जाणिवांची फुले

डॉ. कैलास दौंड

/media/G6qZO3zlnQQB.jpg

मुलांना मौलिक शिकवण देणारा बालकथासंग्रह 'जाणिवांची फुले'. - प्रा. देवबा पाटील, खामगाव जि. बुलढाणा

• मुलांना मौलिक शिकवण देणारा बालकथासंग्रह 'जाणिवांची फुले'.
प्रा. देवबा पाटील.

पूर्वीच्या काळी जरी वाचनसंस्कृती जास्त विकसित झालेली नव्हती तरी एकत्र कुटुंबपध्दती असल्यामुळे मुलामुलींना दररोज रात्री झोपण्यापूर्वी आजीकडून एखादी मनोरंजक गोष्ट हमखास ऐकायला मिळायची तर आजोबांकडून एखादा व्यावहारीक धडा शिकायला मिळायचा. त्यातून कळत नकळत त्यांच्या बालमनावर सुसंस्कार घडायचेत जे भावी काळात त्यांच्या कामी यायचेत. आजच्या विभक्त कुटुंबपध्दतीत मुलेमुली आजीआजोबांच्या ह्या सुंदर व रमणीय गोष्टींना मुकली आहेत. परंतु आजच्या काळातील अनेक बालसाहित्यिकांनी वेगवेगळ्या प्रकारची बालसाहित्याची पुस्तके लिहून ही उणीव दूर करण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे, करीत आहेत. अर्थात पालक किती जागरूक आहेत व अशी जीवन घडवणारी बालकविता, बालकथा व बालकादंब­ऱ्यांची पुस्तके आपल्या मुलांपर्यंत किती प्रमाणावर पोहचवतात नि त्यांना वाचायला प्रोत्साहन देतात आणि विशेष महत्वाचे म्हणजे त्यांच्याजवळून ती पुस्तके वाचून घेण्यासाठी आपला दररोजच्या जीवनातील वेळ किती देतात हा प्रश्नही मोठा विचार करण्यासारखा आहे. पण असाच एक सुंदरसा व प्रशंसनीय प्रयत्न सुप्रसिध्द साहित्यिक डॉ. कैलास दौंड सरांनी आपल्या 'जाणिवांची फुले'ह्या इसाप प्रकाशनाद्वारे नुकताच प्रकाशित झालेल्या बालकथासंग्रहाद्वारे केला आहे. डॉ. कैलास दौंड ह्यांचे ह्याआधीही अनेक कथासंग्रह, काव्यसंग्रह, बालकाव्यसंग्रह, कादंब­ऱ्या असे सर्वांगसुंदर साहित्य प्रकाशित झालेले आहे व ते वाचकांच्या नि बालसाहित्य बालकांच्या पसंतीसही उतरलेले आहे.
ह्या बालकथासंग्रहात एकूण सोळा कथा आहेत. त्यातील पहिलीच कथा "पशुपक्ष्यांची पाणपोई" ही आहे. आजच्या अतिशय उष्णतामानाच्या काळात विशेषत: उन्हाळ्याच्या दिवसात तहानलेल्या पशुपक्ष्यांना पिण्यासाठी पाणी मिळणे खूपच दुरापास्त झाले आहे. ह्या कथेद्वारे मुलांना भूतदया हा गुण शिकण्यास मिळतो व ते आपल्याही घरी वा दारी अशा पाणपोईची व्यवस्था जरूर करतील ही खात्रीच आहे. 'घाटेवाडीची शूर सोनाली' ह्या कथेतून सोनाली ही तिच्या आजीला बुडण्यापासून कशी वाचवते हे वाचून मुलांना निर्भयतेने प्रसंगावधानी बनण्याचा संदेश मिळतो. अशीच एक धाडशी अश्विनी मुलांना 'महाराष्ट्राची वाघीण 'ह्या कथेमध्ये भेटते. ह्या दोन्हीही कथा मुलांच्या अंगी धाडस हा सद्गुण वाढविण्यासाठी खूप उपयोगी आहेत.
