पार्टनर - वसंत पुरुषोत्तम काळे

मेहता पब्लिशिंग हाऊस

पाने : ☀ 160 मुल्य (₹): 150.0

/media/6JbPggtZ43BI.jpg

संवादाची कथा ............... - अनेक

‘पार्टनर’ या कादंबरीत मराठी मध्यमवर्गीयांचे आवडते लेखक व.पु.काळे यांनी केलेली नरकाची ही व्याख्या मध्यमवर्गीय वाचकांना विचार करायला लावते. जन्म ते मृत्यूचा न टाळता येणार प्रवास आणि त्या प्रवासात येणारे कितीतरी दुःखाचे आनंदाचे, विरहाचे-मिलनाचे, यशाचे-अपयशाचे प्रसंग! आणि या प्रत्येक अनुभवातून जाताना जाणवलेली माणसानीच माणसांची केलेली कुचंबणा. व.पु.काळे यांचा ‘पार्टनर’ आपल्यासमोर एक आरसा धरतो. मध्यमवर्गीय हतबलतेच्या प्रतिमा त्यात दिसायला लागतात. आपल्याला हवा तेव्हा तिसरा माणूस न जाणं म्हणजे नेमकं काय, याचा अर्थ कळायला लागतो. व.पु. काळे यांची एकूण ४५ पुस्तके झाली. त्यांच्या कथा कादंबरीतून पांढरपेशी मध्यमवर्गीयांचे सोशिक जीवन चित्रीत झाले. स्वतःच्या मनाशी संवाद करणारा, भावनाचा उद्रेक चेह-यावर न दाखवणारा, मनातल्या मनात घुमसणारा मध्यमवर्गीय माणूस हाच त्यांच्या कथेचा नायक होता. पार्टनर कादंबरी देखील त्याला अपवाद नाही. तसं म्हटलं तर ही एक साधी प्रेमकहाणी. औषधाच्या दुकानात काम करणारा एक केमिस्ट श्रीनिवास आणि किरण या दोन सामान्य जीवांची! लैला-मंजनू, रोमिओ ज्युलियेट यांच्यासारखी ताटातूट या कहाणीत नाही. अर्थात वैफल्य नसलं म्हणून काय झालं दाहकता जरूर आहे. तर हे दोघं प्रेम करतात आणि अगदी सहगत्या विवाहबद्ध होतात. कोणताही म्हणावा तसा विरोध नाही, की प्रेमाचा त्रिकोण नाही. परंतु, सिनेमात दाखवतात त्याप्रमाणे नायक नायिकेचं मिलन हाच प्रेमकथेचा शेवट असतो का? लैला-मजनू रोमिओ-ज्युलियेट यांनी लग्न झाली नाहीत म्हणून जीव दिले परंतु लग्न झाली असती तर...? त्यांच्या प्रेमकहाणीचं नेमकं काय झालं असतं? पदरी वैफल्य पडलं असतं की साफल्य? पार्टनर म्हणतो,‘ज्या माणसाच्या प्रेमाची वाटचाल लग्नाच्या मंडपात होते, तो वाया गेला!’ कोण हा पार्टनर! श्री आणि किरण यांच्या प्रेमकथेला एक जवळचा साक्षीदार आहे. हा साक्षीदार म्हणजे श्री चा मित्र पार्टनर. (श्री चा मित्र का आतला आवाज? की मारलेल्या इच्छेचा प्रतिनिधी?) औषधे खरेदी करण्याच्या निमित्ताने पार्टनर दुकानात येतो. घर ओळख वाढते. आणि आयुष्याच्या वळणावर श्रीला आधार देतो. श्रीचं घर उभं राहावं म्हणून पार्टनर स्वतःची जागा सोडतो आणि या विरुद्ध त्याचा सख्खा भाऊ अरविंद लग्नानंतर एकांत मिळावा म्हणून श्रीला आणि आईला बाहेर घालवतो. श्रीच्या सुखदुःखात महत्त्वाचा साक्षीदार असलेल्या या पार्टनरची स्वतःची विचारधारा आहे. ती सामाजिक बंधन पाळत तर नाहीच. परंतु सर्व सामान्यांनाही न झेपणारी आहे. उदाहरणार्थ पार्टनर कोणावरही प्रेम करत नाही. त्याच्या मते प्रेम ही तद्दन टाकाऊ गोष्ट आहे. नैतिक अनैतिक अशी बडबड करून पार्टनर कोणत्याही भुका मारत नाही. आणि स्वतःसाठी समोरच्या माणसाला त्याच्या मनाविरुद्ध वाकायला लावत नाही. पार्टनर केवळ एक कथाकथन नाही, तर एक सखोल चिंतन आहे. हे चिंतन वाचकाला अंतर्मुख करतं आणि हेच या कादंबरीचे यश आहे.
- तरुण भारत

