युगान्त

इरावती कर्वे

देशमुख अ‍ॅन्ड कंपनी पब्लिशर्स प्रा. लि.

/media/युगान्त _ynt.jpg

पाने : ☀ 244 मुल्य (₹): 350.0

अल्प परिचय - महेश नाईक

महाभारताच्या जिज्ञासू वाचकांसाठी जी काही दर्जेदार पुस्तकं उपलब्ध आहेत त्यात इरावती कर्वेंच्या युगांत चा वरचा क्रम लागतो. हा वरचा क्रम त्याच्या दर्जा वरून जसा आहे, तसाच तो विचार मंथनाच्या काळा वरून देखील आहे. महाभारताची भांडारकर संस्थेची संशोधित प्रत त्याच्या प्रसिद्धीच्या शेवटच्या टप्प्यात असताना, उपलब्ध पर्वाचा संदर्भ घेत इरावतीबाईनी आपलं वेगळं विचारमंथन सुरू केलं आणि १९६२ पासून यातील पात्र व प्रसंगावर वृत्तपत्रीय लिखाण सुरू केलं या आगळ्यावेगळ्या विचारमंथनाची परिणती म्हणजे १९६७ साली, म्हणजे सुमारे ५०-५५ वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेलं युगांत हे पुस्तक.
इरावती बाईंनी यात महाभारताच्या भीष्म, गांधारी, कुंती, द्रौपदी, कर्ण,कृष्ण इत्यादी प्रमुख व्यक्तिरेखांचा सखोल आढावा घेतला व त्यांच्या स्वभावाचे मानवी पैलू देखील दाखविले. अनेक चमत्कृतीपूर्ण घटनांची संगती लावायचा प्रयत्न केला व तत्कालीन वैचारिक प्रवाहांना एक वेगळी दिशा दिली महाभारत व त्यातील पात्रे हा जर इतिहास असेल तर त्याचा विचार देखील त्याच पातळीवर व्हायला हवा हे त्यांनी प्रतिपादिले.

यातील गांधारी वरचा त्यांचा लेख हा १९६२ सालचा व ललित लेखन प्रकाराच्या जवळ जाणारा. त्यामुळेच की काय पण यातल्या अद्भुताची म्हणजे शंभर गांधारी पुत्रांची जन्म-उकल यात नाही. पण कुंतीच तसं नाही. कुंतीवरचा लेख १९६६ सालचा व त्यात कर्ण जन्म, कवचकुंडलं इत्यादीची उकल करण्याचा प्रयत्न देखील आढळतो पण याचबरोबर काही अनुमान आहेत जी आज तितकीशी पटत नाहीत.

पिता पुत्र हा विदुर युधिष्ठिरावरील लेख तर आजमितीला अनाठायी वाटतो कारण त्यानंतर बरेच चिंतन त्यांच्या नात्यावर झालेय आणि युधिष्ठिराच्या जन्मावर देखील.

भीष्मांची व्यथा दर्शविणारा लेख भीष्मांचं आयुष्य उलगडत जातो तसंच त्यांची अगतिकता देखील. आपल्या सर्व ईच्छांवर आपल्या पित्यासाठी पाणी सोडणाऱ्या भीष्मांवर आपल्या कित्येक पिढ्यांना सांभाळण्याची जबाबदारी येऊन पडतं त्याचं हळूवार वर्णन “शेवटचा प्रयत्न” या १९६५ च्या लेखात आढळत.

द्रौपदी, कृष्ण या इतर व्यक्तीचित्रांमधूनच महाभारतीय घटनांचा पट उलगडतो तसाच द्रौपदी, कृष्ण व पांडव यांच्या नात्यांचा देखील आणि मग हे पुस्तक एकदा हातात घेतलं की ते संपेपर्यंत ठेववतच नाही.

असं असलं तरी खटकणार्‍या बऱ्याच गोष्टी या पुस्तकात आहेत. कुंतीची शरीर यष्टी व पृथा नावाचा संबंध, तिचे स्वयंवर, तिचे डावपेच, कृष्णाच्या वासुदेव बनण्याच्या महत्त्वाकांक्षेचे कथन, या गोष्टीदेखील विदुर आणि धर्म यांच्या नात्याच्या वर्णना सारख्याच खटकतात पण त्याचा परामर्श श्री अनंत आठवले यांनी “महाभारताचे वास्तव दर्शन - आक्षेपांचा संदर्भात” या त्यांच्या पुस्तकात इतर अनेक लेखकांच्या पुस्तक आणि लेखांच्या संदर्भाने घेतला आहेच त्यामुळे त्याविषयी नंतर कधी तरी लिहिता येईल.

पण यातील सर्वच लेख माहितीपूर्ण आहेत व ओघवत्या शैलीत आपल्याला महाभारतातील प्राथमिक खाचाखोचांचे मानवीकरण करत विचार करायला भाग पाडते. सुमारे पन्नास-साठ वर्षांपूर्वी असा विचार करणे निश्चितच धाडसाचे होते म्हणूनच आजही चोखंदळ वाचकांसाठी महाभारत विचारमंथनाचे हे आद्य पुस्तक ठरते. याच कालावधीत दुर्गा भागवतांचे "व्यासपर्व", आनंद साधले यांचे "हा जय नावाचा इतिहास आहे", शं के पेंडसे यांचे "महाभारतातील व्यक्ती दर्शन", इत्यादी पुस्तके देखील प्रसिद्ध झाली व ही सर्व वेगळ्या धाटणीची आणि स्वतःचे वेगळे अस्तित्व आणि वैशिष्ट्य दाखवणारी होती त्यांच्याबद्दल यथावकाश लिहीनच.
शुक्रवार, १९ मार्च, २०२१

द्वारा : https://manaasajjanaa.blogspot.com/