अस्तित्वाची शुभ्र शिडे

नागनाथ कोत्तापल्ले

लोकवाङ्मय गृह

/media/N7vv7DodvmrL.jpg

पाने : ☀ 240 मुल्य (₹): 300.0

मानुषतेच्या शोधाच्या कथा - डॉ. रवींद्र शोभणे

एखादा लेखक आपली ठरीव चाकोरी धरून लेखन करतो, तर कुणी एखादा लेखक आपल्या अनुभवाच्या प्रकटीकरणासाठी सतत विविध वाटांचा धांडोळा घेत असतो आणि त्यातून तो अनेक वाङ्मयप्रकार हाताळत असतो. हे असे वाङ्मयप्रकार हाताळणे ही त्याच्या व्यक्तिमत्त्वाची मुळात गरज होऊन बसते; म्हणून त्या अनुभवाच्या मागणीनुसार तो त्या त्या प्रकारच्या वाटा शोधत असतो. पण त्याद्वारे तो जी निर्मिती करतो ती त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेकविध पैलूंची ठोस अशी ओळख पटविणारी ठरते. त्यात तो कलावंत सामाजिक बांधिलकी, परिवर्तनशील भूमिका घेऊन उभा राहणार असेल, तर त्याच्या लेखनाला अधिक प्रभावी कंगोरे प्राप्त होतात. त्याची जीवनदृष्टी त्याच्या सर्वच लेखनातून सजग कलात्मभान घेऊन आलेली असते. असेच मराठी साहित्यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे नागनाथ कोतापल्ले!

कवी, कथाकार, समीक्षक, ललित निबंधकार, कादंबरीकार, संपादक आणि सामाजिक-परिवर्तनशील चळवळीचा एक खंदा पुरस्कर्ता अशा विविध नात्यांनी नागनाथ कोत्तापल्ले मराठी साहित्यक्षेत्रात ओळखले जातात. 'अस्तित्वाची शुभ्र शिडे' हा त्यांचा नवा कथासंग्रह. 'सावित्रीचा निर्णय' या कथासंग्रहानंतर तब्बल पंचवीस वर्षांनंतर त्यांचा हा कथासंग्रह प्रकाशित होतो आहे. आपली कथावस्तू ही केवळ आपल्याच नव्हे, तर मराठी कथेच्याही दृष्टीने वेगळी असावी, तिची मांडणी करताना अन्वयार्थाचीही एक ठळक रेघ त्या कथेत अध्याहृत असावी, ही कथाकार म्हणून कोत्तापल्लेंची धारणा आहे; ती त्यांच्या पूर्वीच्याही कथांमध्ये ठळकपणे दिसून येते.

'अस्तित्वाची शुभ्र शिडे' या कथासंग्रहातील कथा त्याअर्थानेच समजून घेणे अधिक उपयुक्त ठरते. या कथासंग्रहात एकूण सात कथा आहेत. डॉ. विलास खोले प्रस्तावनेत या कथांना दीर्घकथा असे संबोधतात. त्याबद्दल काही मतभेद नोंदवता येतील. पण त्याही पलीकडे त्या कथा म्हणून अधिक अर्थपूर्ण ठरतात. हे अर्थपूर्णत्व कशातून प्रतीत होतं? ते कथेच्या आशयातून आणि अभिव्यक्तीतूनही व्यक्त होतं. अभिव्यक्ती म्हटली तर ती तशी प्रयोगशील नाही, पण शैलीदार मात्र नक्कीच आहे. त्यासाठी 'पुस्तक आणि सरुकी बिंदिया' ही फँटसीयुक्त कथा विचारात घ्यावी लागेल. कोत्तापल्ले यांच्या लेखनात ही अशी फँटसी किंवा उपरोधात्मक शैली मधून मधून येते. त्यामागे त्यांचे सामाजिक-राजकीय चिंतन आणि येणारा तिरकसपणा मात्र महत्त्वाचा वाटतो. 'सरुकी बिंदिया' हा प्रतीकात्मक उपग्रह आणि त्या उपग्रहाच्या सफरीवर गेलेलं भारतीय शिष्टमंडळ यांच्या माध्यामातून अनेकपदरी सामाजिक, राजकीय विसंगतीवर लेखक प्रहार करताना दिसतात.

एखादा लेखक अशा फँटसीचा किंवा रूपकात्मकतेचा वापर करताना मुळात आपली भूमिका, पले चिंतन थेटपणे कथात्म किंवा ललितसाहित्यात मांडू शकत नसेल,तर त्याला ही वाट स्वीकारणे अपरिहार्य ठरते. या अर्थाने कथासंग्रहातली एक महत्त्वाची कथा म्हणून 'जैत्रपाळाचा धर्म' या कथेला अधोरेखित करावे लागेल. राजाचा धर्म आणि तपस्वीचा धर्म या दोहोंच्या धर्मतत्त्वातील द्वंद्व हा या कथेचा सनातन विषय आहे. पण या सनातन विषयातून ही आधुनिक तत्त्वविचार, राजधर्म, साधू-महंतांनी धर्माच्या नावाखाली चालवलेला नैतिक अध:पात आणि त्यातूनच जैत्रपाळासारख्या राजाचा अंत आणि त्यातून उभी राहणारी लोककथा, तिच्या माध्यमातून वर्षोनुवर्षे ऐकवली जाणारी ही नीतिकथा हा या कथेचा विषय. एक कथा म्हणून ही कथा मराठी कथाविश्वात ठळकपणे अधोरेखित होणारी आहे.