तसं म्हणले तर आयुष्यात गरज अशी कुणाचीच लागत नाही अथवा कुण्या असण्या किंवा नसण्याने तसा फारसा काही फरक पडत नाही असे आपल्याला एकदा तरी वाटतेच. एखादा तरी पार्टनर असावा, मग तो कसा का असेना पण जीवाला जीव देणारा असावा, अडी अडचणीत साथ देणारा असावा... वगैरे वगैरे सगळी फिलॉसफी वाटते खरी पण काही वेळा तथ्य असते. तुमचं अगदी बरोबर आहे, मी व. पु. काळेजींच्या पार्टनर या पुस्तकाबद्दलच बोलतोय. लाल कलरच्या बॅकग्रांऊंडवर अर्धा पत्त्यात राणीचे स्केच तर राहीलेल्या पत्यात राजा... असे कव्हर पाहिल्यावर अर्थातच पार्टनर म्हणजे संसाररूपी जीवनाचे कथानक आहे की काय वाटते पण जसे जसे पानं पलटत जातो तसतसे मित्र आधी पार्टनर बनतो आणि तो निस्वार्थपणे जीवनरूपी संसाराची घडी घालून देतो. सुरवात होते ते पार्टनरने सांगितलेल्या साहेबाच्या नाटकातली कथेने. मग पुढे नायकाला "किरण वर्तक" नावाची मुलगी भेटते. एकीकडे प्रेमाचे धडे गिरवत असताना भाऊ, वहिनी आणि आई यांना सांगून तिच्याशी लग्नाचे स्वप्न रंगू लागते. पार्टनर मदतीने नवा संसार नव्या जागी राजा राणी सारखा बहरू लागतो. पण रोज नवी लफडी करणारा पार्टनर मात्र आयुष्यातून दूर झालेला असतो... नेहमीप्रमाणे काही काही वाक्य मनाला भावणारी आहेत. "नरक म्हणजे काय?, आपल्याला हवं तेव्हा तिसरा माणूस न जाणं ", "गैरसमज हा कॅन्सर सारखा असतो, तिस-या अवस्थेत पोचल्यावर तो आपलं स्वरूप प्रकट करतो." "आपल्याला खरं तर नावच नसतं, बारशाला नाव ठेवतात ते देहाचं". अगदी मोजक्याच म्हणजे दिडशे पानातच वपूंनी कथा मांडली आहे ती ही इतक्या प्रभावीपणे वाटते की जणू डोळ्यासमोर चित्रफितच चालू आहे..
- अनिकेत अनिल आपटे

कादंबरी वाचताना आपण कादंबरीच्या नायकाच्या सोबत त्याच्या विश्वात आपोआप जात जातो. अतिशय ओघवती व सोपी घरगुती भाषा लेखकाने योजली आहे. नायकाचा टपोरी मित्र, ज्याला या कादंबरीत `पार्टनर` म्हणुन म्हटले जाते, तो फारच रंगेल व बिन्धास्त दाखवला आहे. नवनवीन पोरींबरोबर टाईमपास करणं, यात त्याला काहीही गैर वाटत नाही. नायक मात्र अतिशय सभ्य, सहनशील, भावनाशील असतो. दोघांचे स्वभाव अपोझिट असुनही दोघं जीवश्च कंठश्च मित्र असतात. नायकाच्या जीवनात अडचणी येताच पार्टनर त्याला खूप मदत करतो, उपाय सुचवतो. पार्टनरचं लाईफ थिल्लर वाटत असलं, तरी काही वेळा तो जीवनाचे तत्वज्ञान सांगतोय असे वाटते. नायक हा लकीही आहे, अनलकीही आहे. त्याला सर्वांची मैत्री, प्रेम, मदत, मिळते म्हणून तो लकी वाटतो. पण आईचे फक्त मोठ्या भावावरच प्रेम असणं, आईचं कधीकधी स्वार्थी वागणं, बाळाचा मृत्यू, या गोष्टी वाचताना तो अनलकी वाटतो. थोडक्यात काय, तर जीवन हे सुखदुःखाचे मिश्रण आहे. ते जसे असेल, तसे स्विकारून पुढे चालावेच लागते.
- शैलजा भास्कर दिक्षित

