त्रिपर्ण

मोनिका गजेंद्रगडकर

मौज प्रकाशन गृह

/media/NyBHGbtsJQV6.jpg

पाने : ☀ 132 मुल्य (₹): 200.0

शहाणिवेच्या मृत्युंजयी कथा - संजय आर्वीकर

'भूप', 'आर्त', 'शिल्प' हे कथासंग्रह आणि 'उगम' या कादंबरीनंतर आलेला 'त्रिपर्ण' हा दीर्घकथांचा संग्रह, मोनिका गजेंद्रगडकर यांच्या लेखन यात्रेतला आणखी एक उन्नत टप्पा आहे. या कथांचं वाचन संपलं, तरी त्यातल्या व्यक्तिरेखांशी, खरं तर आता अंतर्मनात शिरलेल्या त्या माणसांशी आपलं बोलणं संपत नाही, इतकी ती मनात रुजत जातात.

यातल्या 'वंश' या कथेमध्ये बहुसांस्कृतिकता, वैश्विकता, स्थानिकता, वंश सातत्य, वंशाची सरमिसळ, माणसाची सहजप्रवृत्ती, कातडीच्या रंगाभोवती असणारं सांस्कृतिक रिंगण हे सगळं असलं, तरी ते ओलांडून जाणारं मानव्य, मैत्रभाव विलक्षण आहे. यातल्या गॅब्रियलबद्दल ज्योतिका सांगते, '(तो) एकदा म्हणाला होता, मैत्र हे अमूर्त चित्रासारखं असतं. कुठलेही अर्थ काढण्याचं स्वातंत्र्य ते देतं; पण त्यातली अमूर्तता स्वतःच्याच एका अर्थाचं स्वातंत्र्य राखून ठेवते, तसं मैत्र. सगळी नाती ते मैत्र स्वतःमध्ये सामावून घेतं; पण तरीही त्याचं ते मुक्त असतं.' गॅब्रियल (मिश्र रक्ताचा अमेरिकन ब्लॅक) स्वतः आयुष्याच्या एक टप्प्यावर भारतीय ज्योतिकाला सोडून, आपल्या वंशाच्या (अमेरिकन ब्लॅक) इसाबेलाबरोबर संसार थाटतो; पण तरीही मैत्रभावाचा प्रत्यय या कथासंग्रहातील गॅब्रियलसह अनेक व्यक्तरेखांमधून येतो.

डोरोथी (गोरी अमेरिकन) आणि ज्योतिकामध्ये वंशापलीकडे जाणारं नातं आहे. डोस्टोव्हस्की आपल्या साहित्यसृष्टीत एकमेकांना पूर्णत्व देणाऱ्या 'द डबल' म्हणाव्या अशा व्यक्तिरेखा निर्माण करतो, ज्या एकमेकांशिवाय अपुऱ्या असतात आणि 'आधे-अधुरे' असणाऱ्या माणसांच्या प्रतिनिधी ठरतात. डोरोथी-ज्योतिका ही जोडी तशी वाटते. एकमेकींना पूर्णत्व देणारी, एकमेकांमधूनही जीवनरेखा शोधणारी. त्यांच्यात परस्परविरोध कमी आणि पूरकता अधिक आहे. निकोलसला नकार दिल्यावर स्वतःला एकटं राहण्याची शिक्षा करून घेणं, ही त्याच्यावर अविरत प्रेम करण्याची डोरोथीची अनोखी तऱ्हा आहे. मृत्युपूर्वी स्वतःच्या अवयवांचं, विशेषतः त्वचेचं दान करण्याबाबत डोरोथीचा आग्रह; यामागे कदाचित आयुष्यभर जपलेलं त्वचा-रंग-वंशाचं रिंगण ओलांडून, मृत्यूनंतर तरी त्यातून मुक्ती मिळवण्याची आस असावी. 'वंश' या कथेतला सर्वांत उन्नत-उत्कट क्षण वाटला तो ज्योतिकानं नॅशचा (गॅब्रियल-इसाबेलाचा मुलगा) मुका घेणं. आपण सारं काही गमावलं आहे याची कल्पना येऊनही, या प्रसंगी लेखिकेची विश्वबोध जीवनदृष्टी दिसते.

दुसरी कथा 'फ्लेमिंगो' अत्यंत दुःखद, शोकात्म घटनेच्या पार्श्वभूमीवर (सुजयचा मृत्यू) घडते; पण त्यातली सकारात्मकता खूप खोलवर जाते. 'दुःख ओलांडण्यासाठी काळ जावाच लागतो असं काही नाही. तसं दुःखाला बरोबर घेऊनही ते ओलांडण्याचा प्रयत्न करता येतोच की!' या जीवनसूत्राचं वहन प्राथम्याने जेसी करत असली, तरी आपल्या 'वंश अंशा'च्या (सॅमच्या) साथीनं, जयंतराव आणि लताबाईही त्यात सामील होतात. वडिलांच्या जागी कुणाची कल्पनाही सहन न करू शकणाऱ्या सॅमनं, पॅट अंकलला घरी बोलवण्यास संमती देणं, इथपर्यंतचा त्याचा प्रवास अत्यंत विलोभनीय आहे. मग हे लक्षात येतं, की 'फ्लेमिंगो' झालेल्या सॅमचं हे स्थलांतर फक्त 'वॉर्म्थ'साठी नाही, एक उमलती शहाणीव त्यातून वाचकही टिपून घेतो.

