यांत्रिकाची यात्रा - शं. वा. किर्लोस्कर

राजहंस प्रकाशन

पाने : ☀ 280 मुल्य (₹): 0.0

/media/GloCcsZeJ57A.jpg

किर्लोसकरवाडीची मुहूर्तमेढ - आद्य महाराष्ट्रीय कारखानदार श्री. लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचें चरित्र - लोकसत्ता टीम


स्वातंत्र्यपूर्व काळातील देशाच्या औद्योगिक क्षेत्रातील एक प्रमुख अग्रणी, महाराष्ट्राचे ‘हेन्री फोर्ड’ म्हणून गौरवले गेलेले लक्ष्मणराव काशीनाथ किर्लोसकर यांच्या १५० व्या जयंती वर्षांची सुरुवात २० जून रोजी झाली. त्यानिमित्ताने ‘यांत्रिकाची यात्रा’ हे शं. वा. किर्लोसकर लिखित लक्ष्मणरावांचे चरित्र राजहंस प्रकाशनातर्फे पुन:प्रकाशित होत आहे. त्यातील संपादित अंश..

आज धुळवड. सणाचा दिवस. या दिवशी किर्लोसकरवाडीची मुहूर्तमेढ रोवण्यास लक्ष्मणराव निघाले होते. एखाद्या महत्त्वाच्या कार्याचा आरंभ करण्यास धुळवडीचा मुहूर्त चांगला की वाईट, हा विचार लक्ष्मणरावांच्या मनात केव्हाच आला नाही. असल्या भोळसट कल्पनांवर त्यांचा मुळीच विश्वास नसे. ते मुहूूर्तासाठी कधी अडले नाहीत व त्यामुळे त्यांचे काही बिघडलेही नाही.

आपली जागा पाहायला ते तशा उन्हातच निघाले. बाजूला निवडुंग तर पायाखाली सराटे. तितक्यात एक नागसाप सळसळत त्यांच्या वाटेवरून आडवा जाऊन झुडुपांत अदृश्य झाला. वर्षांनुवर्षे ओसाड पडलेल्या असल्या रानात सापांना काय तोटा? तेवढय़ासाठी पुढील काळात वाडीच्या सुरक्षिततेसाठी जनमेजयाप्रमाणे येथे एक सर्पसत्रच सुरू झाले.

या माळावर भटकत असता त्यांना एक शमीचे झाड दिसले. त्याच्या सावलीत बसून दशम्या खाताखाता कारखाना कोणत्या अंगास व राहण्याच्या झोपडय़ा कोणत्या अंगास घालावयाच्या हे त्यांनी ठरवले आणि परत स्टेशनवर येऊन बेळगावहून आलेल्या बांबू व तट्टय़ा घेऊन धर्मशाळेपुढे संध्याकाळपर्यंत त्यांनी एक मांडव तयार केला. हेच त्यांचे वाडीतले पहिले मकाण!

अशा एखाद्या ओसाड परठिकाणी येऊन आपला पसारा मांडायला सामान्य मनुष्य खात्रीने कचरला असता. तथापि लक्ष्मणरावांकडे पाहावे तर ते या वेळी एका सुखस्वप्नात गढून गेलेले दिसत. ठळकवाडीहून कारखान्याचे स्थलांतर करावे लागले, ही खरी म्हणजे एक आपत्तीच; परंतु त्यामुळेच आपल्यास एक अपूर्व संधी मिळाली असे लक्ष्मणरावांस वाटले.

याचे कारण अलीकडे त्यांच्या वाचनात विलायतेतील काही कारखानदारांनी आपले कामगार व वरिष्ठ लोकांसाठी स्वतंत्र वसाहती स्थापन केल्याचे आले हाते. तेव्हा एवीतेवी नव्या ठिकाणी कारखान्याची स्थापना करायची तर तोच कित्ता आपण का गिरवू नये, असे त्यांना वाटले. पोर्ट सनर्लाट व कॅडबरी कंपनीने स्थापन केलेल्या बोर्नव्हिल या फॅक्टरी टाऊनची माहिती त्यांना होती. पण त्यांच्या मनात विशेष भरलेला नमुना म्हणजे अमेरिकेतील नॅशनल कॅश रजिस्टर या कंपनीने आपल्या कामगारांसाठी उघडलेली वसाहत. या ठिकाणी कामगारांसाठी हवेशीर व सोयीस्कर घरे तर होतीच, पण त्याशिवाय मुलांसाठी शाळा, खेळण्यासाठी जागा, हॉस्पिटल, रिक्रिएशन हॉल, बगीचा, इत्यादी सोयीही केल्या होत्या.

