैनिकी बाण्याने हे लोक आपल्याला दिलेला आदेश इमानेइतबारे पार पाडतात आणि गंतव्य स्थानी पोहचतात.

निघताना त्यांना प्रत्येकाला सोबत एक दहा पुऱ्या आणि भाजीचं एक पार्सल दिलं गेलं आहे. हे त्यांना भेटलेलं शेवटचं भारतीय जेवण ठरतं….

कर्नल श्यामच्या नशीबात तर तेही येत नाही…

कारण नेमकं पार्सलच्या लाईनमध्ये उभा रहायच्या वेळीच त्यांचे सिनीअर एक काम त्यांच्यावर सोपवतात, आणि तसेच उपाशीपोटी ते डोंगर चढायची सुरुवात करतात.

शिखरावर पोहचेपर्यंत त्यांचे अनेक हाल हाल होतात, निकृष्ट दर्जाचे बुट, हाडं गोठवुन टाकणारी थंडी, अन्न पाण्याची टंचाई, अशा अनेक अडचणींना तोंड देत जवळ पोहचले की वायरलेस वर आदेश येतो की चीनी लोकांवर हल्ला चढवा.

कर्नल श्यामच्या मनात पाल चुकचुकते. आपलं पुर्ण सैन्य थकलेलं आहे, रिकाम्या पोटी दोन दिवस चालल्याने सर्वांचे पाय सोलुन निघाले आहेत, जखमा झाल्या आहेत, आता दिवसाढवळ्या हल्ला करण्याऐवजी रात्री बेसावध शत्रुवर हल्ला करणे अधिक परिणामकारक होईल, असे ते जीवाच्या आकांताने वरिष्ठांना सांगु पाहतात.

शत्रुने लॅंड माईन्स अंथरल्या आहेत का, हे सुद्धा टेहाळणी करायला वेळ मिळालेला नाही, ती जागा तिचा भुगोल, व्युहरचना बनवण्यासाठी काही तासांचा अवधी दिला जावा, अशी अजिजीने विनंती करतात.

पण वायरलेस वर ‘एनी डाऊटस’ असा संदेश येतो, अर्थात तुमचे काही ऐकले जाणार नाही, तात्काळ हल्ला चढवा, चीन्यांना हुसकुन लावा, हा संदेश ऐकुन ते काय समजायचे ते समजतात, आणि आता ते चीनी चोक्यांवर हल्ला करायची मानसिक तयारी करतात.

दोन अडीच दिवस उपाशीपोटी चाललेलं, बाराशे लोकांचं आपलं भारतीय सैन्य, अत्याधुनिक शस्त्रांनी, प्रखर मारा करणाऱ्या तोफांनी, सुसज्ज असलेल्या चीनी सैन्याच्या बंदुकी आणि तोफखान्यासमोर आपल्या जीवाची आहुती द्यायला सज्ज होतं….

आपल्या मातृभुमी साठी मृत्युला कवटाळण्याची तयारी केलेलं ते सैन्य पाहिलं की आपल्याला राजपुतांचा केसरिया-जोहार आठवतो.

ते वर्णन वाचताना आपल्या ह्रद्यात कालवाकालव होते, अंगावर शहारे येतात, डोळ्यातुन पाणी येतं, हुंदके फुटु लागतात.आपल्या देशासाठी जीव देणाऱ्या ह्या वीर आणि बहादुर सैनिकांबद्द्ल, ह्या देशातले देशवासी खरोखर कृतज्ञ राहतात का?

कोणी आपल्या रक्षणासाठी स्वतःच्या जीवाचं बलिदान द्यावं, इतके आपल्या देशातल्या लोकांची खरोखर पात्रता आहे का?

हा प्रश्न मनात अनेकदा काहुर उठवत राहतो….

आपणही मनातल्या मनात लढाईच्या ठिकाणी जाऊन पोहचतो.

कर्नल श्याम गनिमी काव्याने लढायचे ठरवतात, चीनी बंकर्सजवळ जाऊन अंदाज घेतात, आणि बेसावध चीन्यांवर आपलं सैन्य मशिनगनचा मारा सुरु करतं, सुरुवातीला त्रेधातिरपीट उडालेलं चीनी सैन्य लवकरच सावध होतं….

त्यांनी बांधलेल्या बंकर्समध्ये ते दबा धरुन स्वतःचा बचाव करतं, आपल्या सैन्याला फक्त झाडांचे आडोसे असतात.

त्यांच्या ऑटोमॅटीक गन्सचा आणि मोर्टार तोफांचा प्रखर मारा सुरु होतो. सकाळी दहाला सुरु झालेलं युद्ध रात्रीपर्यंत चालतं.

जीवात जीव असेपर्यंत एकेक भारतीय सैनिक चीन्यांना कडवी झुंज देतो. दिवसाच्या शेवटी भारतीय सैन्याकडे असलेल्या बंदुकीच्या गोळ्या, हॅन्डग्रेनेस, तोफांचे गोळे सगळं संपतं.

पाठीमागुन कसलं बॅक अप येणार आहे, ह्याची आशा ही नसते. आता मृत्यु कवेत घ्यायला आतुर असतो.