#पार्टनर एखाद्या क्षणी आपल्यावर दुःखाचा डोंगर कोसळावा किंवा आनंदाचा वर्षाव व्हावा आणि त्या क्षणी सगळ्यात आधी आपण पुकारा करत सुटावे आपल्या प्रिय माणसाचा तो असतो `पार्टनर`. मग ती आई, बायको, बहीण, वहिनी, लेकरू किंवा व. पु. काळे यांच्या पार्टनर या कादंबरीतील देवधर! देवधरच्या औषधाच्या दुकानात काम करणारा श्रीनिवास..आयुष्यभर तडजोडी करत जगलेला...जेव्हा तेव्हा आई, भाऊ, वाहिणींची उपेक्षा मिळवलेला हा इसम आपल्या प्रत्येक सुखदुःखाचा साक्षीदार पार्टनर म्हणून ठरवताना अनेक प्रसंग डोळ्यांसमोर उभे राहतात. एखाद्या प्रसंगात मावशी देखील देवसारखीच उभी राहते. अतिशय सोप्या भाषेत, ओघवत्या शैलीत मधेच गतीत जाणारे कथानक पण कुठेही अति रंजकपणा न जाणवणारी ही `पार्टनर` नावाची कादंबरी एका बैठकीत वाचून काढावी अशीच आहे. एक दोन ठिकाणी वापरलेल्या धक्का तंत्राने आपण बिथरतो कारण सगळं `गुडी गुडी` चालत असताना अचानक दुःख कोसळणे त्रासदायकच. अधूनमधून `वर्पूझा`चा चांदीचा वर्ख लिखाणावर लावलेला जाणवतो. उदाहरणादाखल घेतलेल्या उपमा मधेच विसंगत वाटत असल्या तरीही क्षणभर थांबून त्यावर विचार करायला भाग पाडतात.पात्रांच्या संवादाची फेक गतिमान असल्याने थेट मुद्द्यावर यायला वेळ लागत नाही आणि अशाने "पुढे काय?" ही उत्सुकता टिकून राहते. डायरी आणि पत्रे कथेचे वजन वाढवतात. संपूर्ण कथानक श्रीनिवास आणि पार्टनर भोवतीचंच आहे पण बायकोसोबतचे काही प्रियराधन प्रसंग अंगावर शहारा आणतात. काही प्रसंग आई आणि भावाचा उगाचच राग आणतात. पण थोडा वेगळा विचार करता आईचे दुसऱ्या मुलावर म्हणजे अरविंदवर जास्त प्रेम असले तरीही कायम तडजोडी करणाऱ्या आपल्या मुलाला म्हणजे श्रीनिवासला आपली अडचण नको या हेतूने कदाचित मुद्दामच आईचं दूर राहणं असावं असा विचारही मनात येतो. माई दांपत्य आणि शेवटी माईने श्रीनिवासच्या पत्नीची सेवा केल्याबद्दलचं कटू फळ जीवाला चटका लावून जातं. एकंदरीत आपण कितीही लोकांत राहत असलो तरी आयुष्याच्या प्रवासात शेवटपर्यंत पुरणारी शिदोरी म्हणजे सख्या, सोबती, प्राणप्रिय ` पार्टनर`. कादंबरीतील काही सुविचार आणि वैचारिक ओळी मनाच्या गाभाऱ्यात जागा करतात...इंग्रजीतून वापरलेली वाक्येसुद्धा अगदी योग्य ठिकाणी बसतात. जीवनात वयात आल्यापासून प्रस्थापित होईपर्यंतच्या काळात अनेकदा उमेद हरपली जाते पण अशा वेळी किमान एक `पार्टनर` असायला हवा जो आपला कुणीच नसतो. तो असतो फक्त डोळ्यांवरून झोपेचं पीस फिरवत "चिंता नको ..शांत झोप ...तोडगा काढू" म्हणणारा.. अशा आशयाचे हे पुस्तक आनंद, द्वेष, प्रणय, लोभ अशा सगळ्या रुपांचं प्रतीक आहे असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही!
- मानसी सरोज

व.पु.काळे यांचं ` पार्टनर ` हे नितांत सुंदर पुस्तक नुकतंच वाचलं. त्यातल्या मनाला भावणाऱ्या काही ओळी... आजच्या वर्तमानात अगदी तंतोतंत लागू पडतात.... ................................................... तिचा हात मी हातात घेतला. तिच्या डोळ्यांत खोलवर पाहत मी म्हणालो, " आपण इथून आत सात पावलं चालू. आशीर्वाद द्यायला ही नवी वास्तू आहे. पावलागणिक ती ` तथास्तु ` म्हणत राहील. तुझ्या दादांची साधना तुझ्या पाठीशी आहे. मरताना दिलेला बाबांचा आशीर्वाद मलाही सावरील. मी आस्तिक आहे की नास्तिक ह्याचा मी कधी शोध घेतलेला नाही. मी श्रद्धावंत मात्र जरूर आहे. सौंदर्य, संगीत, सुगंध, साहित्य ह्या सर्वांसाठी मी बेभान होतो. पण माझी जमीन कधी सुटत नाही. मी माणूस आहे ह्याचा मला अभिमान वाटतो. मला परमेश्वर व्हायचं नाही. नवऱ्याला देव वगैरे मानणाऱ्यांपेकी तू आहेस की नाहीस हे मी परिचय होऊनही विचारलं नाही. तशी नसलीस तर उत्तमच, पण असलीस तर इतकंच सांगेन की मला देव मानायचा प्रयत्न केलास तर तो माझ्यावर फार मोठा अन्याय होईल. मला माणूसच मान म्हणजे कळत- नकळत होणारे अपराध क्षम्य ठरतील. कुणाचंही मन न दुखवणं हीच मी देवपूजा मानतो. जिवात जीव असेतो मी तुला सांभाळीन. आता सांभाळीन हा शब्द चुकीचा आहे. त्यात अहंकार डोकावतो. तेव्हा इतकंच सांगेन की आपल्या ह्या घरात, संसारात, तू चिंतेत असताना मी मजेत आहे असं कधी घडणार नाही. आणि शेवटचं सांगायचं म्हणजे मला पत्नी हवीच होती. मात्र पत्नी झाल्यावर तुझ्यातली प्रेयसी सांभाळ. मला सखी हवी आहे. होशील ? " ऐकता ऐकता किरणच्या डोळ्यांत पाणी आलं. तिने मला दारातच कडकडून मिठी मारली, चुंबनांचा वर्षाव केला. तिच्या भरून आलेल्या पापण्यांवर मी, पापणीइतका हलका होत, ओठ टेकले. अश्रूंना चव असते हे मला प्रथम समजलं. .............................................. मनाला भावणाऱ्या आणखी काही ओळी... " प्रिय पार्टनर, समुद्राची ताकद टिटवीला समजत नाही. आकाशाची व्याप्ती गरूडाला समजत नाही. सुगंधाचं कोडं फुलाला उकलत नाही. एवढास्सा तू. त्याहून एवढास्सा मी. मला जीवनाचा अर्थ कसला विचारतोस ? आणि त्याहीपेक्षा, संभोगाचा अर्थ लावायचा असतो हे मुळात तुला कोणी सांगितलं ? " पाणी म्हणजे एच् टू ओ. इथंच सगळे थांबलेले आहेत. मूर्ख म्हणून नव्हेत, तर जाणकार म्हणून थांबले. पृथ:करण पाण्याचं करायचं असतं, तहानेचं नाही हे त्यांना समजलं म्हणून. कोणता आनंद क्षणजीवी नाही ? दोन इंच लांबीच्या जिभेवर पदार्थ असतो, तोवर ` चव `. खाली उतरला की ` घास `. सुगंधाचं नातं नाकाशी, घशातून आत गेल्यावर ती फक्त ` हवा `. खरं तर सगळ्या पंचेंद्रियांचं नातं रसिकतेशी नसून तृप्तीशी असतं. तो क्षण संपला की रसिकता संपली. इतर अनेक गरजांपैकी ` तृप्ती ` ही गरज आहे. जो गरजू आहे, त्याला व्यवहार सांभाळावा लागतो. व्यवहार नेहमीच साधतो असं नाही. तो सत्यासारखा कटू असतो. ज्या मनात रसिकता असते, त्याच मनात कटुता निर्माण होते. तेव्हा जास्त काय सांगू ? सध्या एकच, वर्तमानकाळ सांभाळ ! Present tense is the only tense, it takes care of past and future, we look at it in correct perspective. तुझ्यापेक्षा किरण जास्त भाग्यवान असेल, असं मला वाटतं. तू जागा राहिलास ह्याचा अर्थ नंतर ती गाढ झोपलेली असणार. लक्षात ठेव, तिला आयुष्य समजले अथवा मुळीच समजणार नाही. पण तुझ्यापेक्षाही ती खात्रीने सुखी होईल. There is not a single example of a happy philosopher. म्हणून हात जोडून विनंती करतो, Don`t be a philosopher. Just a kiran`s Husband. तुझा, पार्टनर. " ........................................ ―― #पार्टनर―लेखक व.पु.काळे यांच्या पुस्तकातून. संकलन–धनाजी माळी. मुखपृष्ठ―गुगलवरून साभार.

