1984 / १९८४

जॉर्ज ऑरवेल , जयंत गुणे

मधुश्री पब्लिकेशन

/media/bwmZJH2VK9nq.jpg

पाने : ☀ 264 मुल्य (₹): 250.0

नाइन्टीन एटीफोर : एक टिपण - वसंत आबाजी डहाके

नाइन्टीन एटीफोर : एक टिपण

जॉर्ज ऑर्वेल यांची 'नाइन्टीन एटीफोर' ही कादंबरी जागतिक साहित्य क्षेत्रात कायमच चर्चेत असलेली कादंबरी आहे. ती त्यांनी १९४८ साली लिहिली आणि १९४९ साली ती पुस्तकरूपात प्रकाशित झाली. तेव्हा ती समकालीन होती आणि आज २0२0 सालीही ती समकालीनच आहे. १९४९ मध्ये या कादंबरीत भविष्यकालीन स्थिती वर्णिली आहे, ३६ वर्षांनंतर जग कोणत्या स्थितीत असेल याची कल्पना केली आहे असे काही तत्कालीन वाचकांना वाटले असेल. काहींना ३६ वर्षांनंतरच्या जगाची नव्हे, तर आजच्याच जगाची स्थिती या कादंबरीत दाखवली आहे असेही वाटले असेल. १९८४ नंतरच्या ३६ वर्षांमध्ये ही कादंबरी केवळ १९८४ च्या आसपासची नव्हे, तर कालच्या- आजच्या, १९८५ पासून २0२0 पर्यंतच्या काळाची आहे असेही पुष्कळ वाचकांना वाटल्याचे दिसलेले आहे. गेली सत्तर वर्षे ही कादंबरी लोकांच्या नुसत्या स्मरणात नव्हे तर वाचनात आहे. कारण कोणत्याही काळातल्या वाचकाला ती आपल्याच आजच्या काळाचा आलेख दाखवणारी आहे, असे वाटलेले आहे. हिटलरशाही, स्टॅलिनशाही, धार्मिक हुकूमशाही या वस्तुस्थिती आहेत आणि त्यांचीच रूपांतरे जगात अनेक ठिकाणी गेल्या ७0-७५ वर्षांत अनुभवास येत गेलेली आहेत. केवळ राजकीय क्षेत्रातच नव्हे, तर आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रातही कुणीतरी आपल्यावर पाळत ठेवून आहे, याची जाणीव दिवसेंदिवस तीव्रतेने होऊ लागलेली आहे. 'नाइन्टीन एटीफोर'मधले “बिग ब्रदर इज वॉचिंग यू' हे वाक्य आज कोणत्या ना कोणत्या रूपात आणि सर्वत्रच प्रत्ययास येत राहते. 'यू आर अंडर सीसीटीव्ही सर्व्हिलन्स', 'आप सीसीटीवी की निगरानी में है' ही त्याचीच उदाहरणे आहेत. मोबाइल फोनमध्ये तर हरघडी त्याचा प्रत्यय येत राहतो. इतरही काही गोष्टी आज आपल्या वास्तवाच्या भाग झालेल्या आहेत, त्यांचा उच्चार कादंबरीत झालेला आहे. उदाहरणार्थ, दमनकारी सत्ता दोन अधिक दोन बरोबर पाच म्हणायला लावत असते. आपले म्हणणे लावून धरत असते, रेटत असते, नव्हे भडिमार करत असते. ते खोटे आहे हे लोकांना समजत असते. तरीदेखील बहुसंख्य जनता, त्यात बुद्धिजिवी, विचारवंत, मध्यमवर्गीयही आले, ते मान्य करते; परंतु अशाही काही व्यक्‍ती असतात, ज्यांना दोन अधिक दोन बरोबर चार हेच म्हणायचे असते. *नाइन्टीन एटीफोर'मध्ये दोन अधिक दोन बरोबर पाच म्हणणारी सर्वकष सत्ता आणि दोन अधिक दोन बरोबर चार म्हणू पाहणारी सामान्य व्यक्‍ती यांच्यातला विक्राळ संघर्ष आहे. या संघर्षात ही व्यक्‍ती पराभूत होणार, हे वाचकाला आधीपासूनच जाणवत असते. तसे त्याने गृहीत धरलेले असते. अर्थातच त्या व्यक्तीचा पराभव म्हणजे डोके ताळ्यावर ठेवू पाहणाऱ्या सर्वच व्यक्तींचा पराभव हेही माहीत असते. 'नाइन्टीन एटीफोर' वाचताना एका अर्थाने वाचक स्वतःच्याच शोकात्म पर्यवसानाची कहाणी वाचत असतो.