या सर्व बाबी खर्चाच्या यात शंका नाही. तथापि कामगारांच्या सुखसोयी व हिताविषयी अशी काळजी घेतल्याने ते आपले काम अधिक काळजीपूर्वक व कार्यक्षमतेने करू शकतात असा तालकांनी अनुभव दिला होता. त्यामुळे हा उपक्रम कारखान्याच्या दृष्टीनेही फार यशस्वी ठरतो, असे सिद्ध झाले होते. स्वत:ची उद्योगनगरी वसविणे अमेरिकेतल्या कारखानदारांस श्रेयस्कर ठरते, तर तो प्रयोग आपल्यालाही हितप्रद होईल, ही लक्ष्मणरावांना खात्री वाटली. त्याचबरोबर आपल्या देशात हा उपक्रम आपण प्रथमच करणार, हा विचारही त्यांना फार उत्साहदायक वाटत होता.

तथापि ही कल्पना कृतीत उतरवणे केवढे महाकर्मकठीण! एखादे साधे घर बांधायचे तरी माणासाला किती अडचणी येतात! आणि इथे लक्ष्मणराव असल्या आडरानात एक गावच उठवायला निघाले होते. बरे, हे सारे कशाच्या जोरावर? अवघ्या १४।। हजारांच्या पुंजीवर. त्यातले दहा हजार राजेसाहेबांनी उसने दिलेले व ४।। हजार ठळकवाडीची जागा सोडल्याबद्दल कलेक्टर ब्रँडन यांनी म्युनिसिपालिटीकडून नुकसानभरपाई म्हणून देवविलेले. मात्र या तुटपुंज्या रकमेच्या भरीला लक्ष्मणरावांचा प्रचंड आत्मविश्वास होता. तेच खरे त्यांचे भांडवल.

लक्ष्मणरावांना मिळालेल्या जागेचे क्षेत्रफळ ३६ एकर होते. स्टेशनपासून वाडीची व कारखान्यासाठी योजलेली जागा सुमारे फर्लाग दूर. तेव्हा स्टेशनवर उतरणारे सामान त्या जागेवर कसे पोचवायचे, हा पहिला प्रश्न आला. असल्या वाहतुकीसाठी इथे गाडीवान मिळण्यासारखे नव्हते. त्यातून कोणी मिळाला, तर तो अवाच्यासवा भाडे सांगायचा. तेव्हा तो विचार सोडून लक्ष्मणरावांनी दोन खटारे सरळ बेळगावहून मागवले आणि चार बैल विकत घेऊन अंतोबांना गाडीवान बनवले. त्यांच्या बैलगाडीच्या खेपा सुरू होताच या मंडळींचे पाणी निराळे आहे हे लोकांनी ओळखले व ते आजूबाजूच्या खेडय़ांतून आपण होऊन रोजगारासाठी येऊ लागले.

कारखान्याबरोबर नव्या ठिकाणी येण्याची इच्छा असलेले ३०-३५ कामगार आपल्या बायकामुलांसह व सामानासुमानासह लवकरच कुंडल रोड स्टेशनवर उतरले. स्टेशनच्या आवारातला हा तांडा जाणाऱ्या-येणाऱ्या गाडीतील प्रवाशांचे लक्ष वेधून घेई. उन्हाळ्याचे दिवस असल्याने सर्व मंडळी उघडय़ावरच झोपत. स्वयंपाकासाठी तेवढा धर्मशाळेचा उपयोग. त्यात १५-१६ चुली जवळजवळ मांडून बायका स्वयंपाक करीत. राधाबाईंच्या चुलीशेजारी संतू सुताराच्या बायकोची चूल, तिच्या पलीकडे तात्या न्हाव्याच्या बायकोची चूल! असल्या गर्दीत कितीही गैरसोयी असल्या, तरी त्यात सहजीवनाचा एक निराळाच आनंद सर्वाना लुटायला मिळे. बायकांची तक्रार असे ती एकच- त्यांनी कितीही भाकऱ्या बडवल्या तरी पुरुष त्याचा फडशा पाडतात! बेळगावची मंडळी इथल्या निरोगी कोरडय़ा हवेत येताच सर्वाची क्षुधा विलक्षण प्रदीप्त झाली व त्यांचा आहार दुप्पट वाढला.