• पार्टनर • There is not a single example of a happy philosopher . म्हणून हात जोडून विनंती करतो , Don`t be a philosopher. तुझा, "पार्टनर." पार्टनर हे सांगून गेला . भावनिक पाश , नात्यांचे मोहबंध हे जोडायचे असतात , जखडून घ्यायचे नसतात . कुणाचं तरी नाव माहीत असणं म्हणजे तो व्यक्ती आपल्या जवळचा होतो का ? नसेलही नाव माहीत तरी काय फरक पडतो ? तो व्यक्ती आपला " पार्टनर " आहे का हे महत्त्वाचं!!!! किती गंम्मत आहे ना , आपल्याला शेकडो लोक ओळखतात , पण जाणतात किती ? पाच ? की चार की एकही नाही ? फक्त चेहऱ्यावरून आपल्याला ओळखणारे हजारो पण आपल्याला अंतर्मणातून कोण ओळखत ? ज्याचा हात हातात घेऊन आपलं सगळं दुःख भडाभडा ओकाव असा ` पार्टनर ` ह्या जगी असेल का ? असेल तर तो पृथ्वीच्या कोणत्या टोकाला ? ज्याच्या चेहरा पाहून मोठमोठ्या प्रॉब्लेम्स चे डोंगर पटदिशी कोसळावे असा कोणी ` पार्टनर ` सृष्टीकाराने बनवला असेल का ? ` वपु ` हे एक नाव नव्हे , ते एक रसायन आहे . एक अजब रसायन . तत्वज्ञानाची गुंफण शब्दांत मांडणार रसायन .आपल्या जीवनातील अगदी छोटछोट्या गोष्टींपासून ते अगदी प्रॉब्लेम्सचे अक्राळविक्राळ डोंगर कसे असतात ते ` वपुंना ` माहीत असतं . वपुंना माणसं कळतात . त्यांना " पार्टनर " उमगला . कोण हा ` पार्टनर `???? दिसतो तरी कसा ? राहतो कुठे? हे सगळं सोडा ह्याचं नाव तरी काय ?? खरं तर बारशाला नाव ठेवतात ते देहाचं . पार्टनर कुठे देह आहे ? ती तर एक वृत्ती आहे . सहजासहजी न सापडणारी वृत्ती . एवढ्या महाकाय भूतलावर छोट्याश्या जागेत आम्हीही आमचा पार्टनर शोधतोय !! पण तो काही गवसत नाही . गीतेचा उपदेश कृष्णाने सांगितला , पण ऐकणारा सुद्धा ` अर्जूनासारखा ` हवा तेव्हाच तो गीतोपदेश सफल होतो . तसा पार्टनर मिळवायला सुद्धा माणूस " श्री " सारखा हवा . रोज पाठीवर बिऱ्हाड घेऊन आम्ही पुढे सरकतो आहे , संथगतीने पायपीट करतो आहे पण पार्टनर वाट सोडून मागे पळतोय . तो थोर आहे . प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहणं म्हणजे " थोरपण " काय ? नाही , तर प्रवाहाविरुद्ध झुंज देत आपली वाट निर्माण करत जाणं म्हणजे " थोरपण " . पार्टनर मला हे शिकवून गेला . पार्टनर प्रत्येकाला काहीतरी वेगळं शिकवतो . ज्याच्या हाती हा जातो त्याला वेगळी दिशा देतो आणि ह्या दिशे बरोबरच प्रवाहविरुद्ध पोहण्याचा बळ ही देतो . वपुंनी हा पार्टनर आम्हाला दिला त्याबद्दल किती धन्यवाद मानायचे वपु तुमचे . वपु तुम्ही नसलात तरी हा " पार्टनर " चिरकाल जिवंत आहे . प्रत्येक मनात तुम्हाला नव्याने जिवंत करत आहे . मूळ कथा फिरते ती श्री भोवती . केविलवाणी आर्थिक परिस्थिती , भावाचा कपटीपणा , आईची भावकडची ओढ ह्या सगळ्यांना वैतागून पण संयम राखणारा श्री केमिस्ट च्या दुकानावर नोकरी करत हेलकावे घेणारा आपला संसार गाडा ओढत असतो . अशातच चालता बोलता भेटलेला एक रूम पार्टनर त्याच्या जीवनातील एक दणकट आधार बनत जातो . आणि अशातच श्री च्या जीवनात ` किरण ` येते . परिकथेतील पऱ्या ही लाजतील अशी ती रूपसुंदरी . चंद्रकोर हाउसिंग सोसायटी च्या शुभारंभ प्रसंगी भेटलेली किरण मित्र बनते , पुढे मैत्री प्रेमात रूपांतरित होते . दोघांचं लग्न होत , पण श्रीच्या आईची संसारातील लुडबुड , किरण च्या आईचं निधन , बाबांचं वैराग्य ह्या सगळ्यात किरण पार हताश होते . मग पार्टनर च्या सल्ल्याने हेलकावे घेणारा आपला संसार श्री सुरळीतपणे चालवतो . ह्या सगळ्यांत श्री ला पार्टनर चा खूप मोठा आधार वाटतो . वेगवेगळ्या पद्धतीने पार्टनर च्या साथीने श्री आयुष्याचे वेगवेगळे अर्थ शोधत जातो . कथानकाला योग्य असा वेग लेखकांनी दिला आहे . कोणत्याही क्षणाला कादंबरी रटाळ किंवा संथ वाटत नाही . कथानक पुढे सरत असतानाच प्रेम , संभोग , किळस , तिटकारा , दयनीयता , सौख्य , दुःख ह्या सगळ्या भावनांचं वास्तव चित्रण लेखकांनी केलं आहे . लहानपणी आपलं लिहून व्हायच्या आत, फळ्यावरचा मजकूर मास्तर पुसतील की काय ही भावना आज प्रत्येकाला होणं स्वाभाविक आहे का ? आपण जगताना कधी मृत्यू आपल्याला कवटाळेल काही सांगता येणार नाही . त्या क्षणी अरेच्या आपलं हे करायचं राहून गेलं अस वाटेल का ? की त्या क्षणी फक्त मरणाची भीती आपल्या डोळ्या समोर असेल . फळ्यावरचा मजकूर जसा पुसून व्हायच्या आत लिहायचं आहे तसं जीवन जगताना सगळं मरणाच्या आधी करून घ्यायचं आहे अशी आसक्ती असेल का की निर्विकारपणे आयुष्य जगत राहू . कमी शब्दांत सांगायचं झालं तर पार्टनर काय सांगतो : "मालकी हक्काची भावना ही सगळयात सुंदर आणि श्रेष्ठ कल्पना . जमीन जुमला , घरदार ह्यावर मालकी हक्क ही सुंदर कल्पना ???? छे !!!!!!!! आम्ही कोण्या मनावर मालकी हक्क गाजवतोय ही खरी सुंदर कल्पना , आणि ह्याहीपेक्षा कोणीतरी आमच्या मनावर मालकी हक्क गाजवतोय ह्या कल्पनेपेक्षा अधिक निखळ आनंदाची भावना अशी कोणती ??" कादंबरीतील वाक्यरचना खूप सुरेख आहेत . काहीही वाचत असताना सुंदर वाक्य आली की नोंद करून घ्यायची सवय असल्यामुळे ह्या कादंबरीतील काही निवडक वाक्ये इथे नमूद करतो : ¶ माणूस गर्दीचा झाला म्हणजे हरवत नाही . एकटा राह्यला की हरवतो. ¶ माणसाची नजर ज्या वस्तूकडे असते , तीच वस्तू त्याला पहायची आहे , तसं त्या माणसाकडे पाहणाऱ्या इतरांना वाटतं. ¶ सौंदर्याची ओढ वाटणं ही जिवंतपणाची खून असते. ¶ स्वतःच नाव विसरणं ह्यात मस्त आनंद आहे . खरं तर आपल्याला नावच नसतं . बारशाला नाव ठेवतात ते देहाचं. ¶ ज्या माणसाच्या बाबतीत प्रेमाची वाटचाल लग्नाच्या मंडपात संपते तो वाया गेला. ¶ शरीराच्या एका गरजे पुरतीच बाईला पुरुष आणि पुरुषाला बाई हवी असते . बाकी निसर्गाच्या गरजा प्रत्येकाच्या एकेकट्या च्या असतात . ¶ आमचा देव दगडाचा नाही . आम्ही दगडात देव पाहणारी माणसं आहोत . ¶ डोळे आणि स्पर्श , शब्दांपेक्षा छान बोलतात. ¶ दोन इंच लांबीच्या जिभेवर पदार्थ असतो , तोवर ` चव .` खाली उतरला की ` घास .` सुगंधाचं नातं नाकाशी , घशातून आत गेल्यावर ती फक्त ` हवा .` खरंतर सगळ्या पंचेंद्रियाच नातं रसिकतेशी नसून तृप्तिशी असतं . तो क्षण संपला की रसिकता संपली . इतर अनेक गरजांपैकी ` तृप्ती ` ही गरज आहे . जो गरजू आहे , त्याला व्यवहार सांभाळावा लागतो . व्यवहार नेहमीच साधतो असा नाही . तो सत्यासारखा कटू असतो . ज्या मनात रसिकता असते त्याच मनात कटुता असते . ¶ गणिताच्या उत्तरासारखी तुम्ही आयुष्याकडे अपेक्षा करता आणि जास्त दुःखी होता . आयुष्य काही गणिताचं कोड नाही लगेच सुटायला . ¶ नजर शाबूत असलेला बाप मुलाला एकदाच जन्म देऊन थांबत नाही . आयुष्यभर तो जन्मच देत असतो . ¶ जो मागं राहणार आहे , त्याचंच खरं मरण आहे . मरणारी व्यक्ती सुटून जाणार आहे . ज्याला आघात सहन करायला मागे राहायचं आहे , त्याचं खरं मरण आहे. लेखक प्रत्येक ओळीतून , प्रत्येक शब्दातून आयुष्य कसं जगायचं हे भरभरून सांगून जातात . आयुष्याचा अर्थ समजावून घेण्यासाठी पार्टनर ही कादंबरी प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी अवश्य वाचायला हवी .
- आदित्य पाटिल

