पत्नीपुराण

डॉ. रवींद्र लक्ष्मीकांत तांबोळी

/media/पत्नीपुराण_pp.jpg

पत्नीचे महत्त्व सांगणारे पुराण - ऋषिकेश देशमुख

डॉ. रवींद्र लक्ष्मीकांत तांबोळी हे आपल्या समूहलक्षी विनोदाचा स्वतंत्र बाज मराठी साहित्यात ठळकपणे उमटवणारे लेखक आहेत. गतिशील असणाऱ्या काळाशी आपली स्पर्धा अविरतपणे सुरू असते. या स्पर्धेत काही विसंगती निर्माण होते. अशाच सामाजिक विसंगतीच्या मर्मावर बोट ठेवणारा; पण भाषेचा दर्जा अबाधित ठेवणारा अत्यंत तरल विनोद लिहिणे हे डॉ. रवींद्र तांबोळी यांच्या विनोदी लेखनाचे अत्यंत महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. विनोदाचे उगमस्थान कारुण्यात असते. कारुण्यातून उगम पावणारा विनोद मनाला शीतलता प्रदान करतो. अस्सल आणि दर्जेदार विनोदात चिंतनाची अपार खोली असते, ही साक्ष डॉ. तांबोळी यांचे लेखन वाचताना पटते.

डॉ. तांबोळी यांचे नुकतेच प्रसिद्ध झालेले 'पत्नीपुराण' हे पुस्तक सांसारिक आहे. संसार करणाऱ्या करू पाहणाऱ्यांना ते बहुमोल मार्गदर्शन करणारे ठरणार आहे. पत्नीपुराणाचे मध्यवर्ती सूत्र पती-पत्नीच्या नाजूक, हळव्या भावभावना, खट्याळ मिस्किलपणा, राग-लोभ व शेवटी उत्तरोत्तर वर्धिष्णू होत जाणाऱ्या शाश्वत प्रेमाचा अनुबंध प्रक्षेपित करणारे आहे. इसवी सनाच्या चारशे वर्षांपूर्वी प्लेटो म्हणाला होता, 'स्त्रियांना राजकीय कार्यात सहभागी न करून घेणे, म्हणजे समाजातील अर्धी शक्ती वाया घालवणे होय.' खरे तर समाजनिर्मिती हीच स्त्री-पुरुषांच्या संयोगातून आकाराला आलेली असते. 'पत्नीपुराणा'चे सगळ्यांत वेगळेपण कोणते, तर या पुराणात मानवी जीवनात विवाहसंस्कार ते विवाहानंतरचे सांवत्सरिक जीवन यांवर निसर्गाच्या ऋतुचक्राचा कसा प्रभाव पडतो आणि त्यातून कसे सहजीवन साकारत जाते याचा अत्यंत हृद्य आढावा घेण्यात आला आहे. हे केवळ विनोदी लेखांचे पुस्तक नाही. त्या लेखनास तरल विनोदाची झालर आहे; मात्र हे लेखन व्यामिश्र मानवी जीवनातील घटना-घटितांचे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून दर्शन घडविणारे आहे. आज समाजात सर्वत्र इंग्रजी शिक्षण व इंग्रजी माध्यमाचा नको एवढा अट्टाहास धरला जात असताना, मराठी महिने, त्या महिन्यातील वेगवेगळे संदर्भ, त्यांचे जीवनात असणारे स्थान या सर्वांचे सखोल ज्ञान हे पुस्तक करून देते.

ललित लेखनात मी हा सार्वभौम असायला हवा. तो या लेखनात आहेच; पण स्वतःवर विनोद करून घेण्याचे व त्या स्वमधून व्यापक समाजाचे दर्शन घडवणारे चिंतनमूल्य दिग्दर्शित करणारे हे लेखन आहे. कुटुंब, कुटुंबव्यवस्था आणि कुटुंबप्रेम अशा मूल्यवान बाबींचा केंद्रबिंदू म्हणजे पत्नी. हे सत्य लेखकाने मनोगतातच कथन केले आहे. महाकवी कालिदास यांनी 'मेघदूत' या काव्यातून पत्नीप्रेमाची उत्कट भावव्याकुळता प्रकट केली आहे. ती तेवढी उत्कट का झाली, तर त्यात वियोगयोग होता, विहाराची होरपळ होती. या 'पत्नीपुराणा'त पत्नीसानिध्य आहे; त्यामुळे अंतःकरणपूर्वक स्वीकारलेली; परंतु वर वर अपरिहार्य आहे अशी भासवलेली पत्नीशरणता आहे. भार्यागौरव म्हणण्यापेक्षाही, भार्येच्या सहअस्तित्वाचा सन्मान या पुराणातून होतो.

मानवी मन चंचल असते. ते नाविन्याचा अविरत शोध घेत राहते. मानवी स्वभावाला प्राप्तपेक्षा अप्राप्य गोष्टींची हुरहूर अधिक असते. 'जून मासी, जेष्ठ मानसी' या लेखातून वट पूजनावेळी क्रॉस कनेक्शन होऊ दे, असे मागणे मागणाऱ्यांवरून मानवी स्वभावधर्माची मोठीच उकल लेखकाने केली आहे. खरे तर कुठलेही व्रत न करता, पुरुष अशी अनेक दिवास्वप्ने पाहत असतो.

हे एक उदाहरण झाले; परंतु डॉ. तांबोळी यांनी बाराही महिन्यातले सूक्ष्मातिसूक्ष्म पैलू या पुस्तकातून फार उत्स्फूर्तपणे लिहिले आहेत. 'मायावी रूप, मधुर बोल, तेच माघमास बोल', 'पत्नीशरणमास तो फाल्गुनमास' अशा काही शीर्षकांवरूही ते लक्षात येते. या पुस्तकातला विनोद गडगडाटी हसविणारा नाही, तर तो प्रसन्न करणारा, त्याच प्रसन्नपणे आपल्या जगण्यात डोकावून पाहायला लावणारा आहे. पत्नीला सन्मानाने वागवायला शिकवणारा, तिच्याशिवाय आपल्या जगण्याला नसणाऱ्या किमतीची जाणीव करून देणारा आहे.

मुखपृष्ठ : ज्ञानेश सोनार

द्वारा : महाराष्ट्र टाइम्स वृत्तसेवा