इकडे पाण्याचा मात्र खडखडाट. सुरुवातीला ती टंचाई फारच भासली. रेल्वेच्या पाण्याच्या खांबातून थेंबथेंब गळणारे पाणी सोंडेखाली घागरी ठेवून भरून घ्यावयाचे, अशीही प्रथम पाळी आली. पुढे वाडीपासून अध्र्या मैलावरच्या भुसाऱ्याच्या विहिरीतून हौद भरून आणून वाटप सुरू केले. नंतर त्या विहिरीपासून नळ टाकून पाणी आणण्याची सोय केली. या विहिरीवर अगोदर हातपंप बसविला. पुढे १।। हॉर्स पॉवरच्या इंजिनने हे काम होऊ लागले. या विहिरीवरून आलेले पाणी एका हौदात सोडले जाई व तिथून बायका घागरी भरून नेत. हा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी वाडीच्या मध्यभागी एक मोठी विहीर काढण्याचे काम हाती घेतले; पण खूप खोल खणल्यावर तो प्रयत्न अयशस्वी म्हणून सोडून द्यावा लागला. वाडीला भरपूर पाण्याचा पुरवठा व्हावा एवढय़ासाठी लक्ष्मणरावांनी किती तऱ्हेचे प्रयोग व केवढा खटोटोप केला, हे विस्ताराने सांगायचे तर ते एक प्रकरणच होईल. सध्या वाडीत घरोघर नळ झाले आहेत; पण ते पाणी चार मैलांवरून पंप करून आणावे लागते.

गावांवरील रस्ते व घरांच्या जागा आखण्याचे काम सुरू झाले. लक्ष्मणरावांनी होकायंत्र व टेप घेऊन बरोबर पूर्व-पश्चिम व दक्षिणोत्तर रस्ते पाडले. सर्व घरे सरळ रेषेत आणि प्रत्येक घरासभोवती थोडे आवार. घरासाठी मातीच्या कच्च्या विटा तयार करण्यात काही मंडळी गुंतली. कौले येऊन पडू लागली. घरांसाठी पाया खणताना कित्येक ठिकाणी माणसांची हाडे निघत. त्या माणसांना नैसर्गिक मृत्यू आला होता की त्यांचा खून झाला होता हे कुणास ठाऊक! माणसांनी अहोरात्र खपून १०-१२ घरे तीन महिन्यांत पुरी केली.

तोपर्यंत इकडे कारखानाही उभा राहिला. बेळगावहून एकेक शेड उतरवावयाचे व ते तसेच आतल्या यंत्रांसकट इथे आणून उभे करावयाचे. त्यामुळे कामात एक दिवसदेखील खंड न पडता ठळकवाडीच्या कारखान्याचे स्थलांतर होऊन तो इथे व्यवस्थित चालू लागला. ही एक मोठी कसरतच होती.

झाडांशिवाय गावाला शोभा नाही. पण या कठीण मुरमाड माळावर झाडे कशी वाढवायची? त्यासाठी अगोदर पुरुषभर खड्डे काढून व खतपाणी घालून त्यात अशोक, सिल्व्हर ओक, इंडियन कॉर्क, गुलमोहर, पिंपरणी, इत्यादी झाडे लावण्यात आली. या झाडांचे शेळ्या, गायी, म्हशींकडून नुकसान होऊ नये म्हणून वाडीत ही जनावरे कोणी बाळगू नयेत, असे फर्मान सोडण्यात आले.

अद्याप गावात किराणा मालाचे दुकान नव्हते. तेव्हा दर रविवारी कुंडलच्या बाजाराला गाडी पाठवून सर्वाना लागणारे धान्य व मीठमिरची आणून त्याचे घरोघर वाटप केले जाई.

वाडीची पहिली शाळा शेजारच्या मायाप्पाच्या देवळात भरली व तिथे सात-आठ मुलांचा वर्ग जरंडीकर मास्तर घेऊ लागले.