तिसरी कथा 'सारांश' दोन संस्कृतींच्या संगमावर उभी असलेली आणि स्थानिक तपशीलांसह वैश्विक आवाहकता असणारी आहे. 'कृष्णाकडे नजर लागलेले केटीचे डोळे. तिच्या त्या आमसुली डोळ्यांत काजळाची एक गर्द घनरेषा उमटत चालली आहे,' या कथेच्या शेवटी येणाऱ्या वाक्यात आरती आणि केटीच्या प्रतिमा एकमेकांत मिसळत, उदयला (दिवंगत आरतीचा पती) सांभाळत आहेत, असं कथेपलीकडचं; पण त्यात सूचित केलेलं दिसतं. यात सहाय्यक ठरते आरतीची आई ललिता. तिच्यात केटीसाठी मैत्रभाव आणि मातृत्वभावाचे संयोगतत्व सामावलेलं दिसतं. या कथेत व्यक्तिरेखाटनाबाबतीत विलक्षण गोष्ट साधलेली दिसते. पात्रांना स्वतंत्र व्यक्तिमत्व देताना, कथा अवकाशात त्यांची संयुगंही असू शकतात, विस्तारू शकतात, अशी शक्यता त्यात सूचित केलेली आहे.

स्त्री-लिखित मराठी कथेच्या खंडाच्या (पद्मगंधा प्रकाशन, २०१४) प्रस्तावनेत, या ग्रंथातील मोनिका गजेंद्रगडकर यांच्या मुलाखतीचा संदर्भ देत मी लिहिले होते, 'अचानक मृत्यूच्या रूपात व्यक्तिगत आयुष्यात आलेली आपत्ती आणि त्यांच्या कथांमधून होणारं मृत्यूचं दर्शन, या संदर्भात त्यांनी केलेलं विवेचन वाचकाला अंतर्मुख करतं. विकल करणारा दुःखाचा मार्ग शहाणपणाच्या वाटेवर नेऊ शकतो, याचाही प्रत्यय त्यात येतो.' या तिन्ही कथा मला त्या बीजाचा, संस्कृती शोधाच्या दिशेनं झालेला आविष्कार वाटतो. एका अर्थी या शहाणिवेच्या मृत्युंजयी कथा आहेत.'भूप', 'आर्त', 'शिल्प' हे कथासंग्रह आणि 'उगम' या कादंबरीनंतर आलेला 'त्रिपर्ण' हा दीर्घकथांचा संग्रह, मोनिका गजेंद्रगडकर यांच्या लेखन यात्रेतला आणखी एक उन्नत टप्पा आहे. या कथांचं वाचन संपलं, तरी त्यातल्या व्यक्तिरेखांशी, खरं तर आता अंतर्मनात शिरलेल्या त्या माणसांशी आपलं बोलणं संपत नाही, इतकी ती मनात रुजत जातात.
ADV- बोट डेज, 26 ते 30 ऑगस्‍ट दरम्यान स्‍पीकर्स, इअरबडस् आणि अधिकवर मिळवा 50% पर्यंत सवलत

यातल्या 'वंश' या कथेमध्ये बहुसांस्कृतिकता, वैश्विकता, स्थानिकता, वंश सातत्य, वंशाची सरमिसळ, माणसाची सहजप्रवृत्ती, कातडीच्या रंगाभोवती असणारं सांस्कृतिक रिंगण हे सगळं असलं, तरी ते ओलांडून जाणारं मानव्य, मैत्रभाव विलक्षण आहे. यातल्या गॅब्रियलबद्दल ज्योतिका सांगते, '(तो) एकदा म्हणाला होता, मैत्र हे अमूर्त चित्रासारखं असतं. कुठलेही अर्थ काढण्याचं स्वातंत्र्य ते देतं; पण त्यातली अमूर्तता स्वतःच्याच एका अर्थाचं स्वातंत्र्य राखून ठेवते, तसं मैत्र. सगळी नाती ते मैत्र स्वतःमध्ये सामावून घेतं; पण तरीही त्याचं ते मुक्त असतं.' गॅब्रियल (मिश्र रक्ताचा अमेरिकन ब्लॅक) स्वतः आयुष्याच्या एक टप्प्यावर भारतीय ज्योतिकाला सोडून, आपल्या वंशाच्या (अमेरिकन ब्लॅक) इसाबेलाबरोबर संसार थाटतो; पण तरीही मैत्रभावाचा प्रत्यय या कथासंग्रहातील गॅब्रियलसह अनेक व्यक्तरेखांमधून येतो.

