जागल्या - श्रीराम दुर्गे

सायन प्रकाशन

पाने : ☀ 180 मुल्य (₹): 250.0

/media/Hjlvlf7JXAkx.jpg

समर्पित व्यक्तिमत्त्वाची ओळख - ईश्वरचंद्र हलगरे

कादंबरी हा विस्तृत कालपट कवेत घेऊन विकसित होणारा साहित्य प्रकार आहे. कथा-कवितेच्या तुलनेत लेखकाला कादंबरीतून अनेक आयाम उपलब्ध होत असतात. कादंबरीच्या वेगवेगळ्या प्रकारानुसार तिचा अवकाश विकसित होत असतो. सामाजिक कादंबरीतून त्या भागाची समाजरचना, लोकव्यवहार, लोकसंकेत, जातिव्यवस्था, प्रथा-परंपरा, भाषा, सण-उत्सव या बाबींतून कथानक आकारास येते. त्यामुळे वाचकाला त्या भागातील समग्र सामाजिक स्थितीचा पट समजतो.

'जागल्या' कादंबरीच्या निमित्ताने वरील बाबीची शक्यता पडताळता येण्यासारखी आहे. या कादंबरीतून विसाव्या शतकाच्या पाचव्या व सहाव्या दशकातील मराठवाड्यातील समाजव्यवस्थेची गुंतागुंत लक्षात येते. 'जागल्या' ही श्रीराम दुर्गे यांची पाचवी कादंबरी. सामाजिक उतरंड ही सुरुवातीपासूनच श्रीराम दुर्गे यांच्या चिंतनाचा विषय राहिलेला आहे. तत्कालीन दलित समाज सवर्णांच्या प्रभावाने दबून गेलेला होता. सवर्णांच्या दावणीतील जनावरांना जेवढं चांगलं खायला आणि राहायला मिळायचं, त्याहीपेक्षा भीषण परिस्थिती गावकुसाबाहेर राहणाऱ्या दलितांची होती. दलितांचे कष्ट चालायचे, त्यांची सेवा चालायची; पण त्यांचा स्पर्श आणि सहवास चालायचा नाही. हा दांभिक लोकव्यवहार एवढा मजबूत झालेला होता की करणाऱ्याला आणि करून घेणाऱ्यालाही हा अन्याय आहे याची जाणीव नव्हती. १९५०-६०च्या दरम्यान महाराष्ट्रात बहुतांश खेड्यातून असंच चित्र होतं. ते आजही पूर्णपणे पुसलं गेलंय असं नाही.

शंकर कांबळे, ज्याला सर्व जण नाना म्हणायचे. तो या कादंबरीचा नायक. लातूर जिल्ह्यातील धसवाडी या खेडेगावातील आहे. लेखकाचं घर नानांच्या घराशेजारीच. एखाद्या चित्रपटात शोभावा असा नानांचा जीवनप्रवास लेखक लहानपणापासूनच पाहत, अनुभवत होता. जगण्याचा संघर्ष व जातीचे चटके लेखकाने लहानपणापासून सोसलेले आहेत. म्हणून त्यांचे लेखन दाहक आणि प्रत्ययकरी आहे, तरी त्यात आततायीपणा अथवा अतिरेकी समाजद्वेष जाणवत नाही.

कादंबरीच्या पहिल्याच प्रकरणात पांदीकडेच्या ढोरफाडीवरचा प्रसंग अंगावर शहारा आणणारा आहे. पोटासाठी मांग-महार समीदर पाटलाच्या म्हशीला औषध घालून मारतात. मटणाच्या वाढणाऱ्या ढिगाबरोबर कावळे, गिधाडं, कुत्री आणि माणसांतील भांडण धारदार होतं आणि त्यांच्या भांडणातूनच गावातील लोकांना समजतं की म्हैस मेली नसून, मारलेली आहे. या कृत्याने गावाचा पारा चढतो. हा हा म्हणता दलित वस्तीतील झोपड्या जळू लागतात. त्या जाळातच अनेक किंकाळ्या विरून जातात. या प्रसंगापासून नाना अंतर्मुख होतो. हे सारं बदललं पाहिजे म्हणून मांगवाड्यातील व महारवाड्यातील लोकांना समजावतो. गावातील यस्करपाळी व गावकीची कामे बंद होतात. एवढ्यावरच न थांबता नाना काही तरुण पोरांसह गावापासून जवळच असलेल्या अंधोरीच्या शंकर पाटलाकडे कामाला जातो. तिथेच गुर-ढोरं राखताना नानांचं शिक्षणही सुरू असतं. मानवतावादी शंकर पाटलाच्या सहवासात नानांच्या व्यक्तिमत्त्वाला उजाळा येत जातो.

इकडे धसवाडीत परंपरागत मांगा-महाराच्या हाडोळ्याच्या जमिनीवर सवर्णांनी कब्जा केलेला होता. त्यामुळे संघर्ष अधिकच चिघळला. भांडून फायदा नव्हता. त्यामुळे नानांनी ही लढाई कोर्टातून जिंकण्याचा निर्धार केला आणि अहमदपूर ते बिदर अशा कोर्टाच्या वाऱ्या सुरू झाल्या. शंकर पाटलाच्या ओळखीच्या महबूब खाँ या वकिलानेही याकामी त्यांना भरपूर मदत केली. आणि हाडोळ्याचा निकाल शेवटी दलितांच्या बाजूने लागला.