अशा प्रकारे ही चिमुकली वाडी हळूहळू आकार धारण करू लागली. एवढय़ात पावसाळा सुरू झाला. त्या वर्षी पावसाच्या अंगात जणू भूतच आले. एकदा धोधो म्हणून सुरुवात झाली, की सारी रात्र खंड नाही. या अतिवृष्टीने वाडीची पार दुर्दशा उडवली. काळ्या मातीच्या कच्च्या विटांच्या भिंती धडाधड कोसळून त्यांचा पुरता चिखल झाला. उभे राहायला कुठेही जागा नाही. सारे सामानसुमान भिजून चिंब.

अशा पावसाच्या माऱ्यात एका कामगाराच्या बायकोला प्रसूति-वेदना सुरू झाल्या. तिला दुसरे कोण मदत करू शकणार? तिच्याकडे राधाबाई व गंगाबाई जांभेकर धावल्या. तिच्या डोक्यावर दोन पत्रे आडवे लावून तिची त्यांनी सुटका केली. तिला जुळे झाले. एखादे नवे गाव वसवून त्याची व्यवस्था लावायची म्हणजे त्या कारखानदाराला किती विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या पत्कराव्या लागतात, याची ही एक चुणूकच होती.

पावसाचा जोर थांबला. पण सर्व घरे आता पुन्हा नव्या विटा घालून बांधली पाहिजेत. गोष्टीतल्या कोळ्यासारखीच लक्ष्मणरावांची स्थिती झाली. त्यांच्या लक्षात आले, की पांढरीच्या मातीशिवाय विटा टिकाऊ होऊ शकत नाहीत. तेव्हा तसली माती असलेले नखातनीचे शेत या नावाची जागा विकत घेण्याचे त्यांनी मनाशी ठरवले. पण पैशाची वाट काय? जवळचे सर्व पैसे संपुष्टात आलेले. राजेसाहेबांकडे पुन्हा मागणी करणे त्यांना उचित वाटेना. अशा स्थितीत त्यांना रामभाऊ गिडय़ांची आठवण झाली. त्यांनी चिठ्ठी देऊन के. केंना बेळगावला धाडले व ते दहा हजार रुपये घेऊन परत आले. कामाला फिरून जोर लागला.

एवढय़ात आषाढी एकादशी आली व कारखान्यातील बरीच कामगार मंडळी पंढरीच्या वारीला निघाली. श्रीविठ्ठलाचे अनेकजण भक्त. त्यांना हरकत घेऊन नाराज करणे लक्ष्मणरावांना योग्य वाटले नाही. तेव्हा लक्ष्मणरावांनी त्यांना वारीसाठी रजा दिली. पण तेवढेच न करता विठ्ठलभक्तांची शक्य तेवढी सोय करावी म्हणून वाडीतच एक विठ्ठल मंदिर स्थापन करण्याचे त्यांनी ठरवले. त्यासाठी पांडोबा पाथरवटाला सांगून विठ्ठल-रखुमाईच्या दोन सुंदर मूर्ती त्यांनी तयार करून घेतल्या आणि आपले बंधू सोलापूरचे डॉ. वासुदेवराव किर्लोसकर व त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांच्या हस्ते त्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. या विठ्ठल मंदिरात पुराणवाचन, भजन, काकड आरती असे कार्यक्रम अजूनही होत असतात.

पुढे दिवाळीपासून नांगराचा हंगाम सुरू झाला. यंदा सुगी चांगली झाल्याने शेतकरी खूश होते. हातात पैसा खुळखुळत होता. मग नांगराच्या मागण्यांना काय तोटा! वाडीत शेतकऱ्यांची एक जत्राच भरू लागली. हंगामासाठी अगोदर तयार करून ठेवलेले नांगर पाहता पाहता खलास झाले.

आतापर्यंत नांगराचा ग्राहक म्हणजे तो स्वत: वापरणारा शेतकरी अशी स्थिती होती. ती स्थिती बदलत चालली. हे नांगर भाडय़ाने देणे हाही एक फार किफायतशीर धंदा आहे, हे काही हुशार व्यापाऱ्यांनी ओळखले. त्यासाठी बार्शी, लातूर, तळेगाव, ढमढेरे, परभणी, अकोला अशा ठिकाणांहून हे नांगर घाऊक प्रमाणावर विकत घेणारा एक नवा वर्ग पुढे आला. ते ६, १०, ४० च्या संख्येने नांगर विकत घेऊ लागले. नांगराबरोबर त्याचे फाळ, पाठी, इत्यादी सुटय़ा भागांचीही मागणी वाढली.