तिस­ऱ्या 'फुटकी पाटी' मधून आईची माया व तिची मुलाच्या जीवनाची पाटी फुटू नये म्हणून करावयाची धडपड दिसून येते. यातून तडजोडीशिवाय जीवन नाही ही शिकवण मुलांना तर मिळतेच पण मुलांची मानसिकता कशी जोपासावी हा धडा पालकांना मिळतो. 'सात रंगांचं गुपित' ह्या लघुकथेतून ऊन पाऊस यांची लेखकाने मानवी जीवनातील दु:ख व सुखाशी छानशी सांगड घातली आहे. आणि त्यातूनच इंद्रधनुष्यासारखे सुंदर जीवन घडते हा मोलाचा संदेश दिला आहे. 'आंब्याचा वाढदिवस' ह्या गोष्टीतून प्रत्येक वाढदिवसाला आंब्याचे झाड लावण्याची प्रथा सुरू करणे हे वृक्षारोपणाला खतपाणी घालणारे तर आहेच पण आंब्याचा वाढदिवस साजरा करण्याची कल्पना ही मुलांना एका वेगळ्या दुनियेत घेऊन जाते व त्यांच्या मनावर आंब्याची उपयोगिता आपोआप ठसते नि त्यांना झाडांचे संगोपन करण्याचे महत्वही त्यांना कळते.
वाचनाचे महत्व जाणणा­ऱ्या व मुलांच्या मनात वाचनाची आवड निर्माण होऊन वाचनाने मुलांचे जीवन घडावे अशी मनातून आंतरिक कळकळ असणा­ऱ्या सविताकाकूची 'पुस्तकवाल्या काकूची गोष्ट' ही मुलांच्या मनाला वाचनाची गोडी तर लावणारी आहेच पण वेगवेगळ्या क्लासेसच्या नावाखाली मुलांचे बालपण हिरावून घेणा­ऱ्या पालकांना धडा देणारीही आहे. आजच्या काळात अत्यंत आवश्यक असलेले मुलांचे बालपण जपणे हा मोलाचा संदेश पालकांना ह्या कथेतून मिळतो. 'काठी जीवंत झाली 'ही या बालकथासंग्रहातील एक वेगळ्याच वळणावरची म्हणजे विज्ञानाधारित पण एक रंजक व कुतूहलवर्धक अशी बालकथा आहे. 'गोष्ट सहलीला न गेलेल्या मुलांची' आपली परिस्थिती पाहून वागावे हा पाठ तर मुलांना मिळतोच पण आपणाजवळ उपलब्ध असलेल्या परिस्थितीतून व साधनांतूनही ज्ञानवर्धन करता येते यासह सहल कशी ज्ञानदायी व माहितीवर्धक असते हा बोध मुलांना होतो.
अशाचप्रकारे इतरही सा­ऱ्या कथा वाचनीयच आहेत. ह्या बालकथासंग्रहातील एकंदरीत सर्वच गोष्टी ह्या मुलांच्या विचारांना चालना देणा­ऱ्या, त्यांच्या मनावर सुसंस्कार करणा­ऱ्या, त्यांना मौलिक शिकवण देणा­ऱ्या रंजनप्रधान अशा आहेत. प्रवाही संवादशैली असल्यामुळे ह्या बालकथासंग्रहातील जीवंत रंजकता निश्चितच बालमनाला मोहवून घेईल यात थोडासाही संदेह नाही. 'किशोर' मासिकाचे प्रयोगशील व कार्यप्रवण असे कार्यकारी संपादक किरण केंद्रे सरांची मलपृष्ठावरील पाठराखण ही खूप बोलकी व पुस्तकाची वैशिष्ट्ये नि उपयोगिता अधोरखित करणारी आहे. असा उत्कृष्टसा बालकथासंग्रह सादर केल्याबद्दल डॉ.कैलास दौंड याचे मन:पूर्वक अभिनंदन व त्यांना भावी वाङमयीन प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा.
• जाणिवांची फुले :बालकथासंग्रह
• लेखक: डॉ. कैलास दौंड
•प्रकाशक: इसाप प्रकाशन, नांदेड
•प्रथमावृत्ती : ५ सप्टेंबर २०२१
• पृष्ठे : ९० •मूल्य : १००₹
~~~~~
-प्रा.देवबा शिवाजी पाटील,
गोविंदनगर, (नांदुरा रोड),
खामगाव.जि.- बुलडाणा.444303

~~~~~

द्वारा : पुस्तकातुन साभार