ऊनउतरणीवरून : अरुणा ढेरे यांची निवडक कविता

अरुणा ढेरे

/media/xG5C2jf2be2G.jpg

पुस्तक परीक्षण: ‘ऊनउतरणीवरून’ स्वागतार्ह संपादन - डॉ. नीलिमा गुंडी

अरुणा ढेरे या गेली चाळीस वर्षे सातत्याने कवितालेखन करणाऱ्या महत्त्वाच्या कवयित्री आहेत. त्यांची एकूण साहित्यसंपदा विपुल असली तरी कविता ही त्यांची निजखूण आहे .‘प्रारंभ’, ‘यक्षरात्र’, ‘मंत्राक्षर’, ‘निरंजन’, ‘जावे जन्माकडे’ आणि ‘निळ्या पारदर्शक अंधारात’ हे त्यांचे सहा कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. ‘ऊन उतरणीवरून’ हे पुस्तक म्हणजे अरुणा ढेरे यांच्या निवडक कवितांचे नीरजा यांनी केलेले साक्षेपी संपादन आहे. नीरजा या स्वत:ही आजच्या महत्त्वाच्या कवयित्री आहेत. ‘मायमावशी’ या अनुवादाला वाहिलेल्या महत्त्वाच्या नियतकालिकाशी त्या अनेक वर्षे संपादक (सध्या ‘सल्लागार संपादक’) या नात्याने निगडित आहेत. त्यांना इतर भाषांमधील साहित्याची जाण आहे. त्यामुळे त्यांनी या पुस्तकाचे संपादन करणे याला महत्त्व प्राप्त होते. संपादन हा समीक्षेचे अनेक घटक अंतर्भूत असणारा साहित्यप्रकार आहे. चोखंदळपणे निकष ठरवून निवड करणे, अनुक्रम ठरवणे, तसेच अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिणे आणि गरजेनुसार टिपणे देणे हे त्यात अपेक्षित असते. नीरजा यांनी या संपादनात केलेली कवितांची निवड समाधानकारक आहे. पुस्तकाचा अनुक्रम पाहता त्यातून कवयित्रीच्या जाणीवविश्वाचा विकास शोधायला मदत होते. प्रस्तावनेत नीरजा यांनी अरुणा ढेरे यांच्या काव्यप्रवासाचा सविस्तर मागोवा घेतला आहे. त्यामुळे हे पुस्तक रसिक वाचक आणि अभ्यासक अशा दोहोंनाही उपयुक्त ठरेल. चंद्रमोहन कुलकर्णी यांचे मुखपृष्ठ अर्थगर्भ असून पुस्तकाची निर्मितीमूल्येही दर्जेदार आहेत.
पुस्तकाच्या प्रस्तावनेत नीरजा यांनी अरुणा ढेरे यांच्या कवितांमधील काही आशयसूत्रांकडे लक्ष वेधले आहे. सर्जनाचा शोध, ‘तू’ आणि ‘मी’विषयी, स्त्रीविषयक कविता, ‘स्व’कडून सम्यकभानाकडे होणारा प्रवास आणि प्रतिमासृष्टी यांचा विचार त्यांनी प्रस्तावनेत चिकित्सक दृष्टीने केला आहे. अरुणा ढेरे यांच्या कवितेचे नेणिवेशी असलेले नाते, तसेच लोकसाहित्य, पुराणकथा, महाकाव्ये अभ्यासताना त्यांना आलेले स्त्रीच्या जगण्याचे भान, त्यांची संयत जीवनदृष्टी आणि सौहार्द राखत नातेसंबंध जपण्याची त्यांची मनोवृत्ती या वैशिष्टय़ांची नीरजा यांनी योग्य ती दखल घेतली आहे. अरुणा ढेरे यांच्या कवितांविषयी त्यांची काही महत्त्वाची भाष्ये आहेत.. ती अशी : ‘ही कविता स्वप्न आणि वास्तवाच्या परिसीमेवर हिंदूोळणारी आहे’, ‘त्यांना मित्राच्या भूमिकेतला पुरुष अपेक्षित आहे’, ‘स्त्रीच्या शोषणापेक्षा तिच्या सोसण्याविषयी कवयित्री जास्त बोलते’, ‘अरुणा ढेरे यांची प्रतिमासृष्टी जास्त ‘एलिमेंटल’ आहे, ती जास्त जोडली गेली आहे ती पंचमहाभूतांशी!’, ‘त्यांच्या कवितेत येणाऱ्या प्रतिमा या जास्त मध्यमवर्गीय जाणिवांच्या आहेत का, असा प्रश्न पडतो’, ‘त्यांची कविता वास्तववादी कमी आणि सौंदर्यलक्ष्यी जास्त आहे..’ नीरजा यांची ही सर्वच निरीक्षणे मान्य होण्याजोगी आहेत. मात्र, ‘हाती लागला आहे अंधाराचा भक्कम जाड दोर’ या कवितेविषयी नीरजा यांचे भाष्य येते ते असे : ‘‘फँटसी’त रमणं हा जगण्यातले विरोधाभास टाळण्याचाही एक मार्ग असावा. हा मार्ग कवयित्रीदेखील अनुसरते.’ (पृष्ठ १२) हे त्यांचे भाष्य खटकते. अरुणा ढेरे यांनी येथे (आणि इतर काही कवितांमध्येही) अस्तित्वविषयक प्रश्नांचा वेध घेतला आहे. त्यामागील तत्त्वचिंतनाची ओढ ‘फँटसी’त रमणं’ या शब्दांमुळे कमी लेखली गेली आहे असं मला वाटतं, इतकंच!
‘ऊन उतरणीवरून’ या संपादित काव्यसंग्रहात अरुणा ढेरे यांच्या १३० कविता समाविष्ट आहेत. ‘निंब’, ‘माझ्या मनातला तो’, ‘तेरुओ’, ‘यक्षरात्र’, ‘मंत्राक्षर’, ‘सईबाई ग’, ‘ठिपका’, ‘करुणाष्टक’, ‘निरंजन’, ‘जनी’, ‘बायका’, ‘जावे जन्माकडे’, ‘ही दंवाच्या डोळय़ांची’, ‘युद्धापेक्षाही प्राणांतिक’, ‘पोथीपाशी ना ज्योतीपाशी’, ‘निळ्या पारदर्शक अंधारात’, ‘प्रार्थना’ अशा आशय आणि अभिव्यक्तीची विविध वैशिष्टय़ं व्यक्त करणाऱ्या अनेक कविता यात एकत्रित स्वरूपात आहेत.
या संग्रहाचे स्वागत करण्यामागे आणखी एक संदर्भ आहे. तो म्हणजे अरुणा ढेरे आणि नीरजा यांची काव्यदृष्टी एकसारखी नाही. अरुणा ढेरे या आत्मलक्ष्यी कवयित्री आहेत, तर नीरजा या समाजलक्ष्यी कवयित्री आहेत. तरीही नीरजा यांनी अरुणा ढेरे यांच्या कवितांचे संपादन करणं म्हणजे या दोन काव्यदृष्टींमधील परस्परसंवादाच्या आणि अभिसरणाच्या जागांचा शोध घेणं ठरतं. वाङ्मयीन वातावरण उदार राखण्यासाठी असे प्रयत्न उपयुक्त ठरतात याची आवर्जून नोंद घ्यायला हवी.
nmgundi@gmail.com

द्वारा : लोकसत्ता वृत्तसेवा