पंगतीतलं पान

अविनाश कोल्हे

मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस

/media/pangatitalepan.jpg

पाने : ☀ 168 मुल्य (₹): 250.0

जातिव्यवस्थेचा अपरिवर्तनीय पीळ - अंजली कुलकर्णी

प्रा. अविनाश कोल्हे यांची ‘पंगतीतलं पान’ ही कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली आहे. जातिव्यवस्था अजूनही शाबूत का? या विषयवार संशोधन करणाऱ्या गुलाब धांडे पाटील या तरुणाची ही कथा आहे.

प्रा. अविनाश कोल्हे लिखित ‘पंगतीतलं पान’ या कादंबरीत बुलढाण्यातील गुलाब धांडे पाटील या तरुणाची कथा सांगितली आहे. गुलाब धांडे पाटील ही एक वेगळ्या धाटणीची व्यक्तिरेखा आहे. गुलाबला एकीकडे ज्ञानसंपादनाची प्रचंड लालसा आहे. त्याच्या काशाकाकाने त्याला महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात पाठविल्यामुळे त्याला ज्ञानाचे एक भांडारच गवसले आहे. नंतर मुंबईत आणि त्यानंतर दिल्लीत रिसर्चसाठी जाताना प्रत्येक टप्प्यावर त्याला त्याच्यातील बुद्धिमत्ता आणि ज्ञानपिपासूपणा ओळखून पुढच्या दिशा दाखवणारे गुरुजन भेटले आहेत. दिल्लीच्या स्कूल ऑफ सोशिऑलॉजी या प्रतिष्ठित संस्थेत ‘जातिव्यवस्था नष्ट करण्याचे भगीरथ प्रयत्न झाल्यानंतरही इतक्या कालखंडानंतर ती शाबूत कशी राहिली?’ या विषयावर त्याला संशोधन करायचे आहे. या प्रवासात त्याला त्याच्यासारखीच करिअरमध्ये महत्त्वाकांक्षा बाळगणारी बुद्धिमान सुलक्षणा भेटली आहे.

पुणे, मुंबई, दिल्लीतले अत्याधुनिक, मोकळे वातावरणात जगत असताना दुसरीकडे गुलाबची मुळे त्याच्या जन्मगावात रुजलेली आहेत. त्याच्या घराण्याचा त्याला अभिमान आहे. त्याला निःसंशयपणे महानगरातच पुढचे आयुष्य काढायचे

आहे; शहरातील आधुनिक, बुद्धिमान, उच्चशिक्षित मुलीशी आंतरजातीय प्रेमविवाह करायचा आहे. पण नियतीच्या मनात काही वेगळेच आहे. परिस्थतीपुढे नमते घेऊन त्याला गावाकडच्या मुलीचीच निवड करावी लागते.

कादंबरीतील गुलाबची परिस्थिती त्याची वैयक्तिक असली, तरी जातीपातीच्या पलीकडे जाऊन विचार करणाऱ्या अनेक तरुणांची ही प्रातिनिधिक गोष्ट आहे. गुलाबसमोर असलेला हा पेच सामाजिक आहे. स्वतःच्या आयुष्याबद्दलच्या कल्पना आणि वास्तव यातील अंतर पार करणे अनेक तरुणांसाठी किती कठीण असते, याचा आरसाच जणू या कथानकात वाचकासमोर धरला जातो. एकप्रकारे, शतकानुशतके भारतातील जातिव्यवस्था कशी अबाधित राहिली, या गुलाबला पडलेल्या प्रश्नाचे उत्तरच त्याला स्वतःच्या जीवनानुभूतीतून मिळते. लेखक यातून जातीयतेचे समर्थन करत नाही, तर त्याच्यासमोर असलेल्या पेचातून व्यावहारिक मार्ग काढतो.

या कादंबरीत या सहस्रकाच्या सुरुवातीचा काळ उभा केला आहे. त्या काळात अधिक संख्येने मुले आपल्या परिसराचा परीघ ओलांडून, गावातून शहरात शिकायला येऊ लागली होती. गाव आणि शहर यांतील संस्कृतीतील फरक हा अधिक ठळक होता, परंतु आजही या परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. आजही भारतात आंतरजातीय विवाहांची संख्या तुलनेने कमीच आहे.

