सरकारी मुसलमान

लेखक : जमीर उद्दिन शाह | अनुवाद : शिरीष सहस्रबुद्धे

राजहंस प्रकाशन

/media/udTALEoFDoU9.jpg

पाने : ☀ 200 मुल्य (₹): 260.0

आत्मकथाच, पण वेगळ्या नजरेतून - प्रतिनिधी saptrang@esakal.com

आत्मचरित्र स्वतःबद्दल सांगत असतंच, पण ते सांगताना ते सभोवतालच्या जगाची नोंद जागरूकपणानं घेतं असेल आणि संवेदनशीलपणे काही बाबी सांगत असेल तर त्या पुस्तकाचा आनंद वेगळाच असतो. अस आनंद देणारं पुस्तक म्हणजे ‘सरकारी मुसलमान’. ‘तुमची मातृभाषा उर्दू असो की हिंदी; पण आजच्या युगात उपजीविकेसाठी आवश्‍यक भाषा म्हणजे संगणकाची भाषा ती उत्तम प्रकारे आत्मसात करा. संगणक अतिशय तटस्थ असतो. तो फक्त तुमची कार्यक्षमता ओळखतो. तुमचा धर्म, जात, पंथ किंवा वर्ण याच्याशी संगणकाला काही देणे-घेणे नसते. ’ ‘भारतीय लष्कर आपल्या जवानांची जात, धर्मवार नोंद करीत नाही. लष्करात अशा प्रकारच्या नोंदी ठेवल्या जात नाहीत. माझ्या इतक्‍या वर्षांच्या कारकिर्दीत मुस्लिम म्हणून मला कधीही पक्षपाती वागणूक मिळाली नाही.’ हे दोन्ही उद् गार आहेत लेफ्टनंट जनरल जमीर उद्दिन शाह यांचे. आत्मकथेत त्यांनी हे जे लिहिलंय ते वेगळं तर आहेच; पण भारतीय सैन्यदलाच्या निःपक्षपाती धोरणाची साक्ष देणारे आहे. देशाच्या लष्कराचे उपप्रमुख म्हणून काम पाहिलेल्या शाह यांच्या इंग्रजीतील पुस्तकाचा अनुवाद वाचताना एका संवेदनशील अशा व्यक्तिमत्त्वाची ओळख होतेच; पण त्याचबरोबर आयुष्यातील ४० वर्षे देशसेवेसाठी दिलेल्या एका लढवय्याचं अंतरंगही मनाला भिडतं.

‘सरकारी मुसलमान’ या शीर्षकातूनच शाह यांनी आपल्याला काय मांडायचंय ते स्पष्ट केलंय. अनुवादक शिरीष सहस्रबुद्धे यांनी अत्यंत संवेदनशीलतेने यातील प्रसंग नेमकेपणाने उभे केलेत. शाह यांनी १९७१ च्या पाकिस्तानबरोबरच्या युद्धात अतुलनीय कामगिरी बजावली. त्याबद्दल त्यांचा गौरवही झाला. त्यानंतर लष्कराच्या न्यायाधिकरणावरही त्यांनी काम केलं. गुजरातमधील दंगलीत शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांच्या पथकाने बजावलेली कामगिरी. २००२ मध्ये गोध्रा रेल्वे जळीतकांडानंतर उसळलेल्या दंगली शमविण्याची जबाबदारी लष्कराच्या ज्या डिव्हिजनला दिली होती, त्या डिव्हिजनचे कमांडर शाह होते. या काळात त्यांना तिथं जे अनुभव आले ते त्यांनी सडेतोडपणे मांडले आहेत. कुठलाही आव न आणता किंवा कोणालाही आरोपीच्या पिंजऱ्यात अकारण उभे न करता जे जसे घडले तसे त्यांनी मांडले आहे.

या महत्वाच्या पदांच्यानंतर अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीच्या कुलगुरूपदी ते होते. या काळात त्यांना अनेक वादग्रस्त बाबींना तोंड द्यावे लागले. राजकारणी मंडळींबरोबरच त्या विद्यापीठातील काही मंडळींचाही त्यांना सामना करावा लागला. शाह यांच्यामुळं त्यांचे हितसंबंध दुखावले होते त्यामुळं त्यांनी शाह यांना खूपच त्रास दिला. मात्र कोणाबद्दलही कडवटपणा न ठेवता आपण नेमके काय केलं याचा वस्तुनिष्ठ लेखाजोखा पुस्तकात त्यांनी मांडला आहे.

