What Millennials Want Decoding the Worlds Largest Generation book

विवान मारवा

/media/XIFU6cu65PdS.jpg

स्थित्यंतरात ‘अडकलेली’ पिढी… - लोकसत्ता टीम

स्थित्यंतर म्हणजे बदल… त्यात ‘अडकणं’ कसं काय? पण आज पंचविशी ते तिशीत असलेल्यांचं तसं झालंय खरं; हे सप्रमाण-साधार सांगणारं पुस्तक…

भारत आज जगातील सर्वात तरुण देश आहे. अमेरिकेच्या सीआयए या संस्थेच्या एका अहवालानुसार २०२१ मध्ये भारताचं सरासरी वय २८ इतकं आहे. म्हणजे देशातील जवळपास ७० कोटींहून अधिक लोकसंख्या ही २८ किंवा त्याहून कमी वयाची आहे. हे सरासरी वय अमेरिका, चीन आणि जपान या प्रगत राष्ट्रांत अनुक्रमे ३८, ३७, ४७ इतकं आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं असलेला तरुण वर्ग म्हणजे त्या राष्ट्राचं सर्वात मोठं बलस्थान. जगातील अनेक राष्ट्रं कुशल मनुष्यबळाअभावी औद्योगिक प्रगतीत मागे पडू लागलेली असताना भारताकडे हे मनुष्यबळ कोटींच्या घरात उपलब्ध आहे. पण त्याकडे अजूनही देशातील धोरणकर्त्यांचं लक्ष गेलेलं नाही. मोफत वायफाय, दररोज दोन जीबीचा डेटा, स्वस्त स्मार्टफोन आणि मनोरंजन पुरवले की तरुणाईचं भागलं, हा विचार राजकीय संस्कृतीत रुळला असल्यामुळे ही युवाशक्ती बेदखल आहे. तरुण पिढीला नेमकं काय पाहिजे, याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न सरकारी पातळीवर क्वचितच पाहायला मिळतो. पण सामाजिक आणि संशोधन संस्थांमध्ये ती जिज्ञासा जागृत आहे. अशाच कुतुहलातून एका संस्थेसाठी तरुणाईचं सर्वेक्षण करणाऱ्या विवान मारवा या तरुणाचं ‘व्हॉट मिलेनियल्स वॉन्ट – डीकोडिंग द वर्ल्डस् लार्जेस्ट जनरेशन’ हे पुस्तक साकारलं आहे. भारतातील तरुण पिढी काय विचार करते, तिच्या अपेक्षा काय आहेत, तिची स्वप्नं काय आहेत आणि ती सध्या कुठं आहे, याचा शोध घेण्याचा विवानचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक.

मिलेनियल्स म्हणजे काय? खरं तर इंटरनेटवर अमर्याद वेळा दिसणारा आणि उच्चारला जाणारा हा शब्द. ‘एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी सज्ञान झालेली पिढी म्ह्णजे मिलेनियल्स’ असं ऑक्सफर्ड डिक्शनरीतील व्याख्या सांगते. हे गणितीय सूत्र मानलं तर १९८० नंतर जन्माला आलेली मुलं या मिलेनियल्सच्या संज्ञेत बसतात. मात्र, मिलेनियल्सची अधिक काटेकोर व सामाजिक व्याख्या करायची झाली तर, इंटरनेटच्या युगात जन्मलेली आणि जागतिकीकरणाशी समरूप झालेली पहिली पिढी म्हणून मिलेनियल्सकडे पाहता येईल. भारताच्या दृष्टिकोनातून सांगायचं झालं तर, बातम्या ते मनोरंजन असा दूरदर्शनच्या स्थित्यंतराचा प्रवास पाहिलेली, भारतानं उदारीकरणाचं धोरण अंगीकारल्यानंतर आर्थिक आशावाद आणि संधी यांच्या सान्निध्यात जन्माला आलेली आणि संगणकाशी लहान वयातच दोस्ती झालेली पिढी म्हणजे मिलेनियल्स. विवान मारवानं आपल्या पुस्तकात हीच व्याख्या केंद्रस्थानी ठेवत १९८१ ते १९९६ दरम्यान जन्माला आलेल्यांना मिलेनियल्समध्ये स्थान दिलं आहे. देशात या पिढीची लोकसंख्या ४५ कोटींच्या आसपास आहे. आजघडीला साधारण पंचविशी ते चाळिशीच्या दरम्यान असलेली ही पिढी म्हणजे एक मोठा कमावता वर्ग आहे. त्याबरोबरच तो एक मोठा ग्राहकवर्गही आहे. हाच वर्ग भारतातील सांस्कृतिक जडणघडणीत सक्रिय भूमिका बजावणाराही आहे आणि देशाच्या राजकीय, सामाजिक अभिसरणातील महत्त्वाचा घटकदेखील हाच वर्ग आहे. थोडक्यात सांगायचं तर हा वर्ग म्हणजे देशाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय सरितेचा मुख्य प्रवाह आहे. त्याची दशा देशाची वर्तमान आणि भविष्याचीही दिशा ठरवणार आहे. म्हणूनच विवान मारवा याने या पिढीला नेमकं काय हवंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

