वर्दीतल्या माणसाच्या नोंदी

सदानंद दाते

समकालीन प्रकाशन

/media/xEDfQMTlFQ9Z.jpg

पाने : ☀ 144 मुल्य (₹): 160.0

पुस्तक परिचय - आशुतोष गं जोगळेकर

पुस्तकाला प्रस्तावना आहे जे एफ रिबेरो यांची. पोलीस दलामध्ये दाते यांनी आतापर्यंत जी सेवा बजावलेली आहे त्याबाबतचे हे पुस्तक आहे.

सांगायला हरकत नाही की हे पुस्तक वाचण्यापूर्वी सुद्धा सदानंद दाते ही व्यक्ती आम्हाला थोडीशी माहीत होती. ते आयपीएस ऑफिसर झाले आणि त्यांचे अमरावतीचे ट्रेनिंग पुरे झाले होते तेव्हा आम्हा मित्रांना त्यांना भेटण्याची संधी मिळालेली होती. अप्पू राजा चित्रपटामध्ये अप्पू आणि राजा यांचे वडील असलेले कमल हसन ज्या प्रकारचे पोलीस इन्स्पेक्टर होते त्यांचीच आठवण यावी. एखाद्या गुन्हेगाराच्या पायावर पाय पडला तर पायाचे काही खरे नाही अशी शरीरयष्टी. त्यावेळी त्यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय भारदस्त आणि रुबाबदार होते.

दाते तसे सामान्य घरातले. शिकता शिकता कामे करून पैसे देखील मिळवावे लागत. दाते पेपर टाकण्याचे काम करीत त्यातून वाचनाची आवड लागली. आधी वाचायचे आणि कामाच्या निमित्ताने हिंडत असताना त्याचे चिंतन करायचे अशी सवय त्यांना लागली होती. सुरुवातीला ते फार हुशार विद्यार्थ्यांपैकी नव्हते. परंतु एफवाय बीकॉम ला ते कॉलेजमध्ये पहिले आले आणि मग त्यांना वाटायला लागले की बीकॉम तर आपण होऊच. आपण अधिक अवघड काहीतरी निवडले पाहिजे म्हणून त्यांनी आयसीडब्ल्यूएच्या अभ्यासाला सुरुवात केली. अर्थात त्यासाठी लागणारी सगळी पुस्तके विकत घेणे शक्य नव्हते. ती कॉलेजच्या लायब्ररी मधून मिळवावी लागत. त्यामुळे दाते दररोज लायब्ररी उघडण्याच्या सुमारास लायब्ररीत पोचत. पण तिथले कर्मचारी वेळेवर लायब्ररी उघडायला आणि पुस्तके द्यायला उत्सुक नसत. कर्मचार्‍यांचे काम रमत गमत सुरु होई. दाते यांना पाहून लायब्ररीमधल्या कर्मचार्‍यांच्या चेहर्‍यावर आठ्या पडत. पण सगळ्या अडचणींवर मात करत लायब्ररी मधून पुस्तक घेऊन दाते लायब्ररीतली एक खुर्ची पकडून अभ्यास करीत बसत. पुढे पुढे लायब्ररीत येणाऱ्या इतर विद्यार्थ्यांना एक ठराविक जागा पकडून अभ्यास करत बसलेला सदानंद दाते हा विद्यार्थी हे दृष्य सवयीचे होऊन गेले. तो पहा घासू , बसला आहे घासत. अशा प्रकारची कमेंटही ऐकायला मिळे. काही जण तशाच प्रकारचा कुत्सित कटाक्ष टाकत. आपल्याकडे नेटाने, चिकाटीने अभ्यास करण्याची देखील चेष्टा होते. चिकाटीने अभ्यास करणार्‍यांना डिमॉरलाईझ केले जाते. पुढे दाते यांनी आयसीडब्ल्यूए चा पहिला ग्रुप सोडवला. तो ग्रुप पहिल्या फटक्यात सोडवणारे पुण्यातले ते पहिले विद्यार्थी. आणि मग आत्तापर्यंत जे विद्यार्थी चेष्टा करीत होते त्याची जागा आता कौतुकाने घेतली. आयसीडब्ल्यूए पूर्ण झाल्यानंतर पुण्यामध्ये ते एका खाजगी कंपनीत नोकरीला लागले. तिथे त्यांना साडेसात हजार पगार होता. पण कामातल्या आकड्यांमध्ये त्यांचे मन रमले नाही. अधिक अवघड क्षितिजे त्यांना खुणावू लागली आणि मग त्यांनी यूपीएससीचा पर्याय निवडला. पद्धतशीर रीतीने इंग्रजी, वाचन, लेखन यांचा सराव सुरू केला. इंग्रजी वर्तमानपत्र वाचायला सुरुवात केली. अखेर युपीएससी परीक्षा पास होऊन त्यांची आयपीएस म्हणून निवड झाली. चिपळूण, अमरावती, वर्धा, मुंबई अशा अनेक ठिकाणी त्यांनी काम केले. तिथे हाताखालच्या सहकाऱ्यांचे आणि वरिष्ठांचे देखील वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव घेतले. प्रत्येक वेळी समोर असलेली कामे सहजपणे पार पडतात असे नाही. कधीकधी समोरचे काम अवघड असते तर कधी कधी साध्या कामात सुद्धा बरोबर काम करणाऱ्यांचे सहकार्य मिळत नाही. तर काही वेळा वरिष्ठ कामात आडकाठी आणतात. या सगळ्याचा दाते यांना खूप त्रास होत असे. त्यांना स्वतःला व्यवस्थापन, मानसशास्त्र, संघटन आणि अध्यात्म या विषयाच्या वाचनाची आवड आहे. ते म्हणतात सुरुवातीला त्यांचा स्वभाव अत्यंत शीघ्रकोपी होता. काम करताना मनाविरुद्ध काही झाले तर त्यांना त्रास होत असे पण पुढे पुढे अधिकाधिक अभ्यासाने चिंतनाने त्यांनी या सगळ्यावर मात केली आणि कामांमधील परिणामकारकता वाढत गेली. पोलिसाचा संबंध फक्त गुन्हेगारांशी येत नाही. आपल्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या आणि समाजाला प्रभावित करणाऱ्या सगळ्याच व्यक्तींशी त्यांचा संबंध येतो किंबहुना आला पाहिजे. सचिन तेंडुलकर, व पु काळे, दामू केंकरे, बाळासाहेब ठाकरे, अरुण टिकेकर अशा लोकांशीही त्यांचा संपर्क आलेला आहे. काम करीत असताना वाचनाचा मोठा फायदा झाला. संत सज्जनांची शिकवण त्या त्या वेळी उपयोगाची ठरली.

