खरं खोटं काय माहीत!

सुजॉय रघुकुल

समकालीन प्रकाशन

/media/gGcIgMblHM8w.jpg

पाने : ☀ 96 मुल्य (₹): 150.0

... हंड्रेड परसेंट रंजक! - मुकेश माचकर

सुजॉय रघुकुल यांचं 'खरं खोटं काय माहीत!' हे पुस्तक नेमकं कोणत्या श्रेणीत गणावं, असा प्रश्न वाचकांना पडू शकतो. कारण, बालवाङ्मय ही फार निसरडी संज्ञा आहे. कारण, अकाली वयात आल्यासारख्या अकालीच 'प्रौढ भाषे'ला प्राप्त झालेल्या मुला-मुलींच्या १९७०च्या दशकात शोभतील अशा गुळगुळीत कविता आणि शब्दबंबाळ निबंधलेखनालाही कुणी बालवाङ्मय म्हणतं, कुणी पन्नाशी-साठी-सत्तरीतले लोक प्रौढत्वातही निजशैशव जपून लेखणीत लिमलेट भरल्यासारखे शब्दफुगे काढतात, त्यालाही बालवाङ्मय म्हटलं जातं आणि सर्वाधिक काळ कोणीतरी काका किंवा काकू किंवा दादा किंवा ताई बालवाङ्मयातून उपदेशाचे, संस्कारांचे महाबोअरिंग पीळ मारत असतात. मुलांसाठी, मुलांच्या वयाचं, मुलांच्या भाषेतलं आणि मुलांच्या अनुभवांशी नातं सांगणारं बालवाङ्मय फारच दुर्मीळ आहे. 'खरं खोटं काय माहीत!' त्यात गणायला हवं!

एकतर हे बालवाङ्मय नाही, किशोरवाङ्मय आहे. चिऊकाऊच्या गोष्टी ऐकण्याच्या वयातलं नव्हे, तर शाळेतल्या 'चिमण्यां'नी लक्ष वेधून घेण्याच्या वयातलं. साहसकथा, विज्ञान काल्पनिका, उपदेशप्रधान साहित्य यांसारखे नेहमीचे यशस्वी प्रकार वगळले, तर या वाङ्मयात दोन अव्वल मानबिंदू प्रस्थापित झालेले आहेत. एकीकडे आहे, प्रकाश नारायण संतांचा 'लंपन' आणि दुसरीकडे मिलिंद बोकीलांची 'शाळा'. या झोनमध्ये नवं काही लिहिणाऱ्याला या दोन्ही दीपस्तंभांचा उजेड टाळून आपली दिवली पेटवावी लागते. ती कसरत सुजॉय यांनी उत्तम साधली आहे. त्यांचा प्रथमपुरुषी कथानायक लंपनसारखा तरल आणि भाबडा नाही; बोकीलांच्या शाळेतल्यासारखा बनेलही नाही. तो अगदीच साधा मुलगा आहे. सगळ्या सामान्य मुलांसारखा गुणावगुणांनी युक्त.

तो जी भाषा बोलतो आहे ती काही या शतकातल्या मुलांची भाषा नाही. हा गेल्या शतकातल्या १९८०-९०च्या दशकांतली, मध्यमवर्गीय मराठी घरातली भाषा बोलणारा मुलगा आहे. तो काळ सायकलींचा होता, म्हणून त्याच्या गोष्टींमध्ये सायकली येतात, तेव्हाची मुलं आंतरभारतीच्या शिबिरांमधून परराज्यात जात, तिथे लोकांच्या घरी राहत, तो संदर्भ येतो. हा काळ प्रखर वीजदिव्यांचा नाही. शहरांचे काही भाग गावांसारखे अंधारे आहेत. त्यात भुताखेतांच्या चर्चांना तरी वाव आहे. एका वयापर्यंत काहीही अपेक्षेच्या विपरीत झालं, भयकारी झालं की याची 'पटाटते,' नंतरच्या वयात टरकायला लागते. यातून त्याच्या काळाचा अंदाज बांधता येतो. मात्र, त्यापलीकडे कसलाच अदमास लागू देत नाही तो कशाचाच. हे या पुस्तकाचं खास वैशिष्ट्य आहे. त्याच्या गोष्टीतला तोही बिननावाचा (सुजॉय रघुकुल हे तरी खरं नाव वाटतं का? टोपणनावच असणार ना!). त्याचे मित्र येतात तेही बिननावाने. भावालाही नाव नाही, बहिणीलाही नाव नाही. मैत्रिणींनाही नावं नाहीत. जिथे अगदी आवश्यक होईल तिथेच माणसांची नावं येतात, बाकी वर्णन किंवा सर्वनामं. बरं याचं गावही निनावी, शाळाही निनावी. त्यातून तो काय साधू पाहतोय, हे गोष्टी वाचता वाचता कळतं. त्याची गोष्ट ही त्याची राहत नाही, त्याच्या काळात त्याच्या वयाच्या असलेल्या सगळ्यांची ती गोष्ट होते. शिवाय आज किशोरवयात असलेल्या आणि आईवडिलांनी घरात 'मराठी मराठी' (आजकाल इंगराठी, हिंदराठी असे नवनवे प्रकार आलेले आहेत मराठीचे) बोलायची, लिहायची, वाचायची सवय लावलेल्या मुलांनाही या गोष्टींमधल्या काही गोष्टी त्यांच्या वाटू शकतात.

शाळकरी वयातले मजेशीर, भयकारी, धाडसी, हसू आणणारे, फजितवडा उडवणारे, रडू आणणारे, अभिमान वाटायला लावणारे, गर्वाचा फुगा फोडणारे, स्तिमित करणारे असे नाना प्रकारचे प्रसंग इथे गोष्टीरूपात मांडलेले आहेत. छोट्या छोट्या गोष्टी. चटकन वाचून संपणाऱ्या आणि उपदेश, जड भाषा, इमोशनल अत्याचार वगैरेंचे डोक्याला शॉट न लावणाऱ्या. यातलं नेमकं काय खरं आहे आणि काय खोटं आहे, हे आपल्यालाही माहीत नाही, हा लेखकाचा दावा आहे आणि तो डिट्टो खरा आहे, असं त्या काळात त्या वयात असलेला कोणीही सांगेल. त्या वयातली कल्पनाशक्तीच तेवढी तरल असते आणि आयुष्यातल्या प्रसंगांचे आपल्याला हवे तसे प्रारंभ-मध्य-शेवट घडवून आणणाऱ्या प्रतिभेचे पंखही सहज लाभलेले असतात.

किशोरवाङ्मय हे मोठ्या माणसांच्या पुस्तकांच्या आकारात नसलं तर मजा येते. समकालीन प्रकाशनाने ते पथ्य पाळलेलं आहे. शिवाय, गिरीश सहस्रबुद्धे यांनी सुजॉय यांच्या नजरेनेच जणू सगळा परिसर पाहिला असावा, अशी चित्रं काढली आहेत आणि गोष्टी सजवल्या आहेत; हे फारच भारी काम झालेलं आहे. मजकुराबरोबरच चित्रांसाठीही वारंवार हातात घ्यावं, असं हे पुस्तक आहे.

मुखपृष्ठ : गिरीश सहस्रबुद्धे

द्वारा : महाराष्ट्र टाइम्स वृत्तसेवा