सलाम वर्दी

संकलन : गोपाळ अवटी

/media/QJBuUBjYnPMI.jpg

देशप्रेम आणि थरार युद्धभूमीवरचा! - अक्षता पवार

बांगला देश मुक्ती संग्रामविषयी माहिती देणाऱ्या साहित्यामधील हे अद्वितीय योगदान आहे. राष्ट्राशी आपले काहीतरी देणे लागते ही भावना या पुस्तकामुळे प्रबळ होईल.

जनरल. मनोज मुकुंद नरवणे भारताचे लष्करप्रमुख
या पुस्तकातील प्रत्येक योद्धा देश प्रेमाने झपाटलेला आहे. प्रत्येकाचे अनुभव म्हणूनच वेगळे आणि समाजाला मनोबल देणारे आहेत. संरक्षणशास्त्राची गोडी लावणारे आहेत.

– भूषण गोखले एअर मार्शल (नि.) भारतीय हवाईदलाचे माजी उपप्रमुख

देशाच्या सैन्यदलाचे पराक्रम आपण आत्तापर्यंत अनेक चित्रपट- मालिका यामधून अनुभवले आहेत. असे प्रसंग किंवा या वीरांचं सैन्यातील योगदान पुस्तकांतून मांडण्यात आलं आहे. सशस्त्र दलाच्या या पराक्रमाची अनुभूती देणारी काही पुस्तकंदेखील सध्या बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, त्यातदेखील कोणत्या तरी एका मुद्द्याला घेऊन या घटनेचं वर्णन किंवा माहिती दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पण, आपल्या सैन्याने केलेले पराक्रम त्याहूनही मोठे आहेत. आपल्या देशाची मान उंचावेल असे अनेक प्रसंग आपल्या जवानांवर आलेले आहेत. हे प्रसंग त्यांनी मोठ्या जिद्दीने पेलत देशाचं संरक्षण केलं आहे. प्रसंगी आपल्या प्राणाची आहुतीदेखील दिली आहे. असे अनेक चित्तथरारक अनुभव हे आजच्या पिढीला नक्कीच प्रेरणादायक ठरतात. ही प्रेरणा तेवत ठेवण्याचं आणि सैन्याच्या अंगावर काटा आणणाऱ्या अनुभवांना आपल्याला पुस्तकरूपात उपलब्ध करून सैन्याची मान आणखी उंचावण्याचं काम गोपाळ अवटी यांनी लिहिलेल्या ‘सलाम वर्दी’ या पुस्तकाच्या माध्यमातून होणार आहे. भारतीय सैन्य दलातील कर्तबगार अधिकाऱ्यांचं अनुभवकथन आहे.

भारताचं जेव्हा शत्रुदेशाबरोबर युद्ध होतं, तेव्हा देशात आणि जवानांच्या मनात कोणती परिस्थिती निर्माण होते, या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी जवान कोणत्या आव्हानांना तोंड देतो, आपण विजय साकारत असताना कशाप्रकारे तो लढाई करतो, याची अनुभूती हे पुस्तक वाचल्यानंतर आल्याशिवाय राहणार नाही. नौदल, हवाईदल आणि सैन्यदल तिन्ही दलांतील पदाधिकाऱ्यांचे अनुभव या पुस्तकात आहेत. व्हाइस ॲडमिरल अशोक सुभेदार, ब्रिगेडियर अनिल तळवळकर, कर्नल अरविंद जोगळेकर, ॲडमिरल संजय वडगावकर, विंग कमांडर विजय शोत्रीय, लेफ्टनंट कमांडर डी. के. माळी यांच्यासह तब्बल ३१ अधिकाऱ्यांचे सैन्यातील अनुभव व त्यांचा प्रवास आणि त्यांनी अनुभवलेली युद्धं, त्यांनी कोणते पराक्रम गाजवले, याची माहिती देणाऱ्या मुलाखती या पुस्तकात आहेत.

या ३१ अधिकाऱ्यांचे अनुभव वाचल्यानंतर अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची मांडणी या पुस्तकात करण्यात आली आहे. सविता जेरे, वीणा भावे, माधुरी कुलकर्णी, तेजश्री कांबळे आणि गोपाळ अवटी यांनी या मुलाखती घेतल्या आहेत. सैन्यातील पदाधिकारी सहसा माध्यमांशी मोकळेपणाने बोलत नाहीत. मात्र, त्यांना बोलतं करीत त्यांचे अनुभव अत्यंत योग्यपणे मुलाखत घेणाऱ्यांनी मांडलं आहे.

मुलाखत घेतलेल्या अधिकाऱ्यांच्या आयुष्याची आणि त्यांच्या शौर्याची माहिती यामध्ये सविस्तरपणे देण्यात आली आहे, त्यामुळे राष्ट्राशी आपलं काही तरी देणं लागतं ही भावना या पुस्तकामुळे प्रबळ होते. भारतीय लष्कराने राष्ट्राच्या संरक्षणासाठी नेहमीच अभिमानास्पद कामगिरी केली आहे, त्यामुळे नागरिकांना एकीच्या भावनेविषयी लष्कराकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. ही भावना यातून पुन्हा एकदा प्रतीत होते. हे पुस्तक देशातील तरुण पिढीला भारतीय सशस्त्र दलांमध्ये सहभागी होण्याची प्रेरणा देईल, किमान आपल्या क्षमतेनुसार देशाची सेवा करण्याची तरी प्रेरणा नक्कीच यातून मिळेल.

द्वारा : सकाळ वृत्तसेवा