'अस्तित्वाची शुभ्र शिडे' ही कथा वरवर पाहता एका योगायोगावरची कथा वाटते. आपली काकी प्रवासात मेली म्हणून पोपटशेठ तिचे तेरावे मोठ्या थाटामाटात करतो आणि नेमकी त्याच तेराव्याच्या मंडपात मेलेली काकी हजर होते आणि यातून ही कथा फुलत जाते. माणसाच्या मनातील स्वार्थ, क्षुद्रवृत्तीचा कळस आणि लाचारीची अवनती यांचा मेळ या कथेत लेखकाने अतिशय आत्मीयतेने साधला आहे. हे सगळं पाहून सामान्य संसारी माणसाला एक प्रश्न सतत भेडसावत असतो. माणूस हे सगळं या पातळीवर येऊन का करतो? स्वार्थाच्या अंधपणाने आपण नात्यातील जिव्हाळ्याचे सगळेच कोंभ कधीचेच मुळातून त्याने उखडून फेकून दिलेले आहेत का? या प्रश्नांचं उत्तर वाचकालाच शोधायचं असतं.

सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया, त्यातून जन्माला आलेल्या मूल्यऱ्हासाची शृंखला, त्याच्या मुळाशी असलेली बळकट आणि प्रचंड राजसत्ता आणि यात पिचली जाणारी, नागवली जाणारी माणसे, त्यांच्या भद्र वर्तन-व्यवहाराला कायद्याच्या, सामाजिक तथाकथित चौकटीच्या नावाने दडपून टाकणारी, प्रसंगी चिरडून टाकणारी, नामशेष करणारी विक्राळ व्यवस्था यांच्या द्वंद्वात्मक मांडणीचे हे आशयसूत्र कोत्तापल्लेंच्या एकूणच लेखनाची प्रकृती आहे. यातूनच मग ते आशयच्या मागणीनुसार काही मांडणीचे प्रयोग करू पाहतात. प्रस्तुत द्वंद्वात्मक मांडणीच्या काही कथा या संग्रहात आहेत आणि त्या अधिक उठून दिसतात. त्यातली 'कागदावरून उडालेला गाव' ही शहरीकरणाच्या हव्यासातून ग्रामव्यवस्थेचा बळी देणाऱ्या निब्बर राजकीय व्यवस्थेची कथा आपल्या संवेदनांना खडबडून जागे करणारी अशी आहे. आपल्या विकासाचा वेग कुठल्या दिशेने घोंगावतो आहे, याचा सहजसुंदर आलेख या कथेत मांडला गेला आहे. तीच गोष्ट 'भावना उचंबळून येणाऱ्या देशात' या कथेविषयी सांगता येईल. आज जातीपातीचे अहंकार, अभिनिवेश आणि त्यातून राजकीय दडपशाहीने एखाद्याचा आवाजच बंद करण्याची वृत्ती आज ज्या निर्दयपणे आणि अविवेकीपणे फोफावत आहे, त्याचे दर्शन या कथेत अतिशय प्रभावीपणे होते.

एकीकडे आपण जातीतीत होण्याच्या, माणसाच्या मनातील जात जावी यासाठी आदर्शांच्या, नैतिकतेच्या गप्पा मारीत सुटलो आहोत, पण जात, तिचा अभिनिवेश माणसाच्या मनात किती खोलवर भिनलेला आहे आणि त्यातून राजकीय स्वार्थापलीकडे कुणाल काहीही देणेघेणे नसते; हे वास्तव कथात्म लेखनातून मांडणे ही आजच्या काळातील धारिष्ट्याची गोष्ट ठरते. पण ती तेवढ्याच कलात्मकतेने आणि तटस्थपणे कोत्तापल्ले यांनी मांडली आहे.

माणसाच्या निबरपणाची, संवेदनाशून्य वृत्तीची आणखी एक कथा म्हणून 'हायजॅकिंग' या कथेचाही असाच उल्लेख करावा लागेल. तर मानवी मूल्यांच्या जपणुकीची, नि:स्वार्थी आचरणाची आणि जातीपातीच्या पलीकडे पाहण्याची जाणीव करून देणारी कथा म्हणून 'देसाई घराण्याचा शेवटचा वंशज' या कथेकडे पाहता येईल.

नागनाथ कोत्तापल्लेंच्या या कथांचा विचार करताना एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते आणि ती म्हणजे राजकीय, सामाजिक घुसळणीच्या, मूल्यसंघर्षांच्या आणि त्यातून नव्याने जगण्याकडे पाहायला लावणाऱ्या या कथा आहेत. डॉ.विलास खोले यांची विवेचक प्रस्तावाना कोत्तापल्लेंच्या लेखनाच्या दिशा अधोरेखित करणारी म्हणून महत्त्वाची आहे.

मुखपृष्ठ : सतीश भावसार

द्वारा : महाराष्ट्र टाइम्स वृत्तसेवा