मोर ओडिशा डायरी

राजेश पाटील

समकालीन प्रकाशन

/media/PViWfAEbrdf0.jpg

पाने : ☀ 180 मुल्य (₹): 250.0

अधिकाऱ्याची अभिनव ‘कार्यकथा’.... - शीतल पवार

ही डायरी आहे एक तरुण आयएएस अधिका-याची ओडिशासारख्या आव्हानात्मक राज्यात त्याने केलेल्या कामांची.. प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत एक तरुण आयएएस होतो. ओडिशासारख्या पूर्ण अनोळखी, मागास मानल्या जाणा-या राज्यात काम सुरु करतो. अधिकारी म्हणून तो तिथे कसा घडत जातो, तिथल्या आदिवासीबहुल-नक्षलग्रस्त भागात काम करताना त्याला कोणते अनुभव येतात, रोज समोर येणारी आव्हानं तो कशी पेलतो याची गोष्ट म्हणजे मोर ओडिशी डायरी

सनदी अधिकारी होण्याची परीक्षा उत्तीर्ण होणं आणि प्रत्यक्ष अधिकारी म्हणून काम करणं या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. प्रत्यक्ष अधिकारी म्हणून काम करताना शिक्षणाचा एक संपूर्ण नवीन प्रवास सुरू होतो. त्या प्रवासात कामातच नाही, तर वैयक्तिक आयुष्यातही अनेक बदल होत असतात. अशाच एका अनुभवसंपन्न प्रवासाची गोष्ट म्हणजे ‘मोर ओडिशा डायरी’ हे पुस्तक आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी राजेश पाटील यांनी ओडिशा राज्यातील आपल्या कामाबद्दलचे अनुभव पुस्तकात मांडले आहेत.

भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाल्यानंतरच्या प्रशिक्षणादरम्यानच्या अनुभवाने पुस्तकाची सुरुवात होते. प्रशिक्षण पूर्ण केल्यावर पाटील यांना ओडिशात नियुक्ती देण्यात आली. पुढे १५ वर्षं त्यांनी ओडिशातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत विविध जबाबदाऱ्या सक्षमपणे हाताळल्या. अधिकारी म्हणून मिळालेली पहिलीच नियुक्ती, त्यामुळे आलेली उत्सुकता आणि अस्वस्थता अशा संमिश्र भावनांचा धावता आढावा या पुस्तकात पाटील यांनी मांडला आहे.

पाटील यांचं पहिलं पोस्टिंग कटक जिल्ह्यातल्या अत्यंत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या आठगडचे प्रांताधिकारी म्हणून झालं होतं. पाटील यांचे प्रशासकीय अनुभव इथून सुरू होतात. पुढे पाटील यांनी कटक, कोरापूट, गंजम-कंधमाल आणि मयूरभंज अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांत पार पाडलेल्या जबाबदाऱ्यांबद्दलही पुस्तकात वाचायला मिळतं. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागरिकांना सोबत घेऊन पाटील यांनी अनेक अभिनव उपक्रम राबविले. त्याबद्दलचे अनुभवही पुस्तकात आहेत.

पुस्तकात सगळ्यात जास्त भावलं ते म्हणजे, आपत्ती नियोजनाबद्दलचा (महापूर हाताळताना) पाटील यांचा अनुभव. याशिवाय सलग पाचव्यांदा निवडून येण्याच्या तयारीत असणाऱ्या तगड्या उमेदवाराचा अर्ज रद्द करणं, कोरापूत - कंधमाळमधल्या कामादरम्यान अनुभवलेला जल-जंगल-जमिनीचा आदिवासी संघर्ष, त्यासाठी केलेल्या उपाययोजना, नक्षलवादाशी थेट सामना आणि स्थानिक शेतीला मार्केटशी जोडणारे मयूरभंजमधील शेतीचे प्रयोग... असे अनेक रंजक किस्से आणि अनुभव पुस्तकात समाविष्ट आहेत. शेतीकेंद्रित रोजगार हमी योजना, पंचायत उत्सव, ‘मो जमी, मो बगीचा’ (माझी जमीन, माझी फळबाग), कर्ज मेळावा, तरुणांना एकत्र आणणारं ‘अंतरंग’, अनाथांसाठीचं ‘समन्वय’ अशा अनेक अभिनव उपक्रमांबद्दल पुस्तकात माहिती मिळते.

अधिकारी म्हणून येणाऱ्या आव्हानांइतकंच खडतर असतं वैयक्तिक आयुष्य. कौटुंबिक पातळीवर राजेश पाटील यांना आणि त्यांच्या कुटुंबाला आलेले अनुभवही पुस्तकात वाचायला मिळतात. कुटुंबप्रमुख, पालक अशा वेगवेगळ्या भूमिकेत येणाऱ्या आव्हानांचा धावता आढावा पाटील यांनी या पुस्तकातून घेतला आहे. कुटुंब म्हणून नव्या प्रदेशात, नव्या माणसांसोबत, त्यांच्या भाषा-संस्कृतीसोबत जुळवून घेताना ते आणि कुटुंब तिथल्या संस्कृतीशीच कसे समरस झाले, हेही वाचायला मिळेल. तसंच, लेखकाच्या अनुभवासोबतच ओडिशातील राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचीही ओळख होते.

शीतल पवार shital.pawar@esakal.com
द्वारा: https://www.esakal.com/saptarang

द्वारा : सकाळ वृत्तसेवा