पृथ:करण पाण्याचं करायचं असतं, तहानेचं नाही तसंच काहीसं आज माझं झालय,पार्टनर वाचुन झालं आहे,पण त्याबद्दल काय लिहायच? फक्त लिहायच,आपला अभिप्राय द्यायचा म्हणुन लिहायलाच हवं,अस केलं तर ती स्वत:शी प्रतारणा तर होईलच पण पुस्तकाचा अपमान पण होईल. "आपल्याला खरं तर नावच नसतं.बारशाला नाव ठेवतात ते देहाचं" किंवा "आपल्याला हवा तेव्हा तिसरा माणूस न जाणे. हाच नरक!" अशी आशयघन वाक्य ज्यांच्या लेखणीतून उतरली आहेत त्या व.पु.काळेंची "पार्टनर"ही कादंबरी, एका सर्वसामान्य माणसाभोवती,श्री भोवती ही कथा गुंफण्यात आली आहे. मेडिकल स्टोअर्समध्ये काम करणारा, तडजोड करत जगणारा. मोठा भाऊ अरविंद नेहमीच आजारी,त्या कारणाने नेहमीच घरात लाडका अन सहानुभूतीस पात्र. आईचा ओढाही त्याच्याकडेच,भावाचे लग्न झाल्यावर रात्री झोपण्यासाठी बाहेर कुठे तरी सोय करण्यासाठी प्रयत्न करत असतो अन त्याच वेळी त्याला आधार मिळतो एका स्वछंदी मित्राचा जो जीवनाचे प्रत्यक्ष दर्शन घडवणारा आहे नाव, गावं न विचारताचं हे दोघे एकमेकांचे पार्टनर बनून जातात. किरण नावाच्या एका सुंदर मुलीशी लग्न झाल्यावर संसार नावाच्या जाळ्यात फसत जाणाऱ्या श्री ला पार्टनर हरतऱ्हेने मदत करतो त्याची ही कथा अस ढोबळमानाने म्हणता येईल. पण हि कोणा एकाची कथा नाही तर ती आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाची व्यथा आहे. नात्यांच्या जंजाळात अडकलेल्या आपल्या सर्वांना पडणारे प्रश्न आणि त्याची उत्तर अस ह्याच व्यापक स्वरुप आहे अस म्हणता येईल. पुस्तकं नक्की वाचा. (पार्टनर तो नसतो जो सतत तुमच्या जवळ असतो, पार्टनर तोच जो तुमच्या भाव भावना समजून घेईल मग तो कोणीही असी शकतो.मग तो कोणीही असु शकतो.)
- संदीप गायकवाड

