भाषेची भिंगरी

डॉ. नीलिमा गुंडी

मनोविकास प्रकाशन

/media/भाषेची भिंगरी_Bhashechi bhingari.jpg

पाने : ☀ 140 मुल्य (₹): 300.0

मुलांशी संवाद साधणारी 'भिंगरी' - डॉ. संगीता बर्वे

मुलांशी कसे बोलावे, त्यांना कसे खुलवावे, त्यांचा भाषेचा पैस कसा वाढवावा हे सहजसोपेपणाने सांगणारे 'भाषेची भिंगरी' हे पुस्तक मुलांसाठी अतिशय उपयोगी आहे. मानवी मेंदूच्या 'ब्रोकाज एरिया' या भागामध्ये भाषेची जडणघडण होत असते. मोठ्यांचे ऐकून ऐकून लहान मूल आपापली भाषा आत्मसात करीत असते. मुलांशी संवाद साधणे ही खरोखरच कौशल्याची बाब आहे. मुलांना समजेल, रुचेल, पटेल अशा पद्धतीने त्यांच्याशी बोलावे लागते. त्यासाठी पालकांनीही शिक्षण घेण्याची आवश्यकता आहे. म्हणूनच डॉ. नीलिमा गुंडी यांचे हे पुस्तक लहानांप्रमाणे मोठ्यांसाठीही आहे.

मुलांना आपल्या वाटतील, इतक्या सहजपणाने नीलिमाताई गोष्टी सांगत सांगत, शब्दांचे बोट धरून, भाषेच्या जगातला गमतीशीर प्रवास घडवतात. मुलांशी गप्पाटप्पा करीत करीत त्यांची शब्दांशी गट्टी कशी होईल, या विषयीचा बारकाईने विचार करतात. या गोष्टींमध्ये नाट्य आहे, काव्य आहे आणि खेळ तर आहेच आहेत. मुलांना भाषेकडे नेणारे, एक नवी वाट खुली करणारे हे पुस्तक आहे. मुलांच्या मनात नव्याने उमलणारी भाषा आणि बाहेरची नाना रूपातील बहुविध भाषा यांचे हळुवार चित्रण लेखिकेने केले आहे. विशिष्ट क्रमांक फिरविल्यावरच उघडणारे कुलुप असते. अक्षरांचेही तसेच असते. आपापल्या चिन्हांसह ती विशिष्ट क्रमाने आली, की मगच त्यांचा योग्य तो अर्थ लागतो. अशी भाषेची गंमत नीलिमाताई अगदी सोपेपणाने उलगडून सांगतात. लिहिताना नीट लक्ष द्यायला हवे, नाही तर काय गमतीजमती होतात, हे सांगताना त्या लिहितात, 'कानामात्रा देताना मी काणाडोळा केला तर उंचावरची घार होते, जमिनीवरचे घर.'

विरामचिन्हे म्हणजे लिहिण्या-बोलण्यातील लाल, हिरवे, पिवळे दिवेच असतात. विरामचिन्हे योग्य त्या ठिकाणीच द्यायला हवीत. नाही तर काय होईल, हे सांगताना झालेले विनोद तर फारच मजेदार. 'मी जंकफूड खाणार, नाही खाल्ल्यास तुम्ही मला खुशाल रागवा.' यामध्ये स्वल्पविरामाने आपली जागा बदलली, 'मी जंकफूड खाणार नाही, खाल्ल्यास तुम्ही मला खुशाल रागवा.' ही आहे विरामचिन्हांची करामत! मुलांना लहानपणापासूनच कल्पनेचे पंख फुटलेले असतात. भाषेच्या अलंकाराच्या गमतीजमती शिकताना, त्या पंखांना आणखी बळ मिळते. उदाहरणार्थ, 'परवा बाबांनी आईला म्हटलं, 'तू केलेला उपमा म्हणजे काय वर्णावा? त्याला उपमाच नाही!' आई बिचारी गोंधळून गेली. ते कौतुक करताहेत, की चेष्टा? कारण उपमा हा खायचा पदार्थ आहे आणि अलंकाराचे नावही! अक्षरांनादेखील स्वभाव असतो, ही कल्पना तर यातील रिमझिमलाच नव्हे, तर आपल्या सर्वांनाच आवडेल अशी आहे. 'ङ्', 'ञ' ही अक्षरे फार कमी शब्दांमध्ये वापरली जातात. या उलट 'क' हे अक्षर कामसू आहे. ते खूप ठिकाणी वापरले जाते. उदा. 'काल काकाने कामासाठी कशिदाकाम केलेले काळे कापड कपाटातून काढले.'

'लंबकर्ण, लईभारी' या प्रकरणातली सावनी म्हणते, 'माझी आजी लाडू वळावेत, इतक्या सहज नवे शब्द तयार करते. आजी किनई स्मार्टफोनला लंबकर्ण म्हणते. आपल्याला त्यातून लांबचं ऐकू येतं नाही, म्हणून! आणि लायटरला ती 'ठिणगीबहादूर' म्हणते.' लई भारी, वंगाळ, पांदी, आंबेडाळ असा शब्दखजिना या पुस्तकात सापडतो. 'बहुरूपी शब्द', 'टिंबांच्या खोड्या', 'दगडलाडू', 'खेळ यमकाचा', 'छोटुकलं नाटुकलं', 'अर्थाची घसरगुंडी' अशा तीस प्रकरणांतून मुले, पालक, शिक्षक आणि रसिक वाचक भाषेची गंमत अनुभवतात. हे पुस्तक म्हणजे मुलांसाठी घेतलेले भाषेचे शिबिरच आहे. यात मुलांसाठीच्या गोष्टी आहेत. त्यांच्याशी रंगलेल्या गप्पागोष्टींतून भाषेचे अद्भुत जग उलगडते. त्यातून अक्षरचिन्हे, उच्चार, शब्द आणि अर्थ यांच्या नात्यातील बारकावे, अभिव्यक्तीच्या वेगवेगळ्या वाटा, अशा अनेक गोष्टींची जाणीव होत जाते. मुलांना भाषेतल्या गमतीजमती कळतातच; पण व्याकरणाचा बागुलबुवा न दाखवता चकवेही अगदी सहजपणे कळत जातात.

मुखपृष्ठ : मधुरा सरडे

द्वारा : महाराष्ट्र टाइम्स वृत्तसेवा