नाथ संप्रदायाचा इतिहास व परंपरा

डॉ. वा.ल.मंजूळ

/media/6ftEOS4edzd8.jpg

नाथ संप्रदायाविषयी अभ्यासपूर्ण चिंतन - सकाळ वृत्तसेवा

‘नाथ संप्रदायाचा इतिहास व परंपरा’ या शीर्षकाचे अभ्यासपूर्ण पुस्तक वा. ल. मंजूळ यांनी लिहिले आणि ते सकाळ प्रकाशनामार्फत प्रकाशित झाले, हा एक चांगला योग आहे. या विषयावर १९५९ मध्ये डॉ. रा. चिं. ढेरे यांनी ग्रंथ लेखन केले होते. हिंदीत आचार्य हजारी प्रसाद द्विवेदी आणि रांगेय राघव यांचे या विषयवरील लेखन गाजले असून ते या विषयावरील फार महत्त्वाचे प्रतिपादन मानले जाते. मंजुळांनी त्यांना उपलब्ध झालेल्या सर्व सामग्रीचा उपयोग करून हे सुलभ लेखन केले आहे. यातून संप्रदाय, त्याच्या शाखा, साहित्य, आचारधर्म, वैचारिक योगदान समजण्यास निश्चितच उपयोग होईल. या पुस्तकाला ज्येष्ठ अभ्यासक डॉ.गो. बं. देगलूरकर यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली आहे.

मंजूळ म्हणतात त्याप्रमाणे, शैव संप्रदायाच्या नाथपंथात शिवशक्तीची योगमार्गे उपासना केली जाते. त्यासाठी गुरुकृपा आणि गुरुमंत्र हवा. त्यातूनच नवनाथकथा आणि नाथ जीवनशैली लोकांसमोर आली. हा संप्रदाय भारतभर पसरला. मध्ययुगीन मराठी काव्यातील सहा धर्मसंप्रदाय आणि त्यांचे दहा ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत. त्यापैकी अमृतानुभव, ज्ञानेश्वरी यांवर विशेषत्वाने आणि अन्य सांप्रदायिक ग्रंथ आणि ग्रंथकारांशी नाथमताचे काही नाते सांगता येते. किंबहुना नाथसंप्रदाय हाच मराठी मुलखातील आद्य आणि प्रधान संप्रदाय म्हणून अभ्यासता येतो. वायव्य भारतात आणि उत्तर भारतातही या संप्रदायाशी इतर भक्तिप्रवाहांचे अनुबंध दाखविता येतात. म्हणून हा विषय व्यापक तर आहेच, व फार महत्त्वाचाही आहे.

पुस्तकाची मांडणी सुटसुटीत व अर्थवाही आहे. ‘नाथसंप्रदायाचा श्रीगणेशा’ या आरंभीच्या प्रकरणात लेखकाने श्रीशैल कर्दळीवन आणि आजचे आंध्र-कर्नाटक हे प्रांत संप्रदायाची उदयभूमी म्हणून सांगितले आहेत. पुढे संप्रदायाची सिद्धमत सिद्धपंथ, अवधूत, कानफाटा इत्यादी विविध नावे त्यांच्या वैशिष्ट्यानिशी सांगून तिसर्‍या प्रकरणात संप्रदायाची जन्मभूमी श्रीशैल असावी, हे नमूद केले आहे. सांप्रदायिक वेषभूषावर्णन करून प्राचीन काळातील नाथसिद्धांचा संक्षिप्त परिचय दिल्यानंतर अखेरीस लेखकाने एक महत्त्वाचे वाक्य असे लिहिले आहे. “आश्चर्य म्हणजे नाथ संप्रदायातील वैशिष्ट्यपूर्ण नवनाथांचा परिचय करून देणार्‍या परंपरायुक्त नामावलीत गहिनीनाथांचा उल्लेख नाही, ज्याचा सांप्रदायिक वारसा निवृत्तिनाथांनी घेतला आणि ज्ञानदेवादि भावंडांना दिला.” नाथसंप्रदायाची शिव ही उपास्य देवता आणि पवित्र स्थाने यांचे त्रोटक वर्णन करून लेखक सांप्रदायिक शाखाभेदांची संक्षेपाने नोंद करतो.

नववे प्रकरण महाराष्ट्रातील ‘नाथसंप्रदायाची परंपरा’ हे महत्त्वाचे ठरते. त्यातील अखेरचा परिच्छेद अनेक तथ्यांचा निर्देश करणारा आहे. इथे अधिक विस्तृत विवेचनाला बराच वाव होता, असे वाटते. राजस्थानातील नाथपरंपरा विशेष वाचनीय वाटते. अकराव्या प्रकरणात संप्रदायाचे देशव्यापी स्वरूप सांगण्याचा प्रयत्न आहे. नवनाथांच्या चरित्रकथा आणि विविध परंपरा सांगणारे प्रकरण मात्र पुरेसे विस्तृत आहे. संप्रदायाचे यौगिक तत्त्वज्ञान आणि विचारसरणी सादर करणारी दोन प्रकरणे अभ्यासपूर्ण वाटतात. नाथ संप्रदायाचा प्रवास गहिनी-निवृत्ती-ज्ञानदेव असा त्र्यंबकेश्वरापासून सुरू झाला. नंतरच्या काळात वारकरी संप्रदायाच्या भक्ती लाटेत अन्य विचारधारा बुडून गेल्या. नंतरच्या काळात त्यांच्या काही सावल्या हळूहळू मठाधिपती महाराजांच्या निर्मितीतून दत्तसंप्रदाय, समर्थ संप्रदाय, महानुभाव संप्रदाय, साई संप्रदाय असे काही पुन्हा उदयाला आले, या लेखकाच्या प्रतिपादनाचा अधिक विचार करण्यासारखा आहे. वारकरी वाड् मय कितपत नाथप्रभावित आहे याविषयीही चिंतन करता येईल. लेखकाने याचे सौम्य शब्दात सूचनही केलेले दिसते.

‘गहिनीनाथांची पारंपरिक वैशिष्ट्ये’ ‘नाथ संप्रदायाच्या रचना’ ही प्रकरणेही काही नवी माहिती देत अभ्यासाच्या नव्या दिशांकडे निर्देश करणारी ठरतात. ‘नाथ संप्रदायाची मराठी मांदियाळी’ हे शेवटचे विसावे प्रकरण मला विशेष भावले. कारण माझा तो विषय १९७४ साली पूर्ण केलेल्या प्रबंधाचा विषय आहे. पुस्तकाच्या आरंभीच मंजुळांनी म्हटले आहे - ‘नाथ संप्रदायाचा इतिहास व परंपरा’ यावर लिहिणे हे शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे.’ हे अवघड कार्य मंजुळांनी त्यांच्यातील संदर्भ सेवाव्रती ग्रंथपालन शक्तीने करून दाखविले आहे.

प्रकाशक : सकाळ प्रकाशन, पुणे. (८८८८८४९०५०, ०२०- २४४०५६७८)

द्वारा : सकाळ वृत्तसेवा