मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

श्रीपाद रामचंद्र टिकेकर

/media/fU8f8xDHtD15.jpg

मुसलमानी मुलखांतली रंजक सफर - प्रदीप कुलकर्णी

गेल्या शतकातील ख्यातनाम संशोधक, लेखक, पत्रकार आणि ज्येष्ठ विचारवंत श्रीपाद रामचंद्र टिकेकर (१९००-१९७९) यांनी लिहिलेलं ‘मुसलमानी मुलखांतली मुशाफरी’हे प्रवासवर्णन १९३१ साली प्रथम प्रकाशित झालं होतं. या पुस्तकातले अनेक संदर्भ ९० वर्षांनंतर आजही कालबाह्य झालेले नाहीत. त्यामुळे विस्मरणात गेलेलं हे पुस्तक आजच्या वाचकांपुढे पुन्हा यावं, या हेतूने डॉ. मनीषा टिकेकर यांनी या पुस्तकाचं पुनर्मुद्रण करायचं ठरवलं. मूळ मजकुरात आणि त्यावेळच्या शुद्धलेखनात कोणताही बदल न करता, या पुस्तकाची नवी आवृत्ती नुकतीच प्रसिद्ध झाली.

मनीषा टिकेकरांनी या पुस्तकाला अतिशय समर्पक, अभ्यासपूर्ण आणि रंजक प्रस्तावना लिहिली आहे. हे पुस्तक वाचताना त्यात अधिक स्पष्टता यावी यासाठी त्यांनी काही छायाचित्रांचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे श्री. रा. टिकेकरांनी कुठल्या मार्गाने या देशांमध्ये प्रवास केला, याची वाचकांना कल्पना यावी म्हणून चार नकाशांचा अंतर्भावदेखील केला आहे. संपादकीय टीपा हे या पुस्तकाचं एक वैशिष्ट्य म्हटलं पाहिजे. या टीपांमुळे पुस्तकात उल्लेख केलेल्या अनेक व्यक्तींबद्दल, शहरांबद्दल, तसंच काही शब्दांबद्दल स्पष्टीकरण मिळतं. त्यामुळे पुस्तकाची वाचनीयता वाढायला निश्चितच मदत झाली आहे.

‘‘केसरी’’ वृत्तपत्राचे प्रवासी प्रतिनिधी म्हणून श्री. रा. टिकेकरांनी १९२८-१९२९ या काळात पेशावर, क्वेट्टा (ही शहरे त्या काळी भारताचाच भाग होती), इराकमधील बगदाद आणि बसरा, तसेच इराणमधील आबादान आणि तेहरान या प्रदेशात सुमारे सहा महिने प्रवास केला. त्या वेळी ते अवघे सत्तावीस वर्षांचे होते. भारताच्या सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणात वाढलेल्या आणि मनाने हिंदू असलेल्या टिकेकरांनी या देशांतील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण, तिथल्या चालीरीती, त्यांची भाषा, तिथलं हवामान, तिथल्या माणसांचे पेहराव, त्यांची हिंदुस्थानबद्दल असलेली मतं इत्यादी गोष्टींचं खुमासदार वर्णन केलं आहे. त्यांना ज्या ज्या गोष्टी खटकल्या, त्यांविषयीचा उल्लेखदेखील त्यांनी परखडपणे आणि औपरोधिक भाषेत केला आहे.

गेल्या काही वर्षांत मध्य-पूर्वेतील देशांविषयीची माहिती देणारी प्रवासवर्णनं प्रसिध्द झाली असली, तरी नव्वद वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेलं मुसलमानी मुलखांवरचं हे पहिलंच प्रवासवर्णन असावं. टिकेकरांची लेखनशैली किती आकर्षक आहे, याचा वाचकांना प्रत्यय यावा म्हणून एक-दोन उदाहरणं देता येतील -

‘आपल्याकडे चैत्र शुद्ध प्रतिपदेला नवीन वर्षाचा आरंभ होतो... तसाच इराणी प्रजेचा २१ मार्च रोजी नव्या वर्षाचा प्रथम दिवस असतो. त्याला नौ-रोज (नवा दिवस) असे म्हणतात. थंड देशात राहिल्यामुळे किंवा पडद्याच्या चालीमुळे, इराणी प्रजा ही गौरवर्णीय आहे... इथे प्रत्येकाला सूट हा हवाच! थंडी कडाक्याची असल्याने बूट व मोजे पायातून निघत नाहीत... इराणात बुरखा हा सर्व वयाच्या स्त्रियांना लागू आहे... तेहरानची हवा फारच उत्तम आहे. हवापाणी हा जोडशब्द मुद्दाम टाळला आहे, कारण पाण्यासंबंधी समाधानाला मुळीच जागा नाही. रूढींविरुद्ध एक चकार शब्द काढता कामा नये... फारसी भाषेत उष्टे, खरकटे आणि किळस या तीन शब्दांना प्रतिशब्द आहेत किंवा नाहीत?....रेस्टॉरंटमध्ये माणसागणिक पाणी पिण्याचा पेला देण्याची चाल कोठेच नाही. दहा बारा माणसं असली तरी एकच प्याला पुरतो. एकाचे पाणी पिऊन झाल्यावर तो तसाच पुढे करावयाचा. पाणी ओतून टाकणे किंवा विसळणे ह्या क्रिया कधीही व्हावयाच्या नाहीत... इकडे आल्यानंतर एक मोठा फरक दैनिक कार्यक्रमात झाला. तो म्हणजे स्नानाचे नाव आन्हिकातून काढून साप्ताहिकात किंवा पाक्षिक व्यवसायात घालायचे...

टिकेकर तेहरानमध्ये असताना त्यांना एका इराणी डॉक्टरने जेवायचं आमंत्रण दिलं. तिथे गेल्यानंतर त्यांनी यजमानांना जेव्हा सांगितलं की, आपण मद्य घेत नाही, तसेच मांसाहारही करत नाही; तेव्हा डॉक्टरमहाशय इतक्या जोराने हसले की, आपल्या फारसी बोलण्यामध्ये काही चूक झाली की काय, अशी शंका टिकेकरांना आली. हसण्याचा भर ओसरल्यावर डॉक्टर टिकेकरांना म्हणाले, अहो, आम्ही आजपर्यंत शाकाहारी माणूस पाहिला नव्हता!’

तेहरान सोडून जाताना टिकेकर जेव्हा सरहद्दीवर पोहोचले तेव्हा तिथल्या पोलिसांनी त्यांचा पासपोर्ट पाहण्यासाठी मागितला. तो पाहिल्यानंतर टिकेकर जासूस (गुप्तहेर) असावेत अशी शंका पोलिसांना आल्यामुळे त्यांनी टिकेकरांना पाच तास अडकवून ठेवलं होतं. त्यातून त्यांची सुटका कशी झाली, याचं म्हटलं तर गंभीर आणि म्हटलं तर हास्यकारक वर्णन वाचताना, परदेशात गेल्यानंतर कशा तऱ्हेचे अनुभव येऊ शकतात याची कल्पना येते.

एकेकाळी मराठी भाषेतील प्रवासवर्णनं अतिशय रुक्ष असायची. पण टिकेकरांनी लिहिलेलं हे प्रवासवर्णन मात्र याला अपवाद आहे. टिकेकरांची लेखनशैली अनौपचारिक असल्यामुळे ते जणू काही आपल्याशी गप्पा मारत आहेत आणि आपण त्यांच्याबरोबर या देशांतून फेरफटका मारत आहोत, असंच वाटत राहतं.

द्वारा : महाराष्ट्र टाइम्स वृत्तसेवा