माझे गाणे आनंदाचे

डॉ. कैलास दौंड

मिलिंद काटे, अनुराधा प्रकाशन, पैठण जि. औरंगाबाद

/media/tirpHM7jjPHH.jpg

पाने : ☀ 44 मुल्य (₹): 50.0

मुलांच्या कल्पना विश्वाचा खजिना,बालकवितासंग्रह : माझे गाणे आनंदाचे - प्रा. डॉ. रंजना मधुकर कदम, अगस्ती महाविद्यालय, अकोले जि. अहमदनगर

मुलांच्या कल्पना विश्वाचा खजिना
बाल कवितासंग्रह ‘माझे गाणे आनंदाचे’

प्रा. डॉ.रंजना मधुकर कदम

डॉ.कैलास दौंड हे मराठी साहित्यातील महत्वाचे आणि मानाचे नाव. त्यांच्या कविता, कथा, कादंबरी इ. वास्तवदर्शी साहित्य वाचकांना आनंद तर देतेच त्याचबरोबर अंतर्मुख करते, विचार करायला भाग पाडते. त्यांनी लिहिलेला बालकवितासंग्रह ‘माझे गाणे आनंदाचे’ हा मुलांच्या बाल मनाला सस आकर्षित करणारा, रमवणारा, आनंदमय विश्वात घेऊन जाणारा, त्यांचा उत्साह वाढवणारा आणि त्यांना सहजरीत्या खूप काही शिकवणारा आहे. लहान मुलांना नवनवीन, मनोरंजक, आकर्षक कल्पना आवडतात. म्हणूनच लहान मुले या कविता मनापासून वाचतात. कारण या कवितासंग्रहातून लहान मुलांचे उत्साही, खेळकर, काल्पनिक, चित्रमय विश्व साकार झालेले आहे. ते बाल मनाला रमवणाऱ्या विश्वात अगदी सहजतेने घेऊन जातात.
उदा.
‘गच्चीवर जेव्हा झोपली मुलं
आकाश अलगद खाली आलं
अनोखं विश्व मग झालं खुलं
चांदण्यांची झाली मोहक फुलं’
यातून दिसून येते की, यात कवीने मुलांच्या परिचयाच्या, त्यांना माहित असणाऱ्या गोष्टी मनोरंजकपणे, मुलांना गंमत-मौज वाटेल, आनंद होईल व तेही विचार करायला लागतील अशा व्यक्त केल्या आहेत. त्या कविता वाचताना लहान मुलेही त्या कल्पना नगरीत एकरूप होतात आणि नकळतपणे तेही विचार करायला लागतात. कवीच्या मांडणीतील वेगळेपणा त्यांना समजतो. आपण नेहमीच करत असणाऱ्या गोष्टीमध्ये काय काय दडलय हे पाहून त्यांना मज्जा तर येतेच तसेच त्यांना आश्चर्यकारक, सुंदर, मन खेचून घेणाऱ्या विश्वाचे प्रचंड आकर्षण वाटते. त्या मन उल्हासित करणाऱ्या कल्पना त्यांनाही सहज विचार करायला शिकवतात, त्यातून लहान मुलेही आपल्या मजेशीर भावना व्यक्त करायला शिकतात.
जसे खिडकी मुलांना आवडते. कारण खिडकीतून बाहेरची दृश्य दिसतात. ती पाहत पाहत त्याचा आनंद मुले लुटत असतात. त्यातूनच कवी पुढे नवा विचार देतात ते म्हणतात,
‘शाळा आपुली असते
जीवनाची खिडकी
शोध असा लागतो
मजलाच एकाएकी’
म्हणजे खिडकी जसा आनंद देते. तसेच शिक्षणही आनंद देत, ज्ञान-विचार देत मुलांना हुशार बनवते. तसेच पाऊस मुलांना आवडतो. कारण पावसात त्यांना मनसोक्त भिजायचे, उड्या मारायच्या, ओरडायचे, मस्ती करायची आणि भरपूर धिंगाणा घालायचा असतो; मात्र आईला वाटणारी मुलांची काळजी या कवितेतून कवीने मुलांना स्वाभाविकरित्या दाखवून दिली आहे. म्हणूनच ती म्हणते, “जसा सूर्य थकूण झोपी गेला तसाच आता तू सुद्धा झोप, असे आई निसर्गातीलच उदाहरण देऊनच कल्पकतेने समजावून सांगते.” कवी हसत-खेळत मुलांना आईच्या भावनांची समजून घ्यायला शिकवतात.
आजूबाजूच्या गोष्टीकडे पाहण्याची वेगळी दृष्टी लहान मुलांमध्ये कवी सहजतेने रुजवतात. ही समज मुलांना खूप आनंद देऊन जाते.
उदा.
‘फुलं म्हणाले आभाळा
रंग माझे पहा जरा
आभाळाला निळाईचा
गर्व होता खराखुरा’
ही कविता बालमनावर ती योग्य संस्कार करते. इतरांना मदत करण्यातील समाधान, देण्यातील आनंद, सहकार्याची वृत्ती निसर्गातील विविध घटकांच्या आधारे कवी मुलांवर हळुवारपणे बिंबवतात. तसेच लहान मुलांच्या मनातील वाईट सवयी, गर्व, अहंकार, इतरांना कमी लेखण्याची वृत्ती सहज काढून टाकण्यास त्यांची कविता मदत करते.