विवान हा स्वत: या पिढीतलाच प्रतिनिधी. पण मुंबई-दिल्लीसारख्या महानगरांत लहानाचा मोठा होत असताना आपण अनुभवलेले स्थित्यंतर देशाच्या ग्रामीण किंवा निमशहरी भागातील आपल्या वयातील मुलामुलींनी अनुभवले असेल का, या प्रश्नाने त्याचं कुतूहल चाळवलं. ते जाणून घेण्यासाठी त्याने देशातील अनेक ठिकाणांना भेटी देऊन, तेथे काही दिवस वास्तव्य करून तेथील मिलेनियल्सशी संवाद साधला. त्याखेरीज या पिढीवर प्रभाव पाडू शकणारे शिक्षणतज्ज्ञ, राजकीय नेते, उद्योजक, धोरणकर्ते यांच्याही मुलाखती त्याने घेतल्या. याखेरीज ‘सेंटर फॉर द स्टडी इन डेव्हलपिंग सोसायटी’ (सीएसडीएस) या विश्लेषक संस्थेने एप्रिल ते मे २०१६ या कालावधीत केलेल्या सर्वेक्षणातील अहवालाचाही त्याने आधार घेतला. त्यातून त्याच्या हाती लागलेले निष्कर्ष, या भ्रमंतीदरम्यान आलेले अनुभव, काही रंजक मुलाखती आणि किस्से यांचा परिपाक म्हणजे हे पुस्तक आहे.

विवाननं या पुस्तकाची मांडणी पाच टप्प्यांत केली आहे. शिक्षण, आर्थिक महत्त्वाकांक्षा, तंत्रज्ञान आणि सोशल मीडिया, विवाह आणि सामाजिक दृष्टिकोन, आणि राजकीय विचार असे कप्पे पाडून त्यानं मिलेनियल्सचं विश्लेषण केलं आहे. यातील काही वर्गवारीत त्याच्या हातात काही धक्कादायक निष्कर्षही आले. त्यातील महत्त्वाचा आणि अनपेक्षित निष्कर्ष विवाहसंस्थेशी संबंधित आहे. विवानने केलेल्या पाहणीनुसार आणि अन्य सर्वेक्षणानुसार ८४ टक्के मिलेनियल्स आजही अॅसरेंज्ड मॅरेज अर्थात आईवडिलांनी ठरवून दिल्याप्रमाणे लग्न करण्यास प्राधान्य देतात! मिलेनियल्सची ही पिढी आईवडिलांच्या छत्रछायेखाली अधिक काळ राहात असल्याचंही सीएसडीएसच्या सर्वेक्षणात आणि विवानच्या पाहणीत आढळून आलं. इतका काळ पालकांसोबत राहत असल्यामुळे त्यांच्या पसंतीच्या किंवा त्यांनी ठरवून दिलेल्या व्यक्तीशी लग्न करण्यात या पिढीला वावगं वाटत नाही. आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहाबद्दल तर यापैकी अनेकांची मतं टोकाची प्रतिकूल असल्याचंही विवानला आढळलं. अॅेरेंज्ड मॅरेजला प्राधान्य देत असलेल्या पिढीकडून अशी चाकोरीबाहेरच्या निर्णयांची अपेक्षा करता येणार नाही. पण केवळ तेच एक यामागचे कारण नाही; तर ही पिढी जातीय आणि धार्मिक अस्मितेबाबत कट्टर असल्याचंही विवानला आढळून आले.

