बीट्स अ‍ॅण्ड बाईटस्

रश्मी पदवाड मदनकर

/media/Vm30iQQLXcYT.jpg

पुस्तक परीक्षण- वैविध्य झुंज - नवनाथ पवार

काही पुस्तकं आपल्याला अक्षरश: झपाटून टाकतात. सुरुवात झाली की, तहानभूक, कामधाम, झोप विसरून अधाशासारखी आपण ती वाचूनच दम घेतो. नंतर कित्येक दिवस त्याच नशेत झिंगलेलो असतो. इतका त्याने तुमच्या भावविश्वाचा ताबा घेतलेला असतो. तसे रश्मी पदवाड-मदनकर यांचे 'बीट्स अॅण्ड बाईटस्' हेही तुमच्या भावविश्वाचा ताबा घेणारेच पुस्तक असले, तरीही ते अगदी वेगळ्या प्रकारचे आहे. एखाद्या सुरम्य कादंबरीसारखे एकाच रात्रीत वाचून हातावेगळे करूच शकत नाही. ते तुम्हाला कुठली नशाही आणत नाही. उलट तुमचे भावविश्व बोचकारून काढत तुमची झोप उडविते. पांढरपेशा जगण्याची नशा उतरविते. टीव्ही, वृत्तपत्र, इंटरनेट यातून आपल्यावर अफाट माहिती आणि घटनांचा मारा होत असताना आपल्या संवेदना अक्षरश: बधीर होत गोठून जातात. वास्तविक जगात कोण कसल्या नरकयातना भोगतेय, कधीकाळी त्याचा आपल्या जीवनावर काही बरा वाईट परिणाम होणार आहे, याबाबत आपण निर्ढावून बेफिकिर होतो.

'बीट्स अॅण्ड बाईटस्' तसा तर वेगवेगळ्या नियतकालिकांत प्रसिद्ध होऊन गेलेल्या स्फुट लेखांचा संग्रह आहे. पण, एक प्रकरण वाचले की थांबावे लागते. मनात अनेक अस्वस्थ भावनांचे थैमान सुरू होते. चांगल्या लेखनाचे हेच लक्षण असते की, ते वाचकांच्या बधीर संवेदना जाग्या करते. त्यातील लेखांचे संकलन, आधी-व्याधी, कथा-व्यथा, वैशम्यलहरी, नाद-अनाहद अशा चार विभागांत केलेले आहे. एकूणच लेखांचा विषय माणूस, समूह आणि समाज म्हणून त्यांचे जगणे हाच आहे. त्यांच्या जगण्यात पराकोटीचे वैविध्य आणि विषमता ठासून भरलेली असते. त्यातून ते आपापल्या वाट्याला आलेल्या परिस्थितीशी कशी झुंज देतात किंवा जुळवून घेतात. एकीकडे विस्मित करणारी विजिगीषू वृत्ती तर दुसरीकडे माणुसकीचे चिपाड करून टाकणारी लाचारी, दैन्य. यातून उभा राहणारा किंवा चिरडून निघणारा माणूस हा रश्मी यांच्या चिंतनाचा विषय आहे. त्यात स्थानिक, राष्ट्रीय ते आंतरराष्ट्रीय अशा सर्व प्रकारच्या घटना, घटकांची नोंद आहे.

उदाहरणादाखल आधीव्याधी विभागातील 'दुर्दैवाचा दशावतारी देश-सीरिया' हा लेख घेऊ. इसिसच्या नृशंस अत्याचाराच्या सर्वाधिक बळी तेथील स्त्रीया ठरल्या. त्यांच्या करुणापूर्ण जीवनाचे दर्शन घडवतानाच रश्मी यांनी त्यांच्यातील विजिगीषू वृत्तीचे घडविलेले दर्शन विस्मित करणारे आहे. इतक्या नरकयातना भोगल्यावर सीरियन स्त्री शरण जात नाही तर स्वत:ची अब्रू, अस्तित्व आणि मातृत्व यांच्या संरक्षणासाठी संघटित होत, एका हातात बंदूक आणि कडेवर तान्हे मूल घेऊन उभी आहे. तिला सलाम करावासा वाटतोच, पण लेखिकेने त्या मागचा इतिहास, अर्थकारण, राजकारण, समाजकारण, आंतरराष्ट्रीय आयाम याचा विलक्षण आलेखही चितारला आहे. वाचकाचे भावविश्व ढवळून काढतानाच त्याची जाणीव प्रगल्भ करणारी, प्रवाही लेखनशैली वाचकाला आपलेसे करत जाते. 'कुमारी माता एक गंभीर समस्या' या दुसऱ्या लेखात त्यांनी आंध्र प्रदेश, यवतमाळ सीमा भागातील पांढरकवडा, वणी या आदिवासीपट्ट्यातील अल्पवयीन मुलींच्या दुर्दैवाची कहानी चितारली आहे. आपल्या तथाकथित महान संस्कृतीच्या सभ्यतेचा बुरखा फाडतानाच आपल्यातील संवेदनशीलतेला आर्त साद घालणारी कहानी आहे. हाक बलुचिस्तानची, संवेदनेच्या सहाणेवर, पाव शतकाचा आक्रोश, मिसाल ए हिम्मत, एक खूबसूरत दर्द 'शरबत गुल', नर मादी पलीकडचा माणूस, असे कितीतरी लेख याचप्रकारे वाचकातील माणसाच्या डोळ्यात अंजन घालणारे आहेत.

याशिवाय काही लेख प्रासंगिक, सामाजिक, चिंतन मांडणारे आहेत. संस्कृती पतनाचा महोत्सव, स्केटिंगची गरुडझेप, पाटीवरचा हक्क, आकांक्षापुढती गगन ठेंगणे, शिंग फुंकिले रणी ही काही वाणगीदाखल उदाहरणे. नाद अनाहद हा विभाग मात्र सृजनशील कला, साहित्य, संगीत, मनोरंजन यांची नोंद घेणारा आहे. मेरा कुछ सामान, काही गुलजारमय लम्हे, वो न आयेंगे पलटकर, अलविदा मुबारक आदी लेख विशेष उल्लेखनीय आहेत.

रश्मी या पत्रकारितेत असल्याने लेखन आटोपशीर, प्रासादिक ठेवतानाच त्यासंबंधीचे संदर्भ संशोधन, चिकित्सक मांडणी वाचकाला काहीतरी अधिकचे देत, विचार करायला प्रवृत्त करते. किंबहुना एक प्रगल्भ दृष्टिकोनही देते. यातले लेख पुन्हा पुन्हा वाचावेत इतके चांगले आहेत. प्रवासात असताना रोजच्या रुटीनचा कंटाळा आला असताना कुठलेही पान उघडावे आणि वाचायला सुरुवात करावी. जराशा वेगळ्या विश्वाचा फेरफटका मारून यावे असेच त्याचे स्वरुप आहे. कथा, नाट्यलेखन करणाऱ्या लेखकांसाठी तर त्यात संदर्भ, कथाबिजांचा खजिना आहे.

द्वारा : महाराष्ट्र टाइम्स वृत्तसेवा