महाभारतातील स्त्रिया भाग - १ - डॉ. आ. ह. साळुंखे

सुगावा प्रकाशन

पाने : ☀ 0 मुल्य (₹): 0.0

/media/महाभारतातील स्त्रिया भाग - १_MS1.jpg

महाभारतकालीन स्त्रीत्वाचा वेध घेणारे पुस्तक - महेश नाईक

महाभारत कथेत स्त्रियांना अनन्यसाधारण महत्व आहे. किंबहुना महाभारताचे कथानक घडते त्याच्या अनेक कारणांपैकी एक मुळी द्रौपदीच्या अपमानाचा सूड हे आहे. पण त्याच बरोबर या स्त्रियांना स्वतःचे तेज , ठोस विचारसरणी , ओजस्विता आहे, व त्यामुळे महाभारतातील काही स्त्रियांची रेखाटने उठून दिसतात.

महाभारतातील उपाख्यानांमध्येही काही जनमानसात रूढ झालेल्या तर काही तुलनेने अप्रसिद्ध कथानकांद्वारे आपल्याला विविध स्त्रियांची ओळख होते. डॉ. आ. ह. साळुंखे यांनी “महाभारतातील स्त्रिया - भाग १” या पुस्तकातून यातील काही निवडक स्त्रियांची ओळख आपल्याला करून दिली आहे. पण हि ओळख केवळ त्या स्त्रीच्या स्वभावाची अथवा महाभारतातील स्त्रीच्या संदर्भातील नसून तत्कालीन समाज जीवनाचे प्रतिबिंब या शब्दचित्रामधून रेखाटले आहे. महाभारतात येणारी एखादी कथा काय आशय दर्शविते व त्यातून स्त्री चे अथवा समाजमनाचे कोणते रूप आपण लक्षात घ्यावे याचे उत्तम विश्लेषण डॉ साळुंखे करतात.

प्रास्ताविकात तुलसीविवाह प्रथा : जालंधर या असुराची पत्नी वृंदा एक श्रेष्ठ पतिव्रता होती. जालंधरच्या वधासाठी विष्णूला प्रथम वृंदेच्या पातिव्रत्यभंग करणे आवश्यक ठरते यासाठी तो जालंधराचे रूप घेऊन वृंदेला फसवितो. मग वृंदा - विष्णू हि तुलसीविवाहाची प्रथा कशी चुकीची आहे हे डॉ साळुंखे आपल्याला पटवून देतात व यातूनच आपल्याला या पुस्तकात काय वाचायला मिळेल याची चुणूक दिसते. यात पुढे मग आपल्याला सावित्री, माधवी, शकुंतला, अंबा, द्रौपदी आणि भंगाश्वन राजाचे स्त्रीत्व या कथांमागील वेगळाच पैलू उलगडतो.

सावित्रीची कथा तशी आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहे. वटसावित्रीच्या व्रताच्या निमित्ताने ती समाजमनावर देखील रुजविली गेली आहे. पण डॉ आ ह साळुंखे मूळ महाभारतातील उपाख्यानाचे बारकावे सांगत आपल्याला वेगळा विचार करायला भाग पाडतात. राजकन्या असलेल्या सुंदर सावित्रीचा विवाह का होत नसावा ? तिला स्वतःलाच वर संशोधनासाठी का बाहेर पडावे लागले असेल ? त्यातही तिने निवडलेला वर जंगलात वास्तव्यास असणारा परागंदा झालेल्या राजाचा राजपुत्रच का असावा ? वनात राहणाऱ्या अल्पायुषी असा शाप असणाऱ्या सत्यवानाशीच तिची लग्नगाठ अशी का बांधलेली असावी याची कारणमिमांसा या कथेतीलच काही मुद्द्यांद्वारे डॉ साळुंखे आपल्यासमोर मांडतात. सत्यवानाचे अल्पजीवीत्व का असावे ? यामधर्माकडून आपली पतीचे प्राण परत मिळविणारी सावित्री आपल्या पित्यालाही १०० पुत्र व्हावेत असा वर का बरे मागून घेत असावी याचे विवेचन डॉ साळुंखे करतात.

