पत्नीपुराण

डॉ. रवींद्र लक्ष्मीकांत तांबोळी

/media/पत्नीपुराण_pp.jpg

ताजे टवटवीत विनोदाख्यान - जीवन तळेगावकर, दिल्ली

विधिवत संस्कारांनी जी नवयौवना कोणाच्याही आयुष्यात नववधू म्हणून येते तेव्हा ती गृहलक्ष्मी म्हणून प्रवेशते. प्रत्येक गृहलक्ष्मी पुढे आयुष्यात गृहस्वामिनी कशी होते, त्या प्रवासाचा ताज्या-टवटवीत विनोदी अंगाने घेतलेला वेध म्हणजे, डॉ. रवींद्र लक्ष्मीकांत तांबोळी यांचे ‘पत्नीपुराण’ हे पुस्तक.

‘पत्नीपुराण’ या पुस्तकामधून पत्नीसामर्थ्याचा आगळा शोध घेताना डॉ. रवींद्र लक्ष्मीकांत तांबोळी यांनी मराठी संवत्सरातील बाराही महिन्यांचा आधार घेतला आहे. हा आधार घेतानाच लेखकाने पुराणकथा जशी सांगितली जाई तीच पद्धत खुसखुशीतपणे वापरली आहे.

पूर्वीची जी रूढ अठरा पुराणे आहेत ती वेगवेगळ्या ऋषींनी त्यांच्या आश्रमात विद्यार्थ्यांना सांगितली होती. तोच धागा लेखकाने इथे घेतला आहे. हे ‘पत्नीपुराण’ नंदीग्राम नगरीतील एल. के. शास्त्री नामक कुटुंबशास्त्रप्रवीण ऋषितुल्य गुरूने लेखकाला सांगितले आणि लेखकाने ते विविधप्रसंगी लिहिले; अशी कथावस्तू आहे. पूर्वी पुराणांतून धर्म, संस्था, परंपरा यांचे ज्ञान मनोरंजक पद्धतीने होई, असे म्हणतात. ‘पत्नीपुराणा’त लेखकाने हे भान सर्वतोपरी ठेवून कुटुंबसंस्था, कुटुंबधर्म आणि कुटुंबस्वामीनी पत्नीचे महत्त्व अधोरेखित केले आहे. यासाठी त्यांनी मराठी भाषेच्या लवचीकतेचा जो वापर केला आहे, त्याची खुमारी शब्दातीत आहे. ही खुमारी भाषिक सौंदर्य घेत विनोदसातत्य ठेवून झळकत राहते. यामागे लेखकाची अपार मेहनत जशी जाणवते, तशीच रूढी व परंपरांमधल्या चांगुलपणाबाबतची अचूक आकलनक्षमताही व्यक्त करते. निसर्ग, ऋतू, नक्षत्रे यांचा नेमका वापर करत ‘पत्नीपुराण’ विनोदी मांडणीने खुलवताना लेखकाने लिखाणात अभिरुची जपली आहे, हे विशेष.

पुस्तकाचे शीर्षकच कुतूहल वाढवणारे ठरते. ह्या शीर्षकापासूनच एका लयीत हा विनोद सुरू होतो. ‘केवळ पत्नीशरण असलेल्या वाचकांसाठी,’ हा खट्याळ इशारा त्यानंतर नजरेसमोर येतो. इथे वाचकाला त्याच्यापुरता प्रश्न पडतो की, मी पत्नीशरण आहे की नाही? या उत्तराच्या शोधात वाचक जेव्हा पुढे वाचत जातो, तेव्हा लेखकाचे अद्‍भुत असे मनोगत समोर येते. विवाहित पुरुषाच्या आयुष्यावर पत्नीचा जो सात्त्विक विळखा व्यापून असतो, त्या भार्यापाशाबद्दल आपले भूमिकापर असे चिंतन लेखक जेव्हा व्यक्त करताना आढळतो, तेव्हा त्या भूमिकेतून पुस्तकातील विनोद नकळतपणे नजरेसमोर येतो.

विधिवत विवाहोत्तर जीवनाचा संवत्सरिक शोध, असे म्हणून लेखकाने आपली भूमिका आरंभीच व्यक्त केली आहे. हा शोध पत्नी नामक दशमदेवतेचा आहे. पत्नीवृत्तीचा आहे. पत्नीवर्तनाचा आहे. ह्या परिपूर्ण ‘पत्नीपुराणा’त पानोपानी पत्नीगौरव आढळतो. स्त्री म्हणून पत्नी ह्या पुराणविषयाकडे पाहिल्यास ह्यात कुठेही स्त्रियांविषयी फाजीलपणा नाही. हा वृत्ती आणि वर्तनावरचा एकदम नवा, अकल्पित विनोद आहे, हेच ह्या पुराणाचे वैशिष्ट्य आहे. नावीन्यपूर्ण विनोदातील अभिनव विविधता पानापानावरील परिच्छेदनिहाय हास्यतरंग निर्माण करणारी आहे.

वाचकांसमोर ‘पत्नीपुराण’ सादर करण्याआधी लेखकाने पत्नी महोदयांची परवानगी घेतली, असे विशद करत लेखक, आयुष्यभर तेच कुटुंबचक्र संवत्सर-दर-संवत्सर-दरमहा चालू राहते, असे नमूद करून वाचकाला बारोमासाच्या आढाव्याकडे अलगदपणे नेतो.

