टिळकपर्व १९१४-१९२०

अरविंद व्यं. गोखले

राजहंस प्रकाशन

/media/tilakparv.jpg

पाने : ☀ 470 मुल्य (₹): 500.0

टिळकांच्या सर्वोच्च संघर्षाचं अंतिम पर्व... - धनंजय बिजले

लोकमान्य टिळक यांच्या जीवनावरील ‘टिळकपर्व १९१४-१९२०’ या पुस्तकाचं येत्या बुधवारी (ता. ३०) पुण्यात प्रकाशन होत आहे. यानिमित्त पुस्तकाचे लेखक व ज्येष्ठ पत्रकार अरविंद व्यं. गोखले यांनी ‘सकाळ’ला दिलेल्या मुलाखतीत या पुस्तकाचं महत्त्व स्पष्ट केलं.

प्रश्न : लोकमान्य टिळकांवर आतापर्यंत विपुल लेखन झालं आहे, तरीही त्यांच्या जीवनातील १९१४ ते १९२० या कालखंडाविषयी स्वतंत्रपणे का लिहावंसं वाटलं?

गोखले : ‘मंडालेचा राजबंदी’ या माझ्या पुस्तकात १९०८ ते १९१४ हा कालखंड आहे. कारागृहात टिळकांनी गीतारहस्यसारखा महत्त्वाचा ग्रंथ लिहिला. पण मंडालेतून सुटका झाल्यानंतरचा काळ हा टिळकांच्या जीवनातील सर्वोच्च महत्त्वाचा कालखंड आहे, तो त्यांच्या संघर्षाचा आणि प्रखरतेचा कालखंड आहे.

या काळात ते आधीपेक्षा खूप आक्रमक झाले. १९१६ मध्ये लखनौमध्ये काँग्रेसच्या अधिवेशनात त्यांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि ते मी मिळवणारच’ ही गगनभेदी घोषणा दिली.

आपल्याकडे मराठीत ही घोषणा ‘तो मी मिळवणारच’ अशी वर्षानुवर्षं दिली जाते. पण जो अधिकार जन्मसिद्ध आहे तो का मिळवायचा? त्यांना मिळवायचं होतं ते स्वराज्य; तेव्हा तिथं ‘ते’च हवं. जेव्हा टिळकांनी ही गर्जना केली, तेव्हा टाळ्यांचा इतका कडकडाट झाला की, अधिवेशनाचा मांडव कोसळतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली. हे सगळं स्वामी श्रद्धानंद यांनी, म्हणजेच लाला मुन्शिराम यांनी लिहून ठेवलं आहे.

याच अधिवेशनाच्या निमित्ताने हिंदू आणि मुस्लिम यांच्यात टिळक आणि महंमद अली जिना यांनी समझोता घडवून आणला. त्यांच्या या आणि अन्य बाबतीतील दूरदृष्टीविषयी विस्तृत लेखन झालं नव्हतं, त्यामुळे मी हे पुस्तक लिहिलं.

प्रश्न : तुमच्या मते टिळकांच्या जीवनाचे पाच महत्त्वाचे टप्पे आहेत, ते कोणते?

- १८५६ ते १८८१ (टिळकांचा जन्म ते केसरीचा जन्म), १८८१ ते १८९९ (प्लेगची साथ, राजद्रोहाचा खटला, त्यांना झालेली शिक्षा), १८९९ ते १९०८ (काँग्रेसमधील फूट, जहाल-मवाळ वाद), १९०८ ते १९१४ (मंडालेतील शिक्षा, गीतारहस्याचं लेखन), १९१४ ते १९२० (स्वराज्यासाठीचा देशव्यापी लढा, लखनौ करार) असे त्यांच्या ६४ वर्षांच्या जीवनाचे पाच महत्त्वाचे टप्पे आहेत. त्यातील शेवटच्या टप्प्यावर हे पुस्तक आहे.

प्रश्न : टिळकांच्या जीवनात या काळात कोणत्या महत्त्वाच्या घटना घडल्या?

