यांत्रिकाची यात्रा

शंकरराव किर्लोस्कर

किर्लोस्कर

/media/UghT5hsnYhip.jpg

पाने : ☀ 286 मुल्य (₹): 0.0

उद्योगसाधनेची सोनेरी कर्तबगारी... - प्रतिनिधी सप्तरंग

मराठी माणूस आणि किर्लोस्कर उद्योगसमूह यांच्यातील नाते भावनिक आहे. किर्लोस्कर कारखान्यात कोणी नोकरी करीत नसले तरी किर्लोस्कर हे नाव घेतले की मराठी माणसाला अभिमानाची भावना निर्माण होते. मराठी माणूस आणि उद्योग हे नाते जुळत नसले तरी उद्योगाची संकल्पना किर्लोस्करांमुळे मराठी माणसामध्ये रुजली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या उद्योगसमूहाचे संस्थापक लक्ष्मण काशिनाथ किर्लोस्कर यांचे चरित्र म्हणजे ‘यांत्रिकाची यात्रा''. शंकरराव किर्लोस्कर यांनी लिहिलेले हे चरित्र अत्यंत ओघवते आणि कुठलाही अभिनिवेश न आणता लिहिले गेले आहे. या चरित्रातून लक्ष्मणरावांचा जीवनप्रवास तर कळतोच पण किर्लोस्कर समूहाची वाटचाल, तसेच या उद्योगाची आधारशिला म्हणजे त्यांचे संस्कार कसे होते ते यातून लक्षात येते.

धारवाडजवळच्या एका खेड्यात लक्ष्मणराव यांचा जन्म झाला. वयाच्या पंधराव्या वर्षी गाव सोडून ते मुंबईला यंत्रकलेचे शिक्षण घ्यायला गेले. मुंबईत त्यांनी शिक्षण तर घेतलेच पण नोकरीही मिळविली. नोकरी मिळविल्यानंतर त्यांनी सायकल विक्रीचाही उद्योग केला. मात्र सायकल विक्री हा काही त्यांच्या जीवनाचा हेतू नव्हता. स्वतःचा उद्योग सुरू करायचा हा विचार पक्का होताच. त्यातून कोटावर लावण्याची बटणे तयार करायचे त्यांनी ठरविले. मात्र त्यात काही अडचणी आल्यावर त्यांनी दुसऱ्या उद्योगाची वाट निवडली. खऱ्या अर्थाने त्यांनी नंतर सुरुवात केली ती शेतकऱ्यांसाठी लोखंडी नांगर तयार करण्याची. त्याच्या विशेष स्वरुपाच्या जाहिराती केल्या. त्याचबरोबर संपूर्ण देशभर त्याचा ग्राहकवर्ग निर्माण केला. या उद्योगानंतर त्यांनी वेगवेगळ्या उद्योगांना सुरुवात केली. काही काळानंतर औंध संस्थानच्या राजांच्या सहकार्यामुळे कुंडल रोड स्टेशनच्या जवळ किर्लोस्करवाडीची मुहूर्तमेढ रोवली. किर्लोस्करवाडीच्या ३६ एकरांच्या परिसरात कारखाना आणि कामगारांची राहण्याची वस्ती उभारण्यात आली. खासगी कारखाना आणि त्यातील कामगारांची घरे एकत्र असा देशातला तो पहिलाच प्रयोग होता. या कारखान्यानंतर मात्र लक्ष्मणराव यांनी मागे वळून पाहिले नाही. वेगवेगळे प्रयोग करीत त्यांनी अनेक गोष्टींची निर्मिती केली. यामध्ये अगदी त्यांनी महात्मा गांधीजींना पसंत पडेल अशा चरख्याचीदेखील निर्मिती केली होती. लक्ष्मणरावांना महाराष्ट्राचे हेन्‍री फोर्ड म्हणत असत यावरून त्यांच्या विविध उद्योगांची व उत्पादनांची कल्पना येईल.

मंदीच्या काळात किर्लोस्करांच्या कारखान्यात विविध प्रकारचे फर्निचर तयार होत असे. खुर्च्या, लोखंडी कॉट त्या काळात तयार झाल्या. इतकेच नाही, तर छोटे नटबोल्टदेखील तयार केले गेले. समस्या आली म्हणून हातपाय गाळून बसणारे उद्योजक अनेक असतात, मात्र समस्येवर नेमका तोडगा काढून आपली प्रगती थांबवायची नाही हा मंत्र प्रत्यक्षात आणणारे लक्ष्मणराव वेगळेच होते. लक्ष्मणरावांनी जिथे-जिथे हात घातला तेथे यशच मिळवले. त्यांना पंतप्रतिनिधींनी दिवाणपदाची जबाबदारी सोपविली तीही तितक्‍याच उत्तमपणे त्यांनी पार पाडली. शेतीत लक्ष घातले तेथेही आपला ठसा उमटवला. कामगारांच्या बाबतीत अत्यंत दक्ष असलेल्या लक्ष्मणरावांनी एकदा मी आता येथे लक्ष घालत नाही, अशी घोषणा करून किर्लोस्करवाडीहून बंगळूरला जाणे पसंत केले; पण कामगारांचे त्यांच्यावर इतके प्रेम होते, की कामगारांनी हट्ट करून त्यांना परत बोलावून घेतले. मालक आणि कामगारांमधील असा जिव्हाळा फार वेगळाच होता.

लक्ष्मणरावांबद्दल सविस्तर माहती देणाऱ्या या पुस्तकाची पहिली आवृत्ती १९५८ मध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर १९८७ मध्ये पुनर्मुद्रण झाले. २०१९ मध्ये २० जूनला याची सुधारित आवृत्ती प्रसिद्ध करण्यात आली. लक्ष्मणराव किर्लोस्करांच्या १५० व्या जयंतीनिमित्ताने ही आवृत्ती प्रसिद्ध करण्यात आली. सुधारित आवृत्तीचे संपादन सुलभा तेरणीकर यांनी केले. ६० वर्षांपूर्वी लिहिले गेलेले हे पुस्तक आजही नवीनच वाटते, कारण यातील चरित्र नायकाची कर्तबगारी इतकी मोठी आहे, की त्यांनी त्यावेळी काळापुढचे पाहून आपल्या उद्योगाचा पाया घातला. हे करताना काही विशिष्ट मूल्यांचा आग्रह धरला. त्यामुळे हे पुस्तक वाचताना कुठेही कंटाळा येत नाही. लक्ष्मणरावांचे उद्योगसाधनेचे असिधरा व्रत त्यांना सोनेरी यश मिळवून देणारे ठरले.

चोवीस प्रकरणांमध्ये लक्ष्मणरावांच्या कौटुंबिक घडामोडींच्या तसेच किर्लोस्कर उद्योगसमूहाच्या विस्ताराची तपशीलवार माहिती मिळते.

द्वारा : सकाळ वृत्तसेवा