एक लढाई जिंकली म्हणून नाना शांत बसले नाहीत, आता त्यांना मोठी लढाई जिंकायची होती. देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या नानांना भारतमातेच्या स्वातंत्र्याने झपाटलेलेच होते. नाना एक दिवस अचानक घरून बेपत्ता झाले. शिरूरचे माधवराव पाटील, भालकीचे यशवंतराव चव्हाण, उदगीरचे विश्वनाथराव हुडगे, मुखेडचे पिराजी कोत्तापल्ले, बिदरचे इस्माईल शेख, मुसा पटेल अशा तरुण कार्यकर्त्यासोबत ते कराडला वसंतदादांच्या आंदोलनात सहभागी झाले. तिथून सोलापूर उमरग्यानंतर उस्मानाबादला सहा महिने आंदोलन केले. नंतर नांदेडला काही काळ आंदोलनात सहभागी झाले, शेवटी यवतमाळला त्यांना अटक झाली. पुढे भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत म्हणजे जवळजवळ अडीच वर्षे नाना तुरुंगात होते. ते जेव्हा गावात आले तेव्हा गावानेही मोठ्या मनाने त्यांचे जंगी स्वागत केले. या कार्यक्रमात शंकरराव पाटील, वैजनाथ पाटील या समर्थकांबरोबरच माली पाटील, सायबु पाटील या एकेकाळच्या विरोधकांनी नानाचं भरभरून कौतुक केलं. यावरून हेच स्पष्ट होतं की, धसवाडीत सामाजिक ऐक्य साधण्यात नानांच्या पुरोगामी विचारांचा महत्त्वाचा वाटा आहे.

नानांच्या आगमनानंतर गावातील दलित-सवर्णांचे संबंध तर सुधारलेच. परंतु, दलित मंडळींनी आपल्या कमाईचे नवे साधन शोधत सुतारकाम व गवंडीकामात प्रगती केली. गावच्या पुरोगामित्वाचा आणखी एक दाखला म्हणजे, धसवाडीत होत असलेला मोहरम सण. गावात एकही मुस्लिम कुटुंब नसताना येथे अतिशय धूमधडाक्याने मोहरम साजरा केला जातो, धुला खेळवला जातो, जे महाराष्ट्रातलं एकमेव उदाहरण असेल.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णाभाऊ साठे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना, त्यांना नानांबद्दल समजले व ते धसवाडीचा पत्ता शोधत नानांच्या घरी आले. त्यांना त्या परिसरात कार्यक्रम करायचे होते. नानांनीही संपूर्ण सहकार्य करण्याचे वचन दिले आणि अण्णा भाऊनी धसवाडीच्या कलाकारांसह स्वतंत्र ताफा तयार केला. अहमदपूर लातूर परिसरात जनजागृतीचे कार्य करून ते मुक्कामाला नानांच्या घरी यायचे. असे साडेतीन महिने यशस्वी कार्यक्रम केल्यानंतरच अण्णा भाऊंनी नानांचा निरोप घेतला, ही फार महत्त्वाची ऐतिहासिक नोंद आहे.

पुढे पहिल्या पंचायत राज निवडणुकीत शंकरराव पाटलांचा मुलगा रामचंद्र पाटील यांच्या आग्रहाखातर नानानी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली व जिंकलीसुद्धा. त्यावेळी मीटिंगला उस्मानाबादला जाताना चालत जायचे. जाताना साधे कपडे घालून डबे-चाळण्या दुरुस्त करायचे. उस्मानाबादच्या जवळ गेल्यानंतरच ते पेटीतले चांगले कपडे घालायचे. अशा उक्ती व कृतीचा मेळ घालणाऱ्या नानांनी राजकारणही तेवढ्याच सच्चेपणाने करून आपला वेगळा दबदबा निर्माण केला. नानांना सुरुवातीपासूनच शिक्षणाबद्दल प्रचंड आस्था होती, याचाच परिणाम म्हणजे आज अडीचशे उंबऱ्याच्या धसवाडीत दीडशे नोकरदार आहेत. नानांसारखे शेकडो नायक इतिहासाच्या पोटात गडप झालेले आहेत. त्याचं प्रातिनिधिक कार्य लोकांसमोर यावं, म्हणूनच लेखकाने हा दीर्घ लेखन प्रपंच केला; ज्यात मराठवाडा मुक्तिसंग्राम तपशीलाने येतोच, बरोबर एक समाज समर्पित चरित्रनायकही उभा राहतो.
मुखपृष्ठ : संतोष घोंगडे
श्रीराम दुर्गे - लेखक मो.- ९४०४३२६४६२

द्वारा : महाराष्ट्र टाइम्स
  Never miss a story from us, get weekly updates in your inbox.