यानंतर ययातिकन्या माधवीची विलक्षण कथा आहे. हट्टीपणा कसा घटक ठरू शकतो हे दुर्योधनाला पटविण्यासाठी उद्योगपर्वात (अ. १०४ ते १२१) हे उपाख्यान येते. विश्वामित्राला गुरुदक्षिणा देण्यासाठी आवश्यकी असणारे ८०० श्यामकर्णी अश्व मागण्यासाठी गालव मुनी ययाती राजाकडे येतात. पण आता आपण पूर्वीप्रमाणे श्रीमंत राहिलेलो नाही त्यामुळे इतके अश्व देऊ शकत नाही, त्या ऐवजी मी माझी कन्या माधवी तुम्हाला देतो, एखाद्या राजाला तिला देऊन तुम्ही ते ८०० अश्व प्राप्त करा असे ययाती गालवांना सांगतो. पुढे प्रत्येकी २०० अश्वांच्या मोबदल्यात ३ राजांशी या माधवीच्या १ वर्षाच्या करारावर विवाह लावत गालव मुनी ६०० अश्व प्राप्त करतात पण ठाहून जास्त अश्व न मिळाल्याने माधवीला घेऊन ते विश्वामित्रांकडे जातात. त्यावर हिला आधीच माझ्याकडे आणले असतेस तर ८०० अश्वांची आवश्यकता नव्हती असे प्रतिपादन विश्वामित्र करतात. तत्कालीन समाजव्यवस्थेतील स्त्रीच्या स्थानाचे, अवस्थेचे विवरण यावर डॉ साळुंखे करतात.

सुप्रसिद्ध कण्वकन्या शकुंतलेची कथाही काहीशी याच धाटणीची. मात्र शंतनू राजाने आपल्या पुत्रासह आपला स्वीकार केलाच पाहिजे हे ठणकावणारी शकुंतला डॉ साळुंखे व्यवस्थित उभी करतात व शंतनूची बाजू लंगडी पडू नये यासाठी याकरिता नंतर पुराणकारांनी महाभारतात त्याच्या शापामुळे झालेली विस्मृतीची कथा घुसविले आहे. यात मग कोळ्याला सापडलेल्या आगनाथाची कथा येते. मूळ महाभारतात मात्र या कथेला स्थान नाही. मूळ शकुंतलाच कणखर आहे.

अंबा व द्रौपदी या महाभारतातील मूळ कथेतील नायिका. यातले अंबेचे भीष्मांविषयक सुडाचे प्रयोजन शिखंडीला कथेत जोडण्यासाठी कसे केले गेले हे आंबा प्रकरणात डॉ साळुंखे आपल्याला समजावतात.

द्रौपदी कथेवरही लेखक असा वेगळा प्रकाश टाकतात. ज्या अर्जुनाने तिला पणात जिंकली त्याच्याच वाट्याला ती सर्वात कमी आली. अर्जुनाला १२ वर्षे तिचा विरह सहन करावा लागला. असे असून देखील तिने अर्जुनाच्या वाजून इंटर्नशी पक्षपात केल्यामुळेच तिला सर्वप्रथम मृत्यू आला असे युधिष्ठीर म्हणतो. पांचालीचा पाचांशी विवाह हा पांडवांच्या तिच्याविषयीच्या लालसेतून झाला. पुढे तो त्यांच्या एकीसही कारणीभूत ठरला हे खरं असलं तरी त्याची वैधता पटविण्यासाठी महाभारतकारानी बऱ्याच कसरती केल्या आहेत.

यातील शेवटची कथा विलक्षण आहे व ती आहे एकाच जन्मी प्रथम पुरुष व नंतर स्त्रीरूप पावलेल्या भंगाश्वन नावाच्या राजाची. तत्कालीन समाजाच्या मानसशास्त्र व समाजशास्त्र यांचा वेध घेणारी हि कथा महाभारताच्या अनुशासन पर्वात येते. या कथेच्या अनुषंगाने आपल्याला महाभारतकारांच्या अचाट कल्पनाशक्तीची कल्पना येते तर याच कथेला उजेडात आणत डॉ साळुंखेंनी स्त्रीत्व कसं श्रेष्ठ याचा विचार करायला लावला आहे.

महाभारतकालीन स्त्रीत्वाचा वेध घेणारे डॉ आ ह साळुंखे यांचे हे पहिले पुस्तक प्रत्येक जिज्ञासूने वाचायलाच हवे असे आहे.

प्रथमावृत्ती - १९९३, चौथी आवृत्ती - २००६

द्वारा : https://manaasajjanaa.blogspot.com/
  Never miss a story from us, get weekly updates in your inbox.