- या काळात महात्मा गांधी आफ्रिकेतून परतले. टिळक त्यांना म्हणाले, मी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करेन आणि स्वराज्य मिळवण्यासाठी काँग्रेस ताब्यात घेईन. अर्थात, त्यांना सरकारमध्ये रस नव्हता. एका मुलाखतीत टिळक म्हणाले होते, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मी परराष्ट्रमंत्री होणार नाही की पंतप्रधान. मी पुन्हा फर्ग्युसनमध्ये जाऊन गणिताचा प्राध्यापक म्हणून काम करेन. पण, काँग्रेस देशव्यापी पक्ष असल्याने ब्रिटिशांच्या सत्तेशी लढायला त्यांना काँग्रेस हाच एकमेव उपयुक्त पक्ष असल्याची जाणीव होती. या काळात तात्त्विक मतभेदांमुळे नामदार गोखलेंचा टिळकांच्या पक्षप्रवेशाला विरोध होता. पण, हा विरोध झुगारून टिळकांनी काँग्रेसमध्ये पुन्हा अढळ स्थान मिळवलं. डिसेंबर १९१६ मध्ये लखनौमध्ये सहा दिवसांचं काँग्रेसचं अधिवेशन झालं. त्याच वेळी त्यांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे’ ही घोषणा दिली. योगायोगाने त्याचवेळी लखनौत हिंदू महासभेचं आणि मुस्लिम लीगचंही अधिवेशन होतं. काँग्रेसचे मोठे नेते असूनही टिळकांना या दोन्ही पक्षांनी निमंत्रित केलं. हिंदू महासभेच्या अधिवेशनात टिळकांचा त्यांच्या उपस्थितीत निषेध झाला; पण त्याची त्यांनी फिकीर केली नाही. हाच तो काळ, जेव्हा त्यांच्या देशव्यापी नेतृत्वावर शिक्कामोर्तब झालं.

प्रश्न : वाचकांनी हे पुस्तक आवर्जून का वाचावं?

- टिळकांवर एक आक्षेप घेतला जातो की, त्यांच्यापासून काँग्रेसने मुस्लिम अनुनयाचं धोरण राबविण्यास सुरुवात केली. मात्र, टिळकांनी स्वतःच असं सांगितलं होतं की, जेव्हा तीन पक्षांचा लढा असतो, त्या वेळी दोघांनी एकत्र यायचं असतं. इथं तिसरा पक्ष म्हणजे इंग्रज, तर अन्य दोन पक्ष म्हणजे हिंदू व मुस्लिमांचे पक्ष असं टिळकांना अभिप्रेत होतं. त्यामुळे काँग्रेस व मुस्लिम लीग जर एकत्र आले, तर ते इंग्रजांच्या नाकी दम आणतील, त्यांच्या फोडा व झोडा या नीतीला पुरून उरतील हे उघड होतं. लखनौ कराराची फोड ‘लक नाऊ इन लखनौ’ अशी त्यांनी केली होती. स्वराज्य मिळालं तर आताच, ही टिळकांची धारणा होती. मुस्लिमांना लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय आरक्षण दिलं पाहिजे, असं त्यांनी लखनौ करारात म्हटलं होतं. लोकसंख्येनुसार त्यांनी पंजाब, मुंबई, सिंध प्रांतात किती आरक्षण द्यावं, याचं वाटप केलं होतं. हे जिनांनाही मान्य होतं. हिंदू-मुस्लिमांतील हा करार स्वातंत्र्यलढ्यातील ‘टर्निंग पॉइंट’च होता. त्यामुळे ब्रिटिश सत्तेविरुद्धचा संघर्ष धारदार झाला. टिळकांच्या जीवनातील हे महत्त्वाचे राजकीय टप्पे पुस्तकात सविस्तर वाचायला मिळतील. या काळात लंडन टाइम्सचे पत्रकार व्हॅलेंटाइन चिरोलने टिळकांना दूषण म्हणून ‘भारतीय असंतोषाचे जनक’ असे म्हटले. त्याला धडा शिकविण्यासाठी टिळकांनी लंडनमध्ये जाऊन कायदेशीर लढा दिला, त्यामुळे चिरोलने दिलेलं दूषण हे टिळकांचं भूषण ठरलं. या दौऱ्यात त्यांनी मजूर पक्षाच्या अधिवेशनात भाषण केलं, तसंच भारताच्या स्वातंत्र्याचा ठरावही केला. लंडनच्या हाईड पार्कवरील त्यांची सभा फार गाजली. या प्रचंड मोठ्या मैदानावर गर्दीसाठी आणि ध्वनिक्षेपकाअभावी चक्क सहा व्यासपीठं उभारली होती. त्या प्रत्येक व्यासपीठावरून टिळकांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. चिरोल खटला, विलायतेतील भाषणं, तसंच गोखले-टिळक वाद याचे दूरगामी परिणाम या पुस्तकात आहेत. टिळकांच्या शेवटच्या क्षणापर्यंतच्या प्रवासाचा मर्मग्राही आढावा पुस्तकात आहे.

प्रश्न - अजूनही टिळकांच्या कोणत्या कार्यावर प्रकाश पडणं गरजेचं वाटतं?

- केसरीतील विपुल लेखनाच्या माध्यमातून त्यांनी इंग्रजीला पर्याय म्हणून मराठीत नोकरशाहीसारख्या तब्बल तीन हजार नव्या मराठी शब्दांची भर घातली आहे. टिळकांची पत्रकारिता, अग्रलेख व मराठी भाषेसाठीचं त्यांचं योगदान, भाषाशैली यावर सखोल अभ्यासाची गरज आहे. त्यांचं मराठामधील लेखन मराठीत फारसं आलेलं नाही, त्यांच्या या योगदानावर अजून फारसा प्रकाश पडलेला नाही.

द्वारा : सकाळ वृत्तसेवा