कर्ण खरा कोण होता..
दाजी पणशीकर
मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
कर्ण खरा कोण होता..
दाजी पणशीकर
मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
पाने : ☀ 184 मुल्य (₹): 200.0
मृत्युन्जय , राधेय यासारख्या पुस्तकांतून कर्णाची थोरवी वाचत ज्या पिढ्या मोठ्या झाल्या त्यातलाच मी देखील एक. या दोन्ही पुस्तकांची मी एकेकाळी अक्षरशः पारायणे केली होती व कित्येकदा कर्णाच्या दुर्दैवावर अश्रू देखील ढाळले होते. एवढेच नव्हे तर कर्णाच्या या उदात्त चारित्र्यावर आधारित अशी “मृत्युंजय” व “तो राजहंस एक” अशी दोन नाटके देखील वडिलांनी मला दाखविली होती व त्यामुळेच अनेकांप्रमाणे कर्ण हा माझा हिरो होता.
पण अलीकडच्या काळात महाभारत वाचायला घेतलं व यातील काही कल्पनांना धक्के बसू लागले. मग ते वर्णन मृत्युंजय शी तुलना करून पाहिलं पण मनाचं समाधान होत नव्हतं. व त्याच वेळी कर्ण खरा कोण होता हे दाजी पणशीकर यांचे पुस्तक हातात पडलं व बऱ्याच गोष्टींचं धुकं निवळायला मदत झाली दाजींनी या पुस्तकात उद्धृत केलेले मूळ श्लोक ताडून पाहायला सुरुवात केली व कर्णाच एक वेगळं रूप समोर आलं.
पुस्तकाच्या आत काय असावं याची कल्पना श्री धोंडो विठ्ठल देशपांडे यांनी लिहिलेल्या १४ पानी प्रस्तावनेवरूनच येते. हे पुस्तक म्हणजे , पणशीकरांनी मराठा या वृत्तपत्रातून दर रविवारी लिहिलेल्या, तत्कालीन कर्ण विषयक लेखांचा संग्रह आहे. सुमारे १८ लेखातून पणशीकरांनी कर्णाचे विविध पैलू समोर आणले आहेत. व्यासांच्या महाभारतात सर्व व्यक्तिरेखा येतात त्या प्रसंगवर्णनातून. कर्ण जन्मही असाच, त्यात त्याचा तीळभरही दोष नाही. पण नंतर त्याच्या प्रसंग-प्रवेशात त्याचे स्वभावदोषही उलगडू लागतात. पणशीकर, यावेळी द्रोणांच्या स्पर्धेच्या रंगमंचावर प्रवेश करणारा विशीचा तरुण कर्ण, आपल्यापेक्षा पाच-सहा वर्षांनी लहान असणाऱ्या युवा अर्जुनाला द्वंद्वयुद्धाचे आव्हान देताना दाखवतात व आपल्याला देखील त्यांची वयं ध्यानात घेता, हा फरक स्पष्ट होऊ लागतो. सूतपुत्र म्हणून हिणविला गेलेल्या कर्णाला लगेचच राजा करून दुर्योधनाने त्याला राज्याभिषेक करताच, तात्कालीन जातीयतेच्या भिंती किती तकलादू होत्या ते दाखवून दिले.
यानंतरच्या दुर्योधनाच्या कारस्थानांमध्ये मात्र कर्णाचा सहभागच नव्हे, तर पुढाकार देखील होता असे काही वेळा दिसून येते. पांडवांचा द्वेष करण्यासाठी दुर्योधनाला कारण तरी होते, पण कर्णाला मात्र असे कोणतेही सबळ कारण नव्हते. असे असताना पण त्याने घोष-यात्रेसाठी दुर्योधनाला प्रवृत्त केले. तेथेही त्याला चित्रसेन गंधर्व कडून पराभूत होऊन पळावे लागले. त्यानंतर विराटाच्या युद्धप्रसंगी देखील अर्जुनाने ज्या कौरवांचा पराभव केला त्यात कर्ण देखील होता, हे पणशीकर नमूद करतात. कृष्ण-कर्ण नात्याबद्दल जा गोष्टी मृत्युंजयातून फुलविल्या गेल्या त्याचा समाचार घेताना, “कृष्णाने कर्णाचेआर्जव का केले?” या प्रकरणात पणशीकरांनी कृष्ण-कर्ण युद्ध पूर्व संवादाची फोड करत, त्याचे सर्व पैलू उघड केले आहेत व त्यातील कृष्णाचा धुरंधरपणा कौरवांची बाजू कशी दुबळी करतो, तेच समजाविले आहे.
कर्णाला द्रोणांनी ब्रह्मास्त्र का नाकारले? हे देखील पणशीकर सप्रमाण स्पष्ट करतात आणि हेच प्रमाण मग परशुरामांकडून कर्ण ब्रह्मास्त्र मिळवितो तेव्हा कसे अधोरेखित होते हे दाखवून देतात
द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग
द्रौपदी वस्त्रहरण प्रसंगाचा बराचसा दोष कर्णाच्या माथी तसा पण जातोच. “द्रौपदीच्या विटंबनेचा सूत्रधार” या लेखातून पणशीकरांनी ते अधिक स्पष्ट केले आहे. मृत्युंजय कार त्यावर पश्चातापाचे पांघरुण घालत असताना पणशीकर मात्र कर्णाचे हे वैगुण्य उघडे पाडतात.
महायुद्धातील कर्ण
प्रत्यक्ष युद्धाच्या वेळी कर्ण पहिले दहा दिवस युद्धा पासून दूर राहिला. असे असले तरी या ताज्या दमाच्या कर्णाचा पुढच्या ७ दिवसात अनेकांनी पराभव देखील केला आहे. युद्धपूर्व बैठकीत जेव्हा भीष्म, द्रोण, कृप, व अश्वत्थामा, पांडवांचा पराजय करण्यासाठी किमान दहा दिवस किंवा जास्त कालावधी लागेल असे सांगत होते तेव्हा कर्ण मात्र “कर्णस्तु पंचरात्रेण प्रतिजज्ञे ने महास्त्रवित” म्हणजेच आपण केवळ पाच दिवसात त्यांचा निःपात करू अशी वल्गना करीत होता. आणि सेनापती बनल्यावर मात्र तो केवळ २ दिवसातच संपला.
एवढं सगळं असून देखील कर्ण वीर होता व म्हणूनच कृष्णाला, त्याला अर्ध-निशस्त्र अवस्थेत का होईना, मारण्यासाठी अर्जुनाला प्रवृत्त करावे लागले, हेदेखील पणशीकर नमूद करतात. अन्यायाचा सल मनात ठेवून का होईना, पण कर्णाच्या वर्तनाने आणि त्याच्या अति पांडव द्वेषाने, त्याचा नेहमीच घात केला.
कर्णाची दुसरी व वास्तव बाजू दर्शविणारे हे पुस्तक कदाचित कर्णप्रेमींना तितकेसे रुचणारे नाही मात्र कर्णाची हि बाजूदेखील विचारात घेण्यासाठी वाचणे आवश्यक आहे.
(प्रथमावृत्ती - १९७६ , ९ वि आवृत्ती - जुन २०१७ मॅजेस्टिक प्रकाशन)
द्वारा : https://manaasajjanaa.blogspot.com/