इथं प्रश्न येतो मिलेनियल्सच्या सामाजिक दृष्टिकोनाचा. त्याचाही वेध याच प्रकरणात घेतला गेला आहे. इथंच मागासवर्गीय जातींना दिल्या जाणाऱ्या आरक्षणामुळे आपली शिक्षण आणि रोजगाराची संधी हिरावली जात असल्याचं मत मांडणारेही त्याला भेटले. शिक्षणाच्याच बाबतीत बोलायचं झालं तर, ‘नोकरीसाठी शिक्षण’ अशी सरळधोपटच वाटचाल आजही सुरू असल्याचं या पाहणीत दिसून येतं. भारतात खासगी शिक्षणसंस्था ढिगानं निर्माण झाल्या असल्या तरी शिक्षणातली समानता अजूनही सर्व वर्र्गांत साधता आलेली नाही. उलट खासगी शिक्षणानं त्यात आणखी विषमता निर्माण केल्याचं निरीक्षण तो नोंदवतो (तरुणांचं नव्हे, लेखकाचंच हे निरीक्षण आहे). अशा परिस्थितीमधून शिक्षण पूर्ण करत असताना मिलेनियल्सच्या डोक्यात आजही सरकारी नोकरीचाच विचार सुरू असल्याचंही विवानला आढळून आलं. ‘सीएसडीएस’च्या सर्वेक्षणातही ६५ टक्के तरुणांना सरकारी नोकरीच सुखद वाटते. उदारीकरणानं देशात खासगी नोकऱ्यांची मोठी संधी निर्माण केली. मात्र, तिचा पहिल्यांदा लाभ घेणाऱ्यांमध्ये त्यावेळचा शहरी आणि उच्चशिक्षित वर्ग होता. आज त्यांची मुलं खासगी क्षेत्रात मोठमोठ्या पदांवर नोकऱ्या करताना दिसतात, असं विवाननं नमूद केलं आहे.

एकीकडे मिलेनियल्सच्या आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक प्रगतीत शहरी-बिगरशहरी अशी तफावत दिसत असली तरी, एका बाबतीत मात्र हा वर्ग एकाच पातळीवर दिसतो. ती गोष्ट म्हणजे तंत्रज्ञान आणि उपकरणं! दिल्लीतील एखाद्या कॅफेमध्ये बसलेला तरुण असो वा डेहराडूनच्या डोंगराळ भागातील एखादी तरुणी असो, स्मार्टफोन आणि इंटरनेटमुळे या दोघांचंही व्हच्र्युअल जग कमी-अधिक प्रमाणात सारखंच आहे. जगभरातील नवीन ट्रेण्ड, फॅशन, रोजगाराच्या संधी, पगारांचे आकडे हे सगळं ग्रामीण भागातील तरुण पिढीलाही समजू लागलं आहे. किंबहुना त्यामुळेच त्यांच्या आकांक्षांना नवे घुमारे फुटू लागले आहेत. एकीकडे, आपल्याच पिढीच्या न्यूयॉर्क किंवा मुंबईतील तरुणाप्रमाणे आयुष्य जगण्याची इच्छा आणि दुसरीकडे त्या इच्छेच्या जवळपासही न पोहोचवू शकणारी वर्तमान परिस्थिती अशा कात्रीत ग्रामीण भागातील तरुणाईचा संघर्ष सुरू असतो. या संघर्षातून काही प्रमाणात नकारात्मकताही निर्माण होत असल्याचं हे पुस्तक वाचताना जाणवतं.