सर्व नरदेहांचे आयुष्य बिघडवणारा महिना म्हणजे चैत्र, असे बजावत तो चैत्रचातुर्य ते काय, हे उलगडून दाखवतो. लग्नाआधीची कन्या म्हणजे चैत्रातील कोवळे ऊन, तर लग्नानंतर कडक उन्हाळा ह्या शेऱ्यांतून चैत्रचातुर्य ते काय हे समजावून सांगतो. चैत्रानंतरचा वैशाख विवाहकारक कसा हे लेखकाचे अफलातून निरीक्षण हास्यस्फोटक आहे. पुढे ‘जून मासी ज्येष्ठ मानसी’ म्हणत लेखक विवाहितेच्या आयुष्यातील वटपौर्णिमेच्या पहिल्या उपवासाकडे घेऊन जातो. कोणत्याही पतीला पत्नीविषयी आदरभाव निर्माण करणारी ही पौर्णिमा तो नव्या अंगाने साजरी करायला लावतो. लेखकाने प्रीती, अनुनय, अनुराग शिकवणारी जी आषाढ असोशी लिहिली आहे, ती मराठी साहित्यातील नवा मानबिंदू ठरावी. भरीसभर म्हणजे ह्यात थेट कालिदासाचाही नव्याने शोध आहे. सात्त्विक, धार्मिक मास मानला गेलेल्या श्रावणातून कोणते कौटुंबिक बोध घ्यावेत, ह्याचाही समर्पक दृष्टांत देण्यात लेखक यशस्वी ठरला आहे. लगेचच पुढे भाद्रपदाला ‘भानगडींचा भाद्रपद’ म्हणत लेखक वाचकाला खुलेपणाने हसवून मोकळा झाला आहे.

पत्नीविषयाशी संबंधित अनुषंगिक किस्से, कोट्या, उपहास, विडंबन, उपरोध ह्या रूढ विनोदमार्गांचा संतुलित वापर करत लेखक प्रत्येक लेख वाचकांच्या स्मृतीवर कोरत जातो.आपला विनोद चिरंतन राहील ही खात्रीही मिळवून घेतो. पत्नीसामर्थ्य अधोरेखित करणारा आश्विन महिना असतो, असे बजावत लेखक शेवटी पत्नीशरणमास तो फाल्गुन मास असे निक्षून सांगतो आणि हे ‘पत्नीपुराण’ ‘इति’ म्हणत थांबवतो.

‘पत्नीपुराणा’तून सांवत्सरिक आढावा घेताना लेखकाने ऋतुचक्रावरही मजेशीर भाष्य केले आहे. लेखक म्हणतो की ऋतुचक्रातील सहा ऋतू म्हणजे पतिरूपाच्या निरनिराळ्या सहा अवस्था आहेत. हरघटकेला पत्नीची मनधरणी करणारा; तिने फुलावे, खुलावे म्हणून पिंगा घालणारा पती हा खरे वसंतरूप असतो. त्याचवेळेस पत्नीच्या कृतक कोपाच्या दाहाने राठ होणारा तो ग्रीष्मरूप असतो. कुटुंबसौख्यासाठी आपल्या सर्वांगीण उत्पन्नाचा वर्षाव पत्नीवर करून तो वर्षारूप होतो तर आपल्याच पत्नीचे आवाहनवजा हास्य त्याला लाभले तर तो शरदाचे चांदणे होतो. पत्नीचा रुसवा त्याला भयाने थरथरायला लावून त्याचा हेमंत करतो. पत्नीविरहाने तो इतका कृश होत असतो, की त्याला शिशिर रूप म्हणायला काहीही हरकत नसते.

डॉ. तांबोळींची सूक्ष्म निरीक्षणशक्ती व बहुश्रुतता त्यांच्या लिखाणातून विविधांगी असल्याची जाणीव हे पुराण वाचताना सतत होत राहाते. परंपरा, भूतकाळ व वर्तमान ह्यांचा समन्वय साधत त्यांनी प्रत्येक लेख फुलवला आहे. ऋतूनुसार जीवनव्यवहार कसा चालत असतो, ह्याचे मासिक दाखले त्यांच्या मासनिहाय लेखात जेव्हा येतात तेव्हा सुखद अनुभूतीचा आनंदही मिळतो. स्वप्रत्ययाने मनही प्रसन्न होऊन जाते.

प्रत्येक संवत्सरात ज्या नियमित व्यावहारिक बाबी घडत असतात त्यांचेही किस्से महिन्यानुसार लेखकाने दिले असून अशा बाबी वाचकानेही अनुभवलेल्या असल्याने तोही त्यात समरस होऊन जातो.

‘पत्नीपुराणा’चे अंतिम वैशिष्ट्य सांगायचे झाले, तर ‘विनोद पानोपानी’ असे म्हणावे लागते. ह्या पुराणाचे मुखपृष्ठ व हास्यसंकेत देणारी आतील समर्पक चित्रे ज्ञानेश सोनारांची असून विषयाशी अनुरूप अशीच आहेत. मराठी वाचकाला आगळ्या विनोदाची भेट ‘पत्नीपुराणा’मुळे मिळाली, असे खात्रीपूर्वक म्हणता येते.

द्वारा : महाराष्ट्र टाइम्स वृत्तसेवा