चीनी शिपायांची दहा हजार सैनीकांची नवी कुमक युद्धक्षेत्रावर दाखल होते. आपला गोळीबार थांबलेला पाहुन चीन्यांना चेव चढतो.

शिकारी सावजाला टिपायला बाहेर पडतो त्या आवेशात बंकरच्या बाहेर येऊन उघडपणे ते भारतीय सैनिकांना टिपायला लागतात.

आपले सगळे तात्पुरते अड्डे उध्वस्त होतात.

मरायच्या आधी दोनचार मारु, ह्या निश्चयाने भारतीय सैनीक लपायचे आडोसे सोडुन रिकाम्या बंदुकीनी चीन्यांवर तुटुन पडतात.

आपल्याला वेडात मराठे वीर दौडले सात, ही कविता उगीचच आठवत राहते.

एकेक शुर शिपायी आपल्या भारतमातेचा शेवटचा निरोप घ्यायला लागतो. धारातिर्थी पडतो….

कर्नल श्यामकांत मरण्याची पुर्ण तयारी करतात, चार चीनी सैनिकांना स्वतःच्या हाताने मारुन पुढे जात असताना एक ग्रेनेड त्यांच्या बाजुच्या झाडावर फुटतो.

ते जबर जखमी होतात, बॉम्बचे तुकडे त्यांच्या सर्वांगात घुसतात.

चीनी सैन्य तात्काळ त्यांना घेरतं, डोक्यावर बंदुक लावतं, पण त्यांची ऑफीसरची वर्दी पाहुन त्यांचा जीव घेतला जात नाही.

त्यांना युद्धबंदी बनवलं जातं, आता हे लोक आपल्याला हाल हाल करुन मारणार, त्याआधी मरण आलं तर बरं, म्हणुन ते देवाची प्रार्थना करतात. पण ते आश्चर्यकारक रित्या अनेक जीवघेण्या संघर्षातुन वाचतात.

पुढचे तब्बल अडीच महीने शत्रुच्या ताब्यात राहुन तिथे सहन केलेल्या नरकयातनांचं वर्णन आहे, वालॉन्ग!

एक युद्धबंदी होणं, किती दुर्दैवी असतं, आपल्या परिवाराची, आपल्या देशाची आठवण येऊन व्याकुळ होणं, म्हणजे काय? ह्याचे जिवंत अनुभव शब्दांशब्दांमध्ये अनुभवणं, ह्याचं नाव आहे वालॉन्ग!…

प्रचंड आणि वाचवल्या न जाणाऱ्या शारीरीक यातना, तहानभुक सहन करुन, आपल्या मातृभुमीसाठी तडफडणं, काय असतं? त्या शब्दाच्या पलिकडील संवेदनांना जन्म देतं, वालॉन्ग!…

संख्येने आणि ताकतीने आपल्याहुन कितीतरी पट असलेल्या शत्रुला आपल्या जिद्दीने नमवता येतं, ह्याचं आपल्या रक्तानं लिहलेलं दर्शन आहे वालॉन्ग!…

कितीही भयंकर संकट असेल तरी भिऊ नका…ते आमच्या ह्या सिचुएशनपुढे काहीच नाही, असा पानापानातुन संदेश देत राहतं वॉलॉन्ग!…

किती लिहु आणि काय लिहु?

मृत्युच्या दाढेतुन कर्नल श्याम अनेकदा सुखरुप परत आले. कारण आपल्यासाठी त्यांनी हे पुस्तक लिहावं, अशी दैवाचीच इच्छा असेल.

ह्या पुस्तकात युद्धबंदी झाल्यावरचे अनुभव, खाण्यापिण्याच्या हालअपेष्टा, चीनमध्ये आलेले भलेबुरे अनुभव, भारतीय युद्धकैद्यांची मानसिक निराशा, कर्नल श्याम यांचे पळुन जाण्याचे प्रयत्न.

आत्महत्येचे विचार दुर झटकणं, आईवडीलांच्या आठवणींनी व्याकुळ होणं, दिवाळीच्या दिवशी नदीकिनारी केलेली पुजा…

त्यासाठी चीनी लोकांकडून सामान घेऊन बनवुन घेतलेला अजबगजब शिरा…

एकमेकांची भाषा येत नसताना, तिबेटी सिनिक कामा सोंद्रा ह्याच्याशी जडलेली मैत्री…

पुढे जवळपास तीन महिन्यांनी रेडक्रॉसच्या पुढाकाराने झालेली सर्व भारतीय कैद्यांची सुटका…

हे सगळे अनुभव ह्या पुस्तकात विलक्षण जिवंतपणे शब्दबद्ध केले आहेत.

हे पुस्तक आपल्या आतमध्ये एका नव्या प्रखर आत्मशक्तीला जन्म देतं.

आणि त्या हॅंगओव्हरमधुन मी अजुनही बाहेर पडु शकलो नाही, असं मी का म्हणतोय, ते आता तुम्हाला कळालं असेल!

भारतीय सैनिक नाही बनता आलं तरी एक चांगला नागरीक बनुन आपण देशासाठी नक्की काही चांगलं काम करुया, अशा ठाम विश्वासासह….

मनःपुर्वक आभार आणि खुप शुभेच्छा!…

द्वारा : मनाचेTalks