हे सगळं नोंदवलं जात असताना एक प्रश्न विवाननं वारंवार उपस्थित केला आहे : ‘मिलेनियल्स त्यांच्या आधीच्या पिढ्यांपेक्षा वेगळे आहेत का?’

पुस्तकाच्या काही प्रकरणांत ते वेगळेपण खचितच जाणवत नाही. विशेषत: सरकारी नोकरी, नियोजित विवाह, सामाजिक दृष्टिकोन याबाबतीत हा तरुण वर्ग आजही आपल्या आधीच्या पिढीसारखाच विचार करत असल्याचे विवाननं म्हटलं आहे. या बाबतीत आपला भ्रमनिरास झाल्याची कबुलीही तो देतो. ‘‘खासगी नोकरी किंवा स्वयंरोजगाराला महत्त्व देणारी, स्वत:चा जोडीदार स्वत:च निवडण्याला प्राधान्य देणारी आणि जातिव्यवस्थेला कस्पटासमान लेखणारी अशी मिलेनियल्सची पिढी असेल, असा माझा विचार होता. पण हा भारत माझ्या कल्पनेच्या विपरीत विचार असलेला भारत आहे,’’ असं तो म्हणतो.

आपल्याला अपेक्षित अशी मिलेनियल्सची झलक केरळमध्ये आढळल्याचं तो आवर्जून सांगतो. इथे जात-धर्म या गौण व्यवस्था मानल्या जातात. धार्मिक अस्मिता असली तरी सहिष्णुताही तितकीच प्रबळ असल्याचं तो म्हणतो. ‘‘शिक्षितांची संख्या केरळमध्ये अधिक आहेच पण स्वतंत्र विचार करणारे तरुणही इथं मोठ्या प्रमाणात भेटले,’’ असं त्यानं म्हटलं आहे. त्याचा हा निष्कर्षही कुतूहल वाढवणारा आहे.

१९८१ ते १९९६ दरम्यान जन्मलेली पिढी आजही धर्म, जात, लिंग, शिक्षण, वर्ग अशा विविध पातळ्यांवर विभागली गेलेली आहे. पण या पिढीत एक समान धागा सर्वत्र पाहायला मिळतो तो म्हणजे, आर्थिक असुरक्षितता. हीच आर्थिक असुरक्षितता त्यांच्या सामाजिक आणि राजकीय विचारांना प्रेरित करते, असे विवानने म्हटलं आहे. ते खरं आहे. ‘दूरदर्शन’ (चित्रवाणीची एकमेव, सरकारी वाहिनी) पासून इंटरनेटपर्यंतच्या स्थित्यंतराची साक्षीदार असलेली सर्वात तरुण पिढी स्वत: मात्र, आदल्या पिढीच्या मानसिकतेतच अडकून पडली आहे, हे या पुस्तकाचं निष्कर्षसार आहे.

विवान मारवाचं हे पुस्तक अनेक बारकाव्यांवर प्रकाश पाडतं. पण ते करताना लेखकाचा प्रामाणिक प्रयत्न कुठेही कमी होत नाही. तेथे तो कुठेही स्वत:चा अजेंडा तरुण प्रतिनिधीवर्गाच्या नावे लादू पाहात नाही. त्यामुळेच तरुण पिढीची स्पंदनं मांडणारं हे पुस्तक पारदर्शी ठरतं. तरुणवर्ग ही या देशाची शक्ती आहे, हे तावातावानं सांगितलं जातं. मात्र, त्या शक्तीचा योग्य वापर कसा होईल, हे अद्याप कुणालाही ठरवता आलेलं नाही. म्हणूनच शशी थरूर यांनी ‘योग्य आणि अटीतटीच्या क्षणी समोर आलेला गाढा अभ्यास’ असं या पुस्तकाचं वर्णन केलं आहे; याचीही दखल घ्यायला हवी.

asif.bagwan@expressindia.com

द्वारा : लोकसत्ता वृत्तसेवा