या कादंबरीकडे अनेक दृष्टींनी पाहिले गेले आहे. 'डिस्टोपिया' असे या कादंबरीचे वर्णन केले जाते. युटोपिया ((014) आणि डिस्टोपिया (1)95(०18) असे दोन शब्द आहेत. युटोपिया म्हणजे जे अस्तित्वातच नाही असे स्थळ; म्हणजे काल्पनिक जग; पुढे 'या पृथ्वीवरचे नंदनवन' असा या शब्दाचा अर्थ रूढ झाला. टॉमस मोअर यांच्या १५१६ मधल्या 'युटोपिया' या पुस्तकाच्या शीर्षकावरून हा शब्द रूढ झाला. 'डिस्टोपिया' हा शब्द जॉन स्टुअर्ट मिल यांनी १८६८ मध्ये प्रथम वापरला होता. डिस्टोपिया म्हणजे राहण्यासाठी चांगले नसलेले स्थळ; म्हणजे दमन, छळ, यातना असलेले जग; असुंदर काल्पनिक जग, मात्र हे जग काल्पनिक वाटले तरी काल्पनिक नसते, ते वास्तव असते. दूर कुठेतरी, भविष्यकाळात नव्हे तर वर्तमानकाळात, फार तर नजीकच्या काळात अस्तित्वात येणारे असते. 'नाइन्टीन एटीफोर' ही एक डिस्टोपियन कादंबरी आहे असे म्हटले जाते, तेव्हा ती वास्तवदर्शी कादंबरी आहे, असेच म्हणायचे असते. काही समीक्षकांनी तिला वेगवेगळ्या वर्गवारीत टाकलेले आहे : उपहासिका, भविष्यकथन, अनागतकाळाविषयीची सूचना, काल्पनिका, गुप्तहेर्कथा, मानसिक भयपट, तर काहींनी ही प्रेमकथा (विन्स्टन आणि ज्युलिया यांची प्रेमकथा) आहे, असेही म्हटलेले आहे. ही सर्वच लक्षणे या कादंबरीत आहेत आणि तरीही ती या वर्गबारीच्या कक्षेबाहेर आहे, हेही जाणवते.

ऑर्वेल यांनी सर्वंकष सत्तेची व्यवस्था कशा प्रकारे काम करीत असते, हे या कादंबरीच्या पहिल्या भागात दाखवले आहे. अर्थात, ही विज्ञान काल्पनिका नव्हे, तर ती जबरदस्त राजकीय कादंबरी आहे, हे वाचकाला जाणवत राहते. डिस्टोपिया हा काल्पनिक भूप्रदेश वा मानवजीवन नाही, ते वास्तव आहे. कादंबरीच्या तिसऱ्या भागात बिन्स्टनशी चाललेल्या संवादात ओब्रायन सांगतो, पक्ष सत्ता हातात घेतो ती फक्त स्वतःसाठी. इतरांच्या कल्याणात आम्हाला काहीच रस नाही. आम्हाला फक्त सत्तेत रस आहे. संपत्ती नाही किंबा चंगळ नाही किंवा दीर्घायुष्य नाही किंवा सुख नाही, फक्त सत्ता. विशुद्ध सत्ता. सत्ता हे साधन नाही, साध्य आहे. क्रांती सुरक्षित करण्यासाठी हुकूमशाही स्थापित केली जात नाही, तर हुकूमशाही स्थापित करण्यासाठी क्रांती केली जाते. दि ऑब्जेक्ट ऑफ पर्सिक्यूशन इज पर्सिक्यूशन. दि ऑब्जेक्ट ऑफ टॉर्चर इज टॉर्चर. दि ऑब्जेक्ट ऑफ पॉवर इज पॉवर. आम्ही सत्तेचे पुजारी आहोत, आमचा देव सत्ता हाच आहे. ही सत्ता सामूहिक आहे. व्यक्‍ती पक्षात पूर्णपणे विलीन होते तेव्हा ती व्यक्‍ती म्हणजेच पक्ष असते. सत्ता म्हणजे मानवांवर सत्ता, त्यांच्या शरीरावर, त्याही पलीकडे त्यांच्या मनांवर.

हे ऑर्वेलियन जग आहे. हे जग प्रत्यक्षात यावे, साकार व्हावे यासाठी आधुनिक काळात अनेक देशांतील सत्तांनी प्रयत्न केले, करीत आहेत. काही ठिकाणी ते प्रयत्न फळाला आलेले आहेत. ऑर्वेलने सत्तर वर्षांपूर्वी ते पाहिले. 'नाइन्टीन एटीफोर' लिहून त्या दमनकारी सत्तेचे उग्र, विनाशक रूप शब्दबद्ध केले.

कादंबरीच्या शेवटच्या परिच्छेदात, कॅफेत बसलेला विन्स्टन पोस्टरवरच्या अवाढव्य चेहऱ्याकडे पाहत असतो. त्या मोठ्या मिशांखाली कसले स्मितहास्य दडलेले आहे, हे त्याला गेल्या चाळीस वर्षांत उमगले नव्हते. विन्स्टन स्वतःशी म्हणतो, ठीक आहे, सर्व काही ठीक आहे. संघर्ष संपलेला आहे. त्याने स्वतःवरच विजय मिळवलेला आहे. बिग ब्रदर त्याला आवडू लागलेला आहे.

दमनकारी सत्तेतल्या माणसाविषयीचे ऑर्वेलचे हे डिस्टोपियन, विपरीत भाष्य आहे.

- वसंत आबाजी डहाके

द्वारा : पुस्तकातुन साभार