सवंगडी

सिसिलिया कर्व्हालो

दिलीपराज प्रकाशन प्रा. लि.

/media/RluP6blakX9P.jpg

पाने : ☀ 43 मुल्य (₹): 130.0

मूल्यविचार रुजवणाऱ्या कथा - लोकसत्ता वृत्तसेवा

लहान मुलांमध्ये मूल्यविचार रुजवण्यासाठी वेगवेगळय़ा कथांचा उपयोग केला जातो. आजही अनेक पालक मुलांना इसापनीतीच्या कथा आवर्जून सांगतात, वाचायला देतात. प्राण्यांच्या जीवनावर आधारित असणारी इसापनीती माणसाला जीवन कसं जगावं याचं उत्तम मार्गदर्शन करते. असाच मूल्यानंद देणारा डॉ. सिसिलिया काव्‍‌र्हालो यांचा बालकथांचा संग्रह म्हणजे ‘सवंगडी’. एकूण चार कथांचा हा कथासंग्रह असून लोककथांचा आधार घेऊन या कथा लिहिल्या गेल्या आहेत. पहिली कथा आहे ‘कोकरू’. ही कथा कोकरू आणि येशू यांच्या संवादातून अलवारपणे उलगडत जाते. येशूची दोन चित्रं पाहून शेफाली नावाच्या मुलीच्या मनात उमटलेले भावतरंग या कथेत आपल्याला वाचायला मिळतात. येशूच्या जन्माच्या इतिहासाबरोबरच तत्कालीन सामाजिक परिस्थितीही बालकांना समजेल अशी या कथेची मांडणी केलेली आपल्याला दिसते.

दुसरी कथा आहे ‘पायमोज्याची मज्जा’. या कथेत मुलांचा आवडता सांताक्लॉज म्हणजेच नाताळबाबा कोण होता,तो कधीपासून व का मुलांना नाताळच्या रात्री भेटवस्तू देऊ लागला, त्याचे कपडे विशिष्ट रंगाचेच का असतात.. हे बालमनाला पडणारे प्रश्न रेनडिअर व सांताच्या संवादातून लेखिकेने छान उलगडून दाखविले आहेत.

तिसरी कथा आहे ‘माऊली’- ज्यात येशूच्या जन्माच्या वेळी माऊलीला होणारा त्रास, तिला मदत करण्यासाठी पुढे येणारी गोमाता, येशूच्या जन्माचा आनंद साजरा करणारी जनावरं या सगळय़ाचं हृदयस्पर्शी वर्णन वाचून वाचकही येशू जन्मोत्सवात नकळत मनाने सहभागी होतो.

कथासंग्रहातील शेवटची कथा आहे ‘गाणारे झाड’. निसर्ग धर्म, जात, पंथ असा भेदभाव करीत नाही. निसर्गातल्या पाना-फुलांत वेगवेगळय़ा धर्मातल्या लोकांना जरी त्यात आपले देव दिसत असले तरी शेवटी माणूस आणि निसर्ग सगळीकडे सारखाच असतो. त्यामुळे धर्म, पंथ, जात इत्यादीवरून भेदभाव न करता निसर्ग नियमानुसार माणसाने वागावे असा महत्त्वपूर्ण संदेश देणारी ही कथा आहे.

‘सवंगडी’ कथासंग्रहातील कथा बालयेशूच्या जीवनाशी संबंधित असल्या तरी त्यातून मानवतेचा संदेश मिळतो. विचारले जाणारे प्रश्न व त्यावरील उत्तरे या स्वरूपात चारही कथांमधले संवाद आल्यामुळे या कथा बालमनाला समजण्यास सुलभ झाल्या आहेत. कथासंग्रहाला उत्तम कोळगावकर यांची सुंदर अशी प्रस्तावना आहे. तीन कथांच्या शेवटी लयदार अशा बालकविता आल्यामुळे कथांची भाषा काव्यमय झाली आहे. सुबक बांधणी असणारा हा कथासंग्रह रंगीत चित्रांनी सजलेला आहे. संतोष घोंगडे यांचे समर्पक असे सुंदर मुखपृष्ठ व मलपृष्ठ आहे. त्यामुळे बालकांना हा कथासंग्रह भुरळ घालणारा आहे. सुंदर दिसणारं हे पुस्तक बालकांना मनोरंजनाबरोबर मूल्यविचार देण्यासाठी नक्कीचं उपयोगी ठरेल.

द्वारा : लोकसत्ता वृत्तसेवा