धंद्याला अशी तेजी आल्यावर राजेसाहेबांचे व गिडय़ांचे कर्ज सव्याज फेडून टाकायला किती उशीर? राजेसाहेबांनाही किर्लोसकरवाडीची ही प्रगती पाहून फार समाधान झाले. ते वाडीत चार दिवस राहायलाच आले व प्रत्येकाच्या कामाबद्दल त्यांनी त्याची मोठय़ा प्रेमाने पाठ थोपटली. राजेसाहेबांची भेट हा पुढे किर्लोसकरवाडीचा एक वार्षिक कार्यक्रमच झाला.

किर्लोसकरवाडीने एक वर्षांत चांगलेच बाळसे धरले. तिथल्या जीवनाला किंचित स्थैर्य आले. धंद्याचाही जम बरा बसत चालला. पण लक्ष्मणरावांना स्वस्थता ठाऊक नव्हती. ‘पुढे चला’ हा त्यांचा एकच मंत्र. तोच मंत्र आपल्या सर्व तरुण साहाय्यकांच्या मनावर ते सारखा बिंबवत व त्यांच्यावरही या मंत्राचा फार परिणाम होई. त्यापैकी एखाद्याने आपल्या कामात थोडीशी निराळी चमक दाखवली तरी लक्ष्मणरावांकडून त्याला मोठीच शाबासकी मिळे.

परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते असे म्हणतात; ते खरे असो अगर नसो, लक्ष्मणरावांच्या अशा उत्तेजनपर शब्दांमुळे साध्या कोटींतील माणसे वरच्या कोटीला चढत, हे मात्र अक्षरश: खरे. त्यांना सुरुवातीला मिळालेले बहुतेक हस्तक अननुभवी व बेताचे शिक्षण झालेले. पण लक्ष्मणरावांच्या तालमीत तयार झाल्यावर तेच केवढी महत्त्वाची व मोठमोठी कामे करू लागले. तसे होते म्हणूनच कोचऱ्यासारख्या कोकणातल्या एका आडवळणी खेडय़ातून कारकुनी करण्यासाठी देशावर आलेला मंगेशराव रेग्यासारखा गरीब मुलगा किर्लोसकर संस्थेचा विश्वासू प्रमुख हिशोबनीस बनला; अंतोबा फळणीकरासारखा आजऱ्यातून एका सदऱ्यानिशी आलेला मुलगा एक अत्यंत कल्पक इंजिनीअर व किर्लोसकर कारखान्याचा मोठाच आधार बनला; तर कुठल्याही छापखान्याचे तोंडही न पाहिलेला इचलकरंजीचा गणपतराव विजापुरे मुद्रणशास्त्र व लिपिसुधारणेचा एक तज्ज्ञ म्हणून पुढे आला. ही सर्व नामावली द्यायची तर ती यादी फार मोठी होईल.

थोडक्यात सांगायचे तर, लक्ष्मणरावांनी अशा अनेक साध्या माणसानांच हाताशी धरून त्यांची सुप्त शक्तीजागृत करून व त्यांना उत्तेजन देऊन किर्लोसकरवाडीचा विकास केला आणि एक मोठा चमत्कार घडवून आणला.

हे पाहिल्यावर स्वातंत्र्योत्तर काळात आपल्या देशाचा विकास अशा मंदगतीने का व्हावा, असा एक प्रश्न अभावितपणे पुढे येतो. अशी स्थिती आपल्यापाशी पुरेसा पैसा नाही म्हणून होत आहे काय? की आपल्याजवळ तज्ज्ञांचे मनुष्यबळ नाही म्हणून? तसे पाहिले तर लक्ष्मणरावांजवळ यापैकी काय होते? पण जवळजवळ कफल्लक असलेल्या या गृहस्थांनी थोडय़ाशा यंत्रसामुग्रीनिशी व हाताशी असलेल्या मूठभर माणसांतच हुरूप भरून एका ओसाड माळाचे नंदनवन बनवले.

लक्ष्मणराव हे एक असे कल्पक रचनाकार होते व हीच त्यांची खरी थोरवी!

द्वारा : लोकसत्ता
  Never miss a story from us, get weekly updates in your inbox.