स्मॅशिंग डॅशिंग कथा

गीतांजली भोसले

रोहन प्रकाशन

/media/lB9twxR3y2py.jpg

पाने : ☀ 182 मुल्य (₹): 300.0

मुलांसाठी साहसी कथा - मंगल कातकर

लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना गोष्टी वाचायला आवडतात. चिऊ-काऊच्या गोष्टी, बोधकथा, अद्भुत कथा, पौराणिक, ऐतिहासिक अशा सर्व प्रकारच्या कथा मुलांना आवडतात. पण जर या कथा त्यांच्या रोजच्या जीवनाशी जोडणाऱ्या, वास्तवतेबरोबर कल्पनाविश्वातही रममाण करणाऱ्या असल्या तर? .. तर त्या वाचायला मुलांना खूप मज्जा येते. अशाच सहा कथा आपल्याला वाचायला मिळतात त्या ‘स्मॅशिंग डॅशिंग कथा’ संचातल्या कथांमध्ये. गीतांजली भोसले यांनी लिहिलेल्या या कथा तीन छोटेखानी पुस्तकांत छापलेल्या आहेत.

पहिल्या पुस्तकात ‘ ब्लॉक’ व ‘अनन्या मिसिंग केस’ या दोन कथा आहेत. जगात सगळीकडे पसरत चाललेला माणसामाणसांतला द्वेष, वाढणारी धार्मिक, वांशिक तेढ व होणारा हिंसाचार आपण पाहतो आहोत. या सगळ्याचा परिणाम पुढच्या पिढीवर व्हायला लागला आहे. आज नवीन पिढीचा भावनांक घसरतो आहे. त्यामुळे हिंसा कमी होण्याऐवजी वाढण्याची भीती आहे. लेखिकेने निर्माण केलेले शुम्भकांचं अद्भुत जग, े ब्लॉकची निर्मिती व जग सुंदर करण्यासाठी हिंसाचाराला नष्ट करणारी लस निर्माण केलेली दाखवून शांत, सुंदर, अहिंसात्मक जगणं हेच जग टिकवण्याचा खरा मार्ग असल्याचं कथेत दाखवून दिलं आहे. कुणीतरी अचानक हरवलं की त्या घरातल्या लोकांना कोणकोणत्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं हे ‘अनन्या मिसिंग केस’मध्ये वाचायला मिळते. आरोग्य सांभाळणे व त्यासाठी खेळ खेळणे कसे महत्त्वाचे असते हे ही कथा सुचवताना दिसते.

दुसऱ्या पुस्तकात ‘त्रिकाळ ‘ व ‘द सेन्ड ऑफ’ या दोन रहस्य उलगडणाऱ्या आणि थरारक अनुभव देणाऱ्या कथा वाचायला मिळतात. त्रिकाळाचं दुष्ट, जादूमय जग, त्यात फसलेली राजकन्या स्वत:ची व राज्याची सोडवणूक इतर दोन मुलींच्या साह्यने कशी करते हे वाचताना मजा येते. कायद्याने मुलीला आई-वडिलांच्या संपत्तीत समान वाटेकरी जरी मानलं असलं तरी आजही समाजात ते प्रचलित झालेलं नाही. तिला मिळणारा कायदेशीर हक्क डावलण्यासाठी प्रसंगी तिचा जीवही घेतला जाऊ शकतो हे भयाण वास्तव ‘द सेन्ड ऑफ’ या कथेत पाहायला मिळतं. शाळेतल्या निरोप समारंभाच्या वेळी झालेला मुलीचा मृत्यू आत्महत्या नसून खून आहे हे एक महिला डिटेक्टिव्ह कसं शोधून काढते हे या कथेत खरोखर वाचण्यासारखे आहे.

तिसऱ्या पुस्तकात ‘समर कॅम्प’ व ‘कनुस्मृती’ या दोन कथा आहेत. हल्ली मोबाइलच्या कूटपाशात अडकलेल्या मुलांना निसर्गातल्या छोटय़ा छोटय़ा गोष्टींतला आनंद अनुभवता येत नाही. एकत्र काम करणं, एकमेकांच्या भावना समजून घेणं, निसर्गात रमणं त्यांना माहीत नाही. हे कळण्यासाठी समर कॅम्पसारखे उपक्रम राबवले तर मुलं किती वेगवेगळ्या गोष्टी शिकतात व निखळ आनंद कसा मिळवतात हे ‘समर कॅम्प’ कथेत लेखिकेने छान दाखवून दिलं आहे. ‘कनुस्मृती’ कथेची नायिका नकुशा समाजातल्या नको असणाऱ्या मुलींचं प्रतिनिधित्व करताना दिसते. वास्तवता आणि अद्भुतता यांचा सुरेख मेळ घातलेली ही कथा वाचकांची उत्सुकता वाढवणारी आहे.

तिन्ही पुस्तकांतल्या सहाही कथा या नावाप्रमाणे ‘स्मॅशिंग डॅशिंग’ आहेत. कथांची भाषा सरळ, प्रवाही असून, त्या वाचकाची उत्कंठा वाढवणाऱ्या आहे. या सहाही कथा नायिकाप्रधान आहेत. प्रत्येक पुस्तकाचं मुखपृष्ठ त्यात असणाऱ्या कथेला साजेसं आहे. कथेच्या सुरुवातीला व मधे मधे कथेला अधिक उठावदार करणारी सानिका देशपांडेंची सुंदर रेखाचित्रं पुस्तकांतून आहेत. मोबाइल युगातल्या स्मार्ट मुलांना आवडतील अशा साहसी, आयुष्याचं सार सांगणाऱ्या आणि कल्पनेच्या अद्भुत जगाची मुशाफिरी करायला लावणाऱ्या स्मॅशिंग डॅशिंग कथा मुलांबरोबर मोठय़ांनाही नक्कीच आनंद देणाऱ्या आहेत. ६

स्मॅशिंग डॅशिंग कथा
तीन पुस्तकांचा संच

द्वारा : लोकसत्ता वृत्तसेवा