मनोवेधस - चंद्रशेखर गोखले

प्रकाशक : उमा गोखले

पाने : ☀ 436 मुल्य (₹): 500.0

/media/मनोवेधस_mv.jpg

शांत, प्रवाही कथन - अक्षय वाटवे

'मनोवेधस' ही चंद्रशेखर गोखले यांची नावाप्रमाणे मन वेधून घेणारी लोभस कादंबरी आहे. चंगो या टोपणनावाने प्रसिद्ध असलेले चारोळीकार चंद्रशेखर गोखले गोष्टीवेल्हाळ आहेत. चिमुकला जीव असणारी एखादी दैनंदीन जीवनातली गोष्ट ते अतिशय रंगवून सांगतात. त्यातून मानवी नातेसंबंधांवर मार्मिक टिपणीही करतात. त्यांच्या आजवरच्या सर्व प्रकारच्या लेखनात मृदू तरलता आहे. त्यांच्या कथांतील पात्रांच्या आयुष्यात उलथापालथ घडते; मात्र त्यात तीव्र स्वर कधी लागत नाही. सतत जीवाची तगमग होईल, इतके बोचरे त्यात काही नसते. त्यांच्या चारोळ्यांमधून जे हळवेपण अनुभवाला येते; तसेच हळवेपण 'मनोवेधस'मध्येही आपण अनुभवू शकतो.

या कादंबरीचे कथानक एका वाक्यात सांगायचे, तर श्रीरामाला जानकी कशी मिळाली त्याची ही गोष्ट. हा श्रीराम त्या युगातला नाही, तर कलियुगातला आहे. ही गोष्ट आजपासून शंभर वर्षांपूर्वी एका नदीकिनारी वसलेल्या गावी घडते. श्रीराम तत्त्व जिवंत असले आणि त्याला तितकीच तेजस्वी जानकी मिळायला हवी असली, तरी ते दोघे सदेह नाहीत. म्हणजे ही काही रामावताराची गोष्ट नाही. ही रामांशाची गोष्ट आहे. बेलगिरी या गावाच्या पटावर घडणारी कथा काही परिवारांभोवती गुंफली आहे. प्राध्यापक अभिराम दाणी आणि त्यांचा परिवार, त्यांची पत्नी, दोन मुली सुधा-राधा आणि माताजी. गोविंदशेठ आणि त्यांचा परिवार ही बेलगिरीतील, तर विश्वंभर बेलगिरीकर, जगदीश, यामिनी, भन्साळी मॅडम, जगदीशची आई अशी बाहेरून गावात आलेली मंडळी. यांच्या भोवती गोखले यांनी हलक्या हाताने कथासूत्र विणत नेले आहे. ते विणणारा सूत्रधार आहे काळ आणि कर्ताकरविता अर्थात श्रीराम. या सगळ्याला निमित्त आहेत माताजी. त्या कशा, याचे उत्तर कादंबरी वाचल्यावर मिळते.

माताजींच्या संस्कारात बहरलेली मुकी सुधा आणि बेफाट आयुष्य जगताना एका तिडीकीसरशी सगळे मागे टाकून, या गावात येऊन राहिलेला मूर्तिकार जगदीश हे दोघे या कथेचे नायक-नायिका. जगदीशसमोर अनपेक्षितपणे एक आव्हान येते; मात्र स्पर्धा भावनेने त्याकडे न पाहता, तो बघताबघता संपूर्ण संमर्पण भावाने त्यात एकरूप होऊन जातो. दाणी कुटुंबाच्या घरी पिढ्यानपिढ्या पूजेत असलेल्या श्रीरामाच्या मूर्ती शेजारची रिकामी बाजू पाहून, माताजी कायम अस्वस्थ असतात. श्रीरामाला जानकी हवी, हा ध्यास घेतलेल्या माताजी तशातच आपला देह ठेवतात. त्यांचा हा ध्यास पूर्ण करण्याची जबाबदारी जगदीश आपल्या शीरावर घेतो.

पुढे काय घडते? त्याने स्वीकारलेली जबाबदारी पूर्ण होते का? मुक्या सुधाचे काय होते? जगदीशच्या भूतकाळात व्यापून राहिलेल्या यामिनीची या सगळ्यावर कशी प्रतिक्रिया येते? गोविंदशेठ, दाणी परिवारात काय काय घडते? श्रीरामासाठी जानकी येत असतानाच, प्राध्यापक दाणींच्या पत्नीच्या मनात असे काय विचार येतात; ज्यामुळे अचानक त्या या सगळ्याच्या विरोधात उभ्या राहतात? हे सगळे जाणून घेण्यासाठी चारशेहून अधिक पानांचा हा ऐवज वाचायला हवा.

ही कादंबरी निव्वळ त्यासाठी वाचायची नाही, तर ती वाचायची शांत, प्रवाही कथन ऐकण्यासाठी. कदाचित सुरुवातीला वर्णन अधिकचे वाटू शकेल; पण आज आपण ज्या वेगवान जगात जगतो आहोत, तिथून मागे शंभर वर्षे जायचे आणि तेव्हाचे भावविश्व अनुभवायचे म्हटले, तर ती गती साधता आली पाहिजे. लेखकाने ती साधली आहे आणि वाचक कसोटीवर खरे उतरतील, इतकी ताकद या कादंबरीत नक्की आहे.

ही कादंबरी बहुपेडी किंवा गुंतागुंतीच्या कथानकाची नसली, तरी विसावा घेण्यासाठी आवश्यक असतो तसा ही कादंबरी म्हणजे डेरेदार वृक्ष आहे. जो वाचतावाचता स्वस्थ करीत जातो. कादंबरी जिथे संपते; तिथे तिच्या संपण्यातले समाधान मनात दरवळत राहते. कदाचित याही अर्थी कादंबरीचे 'मनोवेधस' हे नाव सार्थ ठरते.

द्वारा : https://maharashtratimes.com/
  Never miss a story from us, get weekly updates in your inbox.