भारतीय जनमानसामध्ये मुस्लिम धर्मीयांविषयी किती प्रकारचे गैरसमज आहेत, याची अगदी नेमकी एक ते दोन उदाहरणे देऊन त्यांनी त्याची ओळख करून दिली आहे. लष्करामध्ये मुस्लिम धर्मीयांनी यावे असे आग्रही प्रतिपादन ते करतात. त्यांच्या मुलालाही त्यांनी लष्करात जायला लावले. त्यांचे अन्य नातेवाइकही लष्करात आले. लष्करातील अत्यंत मानाचे पद भूषवितानाच त्यांनी आखाती देशांमध्ये काम केले. तो अनुभवही त्यांनी सविस्तर मांडला आहे.

शाह यांना विविध प्रसंगाच्यानिमित्तानं अनेक मान्यवर मंडळी भेटली. त्यांच्याबरोबर त्यांचा जो संवाद झाला, त्यापैकी काही तपशील त्यांनी इथं दिला आहे. अमेरिकेचे भारतातील राजदूत रिचर्ड वर्मा यांच्याबरोबरचा संवाद आवर्जून वाचण्यासारखा आहे. चाळीस वर्षांच्या लष्करी सेवेत ‘विविधतेत एकता’ या तत्त्वाचे लष्करात कसोशीने पालन कसे केले जाते ते त्यांनी आवर्जून सांगितले आहे. भारतीय लष्करात कसलाही भेदभाव केला जात नाही हे सांगताना त्यांनी अनेक उदाहरणेदेखील दिली आहेत. ‘माझी इस्लामवरचा श्रद्धा आणि माझ्या देशावरचे माझे प्रेम यात कुठेही, कधीही विसंवाद किंवा संघर्ष नव्हता. खरं सांगायचं तर माझ्या या दोन्ही निष्ठा एकमेकांशी अगदी जवळून गुंतलेल्या होत्या,’ हे त्यांचे वाक्‍यच त्यांच्या ४० वर्षांच्या वाटचालीचे सार सांगते. ‘कमी बोला, कमी लिहा पण जे काही लिहाल किंवा बोलाल ते अर्थपूर्ण असू द्या'' हा मंत्र मी नेहमीच शिकवीत आलो असं सांगणाऱ्या शाह यांनी हेच तत्त्व पुस्तक लिहिताना पाळले आहे.

‘सैन्याच्या मुख्यालयाला मात्र वेळोवेळी मी जे अहवाल सादर केले, त्यात मात्र घडलेल्या घटनांची वस्तुस्थिती अगदी सुस्पष्ट शब्दांत निवेदन केली. तेथे मात्र शब्दांची काटकसर केली नाही,’’ हे त्यांनी आवर्जून सांगितले आहे आणि असे अहवाल लिहिण्याचा फायदा काय होतो त्याचे उदाहरणही दिले आहे. या आत्मकथेत चार परिशिष्टे आहेत; ती आवर्जून वाचण्यासारखी आहेत. केवळ पुस्तकासंबंधीची जादा माहिती असे या परिशिष्टांचे स्वरूप नाही. आवश्‍यक ती छायाचित्रे दिल्यामुळे आत्मकथेत वर्णन केलेले वातावरण आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते. कुठल्या तरी गाजलेल्या गोष्टींमागची वस्तुस्थिती सांगण्याचा आव न आणता काही महत्त्वाचे तपशील या आत्मकथेत लेखकाने सहजपणे सांगून टाकले आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर त्यांचे कसे संबंध होते हे तर कळतेच; पण त्यांच्याच मंत्रिमंडळातील एका मंत्र्याबद्दल त्यांनी केलेली तक्रार त्या मंत्र्याचे खाते जाण्यासाठीच्या अनेक कारणांपेकी एक तर नसेल असेही वाटून जाते. फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांच्याबद्दलची माहितीदेखील इतिहासावर वेगळाच प्रकाश टाकते.

प्रसिद्ध अभिनेते नसिरुद्दीन शाह हे जमीर यांचे लहान भाऊ. आत्मकथेची प्रस्तावनाही त्यांनी लिहिली आहे. नसिरुद्दिन यांच्याबद्दलचे एक प्रकरणच इथं असून या दोन भावांमधील नात्यांचा भावबंध त्यातील ओलाव्यासह उलगडतो. खरगपूर आयआयटीमध्ये शिक्षण घेतलेल्या त्यांच्या मोठ्या भावाबद्दलही त्यांनी असंच आत्मीयतेनं लिहिलंय.

सरकारी मुसलमान म्हणून सरकारी सेवेत असलेल्या मुस्लिम धर्मीयांची त्यांच्या समाजात होणारी हेटाळणी आणि सरकारदरबारी काम करताना मुस्लिम धर्मीयांना येणारे अनुभव व त्यांची मनोव्यथा या पुस्तकातून समोर येते. मात्र त्यामध्ये कोठेही तक्रारीचा किंवा बाजू मांडण्याचा भाग नाही. त्यांनी दिलेली नेमकी काही उदाहरणं संवेदनशील मन असलेल्या माणसाची कशी घुसमट होते ते जाणवून देतात.

द्वारा : सकाळ वृत्तसेवा