दुसरे म्हणजे, कथानकाला आशयाचे विविध पदर आहेत. या कादंबरीचा नायक गुलाब धांडे पाटील याचा लग्नापर्यंतचा एक जीवनप्रवास कादंबरीत रेखाटला आहे. त्याचबरोबर कुटुंबव्यवस्था, आजूबाजूच्या एकूणच माणसांची मानसिकता, त्यांची वर्तनशैली, रीतिरिवाजांचा पगडा यांचा प्रत्यय या कथानकातून येतो. त्याचबरोबर कुटुंबातील माणसांमधील नातेसंबंधांत असणारी उलटसुलट धाग्यांची सुंदर गुंफण, भावनात्मक आणि व्यावहारिक संबंधांचा सुंदर पट येथे उलगडला आहे. गुलाबाच्या मनात अनेकानेक घडामोडींमुळे होणारी उलथापालथ आणि त्यातून होणारी त्याची उलघाल, परिस्थितीला सामोरे जात त्याने विवेकाचा आधार घेत घेतलेला निर्णय आणि त्यातून सूक्ष्मपणे त्याचे तुटणे हे सारे फार उत्कटपणे मांडले आहे.

या कादंबरीतील स्त्री व्यक्तिरेखांची वेधक चित्रणे खास आहेत. विशेषतः मायावहिनीचे पात्र फार सुंदर पद्धतीने, त्यातील सगळ्या कंगोऱ्यांनिशी साकार झाले आहे. या नात्याची खुमारी गुलाबचे लग्न ठरविताना अधिक जाणवते. त्याचबरोबर दिल्लीत भेटलेली सुलक्षणाची व्यक्तिरेखाही फार विलोभनीय आहे. सुलक्षणामध्ये गुलाबला अपेक्षित आधुनिकता आणि परंपरा यांचे सुंदर मिश्रण आहे. महानगरे आणि गावखेड्यांतील स्त्रियांच्या प्रत्ययकारी व्यक्तिचित्रणांतून त्याला गवसलेले वास्तव कोल्हे यांनी फार अचूकतेने मांडले आहे. ग्रामीण लोकांच्या प्रश्नांवर अभ्यास करणाऱ्या मुलीदेखील सर्व्हेपुरत्याच खेड्यात येतील, परंतु खेड्याशी त्या एकरूप होणार नाहीत; हे वास्तव उमजलेला गुलाब मग त्याच्या साऱ्या स्वप्नांशी तडजोड करायला तयार होतो. एकप्रकारे महानगर आणि ग्रामीण संस्कृतीतील असलेल्या फरकावर तसेच विवाहसंस्थेतील अपरिवर्तनीय वास्तवावर हे कथानक भाष्य करते.

या कथानकातील बौद्धिक चर्चा हा एक सुंदर भाग आहे. विशेषतः भारतातील जातिव्यवस्थेवरील चर्चांमध्ये कोल्हे यांची लेखणी खुलून येते. कथानकात वापरलेल्या विदर्भातील वऱ्हाडी बोलीभाषेचा मुबलक वापर हेदेखील या कथानकाचे एक वैशिष्ट्य आहे. वऱ्हाडी भाषेतील विशिष्ट हेलकावे, लय, गोडवा, वाक्प्रचार, शब्द यांचा सुंदर प्रत्यय या संवादांतून येतो.

प्रा. अविनाश कोल्हे यांची लेखनशैली प्रवाही आणि प्रभावी आहे. त्यात सतत फ्लॅशबॅक पद्धतीचा वापर करत विविध काळांतले प्रसंग चित्रमय पद्धतीने समोर घडत राहतात. गुलाब या मुख्य व्यक्तिरेखेच्या प्रत्यक्ष प्रवासाबरोबरच त्याचा शैक्षणिक, बौद्धिक, वैचारिक, मानसिक, भावनिक विकासाचा, आंदोलनांचा प्रवास फार वेधकपणे दर्शविला आहे, तो एकप्रकारे प्रतीकात्मक आहे. प्रसिद्ध चित्रकार रविमुकुल यांचे मुखपृष्ठ कादंबरीच्या आशयाचे मूल्यवर्धन करणारे आहे.

द्वारा : सकाळ वृत्तसेवा