डोरोथी (गोरी अमेरिकन) आणि ज्योतिकामध्ये वंशापलीकडे जाणारं नातं आहे. डोस्टोव्हस्की आपल्या साहित्यसृष्टीत एकमेकांना पूर्णत्व देणाऱ्या 'द डबल' म्हणाव्या अशा व्यक्तिरेखा निर्माण करतो, ज्या एकमेकांशिवाय अपुऱ्या असतात आणि 'आधे-अधुरे' असणाऱ्या माणसांच्या प्रतिनिधी ठरतात. डोरोथी-ज्योतिका ही जोडी तशी वाटते. एकमेकींना पूर्णत्व देणारी, एकमेकांमधूनही जीवनरेखा शोधणारी. त्यांच्यात परस्परविरोध कमी आणि पूरकता अधिक आहे. निकोलसला नकार दिल्यावर स्वतःला एकटं राहण्याची शिक्षा करून घेणं, ही त्याच्यावर अविरत प्रेम करण्याची डोरोथीची अनोखी तऱ्हा आहे. मृत्युपूर्वी स्वतःच्या अवयवांचं, विशेषतः त्वचेचं दान करण्याबाबत डोरोथीचा आग्रह; यामागे कदाचित आयुष्यभर जपलेलं त्वचा-रंग-वंशाचं रिंगण ओलांडून, मृत्यूनंतर तरी त्यातून मुक्ती मिळवण्याची आस असावी. 'वंश' या कथेतला सर्वांत उन्नत-उत्कट क्षण वाटला तो ज्योतिकानं नॅशचा (गॅब्रियल-इसाबेलाचा मुलगा) मुका घेणं. आपण सारं काही गमावलं आहे याची कल्पना येऊनही, या प्रसंगी लेखिकेची विश्वबोध जीवनदृष्टी दिसते.

दुसरी कथा 'फ्लेमिंगो' अत्यंत दुःखद, शोकात्म घटनेच्या पार्श्वभूमीवर (सुजयचा मृत्यू) घडते; पण त्यातली सकारात्मकता खूप खोलवर जाते. 'दुःख ओलांडण्यासाठी काळ जावाच लागतो असं काही नाही. तसं दुःखाला बरोबर घेऊनही ते ओलांडण्याचा प्रयत्न करता येतोच की!' या जीवनसूत्राचं वहन प्राथम्याने जेसी करत असली, तरी आपल्या 'वंश अंशा'च्या (सॅमच्या) साथीनं, जयंतराव आणि लताबाईही त्यात सामील होतात. वडिलांच्या जागी कुणाची कल्पनाही सहन न करू शकणाऱ्या सॅमनं, पॅट अंकलला घरी बोलवण्यास संमती देणं, इथपर्यंतचा त्याचा प्रवास अत्यंत विलोभनीय आहे. मग हे लक्षात येतं, की 'फ्लेमिंगो' झालेल्या सॅमचं हे स्थलांतर फक्त 'वॉर्म्थ'साठी नाही, एक उमलती शहाणीव त्यातून वाचकही टिपून घेतो.

तिसरी कथा 'सारांश' दोन संस्कृतींच्या संगमावर उभी असलेली आणि स्थानिक तपशीलांसह वैश्विक आवाहकता असणारी आहे. 'कृष्णाकडे नजर लागलेले केटीचे डोळे. तिच्या त्या आमसुली डोळ्यांत काजळाची एक गर्द घनरेषा उमटत चालली आहे,' या कथेच्या शेवटी येणाऱ्या वाक्यात आरती आणि केटीच्या प्रतिमा एकमेकांत मिसळत, उदयला (दिवंगत आरतीचा पती) सांभाळत आहेत, असं कथेपलीकडचं; पण त्यात सूचित केलेलं दिसतं. यात सहाय्यक ठरते आरतीची आई ललिता. तिच्यात केटीसाठी मैत्रभाव आणि मातृत्वभावाचे संयोगतत्व सामावलेलं दिसतं. या कथेत व्यक्तिरेखाटनाबाबतीत विलक्षण गोष्ट साधलेली दिसते. पात्रांना स्वतंत्र व्यक्तिमत्व देताना, कथा अवकाशात त्यांची संयुगंही असू शकतात, विस्तारू शकतात, अशी शक्यता त्यात सूचित केलेली आहे.

स्त्री-लिखित मराठी कथेच्या खंडाच्या (पद्मगंधा प्रकाशन, २०१४) प्रस्तावनेत, या ग्रंथातील मोनिका गजेंद्रगडकर यांच्या मुलाखतीचा संदर्भ देत मी लिहिले होते, 'अचानक मृत्यूच्या रूपात व्यक्तिगत आयुष्यात आलेली आपत्ती आणि त्यांच्या कथांमधून होणारं मृत्यूचं दर्शन, या संदर्भात त्यांनी केलेलं विवेचन वाचकाला अंतर्मुख करतं. विकल करणारा दुःखाचा मार्ग शहाणपणाच्या वाटेवर नेऊ शकतो, याचाही प्रत्यय त्यात येतो.' या तिन्ही कथा मला त्या बीजाचा, संस्कृती शोधाच्या दिशेनं झालेला आविष्कार वाटतो. एका अर्थी या शहाणिवेच्या मृत्युंजयी कथा आहेत.

मुखपृष्ठ : अन्वर हुसेन

द्वारा : महाराष्ट्र टाइम्स वृत्तसेवा