हस्तिनापूर - मनोहर रं. शिरवाडकर

कॉंटिनेंटल प्रकाशन

पाने : ☀ 160 मुल्य (₹): 100.0

/media/हस्तिनापूर_hp.jpg

मोजक्या शब्दातील समर्पक व्यक्तिचित्रण - महेश नाईक

सत्तरीच्या दशकातील महाभारतावरील विविध अंगांचे विवेचन करणारी जी पुस्तके आली त्याच परंपरेतील म.रं. शिरवाडकर यांचे हे आणखी एक पुस्तक. यातदेखील महाभारताच्या काही अंगाचं नव्याने दर्शन घडते. विशेषतः चमत्कार , वर, शाप या संकल्पना व त्यांचा विशेषतः पांडवांवरील प्रभाव याचं उत्कृष्ट विवेचन या पुस्तकात आहे. महाभारतातील कोणकोणत्या घटनांना वर शापांनी प्रभावी किंवा अतिरंजित केले आहे हे देखील शिरवाडकरांनी सप्रमाण स्पष्ट केले आहे. उदाहरण द्यायचं झालंच तर द्रौपदी वस्रहरणाचा प्रसंग. हा प्रसंग प्रत्यक्षात कसा घडलेला नसावा व श्रीकृष्णाचा वस्त्र पुरविण्यात कोणताही सहभाग कसा नव्हता यावरील शिरवाडकरांचा युक्तिवाद मुद्देसूद व बिनतोड वाटतो.
कृष्णानं अर्जुनाच सारथ्य का स्वीकारलं याची देखील छान उकल शिरवाडकर करतात व ते आपल्याला पटल्यावाचून राहात नाही. हे करताना अर्जुनाचा हळवा , भावुक स्वभाव आणि श्रीकृष्णची कर्तव्य कठोरता आपल्या मनावर बिंबत जाते.

शिरवाडकरांनी कर्ण , अर्जुन, धृतराष्ट्र , युधिष्ठिर , भीम आणि द्रौपदी या पात्रांचीदेखील व्यक्तिचित्रे सुंदर रेखाटली आहेत आणि याचबरोबर महारथी सात्यकी आणि कौरव सेनापती झालेल्या पांडवांच्या मामाचं , शल्याचं देखील.

शतपुत्रा या प्रकरणात त्यांनी १०० कौरवांतील गांधारीपुत्र किती व कृतकपुत्र किती व का? याचं केलेलं स्पष्टीकरण देखील मुद्देसूद आहे.

पुस्तक छोटेसेच असले तरी महाभारताविषयी कुतूहल असणाऱ्यांना वाचायला अतिशय सुंदर पूरक पुस्तक आहे. काहीसा वेगळा विचार ते नक्कीच देतं पण युगांत , व्यासपर्व सारखा आपला वेगळा ठसा ते उमटवत नाही.
(प्रथमावृत्ती १९७२ , पुनर्मुद्रण - २०१९)

द्वारा : https://manaasajjanaa.blogspot.com/
  Never miss a story from us, get weekly updates in your inbox.