एखाद्या क्षणी आपल्यावर दुःखाचा डोंगर कोसळावा किंवा आनंदाचा वर्षाव व्हावा आणि त्या क्षणी सगळ्यात आधी आपण पुकारा करत सुटावे आपल्या प्रिय माणसाचा तो असतो `पार्टनर`. मग ती आई, बायको, बहीण, वहिनी, लेकरू किंवा व. पु. काळे यांच्या पार्टनर या कादंबरीतील देवधर! देवधरच्या औषधाच्या दुकानात काम करणारा श्रीनिवास..आयुष्यभर तडजोडी करत जगलेला...जेव्हा तेव्हा आई, भाऊ, वाहिणींची उपेक्षा मिळवलेला हा इसम आपल्या प्रत्येक सुखदुःखाचा साक्षीदार पार्टनर म्हणून ठरवताना अनेक प्रसंग डोळ्यांसमोर उभे राहतात. एखाद्या प्रसंगात मावशी देखील देवसारखीच उभी राहते. अतिशय सोप्या भाषेत, ओघवत्या शैलीत मधेच गतीत जाणारे कथानक पण कुठेही अति रंजकपणा न जाणवणारी ही `पार्टनर` नावाची कादंबरी एका बैठकीत वाचून काढावी अशीच आहे. एक दोन ठिकाणी वापरलेल्या धक्का तंत्राने आपण बिथरतो कारण सगळं `गुडी गुडी` चालत असताना अचानक दुःख कोसळणे त्रासदायकच. अधूनमधून `वर्पूझा`चा चांदीचा वर्ख लिखाणावर लावलेला जाणवतो. उदाहरणादाखल घेतलेल्या उपमा मधेच विसंगत वाटत असल्या तरीही क्षणभर थांबून त्यावर विचार करायला भाग पाडतात.पात्रांच्या संवादाची फेक गतिमान असल्याने थेट मुद्द्यावर यायला वेळ लागत नाही आणि अशाने "पुढे काय?" ही उत्सुकता टिकून राहते. डायरी आणि पत्रे कथेचे वजन वाढवतात. संपूर्ण कथानक श्रीनिवास आणि पार्टनर भोवतीचंच आहे पण बायकोसोबतचे काही प्रियराधन प्रसंग अंगावर शहारा आणतात. काही प्रसंग आई आणि भावाचा उगाचच राग आणतात. पण थोडा वेगळा विचार करता आईचे दुसऱ्या मुलावर म्हणजे अरविंदवर जास्त प्रेम असले तरीही कायम तडजोडी करणाऱ्या आपल्या मुलाला म्हणजे श्रीनिवासला आपली अडचण नको या हेतूने कदाचित मुद्दामच आईचं दूर राहणं असावं असा विचारही मनात येतो. माई दांपत्य आणि शेवटी माईने श्रीनिवासच्या पत्नीची सेवा केल्याबद्दलचं कटू फळ जीवाला चटका लावून जातं. एकंदरीत आपण कितीही लोकांत राहत असलो तरी आयुष्याच्या प्रवासात शेवटपर्यंत पुरणारी शिदोरी म्हणजे सख्या, सोबती, प्राणप्रिय ` पार्टनर`. कादंबरीतील काही सुविचार आणि वैचारिक ओळी मनाच्या गाभाऱ्यात जागा करतात...इंग्रजीतून वापरलेली वाक्येसुद्धा अगदी योग्य ठिकाणी बसतात. जीवनात वयात आल्यापासून प्रस्थापित होईपर्यंतच्या काळात अनेकदा उमेद हरपली जाते पण अशा वेळी किमान एक `पार्टनर` असायला हवा जो आपला कुणीच नसतो. तो असतो फक्त डोळ्यांवरून झोपेचं पीस फिरवत "चिंता नको ..शांत झोप ...तोडगा काढू" म्हणणारा.. अशा आशयाचे हे पुस्तक आनंद, द्वेष, प्रणय, लोभ अशा सगळ्या रुपांचं प्रतीक आहे असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही!
-ऋतुजा राऊत