उन्हाळ्यात झाडाची सावली शरीराला-मनाला कशी शांती, गारवा, अल्हाददायकता देते. याचे सुंदर वर्णन करून झाडांचे महत्व कवीने बालमनावर ठसवले आहे. सूर्य सर्वांना प्रकाश देतो, झाडे सावली देतात. पाऊस निसर्गाची तहान भागवतो, वारा सर्व सृष्टीला जगवतो, देण्यातील आनंद, समाधान , त्यांनी मुलांवर रुजवले आहे.
उदा.
‘झऱ्याची झुळझुळ
कानात गुंजते
पाणी स्वच्छ ठेवा
आम्हाला सांगते’
यातून निसर्गातील विविधता, सौंदर्य, पशू-पक्षी, झाडे, नदी, आकाश, वारा, झरे, डोंगर, फुले, फळे इत्यादींचे महत्व, त्या विषयी जिव्हाळा, आपलेपणा, प्रेम, जवळीक, ओढ हे जगण्यातील अत्यंत आवश्यक-महत्वाचे घटक आहेत, यांचे भान मुलांच्या मनात हसत, खेळत आकर्षक भाषेत कवी बालवयातच रुजवतात. स्वतः साठी जगण्यापेक्षा इतरांसाठी जगले पाहिजे, हे नदी कसे शिकवते? हे कवीने दाखवून दिले आहे. देण्यामुळेच माणसाला खरे सुख मिळते. नदी फक्त इतरांना देत असते. दातृत्वाचे सुख ती मनसोक्त अनुभवते. आपले काहीच नाही जे आहे ते सर्व देवाने दिलेले आहे. त्यामुळे आपण स्वताला मोठे समजून इतरांना कमी लेखू नये. उलट इतरांना मानाने सन्मानाने वागवावे व आपण जे करतो ते देवाचरणी अर्पण करावे, हे आपल्या कवितेतून ते सहजरीत्या पटवून देतात. जसे कवी त्यांच्या कवितेचे श्रेय स्वतःकडे न घेता देवाला देतात. तसेच आपले काहीच नसण्याची भावना बालवयातच कवी बालकांच्या मनावर रुजवतात.
झाडांमुळे आपण चांगले जगतो. झाडे आपल्याला जगवतात मग आपणही झाडांना जगवलं पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे. त्यांना पाणी-खत घातले, तर ते झाड डेरेदार होईल व आपल्याला शांत, शितल, आनंददायी सावली देईल. याचे तालात, ठेक्यात, लयबद्धपणे, आकर्षक वर्णन कवीने केले आहे.
उदा. ‘पाला बाई पाला , थांबेल उन्हं
हसतील तेव्हा ' पानांत फुलं’
कवीची ही सुंदर कल्पना लहान मुलांना प्रचंड आवडते. बालमनही कवीने सहजरीत्या रेखाटले आहे. लहान मुले ही निरागस असतात. त्या त्या क्षणाचा मनमुराद आनंद ते लुटतात. त्यांचे भांडण-रुसवा हा तेवढ्यापुरता असतो. नंतर ते सर्व विसरून जातात. त्यांचा रुसवा जास्त वेळ टिकत नाही. त्यांना लगेच एकमेकांशी बोलायचे असते. भरपूर खेळायचे असते; पण मित्र-मैत्रीण रूसलेली असेल तर ते अस्वस्थ होतात. एकमेकांशी बोलण्यासाठी धडपड करतात. हा अबोला त्यांना सहन होत नाही. परत भांडायचे नाही असे ते ठरवून टाकतात. एकंदर रुसवा-रुसवी झाल्यानंतरची लाहान मुलांची तगमग, घुसमट, कोंडी कवीने अचूक रेखाटली आहे. प्राणी, पक्षी मुलांचे सोबती कसे होतात. याची अफलातून कल्पना मुलांना खेचून घेणारी, आवाक करणारी, मजा वाटणारी आहे. त्यांच्या कवितेतील ससा मुलांना शांत बसा म्हणतो, वाघ दुकारणार बनतो व हवे ते माग म्हणतो, तर हरीण चिमणीचे कान धरीन म्हणतो. एकंदर मुलांना मज्जा, आनंद, आश्चर्य वाटेल अशा भन्नाट कल्पना कवीने या कवितासंग्रहात रंगवल्या आहेत. उगवत्या दिवसावर मोहक रमणीय भाष्य कवीने आपल्या कवितेतून केले आहे. जेथे झाडे नाहीत तेथील भकास, उजाड, तापदायक, रुक्ष, कोंदट वातावरण व जेथे झाडे आहेत तेथील सुखदायी, चैतन्यमय, सौंदर्याने नटलेले मनोवेधक वातावरण कवीने टिपून कवीने झाडाच्या रक्षणाचे महत्व पटवून दिले आहे. एकंदर हा कवितासंग्रह बालकांना आनंद देणारा, त्यांच्यावर योग्य ते संस्कार करणारा आहे.
डॉ. कैलास दौंड - माझे गाणे आनंदाचे
अनुराधा प्रकाशन, पैठण,१४नोव्हेंबर २०२०
मूल्य-५०

—---------

प्रा. डॉ.रंजना मधुकर कदम
अगस्ती महाविद्यालय, अकोले जिल्हा अहमदनगर

द्वारा : महाराष्ट्र साहित्य पत्रिका, जानेवारी ते मार्च २०२२