अवघी भूमी जगदीशाची - पराग चोळकर

साधना प्रकाशन

पाने : ☀ 455 मुल्य (₹): 500.0

/media/hgCpyXUR6zV8.jpg

कहाणी एका ‘हृदयक्रांती’ची - गणाधीश प्रभुदेसाई

देशाला स्वातंत्र्य मिळाले, पण गांधीजींच्या स्वप्नातील ग्रामस्वराज्याचे काय हा प्रश्न अनिर्णीत होता. त्या शोधप्रक्रियेचा भाग म्हणून ८ मार्च १९५१ रोजी सर्वोदय संमेलन आणि तेलंगणाची यात्रा करायला विनोबा भावे निघाले. नलगोंडा जिल्ह्यातील पोचमपल्ली या गावातील बैठकीत तेथील दलितांच्या समस्यांवर चर्चा चालू होती. तेव्हा रामचंद्र रेड्डी या व्यक्तीने त्यांच्या मालकीची ५० एकर कोरडवाहू आणि ५० एकर ओलिताची जमीन दान करण्याची घोषणा केली. त्या घटनेने ठिणगी पडली, त्या रात्री विनोबा झोपू शकले नाहीत. तो दिवस होता १८ एप्रिल १९५१. आणि मग दुसऱ्या दिवशीपासून सुरू झाले भूदान आंदोलन, नंतर त्याला ग्रामदानाची जोड मिळाली. तब्बल १३ वर्षे त्या आंदोलनाचा झंझावात देशातील विविध राज्यांतून चालूच राहिला, आणखी दशकभर त्याचा प्रभाव देशभर राहिला. त्या प्रक्रियेत एकूण ४७ लाख एकर जमीन मिळाली आणि त्यातील २५ लाख एकर जमीन भूमिहीन शेतमजुरांना वाटली गेली. या संपूर्ण प्रक्रियेची कहाणी, शिवाय त्या आंदोलनाचे आणखी काय, किती व कसे परिणाम झाले, या सर्वांची अतिशय अभ्यासपूर्ण आणि तरीही कमालीची वाचनीय व रोचक अशी समीक्षा या पुस्तकात आहे. त्या आंदोलनाचा प्रारंभ झाला त्याला आता ७१ वर्षे पूर्ण होत आहेत, त्या निमित्ताने हे पुस्तक वाचायलाच हवे...!

विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीसंबंधी अभ्यासपूर्ण आणि परिपूर्ण माहिती देणारा ‘अवघी भूमी जगदीशाची’ हा ग्रंथ नुकताच प्रकाशित झाला आहे. ‘सबै भूमी गोपाल की - ३ खंड’ व ‘द अर्थ इज द लॉड्स’ या हिंदी आणि इंग्रजी ग्रंथानंतर स्वतः लेखक पराग चोळकर यांनीच मराठीतून हा ग्रंथ वाचकांपुढे आणला आहे. ‘‘देशाला स्वातंत्र्य मिळाले; पण गांधीजींच्या स्वप्नातील ग्रामस्वराज्याचे काय हा प्रश्‍न अनिर्णीत होता. त्या शोधप्रक्रियेचा भाग म्हणून आठ मार्च १९५१ रोजी सर्वोदय संमेलन आणि तेलंगणाची यात्रा करायला विनोबा भावे निघाले. नालगोंडा जिल्ह्यातील पोचमपल्ली या गावातील बैठकीत येथील दलितांच्या समस्यांवर चर्चा चालू होती. तेव्हा रामचंद्र रेड्डी या व्यक्तीने त्यांच्या मालकीच्या ५० एकर कोरडवाहू आणि ५० एकर ओलिताची जमीन दान करण्याची घोषणा केली. त्या घटनेने विनोबांच्या मनात ठिणगी पडली. त्या रात्री विनोबा झोपू शकले नाहीत. तो दिवस होता १८ एप्रिल १९५१.’’...येथून सुरवात झालेला हा ग्रंथ ‘भूदान’ व ‘ग्रामदान’ या चळवळीची पूर्ण वाटचाल डोळ्यासमोर उभी करतो.

ग्रंथाच्या शेवटी दिलेली संदर्भ सूचीच तब्बल २८ पानी आहे. यावरून या ग्रंथाची खोली आपल्या लक्षात येईल.

तब्बल १३ वर्षे या चळवळीचा झंझावात देशातील विविध राज्यांतून चालूच राहिला. त्यावेळी एकूण ४७ लाख एकर जमीन मिळाली आणि त्यातील २५ लाख एकर जमीन भूमिहीन शेतमजुरांना वाटली गेली. या घटनाक्रमाची अभ्यासपूर्ण आणि वाचनीय माहिती या ग्रंथात आहे. भूदान चळवळीला यंदा ७१ वर्षे पूर्ण झाली. या पार्श्‍वभूमीवर हा ग्रंथ मराठी वाचकांपुढे येत आहे, हे विशेष. ‘एका महान क्रांतिकारी आंदोलनाचे या प्रकारे संपूर्ण, सर्वांगीण असे तपशीलवार विवरण आजपर्यंत उपलब्ध नव्हते. पराग चोळकर यांच्या प्रयत्नातून आंदोलनाचा एक अधिकृत दस्तावेज बनला आहे, हे मोठे यश आहे. हे केवळ एक दस्तावेजी विवरण नाही. सगळे काही एका व्यापक परिप्रेक्ष्यात मांडले गेले आहे.’...असे क्रांती शहा यांनी प्रस्तावनेत म्हटले आहे. यावरून या ग्रंथाचे महत्त्व स्पष्ट होते.

‘सिंहावलोकन’ व ‘समीक्षा’ असा दोन विभागात हा ग्रंथ विभागला आहे. ‘पार्श्‍वभूमी’ ते ‘शेवटचा अध्याय’ अशा २० प्रकरणातून भूदान चळवळीची एक एक पाने लेखकाने उलगडून दाखविली आहेत. ‘समीक्षा’ विभागात ‘भूदान-जमिनीचे विवरण’, ‘भूदान - भूमिसुधारणांच्या संदर्भात’, ‘भूदान - एक आढावा’, ‘ग्रामदान - जमिनीवरचे प्रयोग’, ‘लोकनीतीची दिशा’, ‘आंदोलनाचे नेतृत्व आणि संघटना’ व ‘ग्रामदान - एक दृष्टिक्षेप या मथळ्यांखाली कायदेविषयक व इतर तांत्रिक माहिती आपल्याला मिळते.

‘खरे म्हणजे, याला ‘इतिहास’ म्हणण्यापेक्षा इतिहासाची साधने जुळवण्याचा एक प्राथमिक प्रयत्न म्हणता येईल. समग्र, अस्सल, आणि ज्याला ‘डेफिनेटिव्ह’ म्हणता येईल, असा इतिहास लिहिला जाणे अजून बाकी आहे.’...असे लेखक पराग चोळकर नम्रपणे म्हणत असले तरी या ग्रंथातून त्यांचे प्रामाणिक प्रयत्न निश्‍चितपणे दिसतात. मूळ हिंदी ग्रंथ १००० पृष्ठांचा (तीन खंडात) आहे. भूदान-ग्रामदान आंदोलनाचा हा दस्तावेज (दुर्दैवाने) आज एकमेव आहे. याचा इतर भाषांमध्ये अनुवाद होणे उपयोगी ठरेल, अशी अपेक्षा लेखकाने व्यक्त केली आहे.

द्वारा : https://www.esakal.com/saptarang
  Never miss a story from us, get weekly updates in your inbox.