भगवंताचं न्यूजलेटर

राजेंद्र वैशंपायन

/media/EITjlNWi6jEW.jpg

व्हॉट्सअपवरील सकारात्मक लेखन - गणेश कदम

सध्या मोकळं होण्याचा जमाना आहे. व्हॉट्सअप आल्यापासून हा वेग भलताच वाढलाय आणि या वेगानं विचार करण्याचा वेळही चोरलाय. त्यातही व्हॉट्सअपवर टाकला जाणारा विचार स्वत:चाच असायला पाहिजे अशी अट नसते. किंबहुना अनेकदा तो नसतोच. विचारांच्या बाबतीत आपण फक्त 'फॉरवर्ड'कर झालोय. अर्थात, याला काही अपवादही असतात. फॉरवर्डच करायचं आहे तर आपला ओरिजिनल विचार, आपल्या स्वत:च्या चिंतनातून गवसलेलं काही फॉरवर्ड करू या असा विचार काहीजण करतात. गांभीर्यानं आणि चिकाटीनं तो अंमलात आणतात. अशा चिंतनातून मग काहीतरी वेगळंच हाती लागतं. राजेंद्र वैशंपायन यांचं 'भगवंताचं न्यूजलेटर' हे पुस्तक यापैकीच एक!

हे पुस्तक म्हणजे दैनंदिन जीवनात घडलेल्या प्रसंगांवर चिंतन करून त्यातून नव्यानं आकळलेल्या अनुभवांचं शब्दचित्रण आहे. हे शब्दचित्रण लेखकानं अर्थातच व्हॉट्सअपवर केलं आहे. यातील अनुभव लेखकाचे असले तरी ते रोजच्या जीवनातील असल्यानं वाचकांना ते आपले वाटतात. सलूनमध्ये फेशियल करणारा माणूस, घरी येणारा प्लंबर, बिल्डिंगवरील पाण्याची टाकी, शँपू पाउच अशा छोट्या छोट्या गोष्टींवर लेखकानं बारकाईनं केलेला विचार इथं दिसतो. यशाचे शारीरिक साइड इफेक्ट्सही असतात आणि ते कसे परिणाम करतात हे एका लेखातून लेखकानं सांगितलंय. लेखकानं सांगितलेले प्रसंग आणि त्यावर केलेलं भाष्य वाचून 'अरेच्चा, हे आपल्याला कसं सुचलं नाही किंवा आपण असा विचार का केला नाही', असं वाचकाला वाटत राहतं, ही पुस्तकाची जमेची बाजू आहे. दोन महनीय व्यक्तींची पत्रापत्री, वृत्तपत्र, मासिकांतील लेखांच्या संकलनाची पुस्तकं आजवर अनेक आलीत. पण व्हॉट्सअपवरील लेखांच्या संकलनाचं हे बहुधा पहिलंच पुस्तक आहे. पुस्तकातले सर्वच लेख वाचनीय, विशेषत: सकारात्मक विचार करायला लावणारे आहेत. 'काँटिनेंटल नैवेद्य', 'कृतज्ञतेचा निर्देशांक', 'माणुसकीचं MLM', 'स्थितप्रज्ञतेचा रबरबँड', 'मारुतीराया आणि फ्लाईंग किस' हे मथळे उत्सुकता वाढवणारे आहेत.

पुस्तकाची मांडणी अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. लेखक केवळ आपले अनुभव मांडून थांबलेला नाही. तर, वाचकांना ते कसे वाटले हे जाणून घेण्याची उत्सुकताही त्याला आहे. त्यामुळंच प्रत्येक लेखाच्या शेवटी एक मोकळं पान सोडण्यात आलंय. त्यावर लेखकाचा मोबाइल नंबर देण्यात आलाय. 'वाचल्यावर काय वाटलं...' हे वाचकांनी त्या पानावर लिहून त्याचा फोटो काढून पाठवण्याचं आवाहन लेखकानं केलंय. हा एक वेगळाच प्रयत्न आहे. व्हॉट्सअप स्क्रीन दाखवणारं मुखपृष्ठावरील मोबाइलचं छायाचित्र पुस्तकाच्या आशयाला साजेसं असंच आहे.

माध्यमाचा योग्य वापर कसा करता येतो याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. शैलीच्या बाबतीत पुस्तकातून फारसं काही हाती लागत नाही. मात्र, आयुष्यातील छोट्या-छोट्या गोष्टींतून जगण्याचा आनंद कसा मिळवता येऊ शकतो हे सांगणारं हे पुस्तक आहे.

मुखपृष्ठ : मयंक परमार

द्वारा : महाराष्ट्र टाइम्स वृत्तसेवा