महाभारत, एक मुक्त चिंतन - प्रेमा कंटक

महाराष्ट्र ग्रंथ भांडार , कोल्हापूर

पाने : ☀ 0 मुल्य (₹): 0.0

/media/MahabharatEMC.jpg

प्रेमा कंटक यांचे महाभारत - एक मुक्त चिंतन - महेश नाईक

महाभारतातील विविध प्रसंगाचे विवेचन , त्याची चिकित्सा व त्यामागील शक्याशक्यता इत्यादींचे विवेचन सुमारे ५५ - ६० वर्षांपूर्वी महाभारताची भांडारकरप्रणित चिकित्सक प्रत उपलब्ध झाल्यावर अनेकांनी केले आहे. यातील बरेच साहित्य त्या काळात पुस्तक रूपात उपलब्ध होत होते. पण हि पुस्तके आता दुर्मिळ या सदरात गणली जाऊ लागली आहेत. लेखिका प्रेमा कंटक यांचे महाभारत - एक मुक्त चिंतन , हे देखील याच दुर्मिळ प्रकारातील एक वेगळे पुस्तक. महाभारताचे वेगळ्या अंगानी चिंतन करत परामर्श घेणारे. तत्कालीन इतरांनी लक्षात न घेतलेले दुवे, संकल्पना मांडणारे व त्याचे वर्गीकरण करत महाभारताची कथा उलगडून दाखविणारे. या पुस्तकाला विनोबाजींनी प्रस्तावना देखील आहे.
पुस्तकाची विभागणी ५ मुख्य प्रकरणांमध्ये केली आहे. हि ५ प्रकरणे महाभारताला वेगळ्या अंगाने स्पर्श करतात. यातील “कवी आणि ग्रंथ” या प्रकरणात नावाप्रमाणेच या महाकाव्याच्या स्वरूपाचा उहापोह आहे. महाभारताच्या रचनेत कुणाकुणाच्या कसकसा हातभार लागला, व्यासांपासून हा वारसा पुढे कसा सरकत गेला, त्यात उपाख्यानाची भर कशी पडत गेली याचे विवेचन आहे.

पुढचं प्रकरण आहे “विसंगती आणि असंभव”, यात महाभारतात आढळणाऱ्या पुनरुक्ति , अतिशयोक्ति , प्रक्षिप्तता याबद्दलची चर्चा आहे. याबद्दलची विविध उदाहरणे देताना लेखिकेने महाभारतातील अनेक विसंगती दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. याचबरोबर हे चमत्कार कसे प्रक्षिप्त असू शकतात यावर भाष्य केले आहे. उदा. चेदिराज शिशुपालाची जन्मकथा व त्याला असणारे जास्तीचे २ हात कृष्ण बलरामांच्या दर्शनानंतर आपोआप गाळून पडल्याचा उल्लेख. यावेळी जर कृष्ण लहानग्या शिशुपालाला मांडीवर घेण्याएवढा मोठं होता तर रुक्मिणीस्वयंवरात तो त्याचा प्रतिस्पर्धी कसा ठरेल ? त्यामुळे शिशुपालाचे अपराध पोटात घालण्याचे वचन जर कृष्णाने आपल्या आत्याला दिलेच असेल तर ते इतर कोणत्या तरी प्रसंगी दोघेही व्यवस्थित मोठे ( व समवयस्क ) असताना दिले असले पाहिजे.

अशीच एक विसंगती द्रोणाचार्यांच्या वयाबद्दलही आहे. द्रोणांचा वाढ झाल्यावरीलच्या वर्णनात

“आकर्ण पलित: श्यामीवयसाशीती पंचक: ।।६०।।"

म्हणजेच ..... आचार्यांच्या शरीराचा वर्ण सावळा होता. कानापर्यंत त्यांचे केस शुभ्र झाले होते. वय ४०० (अशीती पंचक = ऐशीं पंचके = ४००) होते.

महाभारतातील इतर योद्ध्यांच्या वयाच्या अंदाजांशी (अगदी भीष्मांच्याही ) हे विसंगत ठरते.

यापुढील २ प्रकाराने विस्तृत आहेत. यातील “दैव कि पुरुषार्थ” या प्रकरणात महाभारत कथा सारांशाने येते व विविध प्रसंगांतील बारकावे उलगडले जातात. महाभारत कथेवरील मुख्य टिपणे या प्रकरणात आहेत. प्रत्येक घटनेमागचे विश्लेषण व लेखिकेची मतेदेखील आहेत. हे प्रकरण सुमारे ७८ पानांचे आहे.

यानंतरचे "सूत्रधार" हे सुमारे ८६ पृष्ठांचे प्रकरण संपूर्णपणे कृष्णाला वाहिलेले आहे. त्याचे बालपण विविध पुराणातून येते पण त्यानंतर महाभारतातील कृष्ण उलगडला आहे. महाभारतातील त्याचे विशेष स्थान , त्याने विविध प्रसंगी घेतातलेले निर्णय , त्याचे पांडव, कुंती, द्रौपदी, विदुर यांच्याशी असणारे संबंध कधी व का जुळून आले असावेत याचा विचार. कृष्ण द्रौपदी नात्यातील खरेपणा व त्यावर रचली गेली नंतरच्या काळातील नाट्यमय वर्णने, याचबरोबर विविध प्रसंगातील कृष्णाचा धोरणीपणा लेखिकेने वर्णिला आहे. कृष्णाची वैगुण्ये जशी लेखिका आपल्याला दाखवते तसेच काही प्रसंगती त्याचा अतिविशेष मुत्सद्दीपणा देखील. उदा. युधिष्ठीर व अर्जुनातील कर्णवधावरून रंगलेले भांडण व कृष्णाने समाधानपूर्वक केलेले दोघांचेही सांत्वन त्याचा मुत्सद्दीपणा व समयसूचकता दर्शवितो.

कृष्णाने पांडवांची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली होती व ती शेवटपर्यंत निभावली. अगदी युद्ध संपल्यावर देखील. अशा या असामान्य व्यक्तीचा अंत मात्र एखाद्या सामान्य व्यक्तीप्रमाणेच झाला याचेही वर्णन या भागात येते.

शेवटचे प्रकरण “असक्तबुद्धी: सर्वत्र”. हे प्रकरण म्हणजे ग्रंथ व धर्म या बद्दलची चर्चा आहे. महाभारत, वेद , पुराणे यातील धर्माचे स्वरूप आणि धर्मशास्त्राचा विकास कसा झाला याचे विवेचन लेखिकेने यात केले आहे.

एकंदरीतच महाभारतावर वेगळा प्रकाश टाकणारे हे पुस्तक सध्या सहज उपलब्ध नाही. पुणे नगर वाचनालयात उपलब्ध असलेली एक प्रत माझे मित्र श्री संजय संती, यांनी मला वाचनासाठी उपलब्ध करून दिली यासाठी मी त्यांचा आभारी आहे. महाभारताच्या जिज्ञासू वाचकाला ते नक्कीच आवडेल.

द्वारा : https://manaasajjanaa.blogspot.com/
  Never miss a story from us, get weekly updates in your inbox.