धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे

विश्वास दांडेकर

देशमुख अ‍ॅन्ड कंपनी पब्लिशर्स प्रा. लि.

/media/धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे_dk.jpg

पाने : ☀ 185 मुल्य (₹): 350.0

महाभारतातिल कृष्णचरित्र - महेश नाईक

मला कृष्ण कुठे सापडेल? हा मला बरेच दिवस पडलेला प्रश्न होता. खराखुरा कृष्ण, देवपणाची पुटे न चढलेला कृष्ण, राजकारण धुरंधर कृष्ण, महाभारतातील पांडव सखा, अर्जुनाचा सखा. असा कृष्ण मला तुकड्या-तुकड्यामध्ये व्यासांचे शिल्प, युगांत, व्यासपर्व मध्ये सापडत होता, पण त्यात हवी तशी सलगता नव्हती. "युगंधर" मधला भगवान श्रीकृष्ण सुखावणारा असला तरी सर्वस्वी पटणारा नव्हता. त्यामुळेच ज्या कृष्णाला मी शोधत होतो तो थोड्याफार प्रमाणात मला सापडला तो श्री विश्वास दांडेकर यांच्या धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे मध्ये.
महाभारताच्या कथानकावर बेतलेले हे पुस्तक आपल्याला महाभारताला स्पर्श करत कृष्णचरित्र उलगडताना आढळते. कृष्ण जन्मापूर्वीची गोकुळ व मथुरेतील यादवांची स्थिती, गणराज्य व राजेशाही यातील सूक्ष्म फरक, आणि त्याच्या पार्श्वभूमीवर कंस जरासंध द्वयीच्या राजेशाहीची स्थापना, याने या पुस्तकाची सुरुवात होते. आणि आपल्याला कृष्णजन्म व त्यानंतर काय काय व कसे कसे घडले याची माहिती देते. मग अशाच प्रकारे आपल्या पुढे येतो तो कुरु वंशाचा संक्षिप्त इतिहास आणि त्यांच्यातील दुहीच्या बीजांची कारणे. छोट्या-मोठ्या घटनांचा उल्लेख करत पण त्यातील वर्णने टाळत आपल्याला मग पांडव व कृष्ण कसे व का एकत्र आले हे अगदी सहजपणे उकलते.

त्यानंतरच्या घटना या कृष्णाच्या पांडवांबरोबरच मैत्री नंतरच्या आहेत. ज्या सुरू होतात द्रौपदीस्वयंवराबरोबर जेथे कृष्ण प्रथम महाभारतात येतो. त्याआधीच्या घटना हरिवंश अथवा भागवत पुराणातून आपल्या समोर येतात. कृष्ण पांडवांबरोबर आल्यानंतर राज्य वाटणी, खांडववन दहन, इंद्रप्रस्था ची स्थापना, जरासंध वध, राजसूय यज्ञ व यावेळी कृष्णाने केलेला शिशुपालवध या सार्‍या घटनांची कारणमीमांसा आपल्याला सहज उलगडत जाते.

मग येतो द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग दोन विस्तृत प्रकरणातून आपल्याला या प्रसंगाच्या वेळी ते द्यूत का व कसे घडले असावे? आणि वस्त्रहरण हि घटना प्रत्यक्षात का घडलेली नसावी ? हे समजावून दिले आहे. यात द्यूत, अक्षविद्या आणि त्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य, या सार्‍यांची फोड आहे व तसेच वस्त्रहरण प्रसंगात पर्यंतच्या व नंतरच्या घटना उकलून दाखविलेल्या आहेत

यानंतरचा कृष्ण येतो तो शिष्टाई प्रसंगीचा. या प्रसंगात श्रीकृष्णाच्या कौशल्याची कसोटी लागते व त्यात तो स्वतःच्या संरक्षणाची संपूर्ण व्यवस्था स्वतःच करत, दुर्योधन, दुशासन, कर्ण व शकुनी या चौकडीचा धुव्वा उडवत, युद्धाचा सर्व दोष कौरवांवर टाकत, आपल्या मनाप्रमाणे युद्ध ठरवतो व कृष्णशिष्टाई फिस्कटली, असे दाखवत नंतर कर्णाला त्याचं जन्म रहस्य उघड करत, त्यावर मानसिक आघात देखील करतो.

याच पुस्तकाच्या परिशिष्टामध्ये या साऱ्या घटनांची सांस्कृतिक पार्श्वभूमी व संदर्भ आहेत जे या पुस्तकाला परिपूर्ण करतात. व म्हणूनच तुम्हाला जर महाभारत कथेची जाण असेल व महाभारतातल्या कृष्णाचा परिचय करून घ्यायचा असेल तर हे पुस्तक वाचायलाच हवे. अर्थातच या एकाच पुस्तकात सामावण्या एवढा कृष्ण लहान नाही. त्याला आणखी शोधायचा असेल तर तो हरीवंश, भागवत पुराण,बाळशास्त्री हरदास यांची व्याख्याने, अशा विविध ठिकाणी शोधायला हवा तेव्हा त्याचे विखुरलेले वेगवेगळे अंश सापडतील.
(प्रथमावृत्ती - डिसेंबर २००६, दुसरी आवृत्ती - २०१४)

द्वारा : https://manaasajjanaa.blogspot.com/