काम करीत असताना ज्या ज्या सहकाऱ्यांची मदत झाली. त्या प्रत्येकाचा नामोल्लेख झाला पाहिजे हा दाते यांचा आग्रह आहे. अगदी सुरुवातीच्या काळात देखील काही जणांची मदत झाली परंतु त्या काळात डायरी लिहीत नसल्यामुळे त्यांची नावे आज लक्षात नाहीत त्यामुळे त्यांचा नामोल्लेख करता येत नाही अशी खंत दाते एका ठिकाणी व्यक्त करतात. 26 /11 ला मुंबईवर जो हल्ला झाला तो अनुभव अत्यंत थ्रिलिंग आहे.

पोलीस दलात सामील झाल्यानंतर सदानंद दाते यांनी आपल्या परीने खूप चांगले काम करण्याचा प्रयत्न केला पण प्रश्न असा की आपण कितीही चांगले काम केले तरी आपण जनतेला न्याय देऊ शकतो का, किंबहुना आपले पोलीस दल हे जनतेला उत्तरदायी आहे का असे अनेक प्रश्न दाते यांनी उपस्थित केलेले आहेत. एखादी गाडी बिघडलेली असेल तर ड्रायव्हर कितीही चांगला असून भागत नाही. अशा प्रकारचे विचार त्यांनी मांडले आहेत. मूळात आपले पोलीस दल, त्याची रचना, त्यात असलेली हायरार्की, पदांची उतरंड, या पोलिस दलाची झालेली सुरुवात आणि सुरुवात झाली त्यावेळचे राज्यकर्ते, पोलिस दल सुरु करण्यामागचा त्यांचा हेतु. अगदी सुरुवात झाली तेव्हापासूनच भ्रष्ट, हडेलहप्पी वृत्ती, जनतेपासून दुरावलेपण आणि त्यामुळे स्वाभिमानाचा अभाव, नीतीधैर्याचा अभाव अशा अनेक गोष्टींबाबत दाते या पुस्तकात चिंतन करतात.

हा एक प्रकारे नोकरीतील त्यांच्या कालखंडाचा वृत्तांत आहे आणि काही प्रमाणात एका व्यक्तीच्या घडण्याचाही प्रवास आहे. या नोंदी आहेत त्यामुळे काही गोष्टी विस्ताराने वाचायला मिळतील तर काहींच्या फक्त नोंदी सापडतील. पण सामान्य वाचकाला माहीत नसलेल्या अनेक गोष्टी माहीत होतील हे नक्की.

द्वारा : समीक्षक