तुला मी कशी हाक मारू ? पार्टनर ह्याच नावाने. आपल्याला खरं तर नावचं नसतं. बारशाला नाव ठेवतात ते देहाचं. नमस्कार मंडळी, ज्यांनी हे पुस्तकं वाचले आहे त्यांच्या नक्कीच लक्षात आले असणार कोणत्या सुप्रसिद्ध लेखकाच्या प्रसिद्ध पुस्तकातील हे वास्तवदर्शी वाक्य आहे. फार उत्सुकता ताणून न धरता सांगते या पुस्तकाचे नाव आहे "पार्टनर"वं.पु. काळे लिखित हे पुस्तकं फक्त मनोरंजन न करता वास्तवाचे दर्शन घडवून देणारे आहे.. एका सामान्य व्यक्ती भोवती फिरत राहणारी ही कथा आपलीचं आहे असे केंव्हा वाटायला लागते कळत नाही. नात्यांची उकल हळु हळु होत जाते अन समोरच्याचे वागणे खरंच असे का? असे प्रश्न पडायचे बंद होतात.. असो.. ही कथा आहे सामान्य जिवन जगणाऱ्या श्री ची मेडिकल स्टोअर मधे काम करणारा श्री नेहमीच तडजोड शब्द घेऊनच जन्माला आला असावा बहुदा.. मोठा भाऊ अरविंद नेहमीच आजारी त्या कारणाने नेहमीच घरात लाडका अन सहानुभूतीस पात्र. त्यामुळे आई चा ओढा त्याच्याकडेच सक्खी आई, भाऊ अन वहिनी यांच्या कडून उपेक्षाचं मिळालेला श्री,भावाचे लग्न झाल्यावर रात्री झोपण्यासाठी बाहेर कुठे तरी सोय करण्यासाठी प्रयत्न करत असतो अन त्याच वेळी त्याला आधार मिळतो एका स्वछंदी मित्राचा की तो स्वतः आनंद वाटणारा, मिळवणारा अन जीवनाचे प्रत्यक्ष दर्शन घडवणारा नाव,गावं न विचारताचं हे दोघे एकमेकांचे पार्टनर बनून जातात. पुढे या श्री च्या आयुष्यात एक मुलगी येते एक आशेचा किरण घेऊन ही सुंदर मुलगी तिचा लाभलेला सहवास अन त्यासाठी पुन्हा केलेल्या तडजोडी श्री बद्दल आदर निर्माण करतो.. दोघांचे लग्न होते अन पुढील संसार चालू होतो.. रूम पार्टनर त्याचे स्वछंदी आयुष्य जगत असतो .. श्री चा संसार अन पार्टनरची सोबत अन मदत मनाला स्पर्श करून जाणारी आहे... ही कथा मुळी कोणा एकाला शोभणारी नसून अनेकांची व्यथा सुद्धा आहे.. पार्टनर वाचत असताना वेळेचे भान राहत नाही की मन इकडे तिकडे भरकट नाही.. वं. पु. काळे यांचे लिखाण त्याबद्दल मी काय बोलावे छोट्याश्या ज्योती ने सूर्याची बरोबरी केल्यासारखे होईल.. लेखक,कथाकथनकार, आर्किटेक्ट, व्हायोलिन व हार्मोनियम वादक,उत्तम रसिक अन उत्तम फोटोग्राफर असणाऱ्या सुंदर मनाच्या वं. पु. याना सुद्धा साहित्य प्रेमी पार्टनर चं मानत आले आहेत.. पुस्तकांची भाषा दैनंदिन आहे त्यामुळे आपण त्या घटनेचे साक्षीदार आहोत की काय असा भास क्षणभर होतो.. अनेक नाते संबंध आपण रोज जोडत असतो काही नाती आपल्याला दैवी असतात तर काही दैवी देणगी. आई वडील भाऊ बहिनी ही नाती आपल्या हातात नसतात ती स्वकारावीच लागतात.. "मुलगा होणं आपल्या हातात नसते पण एखाद्याचा बाप न होणं आपल्या हातात असते."असे वं. पु. पुस्तकात म्हणतात.. अतिशय छान पुस्तकं आहे खूप दिवसांपासून वाचण्याची इच्छा होती. मैत्रीणीन कडून भेट मिळाले हे पुस्तकं अन वाचण्याचा मोह आवरला नाही.. या पुस्तकाचे पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे थोडक्यात इतकेच सांगेल की पुस्तकं संपेपर्यंत खाली ठेवण्याचा मोह होत नाही.. पार्टनर तो नाही की जो फक्त जन्मभर तुमच्या जवळ असेन पार्टनर तोच जो तुमच्या भाव भावना समजून घेईल.मग तो कोणीही असू शकतो एखादा सहज कुठे तरी भेटलेला मित्र सुद्धा.. पुस्तकं नक्की वाचा मी वाचत असलेली ही पुस्तकाची बत्तिसावी आवृत्ती असून मेहता पब्लिशिंग हाऊस चे प्रकाशन आहे.. सुंदर मनाला भावणारे हे पुस्तकं नक्की नक्की वाचा.. लवकरच नवीन पुस्तकांचा अभिप्राय घेऊन तुम्हाला भेटेन तोपर्यंत धन्यवाद..
- मनीषा संदीप

