Why We Kneel How We Rise

Michael Holding

/media/Why We Kneel How We Rise_we.jpg

दडपलेला इतिहास - विवेक गोविलकर

मायकल होल्डिंग हा वेस्ट इंडीजचा माजी जलदगती गोलंदाज आणि फलंदाजांचा कर्दनकाळ. नंतर नभोवाणीवरचा समालोचक म्हणूनही लोकप्रिय झाला. 'व्हाय वुई नील अँड हाऊ वुई राइज' हे त्याचे पुस्तक म्हणजे केवळ कृष्णवर्णीयांच्या तक्रारी किंवा रडगाणे नाही. अलीकडे कृष्णवर्णीय खेळाडू वर्णद्वेषाचा प्रतीकात्मक विरोध म्हणून खेळाच्या मैदानात गुडघ्यावर का बसतात आणि त्यांची प्रगती कशी होते, याचा मागोवा या पुस्तकात घेतला आहे. सर्ववर्णी लोकांच्या समानतेचे ध्येय समोर ठेवणाऱ्या होल्डिंगचे हे पुस्तक विचार करायला लावते. पूर्वी आफ्रिका हे फार मोठे जागतिक व्यापारी केंद्र होते किंवा कॅरिबिअन बेटांवर कोलंबसच्या आगमनापूर्वीपासून संस्कृती होती, या गोष्टी बहुतेकांना माहीत नसतात. 'ब्लॅक लाइव्हज मॅटर' या चळवळीत होल्डिंगने भाग घेतला, तेव्हा त्याचे असे म्हणणे होते की, 'शेकडो वर्षे कृष्णवर्णीयांच्या आयुष्याला महत्त्व दिले गेले नाही आणि आता त्याबाबत काहीतरी करण्याची वेळ आलेली आहे'. या पुस्तकात 'गौरवर्णीयांचे विशेषाधिकार', म्हणजे त्यांना दररोजच्या आयुष्यात वर्णद्वेषाचा सामना करावा लागत नाही, या संकल्पनेवर बरीच चर्चा आहे. त्यानुसार त्यांचेही आयुष्य खडतर असू शकते; पण ते त्यांच्या रंगामुळे नसते, हे सांगितले आहे. वर्णद्वेषाबद्दल सर्वांचे ज्या प्रकारे ब्रेनवॉशिंग झाले आहे, त्याबद्दल होल्डिंग बराच दोष चर्चला देतो. आजतागायत येशू ख्रिस्त हा निळ्या डोळ्यांचा आणि सोनेरी केसांचा दाखवला गेला आहे. पण त्या काळात पश्चिम आशियातील वाळवंटात जन्मलेला कोणीही रंगाने तसा असणे शक्य नाही. त्यामुळे जर येशू गोरा नसेल तर ईश्वरही गोरा नसेल, असा होल्डिंगचा युक्तिवाद आहे. काळ्या लोकांबाबत अनेक प्रसिद्ध लोकांची मते आणि कृत्ये केवळ धक्कादायक आहेत. 'काळ्यांना फक्त गुलाम म्हणून प्रशिक्षण देता येईल' असे जगविख्यात तत्त्वज्ञ कांटने म्हटले होते. फ्रेंच लेखक व्हॉल्टेअर या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या खंद्या पुरस्कर्त्याने सर्व प्राण्यांच्या उतरंडीत काळ्यांना माणसांमध्ये सर्वांत खालचे आणि माकडांच्या थोडेसे वरचे स्थान दिले. डेव्हिड ह्यूम या स्कॉटिश तत्त्वज्ञाच्या मते काळे हे निसर्गतःच गोऱ्यांपेक्षा कमी प्रतीचे होते. अमेरिकी स्वातंत्र्ययोद्धा थॉमस जेफर्सन हाही अनेक काळे गुलाम पदरी बाळगून होता. काळ्या महिलाच शिंदळकी करणाऱ्या असल्याने त्यांच्यावर गोऱ्या लोकांकडून बलात्कार होऊच शकत नाही, अशी धारणा ठेवणे किंवा काही राज्यांच्या कायद्यांनुसार गुलामाला ठार करणे हा तर गुन्हाही नसणे, अशा अनेक विसंगत गोष्टी लोकशाहीवादी अमेरिकेच्या इतिहासात अगदी गेल्या शतकापर्यंत होत्या. काळ्या व्यक्तींवर भूल किंवा वेदनाशामके न देता शस्त्रक्रिया करणे किंवा जिवंत लहान मुलांची कवटी उघडणे, असेही रानटी प्रयोग झाले होते, याचा उल्लेख पुस्तकात येतो. अनेक गोऱ्यांना मिळालेली प्रसिद्धी आणि काळ्यांच्या कर्तृत्वाकडे झालेले दुर्लक्ष यामागचे वास्तव लेखक मांडतो. कोलंबस हा शोधप्रवासी नसून तो स्पेनच्या राजाचा पगारी व भाडोत्री सैनिक तसेच खुनी होता. देवीची लागण झालेल्या माणसाचा पू एखाद्या निरोगी माणसाच्या हाताला बारीकशी चीर देऊन तिथे चोळायचा, ही पद्धत प्रतिबंधक इलाज म्हणून ओनेसिमस या कृष्णवर्णीयाने जेन्नरच्या आधीच वापरली होती. एडिसनने तयार केलेला दिवा अल्पायुषी असे. पण कार्बन फिलामेंट वापरून दीर्घकाळ चालणारा दिवा लॅटिमर या कृष्णवर्णी शास्त्रज्ञाने तयार केला होती. त्याला त्याचे पेटंटही मिळाले. टेलिफोनच्या शोधाचे श्रेय ग्रॅहम बेलला दिले जाते. पण त्यात लॅटिमरची भूमिका महत्त्वाची होती, हे सांगितलेच जात नाही. जॉर्ज हॅडली या महान कृष्णवर्णी फलंदाजाला काळा ब्रॅडमन असे नाव मिळाले. पण गोरा पेले किंवा गोरा महम्मद अली, अशी ओळख कोणा खेळाडूला कधीच दिली जात नाही. ब्लूज, जॅझ, रॉक अ‍ॅन्ड रोल, कंट्री, फंक हे सर्व संगीत प्रकार शेतमजूर काळ्यांनी तयार केले. आपली ओळख देहावरून ठरते; बौद्धिक वा इतर गुणांनी नाही, ही गोष्ट काळ्यांना सर्वाधिक त्रासदायक वाटते. विषमतेबद्दल तक्रार करणे, पण जेव्हा सोयीची असेल ती मान्य करणे होल्डिंगला मान्य नाही. होल्डिंगने अनेक कृष्णवर्णी खेळाडूंच्या मुलाखती घेतल्या. त्याने प्रत्येक मुलाखतीत विचारले, 'तुमची प्रगती कशी झाली?' प्रत्येक खेळाडूने एकच उत्तर दिले, 'शिक्षणामुळे.' होल्डिंगच्या मते शिक्षणातच कृष्णवर्णीयांच्या प्रत्येक समस्येचे उत्तर आहे. ....

व्हाय वुई नील अँड हाऊ वुई राइज लेखक : मायकल होल्डिंग
किंमत : ४१९ रु., किंडल : ३७४ रु.

द्वारा : महाराष्ट्र टाइम्स वृत्तसेवा