व पु काळे यांची पुस्तके खूप चांगली असतात . पार्टनर वाचून झाले . खूप छान कथा आहे आणि प्रत्येकाच्या जीवनाशी मिळती जुळती कथा आहे . खूप ठिकाणी व पु नि हसवले आणि काही ठिकाणी राडवले सुद्धा . कथा काही अशी आहे , पहिल्याच सार्वजनिक भेटीत सुंदर दिसणाऱ्या पोरीला पाहताच एका सामान्य दिसणार्‍या तरुणाचे चित्त हरवते. तिला आपल्या खर्‍या प्रेमाची कबुली एकदम स्पष्टपणे देऊनही तिच्याशी लग्न होण्याची शक्यता नाही या वास्तवाचे भान आहे हे देखील तिलाच स्पष्टपणे सांगणे.तिला प्राप्त करताना त्याला मिळालेले समाधान, आणि त्याचबरोबर लग्न केल्यामुळे वाट्याला आलेला सख्ख्या आई भाऊ व वहिनीचा तिरस्कार. असे कित्येक वेगवेगळे पण वेगवान घटनाक्रम वाट्याला येऊनही अधून मधून धूमकेतू सारखा अवतीर्ण होणारा `पार्टनर`च त्याला प्रत्येक प्रसंगात जवळ कसा वाटतो. प्रेयसीचे रुपांतर आधी बायकोत त्यानंतर मग आईत झाल्यावर तिच्या स्वभावातील बदल किती छोट्याशाच पण काळजाला चटका लावणार्‍या प्रसंगांतून वपुंनी दाखवून दिले आहे. वेळे जशी बदलत जाते तसाच माणूस ही बदलत असतो प्रत्येक सेकंद ला माणूस बदलत असतो . आपण एक वर्षा आधी ज्या व्यक्तीला भेटलो तीच व्यक्ती एका वर्षात खूप बदललेली असते . प्रत्येकाने वाचावी अस हे पुस्तक.
- सानिका प्रधान

द्वारा : मेहता पब्लिशिंग हाऊस
  Never miss a story from us, get weekly updates in your inbox.